Monday, April 29, 2024

6. वामन आबाजी मोडक ( 1835? - 1897)


मूळचे रत्नागिरी येथील वामन आबाजी मोडक यांचे, प्राथमिक शिक्षण दापोलीला झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. मुंबईतील एका पारशी विद्या फंडातून आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण सुकर झाले. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या चार पदवीधरांपैकी वामन आबाजी एक. न्यायमूर्ती रानडे, डॉ. रा गो भांडारकर, बी. एम वागळे हे बाकीचे तीन. साल होते 1862. पुढे संस्कृत आणि इंग्रजी विषय घेऊन त्यांनी एम. ए. केले. व्याकरण, साहित्य, वेदांत, न्याय यांचा अभ्यासही त्यांनी केला. हिंदु धर्म तसेच ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, पारशी या धर्मांचाही त्यांनी अभ्यास केला.

एल्फिन्स्टन हायस्कूलमधे ते मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय होते. जवळ जवळ अकरा वर्ष त्यांनी हा कार्यभार सांभाळला.
मुंबई विद्यापीठाची फेलोशीपही त्यांना मिळाली.
प्रार्थना समाजाचे ते सदस्य होते. तिथे कीर्तनं करणे, त्या मार्फत समाजप्रबोधनाचा प्रयत्न ते करत. किर्तनाची पद्धत जुनी परंतु कीर्तनाचे विषय नवीन असत. अगदी येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस, व्यापार, विविध कौशल्य, बालविवाहाचे दोष, जुगाराचे तोटे असे विविध विषय ते आपल्या कीर्तनामधे मांडत.
वामन आबाजी यांनी लेखनापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. याचे उत्तम उदाहरण ही कीर्तने होत.

तसेच वामन आबाजी, न्या. म. गो. रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर यांनी मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून हुजूरपागा ही शाळा सुरु केली.
कामगारांना शिक्षण देण्यासाठी रात्रशाळा प्रार्थना समाजाने सुरु केल्या, त्यातही वामन आबाजींचा मोठा सहभाग होता. 
मुंबईमधे पहिला विधवा विवाह झाला (1893) तेव्हा त्या विवाहाला वामन आबाजींनी जाहीर संमती दिली. तेव्हा त्यांच्यावर समाजाने बहिष्कार घातला होता.

वामन आबाजींनी उपनिषदे मराठीमधे आणण्याचा प्रयत्न केला, पण ते काम अपूर्ण राहिले. त्यांची सुधारणे संदर्भातली, प्रार्थना समाजातील अनेक पदे आजही उपलब्ध आहेत. शिवाय "उत्तरनैषधचरित" नावाचे एक गद्य-पद्य असलेले नाटकही त्यांनी लिहिले.

न्या. रानडे, डॉ. भांडारकर, विष्णुशास्त्री पंडीत यांच्याशी त्यांचे अतिशय मैत्रीचे संबंध आयुष्यभर राहिले.
--- 

Thursday, April 25, 2024

5. विष्णुबुवा ब्रह्मचारी (1825-1872)


विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म  1825 मध्ये रायगड जिल्ह्यातल्या शिरवली गावामध्ये झाला.
अगदी लहान वयातच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे आणि गरीबीमुळे त्यांना त्यांचे शिक्षण चालू ठेवता आले नाही. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांना दुकानांमध्ये कस्टमच्या कार्यालयामध्ये य अशा विविध ठिकाणी नोकऱ्या कराव्या लागल्यात. लहानपणापासून त्यांचा ओढा अध्यात्माकडील होता. त्यामुळे आपल्या नोकरीच्या काळातही विविध धार्मिक ग्रंथांचा त्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास चालू ठेवला. त्याचबरोबर कथाकिर्तेने, पुराणे,  साधू संन्यासी यांच्याशी संवाद अशांमधे त्यांचे मन रमत असे.  कालांतरानं यातही त्यांचे समाधान होई ना. अखेर 23 व्या वर्षी त्यांनी सगळ्याचा परित्याग केला आणि ते अरण्यामध्ये निघून गेले. विष्णुबुवांनी त्यानंतर अनेक सद्गुरुंना गुरु मानण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठेच त्यांचे समाधान झाले नाही. अखेर सप्तशृंगीच्या डोंगरावर ते गेले आणि तेथील देवीचे सानिध्यात फक्त कंदमूळ खाऊन वेदांत विचार ध्यान साधना यावर त्यांनी स्वतःला गुंतवून  घेतले.  कालांतराने ज्यासाठी आपण साधना केली होती ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. उग्र तपश्चर्याच्या योगाने आपण स्वतःचा कल्याण तर साधला; पण आपला कार्यभाग पूर्ण झाला नाही. समाजाच्या कल्याणासाठी आपले उर्वरित आयुष्य आपण वेचले पाहिजे असे त्यांना वाटू लागले.  त्याच वेळेस " पाखंडी मतांचे खंडन करून;  तू वैदिक धर्माची पुन्हा स्थापना कर" असा संदेश परमेश्वराने आपल्याला दिला आहे असे त्यांना वाटले. त्यामुळे ते गावाकडे परत आले. विष्णुबुवा त्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक, पंढरपूर अशा वेगवेगळ्या गावी गेले. वैदिक धर्माचे महत्त्व विशद करणारी व्याख्याने देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या वक्तृत्वाची छाप लोकांना पडत असे. लवकरच त्यांचं नाव सर्वांना माहिती झाले. लोक त्यांना ब्रह्मचारी बुवा या नावाने ओळखू लागले. 1856 मध्ये विष्णुबुवा मुंबईस आले. त्या काळी ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी भारतीय लोकांच्या मध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचे काम अतिशय पद्धतशीरपणे चालवले होते. ख्रिस्ती धर्मातील उदात्त तत्त्वे, मानवतावादी तत्त्वे यांच्या आधारे सुशिक्षितांवरील प्रभाव त्यांनी पाडण्यास सुरुवात केली होती. आणि मिशनऱ्यांच्या  सेवाभावी वृत्तीचा सामान्य जनतेवर प्रभाव पडत होता.  ख्रिस्ती धर्मप्रचाराकांच्या या दुहेरी आक्रमणामुळे हिंदू धर्मावर मोठे संकट येऊ घातले होते.  ख्रिश्चन धर्मांच्या या प्रभावावर नियंत्रण घालण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी प्रयत्न सुरु केले.  ख्रिस्ती धर्म प्रचारकांच्या प्रचाराला उत्तर म्हणून विष्णुबुवांनी जाहीर व्याख्याने देण्यास सुरुवात केली. ख्रिस्ती मिशनरी हिंदु धर्मातील दोष सांगत असत, त्यांचे विष्णुबुवा आपल्या व्याख्यानातून खंडन करत. जवळ जवळ 50 सभा त्यांनी घेतल्या. यात त्यांनी वैदिक धर्मातील आक्षेपांचे खंडन करून त्याची श्रेष्ठता समाजाला पटवून दिली. आपल्या तार्किक युक्तिवादाने आणि पुराव्यांनी समाजातील सर्वांची मने त्यांनी पुन्हा हिंदू धर्माकडे खेचून आणली. त्यांच्या या व्याख्यानांना वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळाले. त्यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर बोलवायला झाला पुढे ख्रिस्ती धर्माच्या धर्मपदेशकां बरोबर मुंबईच्या समुद्रकिनारी वीस दिवस जाहीर वादविवाद झाले. समुद्रकिनाच्या वादविवादांंचा समाजावरती खूप मोठा प्रभाव पडला. मुळात धार्मिक क्षेत्रात मिशनऱ्यांना अडवण्याचे पहिले पाऊल विष्णुबुवांनी उचलले.
पुढे विष्णुबुवांनी तामिळनाडू, प. बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात येथे जाऊनही हिंदूंचे प्रबोधन केले.

