Sunday, November 6, 2022

त्र्यं. शं. शेजवलकर यांचे म. गांधींबाबतचे विचार


(मराठी विकास संस्था मुंबई आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित कै. त्र्यं. शं. शेजवलकर जन्मशताब्दि समारोहातील चर्चासत्रामध्ये केलेला शोधनिबंध - जुलै १९९५)

त्र्यंबक शंकर शेजवलकर हे एक अनेकविध पैलूंचे व्यक्तिमत्व ! त्यांच्या लेखांच्या सूचीतील विषयांची विविधता पाहिली तरी हे स्पष्ट होईल. त्यांच्या लेखांंतून व्यक्त होणाऱ्या म. गांधींवरील त्यांच्या विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या शोधनिबंधात केला आहे.

म. गांधी वर असे, त्यांनी दोन लेख लिहिले. एक मोहनदास करमचंद गांधी' हा १९३० साली लिहीलेला लेख आणि दुसरा १९४८ साली लिहीलेला 'गांधी प्रणित समाजरचना शक्य आहे का?' हा लेख . असे असले तरी इतर अनेक लेखांमधून त्यांची गांधींबद्दलची मते व्यक्त झालेली दिसतात. पैकी रामदास, ब्राह्मण्याचा हास, विभावरी वाङ्मयाच्या निमित्ताने, पानिपतची अप्रकाशित प्रस्तावना, टॉयन्बीचा इतिहासबोध, टॉयन्बीचे इतिहासावरील महाभाष्य, लोकमान्य टिळक इत्यादि लेखांचा उपयोग या निबंधामध्ये करण्यात आला आहे.

१९३० सालच्या 'मोहनदास करमचंद गांधी' या लेखामध्ये शेजवलकरांनी गांधींचा मार्ग, तत्त्वज्ञान यांचा उहापोह केला आहे. शेजवलकर लिहीतात, "गांधींचा विशेष देशभक्ती हा तर आहेच परंतु जोडीने अखिल मानवजातीच्या हिताचा मार्ग शोधण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांचा महत्त्वाचा विशेष होय"१ गांधींनी सांगितलेला सत्य-अहिंसा-ब्रह्मचर्य-अस्तेय-वैराग्य हा संयमाचा मार्ग प्राचीन काळापासून हिंदुस्थानात आहे. परंतु या नियमांचा उपयोग विशिष्ट काळामध्ये कसा करून दाखवायचा हे गांधींनी वर्तनाने दाखविले असे शेजवलकर मानतात.

म. गांधींनी सार्वत्रिक सुधारणेला प्राधान्य दिले आणि त्यासाठी कायद्यापेक्षा धार्मिक स्वरूपाच्या आचारांचे अधिष्ठान त्यांनी महत्त्वाचे मानले. "गांधींची सर्व शक्ती त्यांच्या धार्मिक भावनेवर अवलंबून होती"२ असे शेजवलकर सांगतात आणि अखिल मानवजातीत कायद्याने नव्हे तर गांधींसारखी शक्ती सर्व राष्ट्रांत गांधींमधून व्यक्त होणाऱ्या जगातील सर्व महापुरुषांचे तत्त्वज्ञान अनुसरण्यातून प्राप्त होईल"३ असा विश्वास शेजवलकरांनी या लेखामध्ये व्यक्त केला आहे. इ.स. १९५८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'रामदास' या लेखामध्ये "रामदासांचे राजकारण, समाजकारण, राजकीय संघटन, सर्वांगिण सुधारणा - टिळक व गांधी यांनी पुढे चालविली".४ असे शेजवलकर लिहितात. परंतु म. गांधींचे जीवन हे कोणत्याही हिंदी ग्रंथापेक्षा ख्रिस्ती नव्या कराराने उद्दिपीत झालेले आहे असे शेजवलकरांना वाटते. म. गांधींचा भर शुभवर्तमान, श्रद्धा, भक्तीभाव यांवर होता. याच लेखात "गांधीचा आतला आवाज म्हणजे श्रवण-मनन-निदि-ध्यासांनी निश्चित झालेला विचार एवढाच समजला पाहिजे"५ असे शेजवलकर लिहितात.

तत्पूर्वी १९४८ सालच्या 'गांधीप्रणित समाजरचना शक्य आहे कां?' या लेखामध्ये शेजवलकर म. गांधींचा मार्ग आधुनिक काळामध्ये कसा शक्य नाही हे स्पष्ट करतात. गांधींची सर्व शक्ती त्यांच्या धार्मिक भावनेवर होती हे पुन्हा मांडून अशी भावना आज एकातही नाही. त्यामुळे गांधींच्या मार्गावर आधारित नवीन समाजरचना प्रत्यक्षात येणे शक्य नाही असे शेजवलकर लिहितात. याशिवाय बदलती जागतिक परिस्थिती आणि गांधींच्या तत्त्वज्ञानाची अनैतिहासिकता ही देखिल नवीन समाजरचना प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने शक्यतेतील नाही असे ते म्हणतात. "कोणत्याही नवमताची निर्मिती ही ऐतिहासिक गरजेतून जशी होते; तसाच तिचा नाशही ऐतिहासिक गरजेतून होतो. असे असतानाही जुन्या काळी नष्ट झालेल्या बौद्ध पंथाचे पुनरूज्जीवन गांधींनी का केले?" ६ असा प्रश्न शेजवलकर उपस्थित करतात. मानवाच्या संपूर्ण वाटचालीमध्ये पूर्णतः नवीन असे काही घुसडणे शक्य नसते परंतु तरीही मानव जातीत निर्माण होणारे महात्मे हे मूलत: एकांगी एक कल्पनेने पछाडलेले असतात. आणि म्हणूनच ते महात्मे ठरतात. गांधींचे सर्वोदयी तत्त्वज्ञान आणि त्यांची सतत सत्याचे प्रयोग करण्याची भूमिका यामुळे शेजवलकर म. गांधींना संपूर्ण ज्ञानी मानीत नाहीत.७ संपूर्ण ज्ञानी हा संन्यस्त असल्याने त्याला ज्ञानोत्तर कर्माची आवश्यकता नसते आणि म्हणून खरा ज्ञानी जगाला ज्ञात होऊ शकत नाही. जगाला जो ज्ञात होतो तो ज्ञानी ज्ञानाच्या क्षेत्रातील खालच्या दर्जाचा असतो. गौतमबुद्धाच्या शब्दांचा दाखला देऊन शेजवलकर म्हणतात की ज्याप्रमाणे शुद्ध धातू भेसळ केल्याशिवाय चलनी नाणे होऊ शकत नाही तसेच कोणत्याही महात्म्याचे तत्वज्ञान साकार व्हायचे असेल तर त्यात भेसळ करावीच लागते,

