Monday, April 29, 2024

6. वामन आबाजी मोडक ( 1835? - 1897)


मूळचे रत्नागिरी येथील वामन आबाजी मोडक यांचे, प्राथमिक शिक्षण दापोलीला झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबईतील एका पारशी विद्या फंडातून आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण सुकर झाले. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या चार पदवीधरांपैकी वामन आबाजी एक. न्यायमूर्ती रानडे, डॉ. रा गो भांडारकर, बी. एम वागळे हे बाकीचे तीन. साल होते 1862. पुढे संस्कृत आणि इंग्रजी विषय घेऊन त्यांनी एम. ए. केले. व्याकरण, साहित्य, वेदांत, न्याय यांचा अभ्यासही त्यांनी केला. हिंदु धर्म तसेच ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, पारशी या धर्मांचाही त्यांनी अभ्यास केला.

एल्फिन्स्टन हायस्कूलमधे ते मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय होते. जवळ जवळ अकरा वर्ष त्यांनी हा कार्यभार सांभाळला.
मुंबई विद्यापीठाची फेलोशीपही त्यांना मिळाली.
प्रार्थना समाजाचे ते सदस्य होते. तिथे कीर्तनं करणे, त्या मार्फत समाजप्रबोधनाचा प्रयत्न ते करत. किर्तनाची पद्धत जुनी परंतु कीर्तनाचे विषय नवीन असत. अगदी येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस, व्यापार, विविध कौशल्य, बालविवाहाचे दोष, जुगाराचे तोटे असे विविध विषय ते आपल्या कीर्तनामधे मांडत.
वामन आबाजी यांनी लेखनापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. याचे उत्तम उदाहरण ही कीर्तने होत.

तसेच वामन आबाजी, न्या. म. गो. रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर यांनी मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून हुजूरपागा ही शाळा सुरु केली.
कामगारांना शिक्षण देण्यासाठी रात्रशाळा प्रार्थना समाजाने सुरु केल्या, त्यातही वामन आबाजींचा मोठा सहभाग होता. 
मुंबईमधे पहिला विधवा विवाह झाला (1893) तेव्हा त्या विवाहाला वामन आबाजींनी जाहीर संमती दिली. तेव्हा त्यांच्यावर समाजाने बहिष्कार घातला होता.

वामन आबाजींनी उपनिषदे मराठीमधे आणण्याचा प्रयत्न केला, पण ते काम अपूर्ण राहिले. त्यांची सुधारणे संदर्भातली, प्रार्थना समाजातील अनेक पदे आजही उपलब्ध आहेत. शिवाय "उत्तरनैषधचरित" नावाचे एक गद्य-पद्य असलेले नाटकही त्यांनी लिहिले.

न्या. रानडे, डॉ. भांडारकर, विष्णुशास्त्री पंडीत यांच्याशी त्यांचे अतिशय मैत्रीचे संबंध आयुष्यभर राहिले.
--- 

No comments:

Post a Comment