विष्णुबुवा वैदिक धर्माचे अभिमाने असले तरी त्यांनी समाजाची दोषांकडे देखील त्यांनी डोळेझाक केली नाही. प्रचलित जातीधर्म हा वेदांतील वर्णव्यवस्थेला सोडून आहे. या जातीभेदामुळे आणि सामाजिक विषमतेमुळे हिंदी समाजाची दुर्गती झाली आहे असे त्यांनी मांडले. समाजसुधारणांचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला. त्यांचे व्यक्तिगत आचरण हे सुधारणांच्या विचारांना धरून होते. ते कोणाच्याही हातचे पाणी पीत असतात, अन्न खात असत. खाण्यापिण्याचे बाबतीत जातीभेदाचे, धर्माचे, स्पर्शाचे बंधन त्यांनी कधी पाळले नाही.
समाजातील जाती विषमतेप्रमाणेच अतिशूद्रांवर होणाऱ्या अमानुष अन्यायाविरुद्ध देखील विष्णुबुवांनी आवाज उठवला. दलितांच्या मागासलेपणाची जबाबदारी सर्व उच्च वर्णीयांवरती आहे. आणि म्हणून त्यांच्या सुधारण्यासाठी उच्च वर्णीयांनीच प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मत मांडले.
पुनर्विवाह, घटस्फोट, प्रौढविवाह, शुद्धीकरण या सामाजिक प्रश्नांबाबत त्यांचे विचार आधुनिक होते. लोकांच्या स्तुती वा निंदा कशाची पर्वा त्यांनी केली नाही.

विष्णुबुवांनी 'वेदोक्तधर्मप्रकाश' या नावाचा धर्मग्रंथ लिहिला. या ग्रंथात राजनीति संदर्भात एक स्वतंत्र प्रकरण त्यांनी लिहिले आहे.  पुढे त्याच मतांचा विस्तार करून 1867 मध्ये 'सुखदायक राज्यप्रकरणी निबंध' हे पुस्तक लिहिले. त्यामध्ये त्यांनी मांडलेले विचार साम्यवादाशी खूपच मिळते जुळते आहेत.  उदाहरणादाखल त्यांनी असं लिहिलंय की "सर्व प्रजे कडून सर्व जमिनीची लागवड करावी. आणि अनेक प्रकारची फळे, कंद, भाज्या, अन्न उत्पादन करून गावोगावी कोठारे भरून ठेवावीत. त्यामधून सर्व गावकऱ्यांच्या पोटास लागेल तितके अन्न द्यावे. याप्रमाणे बाराही महिन्यात एकसारखे सर्व जमिनीतून उत्पन्न घ्यावे. ते सर्वांचे उत्पन्न एकत्रच ताब्यात राहून त्यातून सर्वांस खावयास भरपूर न्यावे.
सर्वांची पाच वर्षांची पोरे झाली म्हणजे मुलगा मुलगी राजाच्या ताब्यात द्यावी. नंतर त्याने त्यांना सर्व विद्या शिकून ज्याला त्याला, ज्या कामात गती आहे तो उद्योग करण्याची सवड द्यावी." विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्या या विचारावरून  त्यांनी साम्यवादा सारखाच विचार मांडला होता असे म्हणावे लागते. अर्थात बुवांचे हे विचार कार्ल मार्क्स याचे लिखाण वाचून बनलेले नव्हते, तर तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे डोळेसपणे अवलोकन अवलंबून करून, साकल्याने विचार करून लिहिलेले आहेत.  यावरून त्यांची बौद्धिक झेप आणि आणि द्रष्टपणा कळून येतो. 

विष्णुबुवांनी भावार्थसिंधू , वेदोक्तधर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, चतु:श्लोकी भागवताचा अर्थ, बोधसागराचे रहस्य, सेतूबंधनी टीका, सहजस्थितीचा निबंध, समुद्र किनारीचा वादविवाद इत्यादी पुस्तके लिहिली होती.
---

Tuesday, April 23, 2024

4. डॉ. भाऊ दाजी लाड (1824-1874)




रामचंद्र उर्फ भाऊ दाजी लाड यांचे सर्व शिक्षण मुंबईत झालं. विद्यार्थीदशेत ते अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात. आणि अनेक पारितोषिकांचे ते मानकरी ठरले. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर (1843) त्यांनी दोन वर्षे मुंबईच्या एल्फिन्टन कॉलेजमध्ये विज्ञानाचे शिक्षक म्हणून काम केले. पुढे 1845 मध्ये ग्रँड मेडिकलची स्थापना झाली तेव्हा भाऊ दाजींनी आपली शिक्षकाची नोकरी सोडून दिली आणि ग्रँड मेडिकल कॉलेजमधे विद्यार्थी म्हणून त्यांनी प्रवेश घेतला. आणि 1850 वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिल्या सन्माननीय डॉक्टरांमधले भाऊ दाजी हे एक होते.  त्यानंतर लगेचच ग्रँड मेडिकल कॉलेजमध्येच त्यांनी काही काळ सब असिस्टंट सर्जन आणि दुय्यम अध्यापक म्हणून काम केले. पुढे त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. वैद्यकीय व्यवसायात भाऊंनी अतिशय लौकिक कमावला. या काळात मुंबईतील एक विख्यात धन्वंतरी म्हणून ते ओळखले जात असतात.
वैद्यकीय संशोधनाचा पाया त्यांनी इथे घातला. महारोगावरील औषधाचा शोध त्यांनी लावला.
अनिष्ट रूढी परंपरा यांना विरोध करून समाज सुधारणेचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक प्रश्नाबाबत त्यांचा दृष्टिकोन अत्यंत पुरोगामी होता.
समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा यांचा त्याग केल्याशिवाय आपल्या लोकांच्या सध्याच्या परिस्थितीत सुधारणा होणार नाही असे त्यांचे मत होते.

भाऊ इंग्रजी राजवटीचे समर्थक होते. अर्थात त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरूनच त्यांची ही भूमिका होती. इंग्रजी राजवटीमुळे आपल्या लोकांना प्रगतीचे दारे उघडली जात आहेत, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. इंग्रजी स्वतःचे समर्थन करत असताना भाऊ दाजींनी भारतीय जनतेच्या हिताकडे मात्र दुर्लक्ष होऊ दिले नाही. उलट येथील लोकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत असे आग्रह धरून बरेच प्रयत्न  त्यांनी केले.

भाऊ दाजींनी विधवा विवाहाचे उघड समर्थन केले. तसेच ते शिक्षण स्त्री शिक्षणाचे पुरस्कार होते.

तत्कालीन नवसुधारकांमधले भाऊ दाजी लाड हे देखील एक महत्त्वाचे नेते होते. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत समाजातील विविध क्षेत्रात सुधारणा करण्याचे प्रयत्न भाऊ दाजी यांनी केले.