गांधींचा पंथ हा अंतिम सामाजिक विकास, राज्यसंस्था नष्ट होऊन मानव स्वतंत्र होण्यात मानतो आणि हा पंथ, संस्था प्रधान नाही असे शेजवलकर प्रतिपादन करतात. नवस्वतंत्र भारत हा अंतर्गत दृष्ट्या इतका विभिन्न झालेला आहे की असा देश जागतिक संकटांपुढे कसा उभा राहील हा मुख्य प्रश्न आहे. तेथे अशा नवीन समाजरचनेचा प्रयोग कसा सुरू करणार आणि यशस्वी कसा करणार असा प्रश्न शेजवलकर उपस्थित करतात. एकूणात गांधी तत्त्वज्ञान आणि गांधीप्रणित समाजरचना कितीही आदर्श असली तरी स्वतंत्र भारतामध्ये ती रूजविता येणार नाही असा विचार शेजवलकरांनी या लेखात मांडला आहे.

१९४८ साली शेजवलकरांचा आणखीन एक लेख प्रसिद्ध झाला तो म्हणजे 'ब्राह्मण्याचा हास' हा होय. यामध्ये भारतातील ब्राह्मणांचा, ब्राह्मण्याचा समाजावरील पगडा यांचे विवेचन करताना, म. गांधींच्या विचारांबाबत आपली मते शेजवलकरांनी मांडली आहेत. ते म्हणतात, 'गांधींनी हिंदुस्थानात शांतता प्रस्थापित न करता उलट खळबळ निर्माण केली'. ही खळबळ केवळ राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नाही तर सर्वच क्षेत्रात असंतोष निर्माण झाला. "हा निर्माण झालेला असंतोष इंग्रजांना बाहेर काढण्यास निश्चितच उपयुक्त ठरला पण स्वातंत्र्योत्तर काळात याच असंतोषाने येथील समाजाच्या अमानुषतेचे खरे स्वरूप चव्हाट्यावर आणले"८ असे शेजवलकर म्हणतात. या असंतोषाच्या जोरामुळे आणि महायुद्धाने अचानक बदललेल्या जागतिक परिस्थितीमुळे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य राजकीय पक्षांच्या अंदाजापूर्वी मिळाले. आणि येथील राजकीय तोल ढासळला. शेजवलकरांच्या मते म. गांधींनाही हे लक्षात आले नाही.

शेजवलकरांच्या मते गांधींच्या तत्त्वज्ञानामध्ये अनेक ढोबळ चुका आहेत पण सर्वात मोठा तोटा झाला तो त्यांच्या अहिंसेच्या निःसंदिग्ध तंत्रामुळे. शत्रूलाही गांधींबद्दल विश्वास निर्माण झाला की कोणत्याही परिस्थितीत गांधी अत्याचाराचा मार्ग स्विकारणार नाहीत. याचाच गैरफायदा जीनांनी पाकिस्तानाच्या निर्मितीसाठी करून घेतला. "गांधींना आपल्या मार्गाच्या खरेपणाबद्दल इतका निढळ विश्वास होता की त्यावर आधारित आपले जळजळीत जीवनकार्य त्यांनी रतिभर ढळू दिले नाही. परंतु, यामुळेच पाकिस्तानची निर्मिती झाली असे म्हणावे लागते”९ असे शेजवलकर म्हणतात. गांधींचा मार्ग सर्व जगाच्या हिताचा होता हे शेजवलकर मान्यच करतात. परंतु मार्ग सोडण्यापेक्षा मरण पत्करावे हे मात्र आजच्या जगात अत्यंत घातक ठरेल. असे शेजवलकर सांगतात. याचा अर्थ शेजवलकरांना तेव्हा गांधीवाद पूर्ण अमान्य होता असे नव्हे तर गांधींच्या तत्त्वांशी ज्यांचे प्रामाणिक मतभेद आहेत त्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे असे ते म्हणतात. "आज जगामध्ये गांधींचा मार्ग स्वीकारला नाही तर जग सुधारणार नाही आणि हा मार्ग व्यवहार्य नसल्याने आज जगामध्ये देशाने कोणता मार्ग स्विकारावा हा प्रश्न आहे.' १० असे शेजवलकरांना वाटते.

म. गांधींबाबत शेजवलकरांचे विचार व्यक्त होणारा आणखीन एक लेख सापडतो तो म्हणजे 'पानिपत' या पुस्तकासाठी लिहिलेली परंतु प्रत्यक्षात न छापलेली त्यांची प्रस्तावना होय. यात शेजवलकरांनी गांधींबाबत आपली मते अत्यंत परखडपणे मांडलेली दिसतात. इतिहासाची खरोखरीच गरज नाही हे गृहीत धरून जगाला चकीत करून सोडणारे राजकारण गांधींनी अवलंबिले असे सांगून शेजवलकर पुढे लिहितात, “पाकिस्तान देण्यात गांधींनी या देशातील हिंदू प्रजेचेच नुकसान केले असे नसून त्यांच्या तत्त्वचळ्या आचरणाने पाकिस्तानातील मुस्लिम जनतेचेही तितकेच नुकसान झाले आहे”११ काँग्रेसच्या तथाकथित अहिंसेच्या तत्त्वाने निरपराध हिंदू-मुस्लिम जनतेची प्राणहानी टळली नाही वा परक्यांना या भूमीपासून दूर ठेवण्यात यश आले नाही; असा आरोप शेजवलकरांनी केला आहे.

