Sunday, April 14, 2024

प्रार्थना समाज


ब्रिटिश राजवट भारतात स्थिरावल्यानंतर आणि इथे पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण सुरू झाल्यानंतर येथील नवशिक्षक भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी नवे विचारांची जाणीव होऊ लागली. जोडीने पाश्चात्य धर्म, धार्मिक विचार, मिशनरी यांचा प्रभावही वाढू लागला. काही विचारी सुशिक्षितांना, आपल्या समाजात सुधारणा केली पाहिजे असे वाटू लागले. बंगालमध्ये  राजा राममोहन राय यांनी 1828 मध्ये ब्राम्हो समाजाची स्थापना केली. आपल्या धर्मातील दुष्परिणामांची जाणीव आणि ख्रिश्चन धर्मातील विसंगत गोष्टी या दोन्हीवर येथील सुधारकांचा विचार सुरू झाला. राजा राममोहन रॉय यांच्या कार्याची माहिती बघून महाराष्ट्रातील सुधारक दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभेची स्थापना 1848 मध्ये मुंबई येथे केली. खरे तर ही समाज सुधारण्यासाठीची संस्था. परंतु त्या काळात असे विचार मांडणे हेही अतिशय धाडसाचे होते. पारंपारिक धर्म मार्तंडांचा प्रचंड प्रभाव समाजावरती होता. त्यामुळे ही संस्था गुप्त स्वरूपात होती. एकेश्वरवाद, रोटीबेटीचे बंधन तोडणे, जातीभेद मोडणे ही त्यांची मूळ उद्दिष्ट होती. या गुप्त संघटनेतील सदस्यांची यादी कोणीतरी पळवली आणि त्यामुळे सगळे सदस्य हादरले. आपले नाव उघड झाले तर समाज आपल्याला वाळित टाकेल अशी भीती वाटल्यामुळे परमहंस सभा संपुष्टात आली. (1860) ( तेव्हा वाळित टाकणं हे अतिशय गंभीर असे. त्या घरांशी कोणताही संपर्क केला जात नसे)


 1864 मध्ये ब्राह्मण समाजाचे ज्येष्ठ नेते केशवचंद्र सेन यांची मुंबई आणि पुणे येथे जाहीर व्याख्याने झाली. या व्याख्यानांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुन्हा येथील समाजसुधारकांनी चंग बांधला. आणि मुंबईत 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली आत्माराम पांडुरंग म्हणजेच दादोबा पांडुरंगाचे धाकटे भाऊ यांनी ही स्थापना केली. या संस्थेच्या पुणे, नगर, सातारा या ठिकाणीही शाखा निघाल्या.  प्रार्थना समाजामध्ये नंतर अनेक मोठे सुधारक सामील झाले. न्यायमूर्ती म. गो. रानडे, भाऊ महाजन, न्या. ना.ग. चंदावरकर,  व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर, मामा परमानंद, सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे ( बहुजन समाजापर्यंत प्रार्थना समाज नेण्याचे काम यांनी केले), वामन आबाजी मोडक, इत्यादी.

 प्रार्थना समाजामध्ये तुकाराम आणि इतर संतांना मोठे महत्त्वाचे स्थान होते. अध्यात्म आणि संतांचे अभंग अशी मोट त्यांनी बांधली. 

सत्य, ज्ञान आणि आनंद अशा रूपातील सगुण ईश्वर प्रार्थना समाजाने मानला. उदबोधन, स्तवन, ध्यान व प्रार्थना, उपदेश, आरती अशा उपासना पद्धती प्रार्थना समाजामध्ये स्वीकारल्या. ईश्वर एकच आहे, त्यांनी विश्व निर्माण केले आहे, त्याची केवळ उपासना करणे पुरेसे आहे, सत्याची कास धरून केवळ मानसिक पूजन करणे पुरेसे आहे, असे प्रार्थना समाज बांधतो. मूर्ती व प्रतिमा यांचे पूजन प्राथमिक प्रार्थना समाज नाकारतो. तसंच त्यांना अवतारही मान्य नाहीत, आणि विशिष्ट धर्मग्रंथ ही त्यांना मान्य नाहीत. 

 सर्व मानव ईश्वराची लेकरे आहेत, म्हणून त्यांनी भेदभाव न मानता बंधुभावाने राहावे, असे प्रार्थना समाज मानतो. संत तुकाराम आणि त्यांचे साहित्य हे प्रार्थना समाजाचे मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण, अस्पृश्यता निवारण, बालविवाह बंदी, दलितांचा उद्धार, शिक्षणाचा विस्तार, अनाथ आश्रमांची उभारणी, ग्रंथ लेखनासाठी प्रोत्साहन, अशी विविध सामाजिक कार्ये प्रार्थना समाजाने केली. अनेक शाळा ही त्यांनी सुरू केल्या.

---


No comments:

Post a Comment