आपल्या वैद्यकीय व्यवसायाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता, समाजसेवेचे माध्यम म्हणून पाहिले.  समाजातील गोर गरीब, निराधार लोकांना मोफत औषध उपचार केले  केले. मोफत दवाखाने उघडले.
मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी शाळा उभारणीत सहभाग घेतला.

इंग्रजी प्रशासनात  ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तुलनेत अधिकाऱ्यांना हिंदी अधिकाऱ्यांना कमी महत्व दिले जात असे त्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यासाठी 1852 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन मध्ये ते सहभागी होते.

बॉम्बे असोसिएशन प्रमाणे हिंदी जनतेच्या हितासाठी सनदशीर मार्गाने कार्य करण्याचे उद्देशाने निर्माण आलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेतही भाऊंचा महत्त्वाचा सहभाग होता. हिंदी लोकांच्या आर्थिक समस्यांचा विचार करणे आणि त्या प्रश्नावर इंग्लंडमधील लोकमत, आपणास अनुकूल करून घेणे; हे तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. 1859 मध्ये ब्रिटिश सरकारने भारतातील व्यापारी उद्योगधंदे यावर कर बसवणारे एक विधेयक तयार केले होते (लायसन्स बिल). यामुळे भारतातील उद्योग आणि व्यापार यावर अनिष्ट परिणाम होणार होता.  या विरोधकाचा निषेध करण्यासाठी मुंबईत एक सभा बोलवली गेली होती या सभेत भाऊ दाजी सक्रिय सहभागी होते.

1894 मधे स्थापन झालेल्या ज्ञानप्रसारक सभेमधे भाऊ दाजींही सामील होते.

मुंबई इलाख्याच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद म्हणून भाऊंची नेमणूक झाली होती.

तसेच मुंबई विद्यापीठाचे फिलो म्हणूनही त्यांची नेमणूक झाली होती.

इंग्रजी इतिहासकारांनी भारताचा इतिहास लिहायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लेखनातील चुका भाऊंनी दाखवून दिल्या. तसेच रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामधे त्यांनी अनेक इतिहासपर अनेक लेख लिहिले. गुप्तकाल खंडावर त्यांचा विषेश अभ्यास होता. नाणी, शिलालेख, ताम्रपट यांवर त्यांचा अभ्यास होता.

ग्रँट मेडिकल  सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.

मुंबईच्या नगरपाल पदावर त्यांची दोनदा नियुक्ती केली गेली होती.

1855 च्या अँग्लो अफगाण युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या हिंदी सैनिकांच्या कुटुंबियांसाठी मदत करण्यासाठी त्यांनी एक वेगळा निधी जमवला होता.

तसेच मादक पदार्थांच्या सेवनाविरुद्ध मोहिम उघडण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.
---

Sunday, April 21, 2024

3. दादोबा पांडुरंग (1814 ते 1882)


मुंबई येथे जन्म झालेल्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर जावरा संस्थांच्या नवाबाकडे त्यांची खाजगी शिक्षक म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर एलफिन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षकाची नोकरी त्यांना मिळाली. नंतर सुरत मध्ये सुरू झाले इंग्रजी शाळेतील त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. 1846 मध्ये मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टर पदावरती त्यांची नियुक्ती झाली. तर 1852 मध्ये दादोबांची डेप्युटी कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. या पदावर असतानाच 1857 मध्ये भिल्लांच्या बंडांचा बिमोड केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सरकारने त्यांना "रावबहादूर" हा किताब दिला. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही दादोबांनी काही काळ एज्युकेशनल ट्रान्सलेटर म्हणून काम केले. 

नोकरी चालू असतानाच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील सुधारणांचा आरंभ झाला. दादोबा पांडुरंग यांचा महाराष्ट्रातील सुरुवातीच्या काळातील समाजसुधारकांमध्ये समावेश होतो. हिंदुस्थानात इंग्रजी सत्तेची स्थापना झाल्यानंतर आधुनिक पाश्चात्य ज्ञानाचा प्रसार होऊ लागला आणि त्यातून नवीन विचारांना चालना मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे डोळस बनून आपल्या धर्मातील वैगुण्ये लक्षात येणाऱ्या तरुणांचा एक नवा वर्ग एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात निर्माण झाला. दादोबा पांडुरंग हे अशाच तरुणांपैकी एक होय.  हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रुढी परंपरा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा दादोबांना खटकू लागल्या. याच गोष्टीच हिंदू धर्माच्या पतनास कारणीभूत झाल्या आहेत अशी त्यांची खात्री झाली होती. परंतु धर्म न बदलता, स्वधर्मात राहून  सुधारणा करण्याचा मार्ग त्यांनी स्विकारला.  आणि म्हणून दादोबा पांडुरंगांनी मानवसभा व परमहंस सभा या संस्था स्थापन केल्या.  1844 मध्ये  सूरत येथे मानवधर्म सभेची स्थापना त्यांनी केली. या सभेच्या सभासदांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. हिंदू धर्मातील जाती संस्थेला ही त्यांचा विरोध होता. निराकार प्रभूची प्रार्थना करण्याच्या ख्रिस्ती पद्धतीचे अनुकरण करण्याचे त्यांनी ठरवले.  माणसामाणसांतील समानतेवर त्यांचा विश्वास होता. मानव सभेचे वरील तत्वे अतिशय उदात्त असली तरी ती उघडपणे पाळणं, स्विकारणे त्या काळात फार अवघड होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचे पाठबळ दादोबांना मिळाले नाही. आणि त्यामुळे ही संस्था लवकर संपुष्टात आली.
एलफिन्स्टन कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी 1848 मध्ये ज्ञान प्रसारक सभा नावाची संस्था स्थापन केली होती. आपल्या देश बांधवात ज्ञानाचा प्रचार, प्रसार करणे आणि सामाजिक जागृती करून आणणे ही त्याची प्रमुख उद्दिष्टे होती. दादोबा पांडुरंग या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते.

पुढे 1849 मध्ये मुंबई येथे परमहंस सभा किंवा परमहंस मंडळी नावाची दुसरी संस्था दादोबा पांडुरंग यांनी सुरू केली. हिची तत्वे सर्वसाधारणपणे मानवधर्म सभेच्या तत्त्वासारखीच होती. ईश्वर एकच असून तो निराकार आहे, मूर्ती पूजा करू नये, जातपात मानू नये, विधवाला संमती असावी, अशा तत्वांचा पुरस्कार त्यांनी केला. परमहंस सभेत सर्व जातीचे सभासद प्रार्थनासाठी एकत्र जमत आणि नंतर सह भोजनही करत. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तिचे कामकाज गुप्तपणे चालत असे. याचे कारण त्या सभेच्या सदस्यांना सामाजिक आणि धार्मिक सुधारण्यासाठी तळमळ वाटत होती; परंतु त्याबद्दलच्या प्रत्यक्ष कृतीतून सनातनी आणि कर्मठ लोकांचा जो जो रोष पत्करावा लागला असता, त्याला तोंड देण्यात की ताकद त्यांच्या अंगी नव्हती. यामुळे 1860 मध्ये ही सभा बरखास्त झाली.

याशिवाय आपल्याला समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून दादोबांनी प्रयत्न केले. आपल्या लोकांनी आधुनिक ज्ञान, विज्ञान यांचा अंगीकार केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही असे त्यांचे मत होते. आणि त्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसारचा आग्रह धरला. ट्रेनिंग कॉलेजचे डायरेक्टर म्हणून काम करत असताना आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक विचारांचा परिचय करून देण्यावर त्यांनी भर दिला.