१९४८ पासून पुढील कालावधीमध्ये इतर अनेक लेखांतून शेजवलकरांची गांधी तत्त्वज्ञान-मार्ग-गांधीवादी याबद्दल मते व्यक्त झालेली आहेत. पैकी काहींमध्ये गांधींच्या बाजूची मते व्यक्त होतात. उदा. “रानडे, टिळक, गांधी तीनही पुढाऱ्यांचे खोल ठसे जनमानसावर उठलेले असूनही त्यातील वाईट तेवढ्या बाजूच दुर्दैवाने पुढे आलेल्या दिसतात"१२ किंवा, "महाराष्ट्राला पूर्वेतिहास नसता तर महाराष्ट्रात गांधींविरद्ध जी अढी दिसते ती मुळातूनच धरली नसती"१३

तर काहींत गांधीवादाच्या अव्यवहार्यतेबाबत मते व्यक्त होतात. उदा. “आज जगाची रचना अशी झाली आहे की तीत कोणत्याही एका बलिष्ट य राष्ट्राला स्वराष्ट्राची घटना स्वतःला वाटेल त्या उच्च तऱ्हेची घडविता येणार नाही. कारण परचक्राची भीती होय. गांधींच्या अतिउच्च अहिंसावादाच्या मार्गातील ही मोठी धोंड आहे."१४ तर काहींत गांधींच्या पूर्ण विरोधी मते व्यक्त होताना दिसतात. उदा." गांधीवाद हा आचारदृष्ट्या व भावनिक दृष्ट्या निश्चितच उपयुक्त ठरत असला तरी ज्ञानाचा डोळसपणा मात्र त्यांत दिसत नाही."१५ किंवा "गांधींची सर्वच सुधारणा या देशात स्वखुषीने क्वचितच कोणी मान्य केली असेल. मतपरिवर्तनाने पटली म्हणून गांधींची मते हिंदुस्थानात प्रचलित झालेली नसून ती लादली गेलेली आहेत"१६

किंवा, "गांधी हे हिंदु मुत्सद्दी म्हणजे हिंदू धर्माचे, लोकांचे व संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी बद्ध परिपक्व झालेले परमदेशभक्त मुत्सद्दी नव्हते. आपली तत्त्वे जे स्वीकारणार नसतील त्यांचे काय झाले याची चौकशी करावयास त्यांस फुरसत नव्हती, इतके ते स्वतत्त्वभ्रमिष्ट होते” १७

१९३० पासून शेवटपर्यंत शेजवलकरांची गांधींबद्दलची मते आपल्याला अशी बदलत जाताना दिसतात. सुरुवातीला केवळ हिंदुस्थानातच उद्भवू शकेल असे आदर्श तत्त्वज्ञान, गांधींची धार्मिक भावना, आणि ईश्वर निष्ठेतील कार्यप्रेरक शक्ती, त्यांचे वेगळेपण, त्यांची ताकद आणि महात्म्य याबद्दल शेजवलकर पुनःपुनः लिहितात. १९४८ सालपासून गांधींचा मार्ग, तत्त्वज्ञान यांच्या व्यवहार्यतेबद्दल शेजवलकरांची मते बदललेली दिसतात. तरीही १९५८ पर्यंत गांधींच्या तत्त्वज्ञानाचे मानव जातीच्या हितामधील महत्त्व आणि हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या कार्याबद्दल एखादा अपवाद सोडला तर शेजवलकर गौरवोद्गारच काढतात. तोपर्यंत गांधीमार्ग - तत्त्वज्ञान हे आदर्श असले तरी आधुनिक जगात व्यवहार्य नाहीत असेच मत शेजवलकरांचे दिसते.

पानिपतच्या अप्रकाशित प्रस्तावने मात्र पूर्ण गांधी विरोध आपणास दिसतो. विभावरी वाङ्मयाच्या निमित्ताने लिहिलेल्या एका लेखामध्ये त्याची पूर्वपिठिका दिसते. एकंदरीत बदलत्या परिस्थितीत गांधीवाद कसा त्याज्य ठरत गेला याची झलक शेजवलकरांच्या लेखातून दिसते.

या सर्व लेखांतून शेजवलकरांची अभ्यासूवृत्ती, गांधी तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास, या तत्त्वज्ञानाचा फोलपणा कोठे आहे, या मार्गाची अव्यवहार्यता नेमकी कशात आहे, हे शेजवलकरांनी स्पष्ट केले आहे. गांधींचे मोठेपणा कशात आहे, मार्गाचा स्विकार आजच्या जगात कोठपर्यंत आणि कसा करणे शक्य आहे, याचा सखोल विचार त्यांच्या लेखनातून आपणास दिसतो. एखाद्या विषयावर आपला त्याची उदाहरणे, व्यवहार्यता, अभ्यास, त्यावरील मते, त्याची सत्यासत्यता आणि अशा सर्वांचा साकल्याने विचार लेखासारख्या मर्यादित लेखनप्रकारामध्ये करणे ही अतिशय कठीण गोष्ट. मं. गांधींच्या तत्त्वज्ञानाबाबत ते अधिकच कठीण! परंतु शेजवलकरांनी आपल्या लेखांमधून ते साध्य केलेले दिसते. आपल्या विषयाची चौकट-मर्यादा याची स्पष्ट जाणीव, अत्यंत चपखल शब्द आणि वाक्यरचना, विषयाचा परिपूर्ण अभ्यास, विषयामागील तळमळ, लेखनाप्रती निष्ठा शेजवलकरांच्या लेखनातून जाणवते. त्यांनी सांगितलेला कितीही अवघड विचार वाचताना चटकन समजतो. कोणतेही वाक्य सहसा पुन्हा वाचावे लागत नाही. विचारांची अत्यंत स्पष्टता असल्याशिवाय लेखनामध्ये ती येत नाही. शेजवलकरांच्या लेखनात ही स्पष्टता अत्यंत सहजतेने येते.

----

तळटिपा

१. मोहनदास करमचंद गांधी : शेजवलकरांचे लेख-संग्रह तृतीय खंड, पृ.३६०

२. कित्ता, पृ. ३६२

३. कित्ता, पृ.३६३

४. रामदास : शेजवलकर लेख-संग्रह - तृतीय खंड, पृ. २३

५. कित्ता, पृ. २४

६. गांधीप्रणित समाजरचना शक्य आहे का? : शेजवलकर लेख-संग्रह-तृतीय खंड, पृ.२५७

७. कित्ता, पृ. २५७

८. ब्राह्मण्याचा ऱ्हास : शेजवलकर लेख-संग्रह-तृतीय खंड पृ. २८६

९. कित्ता, पृ. २८८

१०. कित्ता, पृ. २८८

११. पानिपतची अप्रकाशित प्रस्तावना : शेजवलकर लेख-संग्रह पृ. २८६.

