Sunday, April 21, 2024

3. दादोबा पांडुरंग (1814 ते 1882)


मुंबई येथे जन्म झालेल्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर जावरा संस्थांच्या नवाबाकडे त्यांची खाजगी शिक्षक म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर एलफिन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षकाची नोकरी त्यांना मिळाली. नंतर सुरत मध्ये सुरू झाले इंग्रजी शाळेतील त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. 1846 मध्ये मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टर पदावरती त्यांची नियुक्ती झाली. तर 1852 मध्ये दादोबांची डेप्युटी कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. या पदावर असतानाच 1857 मध्ये भिल्लांच्या बंडांचा बिमोड केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सरकारने त्यांना "रावबहादूर" हा किताब दिला. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही दादोबांनी काही काळ एज्युकेशनल ट्रान्सलेटर म्हणून काम केले. 

नोकरी चालू असतानाच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सुधारणांचा आरंभ झाला. दादोबा पांडुरंग यांचा महाराष्ट्रातील सुरुवातीच्या काळातील समाजसुधारकांमध्ये समावेश होतो. हिंदुस्थानात इंग्रजी सत्तेची स्थापना झाल्यानंतर आधुनिक पाश्चात्य ज्ञानाचा प्रसार होऊ लागला आणि त्यातून नवीन विचारांना चालना मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे डोळस बनून आपल्या धर्मातील वैगुण्ये लक्षात येणाऱ्या तरुणांचा एक नवा वर्ग एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात निर्माण झाला. दादोबा पांडुरंग हे अशाच तरुणांपैकी एक होय.  हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रुढी परंपरा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा दादोबांना खटकू लागल्या. याच गोष्टीच हिंदू धर्माच्या पतनास कारणीभूत झाल्या आहेत अशी त्यांची खात्री झाली होती. परंतु धर्म न बदलता, स्वधर्मात राहून  सुधारणा करण्याचा मार्ग त्यांनी स्विकारला.  आणि म्हणून दादोबा पांडुरंगांनी मानवसभा व परमहंस सभा या संस्था स्थापन केल्या.  1844 मध्ये  सूरत येथे मानवधर्म सभेची स्थापना त्यांनी केली. या सभेच्या सभासदांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. हिंदू धर्मातील जाती संस्थेला ही त्यांचा विरोध होता. निराकार प्रभूची प्रार्थना करण्याच्या ख्रिस्ती पद्धतीचे अनुकरण करण्याचे त्यांनी ठरवले.  माणसामाणसांतील समानतेवर त्यांचा विश्वास होता. मानव सभेचे वरील तत्वे अतिशय उदात्त असली तरी ती उघडपणे पाळणं, स्विकारणे त्या काळात फार अवघड होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचे पाठबळ दादोबांना मिळाले नाही. आणि त्यामुळे ही संस्था लवकर संपुष्टात आली.
एलफिन्स्टन कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी 1848 मध्ये ज्ञान प्रसारक सभा नावाची संस्था स्थापन केली होती. आपल्या देश बांधवात ज्ञानाचा प्रचार, प्रसार करणे आणि सामाजिक जागृती करून आणणे ही त्याची प्रमुख उद्दिष्टे होती. दादोबा पांडुरंग या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते.

पुढे 1849 मध्ये मुंबई येथे परमहंस सभा किंवा परमहंस मंडळी नावाची दुसरी संस्था दादोबा पांडुरंग यांनी सुरू केली. हिची तत्वे सर्वसाधारणपणे मानवधर्म सभेच्या तत्त्वासारखीच होती. ईश्वर एकच असून तो निराकार आहे, मूर्ती पूजा करू नये, जातपात मानू नये, विधवाला संमती असावी, अशा तत्वांचा पुरस्कार त्यांनी केला. परमहंस सभेत सर्व जातीचे सभासद प्रार्थनासाठी एकत्र जमत आणि नंतर सह भोजनही करत. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तिचे कामकाज गुप्तपणे चालत असे. याचे कारण त्या सभेच्या सदस्यांना सामाजिक आणि धार्मिक सुधारण्यासाठी तळमळ वाटत होती; परंतु त्याबद्दलच्या प्रत्यक्ष कृतीतून सनातनी आणि कर्मठ लोकांचा जो जो रोष पत्करावा लागला असता, त्याला तोंड देण्यात की ताकद त्यांच्या अंगी नव्हती. यामुळे 1860 मध्ये ही सभा बरखास्त झाली.

याशिवाय आपल्याला समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून दादोबांनी प्रयत्न केले. आपल्या लोकांनी आधुनिक ज्ञान, विज्ञान यांचा अंगीकार केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही असे त्यांचे मत होते. आणि त्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसारचा आग्रह धरला. ट्रेनिंग कॉलेजचे डायरेक्टर म्हणून काम करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक विचारांचा परिचय करून देण्यावर त्यांनी भर दिला.

दादोबांचे वाङ्मयीन कार्यही मोठे आहे. मराठी भाषेचे व्याकरण लिहून त्यांनी मराठी व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य केले. त्यामुळे "मराठी भाषेचे पाणिनी" असे त्यांना म्हटले जाते.
तसंच इंग्रजी भाषा शिकणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी दादोबांनी इंग्रजी व्याकरण मराठीत आणलं. त्यांनी संस्कृत व्याकरणही मराठीत उपलब्ध करून दिले.
तसेच मोरोपंतांच्या केकावली यावर त्यांनी 'यशोदा पांडुरंगी' नावाची टीका लिहून; मराठी भाषेतील आधुनिक समीक्षेचा पाया घातला.

याशिवाय लघुव्याकरण, महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाची पूरणिका, शिशुबोध, धर्मविवेचन, पारमहंसिक ब्राह्मधर्म, विधवाश्रुमार्जन, आत्मचरित्र इत्यादी पुस्तकात यांनी लिहिली. तसेच
नकाशाचं पुस्तक मराठीत काढण्याचा पहिला स्तुत्य उपक्रमही त्यांनी केला होता.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राचे गाढे अभ्यासक  अ. का. प्रियोळकर यांनी दादोबा पांडुरंग यांचे फार सुंदर अन तपशीलवार चरित्र लिहिले आहे.

No comments:

Post a Comment