दादोबांचे वाङ्मयीन कार्यही मोठे आहे. मराठी भाषेचे व्याकरण लिहून त्यांनी मराठी व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य केले. त्यामुळे "मराठी भाषेचे पाणिनी" असे त्यांना म्हटले जाते.
तसंच इंग्रजी भाषा शिकणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी दादोबांनी इंग्रजी व्याकरण मराठीत आणलं. त्यांनी संस्कृत व्याकरणही मराठीत उपलब्ध करून दिले.
तसेच मोरोपंतांच्या केकावली यावर त्यांनी 'यशोदा पांडुरंगी' नावाची टीका लिहून; मराठी भाषेतील आधुनिक समीक्षेचा पाया घातला.

याशिवाय लघुव्याकरण, महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाची पूरणिका, शिशुबोध, धर्मविवेचन, पारमहंसिक ब्राह्मधर्म, विधवाश्रुमार्जन, आत्मचरित्र इत्यादी पुस्तकात यांनी लिहिली. तसेच
नकाशाचं पुस्तक मराठीत काढण्याचा पहिला स्तुत्य उपक्रमही त्यांनी केला होता.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राचे गाढे अभ्यासक  अ. का. प्रियोळकर यांनी दादोबा पांडुरंग यांचे फार सुंदर अन तपशीलवार चरित्र लिहिले आहे.

Thursday, April 18, 2024

2. आचार्य बाळशास्त्री जांभेकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘मुंबई दर्पण’ हे पहिले पाक्षिक 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईतून (काळबादेवी) सुरू केले. तसेच त्यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्याच वेळी, मे 1840 पासून सुरू केले. 

जांभेकर यांनी महाराष्ट्रात पत्रकारिता सुरू केली तो काळ पेशवाईच्या अस्तानंतरचा (1818) होता. महाराष्ट्रातील पेशव्यांचे राज्य गेल्यानंतर मराठी माणसांचे मन, मेंदू, मनगट बधिर झाले होते. ते पुन्हा प्रज्वलित होण्यासाठी लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून त्यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले. ‘दर्पण’ म्हणजे समाजाच्या सर्वांगीण क्षेत्राचे प्रतिबिंब! दर्पण सुरु केले तेव्हा त्यांचे वय होते अवघे वीस वर्षे. ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील ‘ज्ञानेश्‍वरी’नंतरचे महत्त्वाचे संक्रमण मानले जाते. त्या पाक्षिकात प्रत्येक पानावर अर्ध्या पानाचा मराठी मजकूर व त्यापुढेच त्याचे इंग्रजीत भाषांतर अशी छपाई असे. मराठी जनतेला काय म्हणायचे आहे ते मराठी भाषेत व ते इंग्रज प्रशासनास कळावे यासाठी इंग्रजीत अशी त्या मजकुराची कल्पक रचना होती. वाचकांना विचारप्रवृत्त करणे हा त्यांचा हेतू होता. मराठी भाषा व साहित्य-संस्कृती यांवर इंग्रजांच्या राजवटीमुळे काही संक्रमण होऊ लागले होते. त्याला पर्याय म्हणजे विकासाचा मार्ग म्हणून शिक्षणाकडे पाहिले पाहिजे हा विचार जांभेकर यांचा होता. वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम शिक्षण, लोकशिक्षण, मराठी साहित्य व पाश्चिमात्य सुधारणावादी ज्ञानविज्ञान यांच्या प्रसारासाठी आहे अशी त्यांची धारणा झाली. 

पोंभुर्ले, ता. देवगड,  रत्नागिरी येथील गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा धाकटा मुलगा बाळ जांभेकर. वयाच्या तेराव्या वर्षी, 1826 च्या सुमारास मुंबईमध्ये इंग्रजी व अन्य विषयांच्या शिक्षणासाठी बॉम्बे नेटिव्ह स्कूलमध्ये दाखल झाला. बाळ जांभेकर बुद्धिमान होते. त्यांनी अवघ्या दोन वर्षांत इंग्रजी, गणित व अन्य नऊ भाषा यांत प्राविण्य मिळवले. त्यांची ती तडफ लक्षात घेऊन त्यांना विद्यार्थिदशेतच उपएतद्देशीय सचिव म्हणून नियुक्ती प्रथम मिळाली. तो मराठी माणसासाठी फार मोठा गौरव होय !

गर्व्हनर एल्फिन्स्टन यांनी बाळ जांभेकर यांची विद्वत्ता ओळखून त्यांना आणखी पुढे संधी दिली; मराठी भाषेत शालेय पाठ्यपुस्तकाशी संबंधित ग्रंथ तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. इतकेच नव्हे तर पुढे, मार्च 1830 पासून त्याच शिक्षण संस्थेत (बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी) उप एतद्देशीय सचिव (डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी) म्हणून दरमहा पन्नास रुपयांवर नियुक्ती केली. बाळशास्त्री यांनी त्या काळात मराठी, संस्कृत, इंग्रजी, गुजराती, बंगाली, हिंदी, फारसी, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच अशा विविध भाषांत प्राविण्य मिळवले. तसेच अंकगणित, बीजगणित, भूमिती, महत्त्वमापन, अंकशास्त्र, शून्य उपलब्धी गणित या विषयांतही विशेष प्राविण्य मिळवले. त्यांचे उत्तम अध्यापन, संस्थेबद्दल निष्ठा, सद्वर्तन आणि मुलांच्यातील व सहाध्यायींमधील लोकप्रियता हे गुण लक्षात घेऊन त्यांची त्याच संस्थेत पूर्ण वेळ एतद्देशीय सचिव म्हणून मार्च 1832 पासून सन्मानाने दरमहा शंभर रुपये पगारावर नियुक्ती झाली. 

तसेच 1831 मध्ये लंडन येथील रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेतील पौर्वात्य भाषांतर समितीचे एतद्देशीय भाषा सचिव म्हणूनही त्यांची नेमणूक झाली होती. पुढे 1842 मधे एलफिन्स्टन कॉलेजमध्ये कार्यकारी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतातील पहिले अध्यापक विद्यालय  एप्रिल 1845 मध्ये मुंबई येथे सुरू केले. 

त्यांनी मुंबईतील पहिले सार्वजनिक वाचनालय ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या नावाने 1845 मध्ये सुरू केले. 

लोकशिक्षणाचा एक भाग म्हणून ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’1845 मध्ये स्थापन केली. सार्वजनिक प्रश्नावर निबंध वाचन व त्यावर चर्चा असे सोसायटीमधील कार्यक्रमांचे अभिनव स्वरूप होते. 

काळबादेवी भागात वाडा भाड्याने घेऊन त्यात पहिले वसतिगृह 1845 मध्ये सुरू केले. 

तसेच मुंबईतील कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही वर्षभर काम केले.

लंडन येथील जिऑग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेत कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून 1842 ते 1846 पर्यंत होते. 

प्रा. बाळशास्त्री जांभेकर पुरातत्त्व व इतिहास संशोधन असे काम लंडन येथील दि रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई येथील शाखेत (1830 पासून) करत असत. त्या शाखेने 1841 पासून ‘जर्नल ऑफ दि बॉम्बे ब्रँच एशियाटिक सोसायटी’ सुरू केले.