१२. न्या. रानडे : शेजवलकर लेख-संग्रह, तृतीय खंड पृ. ३३२

१३. महाराष्ट्राच्या मानगुटीवरचा समंध : शेजवलकर लेख-संग्रह, तृतीय खंड, पृ. २७६.

१४. क्रांतीच्या मूलतत्वांचा महाराष्ट्रातील अनुक्रम: शेजवलकर लेख-संग्रह, तृतीय खंड, पृ. 

१५. ब्राह्मण्याचा -हास : शेजवलकर लेखसंग्रह, पृ. २९४

१६. लोकमान्य टिळक : शेजवलकर लेख संग्रह, तृतीय खंड पृ. ३५१

१७. कित्ता, पृ.२५२.

---

लोकनायक जयप्रकाश नारायण

बिहारमधील गंगा--शरयू नद्यांच्या संगमाच्या गावी सिताबदियारा येथे ११ ऑक्टोबर १९०२ या दिवशी जयप्रकाश नारायण यांचा जन्म झाला. एक मध्यमवर्गीय, सरकारी अधिकारी असलेले हरसूदयाळ हे त्यांचे वडील आणि प्रेमळ आणि कर्तबगार फुलराणी ही त्यांची आई. जयप्रकाश लहानपणापासून शांत आणि गंभीर वृत्तीचे होते. त्यांचे शालेय शिक्षण पाटणा येथे झाले. मोठेपणी शास्त्रज्ञ व्हायचे या विचारांतून विज्ञान शाखेचे महाविद्यालयीन शिक्षण घेणे त्यांनी सुरू केले. दरम्यान बंगालमधील क्रांतिकारकांचे आणि त्यांच्या क्रांतिकार्याचे आकर्षण तरुण जयप्रकाशना वाटले. याच सुमारास बिहारचे नेते ब्रजकिशोर प्रसाद यांची कन्या प्रभावतींशी जयप्रकाश यांचा विवाह झाला. ब्रजकिशोर प्रसाद राष्ट्रीय चळवळीतील अनेक नेत्यांशी जवळून संबंधित होते. त्यांच्यामुळे राजेंद्रप्रसाद, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद इत्यादींशी जयप्रकाशांची ओळख झाली.

१९२० मध्ये म. गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली. सरकारी नोकऱ्या, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, परदेशी माल यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन म. गांधींनी जनतेला केले. १९२१ मध्ये जयप्रकाशांनी या अवाहनानुसार

महाविद्यालय सोडले आणि ते राष्ट्रीय चळवळीत उतरले. परंतु चौरीचौरा प्रकरणामुळे म. गांधींनी ही चळवळ मागे घेतली.

जयप्रकाश पुन्हा शिक्षणाकडे वळले. अमेरिकेत जाऊन शिक्षण घ्यायचे त्यांनी ठरवले. आवश्यक ते आर्थिक पाठबळे नसल्याने अमेरिकेत गेल्यानंतर मिळेल ते काम करून त्यांनी पैसा उभा केला आणि शिक्षण घेतले. वेळप्रसंगी मळ्यात, कारखान्यात, हॉटेलमध्ये वेटर अशी अनेक तऱ्हेची कामे त्यांनी केली, आणि शिक्षण चालू ठेवले. निसर्गविज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करता करता मार्क्स, लेनिन, मानवेंद्रनाथ रॉय, ट्रॉटस्की इत्यादींच्या साम्यवादी तत्त्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी केला. १९२९ मध्ये समाजशास्त्राची एम.ए. ही पदवी घेऊन जयप्रकाश भारतात परतले.

म. गांधींनी भेटण्यासाठी साबरमतीच्या आश्रमात जयप्रकाश गेले. तेथे म. गांधींनी जयप्रकाशांची आणि जवाहरलाल नेहरूंची ओळख करून दिली. दोन समान समाजवादी विचारवंतांची भेट झाली. नेहरूंनी अखिल भारतीय काँग्रेस च्या मजूर विभागाची सूत्रे जयप्रकाशांकडे सुपूर्द केली. मजुरांसाठीच्या विविध योजना जयप्रकाशांनी मांडल्या. दरम्यान म. गांधींनी मिठाचा सत्याग्रह पुकारला. जयप्रकाशही यात सहभागी झाले. याच लढ्यात त्यांना देशासाठी पहिली तुरुंगवासाची शिक्षा झाली. ही शिक्षा संपल्यानंतर पुन्हा मजूर विभागाचे काम त्यांनी सुरू केले. परंतु आईचा मृत्यू, वडिलांचे आजारपण, कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक अडचणी या सर्वांमुळे कडव्या मार्क्सवादी जयप्रकाशांना उद्योगपती बिर्लांकडे सचिव म्हणून काम स्वीकारणे भाग पडले.

भारतातील व जगातील घडामोडी, रशियातील मार्क्सवादाचा प्रत्यक्ष प्रयोग, भारतातील मार्क्सवादी चळवळीऐवजी समाजवादी तत्त्वज्ञानाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली.

दरम्यान, सविनय कायदेभंगाच्या चळवळीत १९३२ मध्ये म.गांधींना तसेच सर्व महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाली. त्यावेळच्या भारतमंत्र्यांना वाटले; काँग्रेस संपली, पण असे झाले नाही. जयप्रकाशांनी चळवळीची सूत्रे हाती घेतली. चळवळ पुन्हा उभी राहिली. अखेर जयप्रकाशांनाही अटक झाली. वृत्तपत्रांमध्ये बातमी झळकली. “काँग्रेस ब्रेन ॲरेस्टेड!”

जयप्रकाशांना नाशिकच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. तेथे अनेक समविचारी मित्र त्यांना भेटले. जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आच नरेंद्रराव, राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे, मिनू मसानी, युसूफ मेहेरअल्ली इत्यादि नेत्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कामगार, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, विद्यार्थी या सर्वांना एकत्र आणावयाचे ठरवले. या सर्व नेत्यांचा लोकशाही समाजवादावर विश्वास होता. आणि राष्ट्रीय चळवळीत त्यांचा सहभाग

होता. यातूनच १८ मे १९३४ मध्ये 'काँग्रेस समाजवादी पक्ष' ही काँग्रेसांतर्गत संघटना उभी राहिली. पक्षाचे संघटन मंत्री म्हणून जयप्रकाशांची नेमणूक झाली. प्रचारासाठी काँग्रेस सोशालिस्ट नावाचे वृत्तपत्र जयप्रकाशांनी अशोक मेहतांच्या

मदतीने चालवले.

