Wednesday, May 1, 2024

7. कृष्णशास्त्री चिपळूणकर (1824-1878)


कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म पुण्यातला. लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून तर ओळखले जात. पुण्यातल्या पाठशालेमध्ये त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले त्यांची हुशारी पाहून त्यांचे गुरुजन त्यांना, बृहस्पती म्हणून संबोधत. पुढे आपल्या गुरूंच्या आपल्या आदेशानुसार पुना कॉलेजमध्ये इंग्रजीचा अभ्यास करायला कृष्णशास्त्रांनी सुरुवात केली. संस्कृत व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. अलंकार, न्याय व धर्म या तीनही शास्त्रांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. याशिवाय अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि इतर विषयांचेही अध्ययन त्यांनी केले. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी 1852 मध्ये अनुवादक म्हणून सरकारी नोकरीमध्ये प्रवेश केला. पुढे पुण्याच्या पाठशाळेमध्ये त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम केले.  दक्षिणा प्राइस कमिटीचे काही काळ ते चिटणीस होते. पुना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. कृष्णशास्त्री हिंदू धर्माचे कट्टर पुरस्कर्ते होते.  ख्रिश्चन मिशनरींच्या धर्मप्रसाराला आणि हिंदू धर्मविरूद्ध ते करत असलेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी चिपळूणकरांनी "विचारलहरी" नावाचे वृत्तपत्र काही काळ चालवले. पुना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य असताना "शाळापत्रक" हे नियतकालिकेही त्यांनी चालवले.

मराठी ग्रंथकार म्हणून कृष्णशास्त्रांना मान्यता मिळाली. अलौकिक बुद्धिमत्ता, संस्कृत आणि इंग्रजी शब्दांना भाषांवरील प्रभूत्व आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे जनमानसात त्यांना मान प्राप्त झाला. पाश्चात्य साहित्याचा त्यांचा खूप अभ्यास होता. पौर्वात्य आणि पश्चिमी ज्ञान प्रवाहांचा संगम त्यांच्यामध्ये झालेला होता.

कृष्णशास्त्रींनी कालिदासांच्या मेघदूताचा केलेला मराठी अनुवाद अतिशय गाजला. शास्त्रीय विषयांवरील लेखनही सोपे करून दाखवण्याची हातोटी त्यांची होती. आरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी हा ग्रंथ कृष्णशास्त्रींनी मराठीत आणला, आणि अद्भुतरम्य कथाविश्वाचे दालन मराठी साहित्याला उपलब्ध करून दिले.

कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी अनेक ग्रंथ लिहिले.  अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी, पद्यरत्नावली, सॉक्रेटिस्टचे चरित्र, रसेलस, अनेक विद्यामूलतत्व संग्रह,  अर्थशास्त्र परिभाषा, मराठी व्याकरणावरील निबंध, संस्कृत व्याकरणावरील निबंध अशा विविध विषयांवर चिपळूणकरांनी लेखन केले.
ग. त्र्यं. माडखोलकरांनी यांनी लिहिल्या प्रमाणे, ‘‘कृष्णशास्त्री हे आधुनिक महाराष्ट्राचे पहिले भाषाप्रभु, पहिले शब्दशिल्पी, पहिले शैलीकार साहित्यिक!" होत.
---

No comments:

Post a Comment