त्यांना ‘जस्टिस ऑफ दि पीस’ हा सन्मान 1840 मध्ये मिळाला होता. तो त्या काळातील बहुमान समजला जात असे. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या ‘ग्रँड ज्युरी’मध्ये बसू शकत होते. 

बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’मधून साहित्यलेखनाचा आरंभ केला होता. त्यांचे लेखन भाषांतराच्या माध्यमातून ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले होते. त्यांनी कॅप्टन जर्व्हिस यांचे लॉर्ड ब्रॉग्हम यांच्या ‘ट्रेएटाईज ऑन द ऑब्जेक्ट्स – अ‍ॅडव्हांटेज अँड प्लेजर्स ऑफ नॉलेज’ नावाच्या प्रसिद्ध शास्त्रीय पुस्तकाचे ‘विद्येचे लाभ, उद्देश आणि संतोष’ या नावाने भाषांतर केले. ते 1829 मध्ये छापले गेले. त्यांनीच पहिला मराठी शब्दकोष आणि मराठी भाषेचे व्याकरण या पुस्तकासाठी संपादन व भाषांतर केले होते.

जांभेकर यांनी त्यांच्या ‘दर्पण’ व नंतर ‘दिग्दर्शन’मधून बरेच निबंध व लेख लिहिले आहेत. जांभेकर हे आद्य निबंधकार व आद्य गद्य लेखक होत. त्यांचे निबंध व लेख यांचे वैशिष्ट्य हे आहे, की त्यातून धार्मिक व सामाजिक सुधारणा, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रुढी-परंपरा यांचा त्याग, ज्ञान व विज्ञान यांची माहिती, स्त्रियांचे शिक्षण, शालेय शिक्षण ह्यांचे दर्शन होते.

त्यांनी ‘दर्पण’मधून हिंदुधर्म आणि सती, जातिभेदाचा प्रश्‍न , स्त्रियांस वेदाभ्यास, स्त्री शिक्षणाची दिशा , स्त्री-पुरुषांना समान हक्क 1 व 2 , ग्रंथपरीक्षणाचा नमुना , मुंज मुलींची का नाही?, सरकारी नोकरीत जातीयता , नाटकशालेस प्रोत्साहन  असे पुरोगामी विचारांचे लेख प्रसिद्ध केले होते. आणि ‘दिग्दर्शन’ या मासिकातूनही रसायनशास्त्र, इतिहास, सूक्ष्मदर्शक यंत्र, मोडी व बाळबोध अक्षरांचे ताम्रपट, वाफयंत्रे, ज्योतिष शास्त्र, सिद्ध पदार्थ विज्ञान असे अनेक विषय हाताळले.

भारतीय इतिहास, शिलालेख, ताम्रपट, पुरातन नाणी, चित्रलिपी, गूढ लिपी यांवर संशोधन करून इंग्रजीतून लेखन प्रसिद्ध केले

त्यांनी ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचे शिळाप्रेसवर मुद्रण सर्वात प्रथम 1845 मध्ये केले. 

त्यांच्यामुळेच ‘ज्ञानेश्‍वरी’ची पहिली मुद्रित प्रत शक्य झाली.

त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा नुसती नावे वाचूनही थक्क व्हायला होते. 

1. नीतिकथा

2. सारसंग्रह 

3. इंग्लंड देशाची बखर भाग 1 व 2, 4. भूगोलविद्येची मूलतत्त्वे, 

5. भूगोलविद्या गणितभाग, 

6. बालव्याकरण (यांतील क्रमांक 4 व 6 ही पुस्तके मुंबई इलाख्याच्या प्राथमिक शाळेतून पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासली जात होती), 

7. मरे यांच्या इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, 

8. शब्दसिद्धी निबंध, 

9. समीकरणाविषयी टिपणे, 

10. शून्यलब्धी गणित व मूलपरिणती, 

11. हिंदुस्थानचा इतिहास, 

12. हिंदुस्थानातील इंग्लिशांच्या राज्याचा इतिहास, 

13. मानसशक्ती विषयीचे शोध (अपूर्ण). 

जांभेकर हे पश्चिम भारतातील प्रबोधनाचा पाया घालणारे आद्य विचारवंतही मानले जातात.  बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात

विचार, लेखन आणि प्रत्यक्ष कृती अशा तीनही स्तरांवर मोठे काम केले. 

 त्यांचे आणखीन एक महत्वाचे कार्य म्हणजे श्रीपती शेषाद्री धर्मांतर प्रकरण.  शेषाद्री यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी त्या काळात त्यांनी लढा दिला.  सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन शेषाद्री यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांना सामाजिक व धार्मिक रोषाला सामोरे जावे लागले; धार्मिक बहिष्कारही सहन करावा लागला. परंतु कायदेशीर आणि संमत मार्गाने लढा देता येऊ शकतो आणि न्याय मिळवता येतो याचा पाया त्यांनी भारतात घातला.

वयाच्या केवळ 34 व्या वर्षी 17 मे 1846 रोजी बाळशास्त्रींचा मुंबईमधे मृत्यू झाला.

---

1. जगन्नाथ शंकरशेठ (1803-1865)

जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी, ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड या गावी झाला. नाना शंकरशेठ या नावाने ते विशेष प्रसिद्ध पावले. जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे हे अतिशय श्रीमंत घरात जन्मले होते. त्यांच्या वडिलांनी व्यापारात अमाप संपत्ती कमावली होती. त्यामुळे नानांचे बालपण अतिशय सुखात गेले. पुढे त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षी, वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे संपूर्ण व्यापाऱ्याची जबाबदारी नानांवर येऊन पडली. त्यांच्या व्यापाराचा इतका प्रचंड व्याप होता की त्यांना इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नसे. परंतु नानांना सार्वजनिक कामाची अत्यंत आवड होती. त्यामुळे जनसेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.  मुंबई शहरातील अनेक सामाजिक संस्थांच्या उभारणीमध्ये नानांचा  सहभार होता.  बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, एलफिनिशन कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी इत्यादी संस्थांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. अनेक सार्वजनिक संस्थांमध्ये त्यांनी आर्थिक स्वरूपाची मदतही केली. 


भारतीय समाजातील स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणाचे ते खंदे पुरस्कार होते. त्या काळातील सनातनी लोकांचा प्रखर विरोध पत्करून 1848 मध्ये मुंबई येथे, स्वतःच्या घरात त्यांनी मुलींची शाळा सुरू केली. 

1829 मध्ये सतीची चाल बंद करणारा कायदा, लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केला. या कायद्याला भारतातल्या सनातनी लोकांचा प्रचंड विरोध होता. त्यामुळे देशामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. अशावेळी नानांनी या कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले.  आणि सतीची चाल कशी अमानुष आहे हे त्यांनी जनतेला पटवून दिले. 

सामान्य जनतेच्या विविध प्रश्नांची सरकार दरबारी दाद लावण्यासाठी  नाना तत्पर असत. मुंबईतील अनेक सामान्य लोकांची गाऱ्हाणी, त्यांनी सरकार दरबारी मांडली. आणि त्याला योग्य तो न्याय मिळवून दिला.  सामान्य जनतेला, विशेषत: गोरगरिबांना, नाना आपल्या आधार वाटत असत. 