१९३४ च्या काँग्रेस अधिवेशनात विधिमंडळाच्या निवडणुका लढविण्या ठरवले गेले. परंतु जयप्रकाशांनी याला विरोध केला. काँग्रेसचे अनेक नेते त्यामुळे नाराज झाले. पुढे म. गांधींनी जयप्रकाशांचे मत मान्य केले. याच सुमारास

कामगारांची ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस फुटण्याची शक्यता निर्माण झाली. ही फूट थांबविण्यासाठी जयप्रकाशांनी यशस्वी प्रयत्न केले. पुढे मुंबई, उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब, बंगाल आदि प्रांतांत कामगार संघटना रुजल्या. महायुद्ध काळात

जमशेटपूरच्या टाटांच्या लोखंड कारखान्यातील मजूर संघटनेच्या कामात जयप्रकाश स्वतः उतरले. तेथील तार कंपनीच्या कामगारांच्या संपाचे नेतृत्वही त्यांनी केले. याच सुमारास महायुद्धात भारताला ओढण्याबाबत सरकारविरुद्ध लिहिल्यामुळे जयप्रकाशांना अटक झाली.

तुरुंगातही ते स्वस्थ बसले नाहीत. तुरुंगातील कार्यकर्त्यांना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादि विषय ते शिकवित. तुरुंगातून सुटका झाल्यावर देशव्यापी लढ्याच्या दृष्टीने संघटना मजबूत करण्यासाठी जयप्रकाशांनी विविध प्रांतातून दौरे काढले. परंतु सरकारने त्यांना पुन्हा अटक केली. देवळी जेलमध्ये त्यांची रवानगी झाली. या तुरुंगात राजबंद्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाला सुरुवात झाली. जयप्रकाशांनी एकतीस दिवसांचे उपोषण केले. अखेर सरकारला त्यांच्या मागण्या मान्य करणे भाग पडले.

१९४२ मध्ये त्यांना हजारीबाग तुरुंगात हलविण्यात आले. याच सुमारास म. गांधींनी चले जाव चळवळ सुरू केली. या चळवळीत भाग घेता यावा म्हणून

जयप्रकाशांनी साहसपूर्ण रीतीने तुरुंगातून पलायन केले. तुरुंगातून बाहेर पडल्यावर राष्ट्रीय चळवळ तीव्र करण्यासाठी जयप्रकाशांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले. गनिमी पद्धतीचे सैनिकी शिक्षण देण्यासाठी आझाद रस्ते संघटनेच्या अनेक शाखा उभ्या केल्या. ब्रिटिश राज्यातील हिंदी पोलीस आणि सैनिकांना स्वातंत्र्य लढ्यात गावकऱ्यांना सामील करून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ब्रिटिश सरकारने जयप्रकाशांना पकडण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु जयप्रकाशांनी भूमिगत राहून कार्य चालूच ठेवले. १९४३ मध्ये अमृतसर येथे त्यांना अटक झाली. लाहोर येथील तुरुंगात त्यांचा अतिशय छळ करण्यात आला.

दुसरे महायुद्ध संपता संपता भारताच्या स्वातंत्र्याच्या विविध योजना मांडल्या जाऊ लागल्या. जयप्रकाशांची तुरुंगातून सुटका झाली. स्वतंत्र भारतामध्ये समाजवादाची स्थापना व्हावी, या विचाराच्या नेत्यांनी १९४८ मध्ये स्वतंत्र समाजवादी पक्ष स्थापन केला.

शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी जयप्रकाशांनी किसान पंचायतीची स्थापना केली. शेतकऱ्यांना स्वतःला अन्यायाची जाणीव व्हावी आणि त्या अन्यायाविरुद्ध त्याने स्वतःच उभे राहावे अशी रचनात्मक शिकवण जयप्रकाशांनी दिली.गावांचा, खेड्यांचा उद्धार करण्यासाठी गावकऱ्यांनीच एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. सरकारी कृपेवर अवलंबून राहता कामा नये, हे सांगून त्यासाठी त्यांनी अनेक गावांमध्ये भूसेना स्थापन केल्या.

शेतकऱ्यांप्रमाणे भारतातील एक महत्त्वाचा गट म्हणजे तरुण विद्यार्थी वर्ग या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी नॅशनल युनियल ऑफ स्टुडंटस ही संघटना स्थापन केली. तसेच कामगार संघटना- किसान संघटना, अखिल भारतीय रेल्वे कामगार

संघटना, कृषक मजदूर संघटना इत्यादि संघटनांच्या उभारणीतही जयप्रकाशांचा मोठा

सहभाग होता.

१९५२ मध्ये भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. पंडित नेहरूंवर समाजवादाचा प्रभाव असल्याने, स्वतंत्र भारतातील भावी कार्यवाही संदर्भ व समाजवादाचा विचार करण्यासाठी १९५३ मध्ये पंडित नेहरूंनी जयप्रकाशांना भेटीसाठी बोलविले. या भेटीत जयप्रकाशांनी चौदा कलमी कार्यक्रम मांडला; परंतु

याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही मात्र होऊ शकली नाही. दरम्यान विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. या चळवळीत जयप्रकाश उतरले. १९५४ च्या गया येथील सर्वोदय संमेलनात जयप्रकाशांनी महत्त्वाची कामगिरी बजाविली. याच संमेलनात त्यांनी स्वत:च्या जीवनदानाची घोषणा केली.

भूदान-ग्रामदान-ग्रामस्वराज्य या चळवळी चालू असताना त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाकडेही लक्ष होते. रशियाच्या पूर्व युरोपमधील साम्यवादी साम्राज्यावादावर टीका करून जगाला सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला. चीन-भारत मैत्रीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्याचा गौरव १९६५ मध्ये मॅगसेस पुरस्काराने केला गेला. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जागतिक शांततेसाठीच्या कार्याबद्दल त्यांना दिला गेला.

