Thursday, January 25, 2024

भारताचा प्रजासत्ताक दिन



प्रजासत्ताक देशामध्ये, देशाचा प्रमुख हा लोकांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीने निवडलेला असतो. एक निश्चित नियम समूह म्हणजेच राज्यघटना (संविधान), देशातील लोकांनी सर्वसंमतीने स्विकारलेली असते. अशा देशात सर्व शासकीय कार्यालये व पदं ही देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात.


इ. स. १९४७ मधे भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताने राज्यकारभारासाठी प्रजासत्ताक पद्धती स्विकारायचे ठरवले. त्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती तयार केली गेली. या समितीने अतिशय सखोल अभ्यास करून भारताची राज्यघटना (संविधान) तयार केली.


स्वातंत्र्यपूर्व काळात, २६ जानेवारी १९३० रोजी जवाहरलाल नेहरु यांनी तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. या प्रसंगाची आठवण म्हणून, २६ जानेवारी १९५० रोजी भारताने ही राज्यघटना स्विकारली आणि लागू केली गेली. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

या दिवशी, दर वर्षी राजधानी नवी दिल्ली येथे मोठे संचलन आयोजित केले जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. अनेक देशांच्या प्रमुखांना तसेच भारतातील विविध क्षेत्रातील माननीयांना आमंत्रित केले जाते. 


प्रथम वीरगतिप्राप्त सैनिकांना  श्रद्धांजली वाहिली जाते. तसेच सैन्यातील पराक्रमींना अशोक चक्र, किर्ती चक्र हे पुरस्कार दिले जातात. नंतर विविध शौर्य पुरस्कार दिले जातात.

 त्या नंतर तीनही सैन्य दलांचे (पायदळ, नौदल, वायुदल) यांचे संचलन होते. विविध शस्त्रास्त्रे, रणगाडे, विमाने यांचेही संचलन होते; भारताच्या लष्करी सामर्थ्याची ती एक झलक असते. नंतर प्रत्येक राज्याचे एक एक संचलन होते. यात आपापल्या संस्कृतींची झलक, राज्याचे नागरिक सादर करतात. महाराष्ट्राचा चित्ररथ आपले प्रतिनिधित्व करतो. 

२६ जानेवारी रोजी सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी संस्था, खाजगी संस्था, कार्यालये, ग्रामपंचायत, अशा सर्व ठिकाणी ध्वजवंदन केले जाते. 

भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५० या दिवशी साजरा झाला. आज आपण आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. 


आपले प्रजासत्ताक चिरायु होवो! 

जय हिंद, जय भारत, जय भारतीय जनता!

🇮🇳😊😇🙏🏻