नानांनी शिक्षण क्षेत्रातही अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली. मुंबई इलाख्यात नव्या शिक्षणाचा पाया घालण्याचे कार्य, मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ड एल्फिन्स्टन यांच्या मदतीने, नाना शंकरशेठ यांनी सुरु केले.  1823 मध्ये मुंबईत बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. आणि या संस्थेच्या मार्फत मुंबई शहरांमध्ये आणि मुंबई बाहेरही अनेक शाळा त्यांनी उघडल्या. या कामी त्यांना सदाशिवपंत छत्रे, बाळाशास्त्री जांभेकर यांचेही सहकार्य लाभले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच सुरुवातीच्या इंग्रजी राज्यकारभारात पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या तरुणांची पहिली पिढी उदयास आली. त्यापैकी अनेक तरुणांनी महाराष्ट्रातील समाज सुधारण्याच्या कार्यात खूप महत्त्वपूर्ण योगदान दिले. याचे सर्वांचे श्रेय अर्थातच जगन्नाथ शंकरशेठ यांच्याकडे जाते. 

भारतीय समाजात विद्येचा आणि ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि येथील तरुणांमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी 1845 मध्ये मुंबईमधे स्टुडन्ट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी स्थापन केली. नानांनी या संस्थेला आर्थिक आणि इतरही खूप मदत केली मुंबईच्या इलाख्याचा गव्हर्नर माऊंट स्टुअर्ड एलफिन्स्टन यांनी अतिशय चांगली काम केली होती. त्यांच्या सन्मानार्थ, त्यांचे स्मारक उभारण्यासाठी नानांनी एक फंड जमवल्या. या फंडातून मुंबईमधे एल्फिन्टन कॉलेजची स्थापना केली. आजही हे अतिशय महत्त्वाचे कॉलेज म्हणून मुंबईत मानले जाते. तसेच मुंबई इलाखाचा आणखीन एक गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांच्या स्मरणार्थ मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेज उभारण्यात नानांनी पुढाकार घेतला होता. 

राजकीय कार्यातही नाना पुढे होते. राजकीय प्रश्नांबाबत नानांचे मत आज आपल्याला वेगळे वाटेल परंतु 1818  मध्ये मराठ्यांचा राज्य संपून ब्रिटिश राजवट भारतामध्ये स्थिरावली. आणि लगतच्याच काळात, साधारण 1825 ते 35 -40 पर्यंत नाना शंकरशेठ यांचे कार्य आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळातील सर्वांचे ब्रिटिश राजवटी बद्दल चांगले मत होते. अनेक वर्ष चालू असलेली युद्धे संपली, कायद्याचे राज्य आले, सुरक्षितता वाढली. यामुळे सुरवातीच्या शिक्षित वर्गाला ब्रिटिश राजवट आपल्या भल्यासाठी आली आहे असे वाटत असे.  इंग्रज राज्यकर्त्यांच्या सहकार्यानेच आपल्या लोकांच्या गाऱ्हाण्यांची, अडीअडचणींची दाद लावून घेता येईल असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी याबाबत राज्यकर्त्यांशी सहकार्य करण्याच्या गरजेवरती भर दिला. 

याच उद्देशाने जगन्नाथ शंकरशेठ आणि दादाभाई नौरोजी यांनी मुंबईत १८५२ मध्ये बॉम्बे असोसिएशन संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून येथील जनतेची दुःखे, अडचणी सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी. आणि जनतेच्या सुखाकरता सरकारला प्रत्येक गोष्टी सहकार्य करावे, असा त्यांचा प्रयत्न असे. बॉम्बे असोसिएशन ही भारतातील राजकीय स्वरुपाची पहिली संस्था होती. बॉम्बे असोसिएशनची स्थापना ही, भारतातील सनदशीर राजकारणाची सुरुवात मानता येईल. पुढील काळात हीच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय पातळीवरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. यावरूनच बॉम्बे असोसिएशनचे महत्त्व लक्षात येईल.  

प्रारंभीच्या काळात सरकारी नोकऱ्यांमध्ये इंग्रज आणि भारतीय यांच्यामध्ये खूप पक्षपात होत असे. प्रशासनातील महत्त्वाची पदे इंग्रज किंवा गोऱ्या लोकांसाठी राखीव ठेवली जात. सरकारच्या या पक्षपाती धोरणाविरुद्ध ज्या भारतीय नेत्यांनी सुरुवातीला आवाज उठवला, त्यामधे जगन्नाथ शंकरशेठ हे होते.  भारतीय लोकांना विविध क्षेत्रांमध्ये गोऱ्यांचे बरोबर अधिकार मिळावेत यासाठी ते प्रयत्नशील होते.उदाहरणार्थ सुप्रिम कोर्टा मध्ये जी ज्युरीची पदे असत ती, सुरुवातीला फक्त गोऱ्यांनाच दिली जात.  नानांनी या पदांवर भारतीय लोकांचाही समावेश केला जावा म्हणून प्रयत्न केले.  1836 मध्ये प्रथमच भारतीय लोकांचा ग्रँड ज्युरी मध्ये बसण्याचा हक्क मान्य झाला. 


जगन्नाथ शंकरशेठ हे दातृत्वाबद्दल देखील फार प्रसिद्ध होते. शाळा, दवाखाने, धर्मशाळा, ग्रंथालय, मंदिरे यासारख्या अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी उदार हस्ते देणग्या दिल्या. आपल्या संपत्तीचा अतिशय सुयोग्य वापर त्यांनी केला. नानांचा त्यांच्या कार्याचा भारतीयांनी गौरव केलाच परंतु ब्रिटिश सरकारनेही त्याचा गौरव केला. अनेक समित्या, पदे यावर त्यांची नियुक्ती करून सरकारने त्यांना सन्मानित केले. मुंबईच्या शिक्षणच्या व्यवस्थेवरती नियंत्रण करण्यासाठी सरकारने 1840 मध्ये बोर्ड एज्युकेशनची स्थापना केली होती. हे बोर्ड जोपर्यंत अस्तित्वात होते तोपर्यंत नाना त्याचे सन्माननिय सदस्य राहिले. 1857 मध्ये मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्यापीठाचे फेलो म्हणूनही नानांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मुंबईचे मुन्सिपल कमिशनवरही त्यांची नियुक्ती झाली होती. 1835 मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस हा बहुमान ब्रिटिश सरकारने त्यांना दिला. 


आधुनिक मुंबईच्या शहराच्या उभाणीतही त्यांचा फार मोठा वाटा आहे. नानांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे मुंबईच्या प्रगतीचा आलेखच होता असे म्हटले जाते. 

सर्वांगीण सुधारण्याचे बिजारोपण करणारे महाराष्ट्राचे पहिले समाज सुधारक असे वर्णन नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांचे केले जाते.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आसामचा सहभाग

देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आसामने महत्त्वाची भूमिका बजावली.  1826 मध्ये यंदाबूच्या तहानंतर आसाम थेट ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आला. तेव्हापासून, आसामच्या अनेक लोकांना परकीय वर्चस्वापासून स्वातंत्र्याची तीव्र इच्छा वाटू लागली.