भारतातील बिहार राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी विविध संघटना त्यांनी उभ्या केल्या. बंगालमधील नक्षलवादी चळवळीला थोपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांचे मनपरिवर्तन घडवून, त्यांना समर्पित होण्यास जयप्रकाश यांनी उद्युक्त केले. शिक्षण व निवडणूक प्रणालींमधील सुधारणांसाठी 'यूथ फॉर डेमॉक्रसी' हा अपक्षीय कार्यक्रम त्यांनी सुरू केला. या आणि अशा अनेकविध चळवळी, कार्यक्रम, कृती, विचार जयप्रकाशांनी स्वातंत्र्योत्तर भारतात रुजविल्या.

जयप्रकाशांच्या आयुष्यातील आणखीन एक महत्वाचे पर्व म्हणजे आणीबाणीचा काळ. आणीबाणीच्या काळात जयप्रकाशांनी स्वयंप्रकाशित दीपस्तंभाचे कार्य केले. देशाला हुकूमशाहीच्या गर्तेतून बाहेर काढावयाचे तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे जयप्रकाशांचे मत होते.

आणीबाणी जाहीर झाली आणि लगेचच जयप्रकाशांना अटक झाली. तुरुंगातच सर्व पक्षांतील विचारवंतांना एकत्र करण्याचे आणि एकमेकांना समजून घेण्याचे काम त्यांनी केले. १९७६ मध्ये जयप्रकाशांच्या निमंत्रणामुळे समाजवादी पक्ष, जनसंघ, संघटना काँग्रेस, भारतीय लोकदल या पक्षांची एकत्रित बैठक झाली. त्याचे फलित म्हणून जनता पक्ष स्थापन झाला. जयप्रकाशांनी जनतेला आवाहन केले. “या निवडणुकीत देशाचे पुढील पन्नास वर्षांचे भवितव्य ठरणार आहे. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही यातून निवड करायची आहे.” जयप्रकाशांच्या या आवाहनाला भारतीय जनतेने प्रतिसाद दिला. १९७७ च्या निवडणुकीत जनता पक्ष बहुमताने निवडून आला.

आणीबाणीत जे झाले ते पुन्हा होऊ नये, स्वातंत्र्याची गळचेपी पुन्हा होऊ नये, लोकशाही अन् स्वातंत्र्य तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचावे, यासाठी जयप्रकाशांनी सर्वंकष क्रांतीची कल्पना मांडली. लोकांची व युवकांची शक्ती पुन्हा वर उसळून येते आहे. तिचा उपयोग भारतीय समाजात रचनात्मक दृष्टीने संपूर्ण क्रांतीकडे करण्यासाठी कसा करावयाचा ते पाहावयाचे आता राहिले आहे. असे जयप्रकाशांनी मांडले. या सर्वकष क्रांतीसाठी देशभर दौरा करावयाचा त्यांचा मानस होता; परंतु प्रकृतीने साथ दिली नाही. त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर ८ ऑक्टोबर १९७९ रोजी जयप्रकाशांनी जगाचा निरोप घेतला.

---






Tuesday, June 28, 2022

12. मेसोपोटेमिया

नेटवरून साभार 

जगातील सृजनशील चंद्रकोर म्हणून ओळखला जातो तो भूभाग म्हणजे मेसोपोटेमिया! मेसोपोटेमिया चा मुळात अर्थच दोन नद्यांमधील भाग असा आहे. 

टायग्रिस आणि  युफरीतीस या नद्यांच्या  दोआबात वसलेली संस्कृती म्हणजे मेसोपोटोमिया संस्कृती. आजच्या कुवेत, इराक आणि सीरिया या देशामच्या भूमीवर हि संस्कृती सुमारे ५००० वर्षांपूर्वी  उदयाला अली अन समृद्ध झाली. बारा  हजार वर्षांपूर्वी पासून या भूभागात मानवाने वसाहत  केलेली आढळते. या दोन नद्यांचे  मुबलक पाणी आणि तेथील सुपीक जमिनी मुळे या ठिकाणी मानवी वसाहत स्थिरावत गेली. 

या नद्यांच्या  किनारी, या नद्यांच्या  लहान लहान प्रवाहांच्या काठावर या टोळ्या राहू लागल्या. अस्मयुगीन माणूस शेतीचा शोध लागल्यावर कसा नद्यांच्या  जवळ वसाहत करू लागला हे आपण मागे बघितलेच आहे. 

अनेक टोळ्या या भूभागात वसाहत करून राहू लागल्या. या टोळ्यांमधूनच ६  हजार वर्षांपूर्वी याती ल काही शहरे विकसित होत गेली.  इ स पूर्व  चार  ते साडेतीन हजार च्या सुमारास उर, उरुक , बॅबिलिन, अक्कड असुर अशी काही गावे मोठी झाली. सत्तेसाठी स्पर्धा असणारी ही  शहरे होती. एका काळात अक्केडियनांनी यांवर  वर्चस्व मिळवलं, तर काही काळानंतर  अक्केरीयन आणि बॅबिलोनियन अशी दोन साम्राज्ये निर्माण   झाली.  युद्ध- स्पर्धा चालू  असूनही या राज्यामध्ये प्रगतीही झाली. अनेक मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्या. राजवाडे,  मंदिरे याला ते झिगुरात  म्हणत, देवाशी संवाद साधण्यासाठी हि झिगुरात  असत. 

मानव जसजसा एका ठिकाणी शिरावर गेली, त्याची शेती विकसित झाली. तस तसा त्याच्या जगण्यासाठीचा लढा कमी होत गेला. अन्नधान्य मिळवण्यासाठीची त्याची रोजची धावपळ आता कमी झाली. शेती करून वर्षभराचे  अन्नधान्य साठवणे आता त्याला जमू लागले. स्वाभाविकच थोडे स्थैर्य  आणि  मोकळा वेळ त्याला उपलब्ध झाला. याचाच उपयोग त्याने अनेक नवीन गोष्टींचा  अभ्यास करण्यासाठी वापरला. त्यातून अनेक शोध, माहिती, ज्ञान त्याने प्राप्त केले.