गोमधर कोंवर यांनी असा पहिलाच प्रयत्न केला. मातृभूमीचे हरवलेले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी त्यांनी कंदुरा डेका फुकन, धर्मधर, हरनाथ आणि इतर काही सरदारांसह इंग्रजांविरुद्ध लढा दिला. 1828 मध्ये बंडखोरांनी सादिया येथील ब्रिटिश शस्त्रागारावर हल्ला केला. इंग्रजांनी हे बंड चिरडून टाकले, पण आसामच्या लोकांच्या मनातील स्वातंत्र्याची धगधगती इच्छा ते दाबू शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या बंडाची नव्याने तयारी सुरू झाली. यावेळी पियाली बारफुकन यांनी पुढाकार घेतला. त्यांना जिउराम दुलिया बरुआ, बेनुधर कोंवर, रुपचंद कोंवर, देउराम दिहिंगिया, बौम चिंगफौ, हरनाथ आदींनी मदत केली. या अनुयायांच्या टोळीने पियाली बारफुकनने इंग्रजांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आणि रंगपूर येथील ब्रिटिश छावणी जाळण्याचा प्रयत्न केला. योजना यशस्वी झाली आणि छावणी उद्ध्वस्त झाली. पण इंग्रजांनी पियाली बारफुकन, जिउराम बरुआ आणि इतर काही जणांना ताब्यात घेतले. पियाली आणि जिउराम यांना फाशी देण्यात आली आणि इतरांना 14 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. 

त्या काळात, गदाधर गोहेन नावाचा आणखी एक देशभक्त ब्रिटीश सैन्यातील काही स्थानिक शिपायांसोबत उठावाची योजना आखत होता आणि त्याने वरच्या आसाममध्ये तैनात असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याची योजना प्रत्यक्षात येण्याआधीच इंग्रजांनी त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले.

1857 मध्ये, जेव्हा उत्तर भारतात उठावाने झाला, तेव्हा आसाममधील मणिराम दिवाण नावाच्या व्यक्तीने  पूर्वेकडील कोपऱ्यात उठाव करण्याचा प्रयत्न केला. तो कोलकात्यात गेला आणि मधु मल्लिक नावाच्या दुसऱ्या बंडखोराच्या मदतीने त्याने आसाममध्ये उठावाची योजना आखली. तिथून त्याने शेवटचा अहोम राजा कंदर्पेश्वर सिंघा आणि त्याचा सल्लागार पियाली बरुआ यांना बंडाच्या मार्गाची माहिती देण्यासाठी पत्रे पाठवण्यास सुरुवात केली. मणिरामच्या ब्रिटीशविरोधी कटात सर्व लोकांनी भाग घेतला. मयाराम नझीर, नीलकांत चोलधारा फुकन, मरंगीखोवा गोहेन, दुतीराम बरुआ, बहादूर गावबुर्हा, फरमुद अली, त्रिनायन, कमला बरुआ आणि इतर उल्लेखनीय होते. सहाबाद येथे तैनात असलेल्या काही हिंदुस्थानी शिपायांनीही त्यांना पाठिंबा दिला. योजनेनुसार स्थानिक सैनिक अहोम राजाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांवर हल्ला करतील असे ठरले होते, तर मणिराम कोलकात्याहून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा घेऊन पुढे निघाले. दुर्दैवाने प्रयत्न अयशस्वी झाला.  इंग्रजांनी अनेक बंडखोरांना पकडले आणि तुरुंगात टाकले. मणिराम यांना कोलकाता येथे कैद करण्यात आले. इंग्रजांनी कंदर्पेश्वर सिंगालाही अटक करून तुरुंगात टाकले. मोठ्या संख्येने देशभक्तांना अंदमानात हद्दपार करण्यात आले. 26 फेब्रुवारी 1858 रोजी मणिराम दिवाण आणि पियाली बरुआ यांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध 'उच्च देशद्रोह' केल्याबद्दल जोरहाट तुरुंगात फाशी दिली.

इ. स. 1861 मध्ये, नागाव जिल्ह्यातील फुलागुरी येथे शेतकरी उठाव झाला. 1894 साली दररंग येथील पाथरुघाट येथे आणखी एक शेतकरी उठाव झाला. या दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांनी ब्रिटिश राजवटीच्या शोषण आणि जाचक धोरणाविरुद्ध निर्भीडपणे आंदोलन केले. इंग्रजांनी निर्दयीपणे हा उठाव दडपून टाकला आणि अनेक शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले.

काही काळ शांतता होती, पण आसामी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची इच्छा धुमसत होती. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि 1905 मध्ये 'बंगालच्या फाळणीनंतर' 'स्वदेशी आंदोलन' यांचा आसाममधील देशभक्त लोकांवर मोठा प्रभाव पडला. 1921 मध्ये महात्मा गांधींच्या येण्याने, आसाममधील स्वातंत्र्यलढ्यालाही उर्वरित भारताबरोबरच वेग आला. हजारोंच्या संख्येने काँग्रेसचे स्वयंसेवक 'असहकार', 'सविनय कायदेभंग' आणि इतर आंदोलनांमध्ये सामील झाले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील निशस्त्र आंदोलन आणि क्रांतिकारकांचे सशस्त्र प्रयत्न या दोन्हींमध्ये आसाममधील देशभक्त लोकांनी उडी घेतली. चंद्रनाथ सरमा, नवीन चंद्र बारदोलोई, तरुण राम फुकन, गोपीनाथ बारदोलोई आणि इतरांनी आसामच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले.

9 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 'भारत छोडो' आंदोलनाची घोषणा केली, तेव्हा देशाच्या या भागात या आंदोलनाने मोठे स्वरूप धारण केले. गोपीनाथ बरदोलोई, बिष्णुराम मेधी, ​​फखरुद्दीन अली अहमद, ओमियो कुमार दास, ज्योतिप्रसाद अग्रवाला, हेम बरुआ, बिजॉय चंद्र भगवती, चंद्रप्रभा सैकियानी, पुष्पलता दास यांसारख्या सक्षम आणि कार्यक्षम नेत्यांनी राष्ट्रीय काँग्रेसने आयोजित केलेल्या आंदोलनाचे आसाममधे नेतृत्व केले. आसाममधील जयप्रकाश नारायण आणि यांच्या समाजवादी अनुयायांच्या कारवायांमुळे या लढ्याची गती प्रचंड वाढली. 

 'रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया' (RCPI) नावाच्या छोट्या कम्युनिस्ट गटाचे सदस्य त्यात सहभागी झाले. इंग्रजांच्या विरुद्ध देशभक्तीपर लढा आणि क्रांतिकारी कारवायां आणि समाजवादी क्रांतिकारी नेते शंकर बरुआ यांच्या 'मृत्यू वाहिनी'च्या स्वयंसेवकांनी केलेल्या विध्वंसक कारवायांमुळे ब्रिटिश सरकारला राज्य करणे अवघड होऊ लागले. 'छोडो भारत' आंदोलनादरम्यान कुशल कोंवर, टिलक डेका, कनकलता बरुआ, मुकुंदा काकती, भोगेश्वरी फुकनानी, मंगल कुर्मी, मणिराम कचारी, हेमोराम पातोर, गुणाभी बरदोलोई, लेरेला बोरो, रतन कचारी, लखी हजारिका, सुताराम सुजारिका, ठगाराम यांसारखे देशभक्त होते. मदन बर्मन, रौता बोरो, निधानू राजबंगशी आणि इतर अनेकांनी ब्रिटिश राजवटीतील फाशी, गोळीबार आणि इतर अत्याचारांमधे आपले प्राण दिले. त्यांच्या बलिदानाने केवळ या पूर्वेकडील लोकांनाच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा दिली. बिष्णू राभा, हरेन कलिता, हरिदास डेका, खगेन बार्बोरा, मथुरा डेका, गोविंदा कलिता, चट्रासिंग टेरॉन, चिंताहरन कलिता, नीरेंद्र लाहिरी, उमा सरमा, सुरेश भट्टाचार्य, सरत राभा, मोहनलाल मुखर्जी, हेना गांगुली यांनी आरसीपीआयच्या क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