यातूनच या संस्कृतीने  अनेक बाबतीत प्रगती केली. गणित, खगोल, काळ, वर्ष यांची विभागणी. यातील अगदी महत्वाची प्रगती होती ती म्हणजे लेखन पद्धतीची. आपली माहिती संग्रहित  करून ठेवणे या संस्कृतीला जमले. त्याच मुळे  आपल्याला या संस्कृतीची तपशीलवार माहिती मिळते. इ स पु ३२०० सुमारास उदयाला आलेल्या या लेखन पद्धती ला क्युनिफार्म असे संबोधले जाते. ओल्या मातीच्या पाटी वरती लाकडी त्रिकोणी आकाराच्या काडीने हि लिहिली जाई.  बाबिलोनियातील राजा हम्मुराबी याचे राज्यशासनाची  कायदेसंहिता हि या लिपीत लिहिलेली सर्वात जुनी अन महत्वाची कायदेसंहिता  .

या संस्कृतीचे आणखीन   एक वैशिष्ट्य म्हणजे यांनी  बांधलेल्या कमानी  कमानी आणि घुमट .  शिवाय  या शहरां च्या वेशी मोठ्या तटबंदीने सुरक्षित असत. 

राजवाड्यांमधील  भिंतीवरच्या  तत्कालीन महत्वाच्या घटनांची चित्र काढली जात. 

कालांतराने असिरीया शहराने आपले सामर्थ्य वाढवले. 

 या राज्याचे वैभव, श्रीमंती इतकी होती कि अनेक आक्रमकांना त्याचे आकर्षण होते. यातूनच इ स पाय ५४० च्या सुमारास पर्शियन राजाने मेसोपोटेमियावर आक्रमण केले आणि जिंकले . आणि अनेक वर्ष या परकीयांचे वर्चस्व मेसोपोटेमियावर राहिले.  

कालांतराने हि  संस्कृती नामशेष झाली. आणि इराकच्या वाळवंटाच्या वाळूत हि संस्कृती हरवून गेली. परंतु त्यांनी  दिलेली लिपी, कायदे, खगोल, गणित यातील प्रगती हि सर्व संस्कृतीची वैशिष्ट्ये हि  त्यांची  मानवी समाजाला मिळालेली देन  आहे. 

अशा रीतीने  पूर्वीचा रानटी- हंटर गॅदरर- माणूस केवळ शेतकरी  झाला असे नाही तर त्याच बरोबर अनेक कौशल्य करणारा हि बनला. शेतकरी,  बांधकाम करणारा, कारागीर, सुतार, चित्रकार, शिल्पकार,  पुजारी, शिक्षक,  राजा, युद्ध करणारा सैनिक आणि लेखन कला असणारा लेखकही. 

Monday, May 2, 2022

11. प्राचीन कालखंड - 1

मानवी इतिहासातील हा सर्वात मोठा कालखंड आणि अतिशय कमी माहिती, पुरावे सापडणारा हा कालखंड ! असं मानलं जातं कि पहिल्या मानवाची नोंद दोन लाख वर्षांपूर्वीची सापडते. यातही विवाद आहेतच. काहींच्या मते  साठ लाख वर्षांपूर्वीपासून मानव पृथ्वीवर आहे. 

या संपूर्ण काळाबद्दल अनेक विवाद आहेत, अनेक मतंमतांतरे आहेत. कालनिश्चिती करता येत नसल्याने ही सर्व मते आपण मोकळेपणाने स्वीकारायला तयार असलं पाहिजे. जस जसे पुरावे समोर येत जातील त्यानुरूप स्वीकार करावा लागेल. परंतु आज तसं होताना दिसत नाही. काही सिद्धांत मानून त्यावर ठाम राहण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे अनेक कोड्यांची उत्तरं शोधणं अवघड होऊन बसते. म्हणूनच या कालखंडाबद्दल दोन वेगवेगळ्या भूमिकांमधून लिहिणार आहे. या भागात सध्या मान्य असलेल्या इतिहासाबद्दल लिहेन. 

तर मानवाची पहिली नोंद आपल्याला दोन लाख ( २,००,००० म्हणजेच इंग्रजीत Two hundred thousand ) वर्षांपूर्वीची सापडते. आफ्रिकेमध्ये हा पहिला मानव आपल्याला सापडतो. त्यानंतरची मोठी नोंद आहे ती ७०,००० ( सत्तर हजार ) वर्षांपूर्वी मानव आफ्रिकेतून बाहेर पडला हि आहे. आफ्रिकेतून बाहेर पडून पूर्वेला त्याने जायला सुरुवात केली. पुढची महत्वाची नोंद आहे ती साधारण १७००० (सतरा हजार) वर्षांपूर्वी पहिल्या वसाहती बांधल्या गेल्या. आणि त्यानंतर साधारण अकरा हजार वर्षांपूर्वी मानवाला शेतीचा शोध लागला अन इथून पुढे तो एका ठिकाणी वस्ती करून राहू लागला अन संस्कृतीची सुरुवात झाली. १०,००० (दहा हजार ) वर्षांपूर्वीची पहिली शहरं आपल्याला सापडतात. 

ही जी पहिली संस्कृती मानली जाते ती मेसोपोटेमिया या प्रदेशातली.म्हणजे आज जेथे  इराक, सीरिया आणि तुर्कस्थान हे देश आहेत तेथील प्राचीन संस्कृती.  प्रामुख्याने तैग्रिस आणि युफ्रिटीस  या दोन नद्यांमधल्या मधल्या सुपीक प्रदेशात अनेक संस्कृती निर्माण  झाल्या.



या प्रदेशाच्या आकारावरून याला सुपीक चंद्रकोर असंही म्हटलं जातं. तैग्रिस आणि युफ्रिटीस  या नद्यांच्या सुपीक जमिनीत अनेक संस्कृती निर्माण झाल्या, वाढल्या. सुमेरियन, अक्केडियन , बॅबिलोनियन, असिरियन, खाल्डियन अशा अनेकांनी आपली राज्य उभी केली. या सर्वांना मिळून मेसोपोटेमिया संस्कृती म्हटलं जातं.  
 पुढील भागांत या विविध संस्कृतींची माहिती घेउ. 

एक होतं आटपाट जग ???