जेव्हा 'छोडो भारत' चळवळ अंतर्गत दृश्यावर वर्चस्व गाजवत होती, तेव्हा  नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या 'आझाद हिंद फौज' किंवा 'इंडियन नॅशनल आर्मी' (आय एन ए) सोबत ब्रिटिश सैन्यावर बाहेरून हल्ला केला. आय एन ए ने आसामच्या पूर्व सीमेवरून भारतीय मुख्य भूमीत प्रवेश केला आणि मणिपूरमधील मोइरांग आणि नागालँडमधील कोहिमा यांना मुक्त केले. आझाद हिंदच्या सैनिकांनी इंफाळ, पालेल, बिशेनपूर, दिमापूर आणि इतर ठिकाणच्या टेकड्या आणि डेल आणि जंगलात इंग्रजांविरुद्ध युद्ध केले. आसामच्या मैदानी भागातील लोकांव्यतिरिक्त, नागा, मणिपुरी, कुकी आणि इतर जमातींचे अनेक डोंगरी लोक ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी या राष्ट्रीय मुक्ती दलात सामील झाले. उमेश चंद्र देवचौधरी, श्रीदाम चंद्र महंता, जलालुद्दीन अहमद, चित्तरंजन देबनाथ, एस रहमान, एस लॉरत सिंग, हरेंद्र नाथ मेच हे आसाम खोऱ्यातून आयएनएमध्ये सामील झालेल्या आणि मातृभूमीसाठी लढणाऱ्यांमध्ये  होते.

स्वातंत्र्य लढा आणि जागतिक परिस्थिती या सर्वांतून शेवटी ब्रिटिशांनी भारतातून परत जाणे स्विकारले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी उर्वरित राष्ट्रासह आसामही  स्वातंत्र्य झाला.

---

(डिसक्लेमर: व्यक्ती, गावं यांच्या  नावांचे उच्चार मराठीत लिहिताना वेगळे झाले असण्याची शक्यता आहे. इंग्रजी स्पेलिंग नुसार लिहिले आहेत. तसच टिनेजसाठी- लिहिलं असल्याने भरपूर तपशील अन भाषाही जरा वेगळी वापरलीय😃)

Sunday, April 14, 2024

प्रार्थना समाज


ब्रिटिश राजवट भारतात स्थिरावल्यानंतर आणि इथे पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण सुरू झाल्यानंतर येथील नवशिक्षक भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी नवे विचारांची जाणीव होऊ लागली. जोडीने पाश्चात्य धर्म, धार्मिक विचार, मिशनरी यांचा प्रभावही वाढू लागला. काही विचारी सुशिक्षितांना, आपल्या समाजात सुधारणा केली पाहिजे असे वाटू लागले. बंगालमध्ये  राजा राममोहन राय यांनी 1828 मध्ये ब्राम्हो समाजाची स्थापना केली. आपल्या धर्मातील दुष्परिणामांची जाणीव आणि ख्रिश्चन धर्मातील विसंगत गोष्टी या दोन्हीवर येथील सुधारकांचा विचार सुरू झाला. राजा राममोहन रॉय यांच्या कार्याची माहिती बघून महाराष्ट्रातील सुधारक दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभेची स्थापना 1848 मध्ये मुंबई येथे केली. खरे तर ही समाज सुधारण्यासाठीची संस्था. परंतु त्या काळात असे विचार मांडणे हेही अतिशय धाडसाचे होते. पारंपारिक धर्म मार्तंडांचा प्रचंड प्रभाव समाजावरती होता. त्यामुळे ही संस्था गुप्त स्वरूपात होती. एकेश्वरवाद, रोटीबेटीचे बंधन तोडणे, जातीभेद मोडणे ही त्यांची मूळ उद्दिष्ट होती. या गुप्त संघटनेतील सदस्यांची यादी कोणीतरी पळवली आणि त्यामुळे सगळे सदस्य हादरले. आपले नाव उघड झाले तर समाज आपल्याला वाळित टाकेल अशी भीती वाटल्यामुळे परमहंस सभा संपुष्टात आली. (1860) ( तेव्हा वाळित टाकणं हे अतिशय गंभीर असे. त्या घरांशी कोणताही संपर्क केला जात नसे)


 1864 मध्ये ब्राह्मण समाजाचे ज्येष्ठ नेते केशवचंद्र सेन यांची मुंबई आणि पुणे येथे जाहीर व्याख्याने झाली. या व्याख्यानांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुन्हा येथील समाजसुधारकांनी चंग बांधला. आणि मुंबईत 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली आत्माराम पांडुरंग म्हणजेच दादोबा पांडुरंगाचे धाकटे भाऊ यांनी ही स्थापना केली. या संस्थेच्या पुणे, नगर, सातारा या ठिकाणीही शाखा निघाल्या.  प्रार्थना समाजामध्ये नंतर अनेक मोठे सुधारक सामील झाले. न्यायमूर्ती म. गो. रानडे, भाऊ महाजन, न्या. ना.ग. चंदावरकर,  व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर, मामा परमानंद, सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे ( बहुजन समाजापर्यंत प्रार्थना समाज नेण्याचे काम यांनी केले), वामन आबाजी मोडक, इत्यादी.

 प्रार्थना समाजामध्ये तुकाराम आणि इतर संतांना मोठे महत्त्वाचे स्थान होते. अध्यात्म आणि संतांचे अभंग अशी मोट त्यांनी बांधली. 

सत्य, ज्ञान आणि आनंद अशा रूपातील सगुण ईश्वर प्रार्थना समाजाने मानला. उदबोधन, स्तवन, ध्यान व प्रार्थना, उपदेश, आरती अशा उपासना पद्धती प्रार्थना समाजामध्ये स्वीकारल्या. ईश्वर एकच आहे, त्यांनी विश्व निर्माण केले आहे, त्याची केवळ उपासना करणे पुरेसे आहे, सत्याची कास धरून केवळ मानसिक पूजन करणे पुरेसे आहे, असे प्रार्थना समाज बांधतो. मूर्ती व प्रतिमा यांचे पूजन प्राथमिक प्रार्थना समाज नाकारतो. तसंच त्यांना अवतारही मान्य नाहीत, आणि विशिष्ट धर्मग्रंथ ही त्यांना मान्य नाहीत. 

 सर्व मानव ईश्वराची लेकरे आहेत, म्हणून त्यांनी भेदभाव न मानता बंधुभावाने राहावे, असे प्रार्थना समाज मानतो. संत तुकाराम आणि त्यांचे साहित्य हे प्रार्थना समाजाचे मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण, अस्पृश्यता निवारण, बालविवाह बंदी, दलितांचा उद्धार, शिक्षणाचा विस्तार, अनाथ आश्रमांची उभारणी, ग्रंथ लेखनासाठी प्रोत्साहन, अशी विविध सामाजिक कार्ये प्रार्थना समाजाने केली. अनेक शाळा ही त्यांनी सुरू केल्या.

---