 (आज जगांमध्ये एका छोट्याशा विषाणूने हाहाकार माजवला आहे. हिंदू धर्मात दशावताराची कल्पना मांडली आहे. प्रत्येक युगात एक एक अवतार जन्म घेतो अशी मान्यता. त्यानुरूप आता अपेक्षित असलेला अवतार हा  कली चा असणार आहे.  ! हा कली म्हणजे कोण, याबद्दल मात्र तपशील फारच कमी आहेत. सद्ध्याची  परिस्थिती अशी आहे कि कशावर विश्वास ठेवायचा, कशावर नाही याबद्दलच मनात संशय निर्माण झाला  आहे, मानवाच्या मनातील हा संशय हा तर कली नसेल? कि हा विषाणू म्हणजेच कली? प्रत्येकाच्या शरीरात घुसून पोखरणारा, मनात घुसून जगण्याचा आत्मविश्वास पोखरणारा ? खरं काय खोटं  काय त्या काळाच्या पोटातच सामावलंय. आज आपल्याला नाहीच कळू शकणार. म्हणून मग लेखकाचं स्वातंत्र्य घेऊन ही कथा रचली आहे। खरं खोटं काळच ठरवेल.  खऱ्या अर्थाने हा इतिहास ठरेल का हेही मला नाही माहिती. पण मनात आलं ती गोष्ट लिहिते ) 

एक आटपाट जग होतं. हो हो जग होतं. नगर नाही तर चक्क जग होतं. खुप मोठ्ठं होतं. त्याला इतिहासही मोठा होता. दहा हजार वर्षांचा. चकीत झालात ना ?
तर आज मी ही अशी वेगळीच गोष्ट सांगणार आहे, ऐकणार ना?

तर एक होतं आटपाट जग ! खुप मोठमोठी शहरं, खुप मोठमोठ्या इमारती, कितीतरी यंत्र, वाहनं, कितीतरी प्रगती केली होती त्या जगाने. त्यांच्या इमारती तर फार वेगळ्या, अतिशय भक्कम होत्या. कारण माहितीय का? त्या होत्या चक्क दगडांच्या, खरं तर खडकांच्या !

तुम्ही म्हणाल; हात्तीच्या ही तर आज गुहेत राहणा-या माणसाची गोष्ट सांगतेय.

नाही नाही, खरच; खुप प्रगती केलेल्या जगाचीच गोष्ट सांगतेय. पण त्यांच्या इमारती होत्या खडकांच्या. हे कसं शक्य आहे ना? तर ऐका हं !

त्या जगात अनेक वर्षांपूर्वी एका शात्रज्ञाने एक फार वेगळा शोध लावला. निसर्गातील विविध गोष्टींचा अभ्यास करताना त्याच्या मनात आलं की आपण दगडाचा अभ्यास का बरं करत नाही? वेगवेगळे धातू आपण शोधले, त्याचा वापर आपण करतो तर दगडाचा का नाही? आणि मग त्याने प्रयोगशाळेत खुप प्रयत्न केले आणि निसर्गात असतो तसाच दगड प्रयोगशाळेत त्याने तयार केला. त्या दगडाचा रंग जरा वेगळा, जरा लालसर होता. पण अतिशय मजबूत दगड त्याने निर्माण केला. महत्वाच हे की हा दगड विशिष्ट पद्धतीने वितळवता येत असे आणि त्याला विशिष्ठ पद्धतीने गार केला की तो हव्या त्या आकारात तयार होत असे.

या शोधामुळे झालं असं की जसं लोखंड वितळवून ते हव्या त्या साच्यात ओतून गार करून हवा तो आकार करता येतो; तशाच दगडाच्याही हव्या त्या वस्तू बनवता येऊ लागल्या. अन मग त्या काळात अनेक उत्तम उत्तम दगडी इमारती तयार झाल्या. अतिशय सुबक, सुंदर आणि अतिशय भक्कम ! शिवाय स्वतःचा लालसर छान रंगाच्या बरं का!

आता दगड कोरून शिल्प करण्याची गरजच नाही उरली. दगड वितळवायचा, हव्या त्या साच्यात ओतायचा. गार झाला की अप्रतिम सुंदर शिल्प तयार.

अशीच अनेक बाबतीत या जगाने प्रगती केली होती. त्या त्या प्रगतीची माहितीही त्याने लिहून ठेवली होती. असं सगळं छान चालू होतं. कधी कधी तिथल्या लोकांच्यामधे काही वाद होत असत. पण ते सोडवलेही जात. म्हणतात ना रामराज्य तसं अगदी आलबेल चाललेलं त्या जगात !

पण प्रत्येक गोष्टीत जसं काही संकट येतं तसच याही जगात झालं. नक्की कशामुळे कळलं नाही पण अचानक हवामान तापू लागलं. नदी नाले आटू लागले. जी जमीन अतिशय सुपीक होती ती कोरडी होऊ लागली. हळुहळू सगळीकडे वाळवंट तयार होऊ लागले. सगळे हवालदिल झाले. निसर्गाचा हा कोप का याचा शोध घेऊ लागले. पण काहीच कारण कळेना. तशात शास्त्रज्ञांनी शोध लावला की उत्तर आणि दक्षिण धृवांवरचे बर्फाचे डोंगर उष्णतेने वितळू लागले आहेत. आणि त्यामुळे समुद्राची पातळी उंचावते आहे.

जगामध्ये एकच भीतीची लाट उसळली. खुप जुन्या काळात त्यांच्या धार्मिक ग्रंथांमधे कधी काळी लिहून ठेवले होते की फार फार पूर्वी जगबुडी झाली होती. समुद्र उंचावला होता आणि सगळी शहरं, सगळ्या वसाहती त्यात बुडून गेल्या होत्या. पण आजवर ही एक गोष्ट म्हणुन तीही सांगोवांगी गोष्ट म्हणुन मजेत उडवून लावलेली सगळ्यांनी. पण आता हे भावी वास्तव म्हणुन समोर उभं राहिलं होतं. सगळी मानवी जमात धोक्यात आली होती. आजवर केलेली सगळी प्रगती पाण्यात वाहून जाणार होती.

पण आता हाती फार काळ नव्ह्ता. शक्य तितक्या उंच डोंगरावर जाण्याचा विचार सगळे करू लगले. त्यातून अनेक संघर्ष घडू लागले. सगळ्यांनाच उंच डोंगरावर जायच होतं. पण हे शक्य नव्हतं. शेवटी सगळ्या महत्वाच्या व्यक्तींनी एकत्र येऊन ठरवलं की यावर काही उपाय केला पाहिजे, काही निर्णय घेतला पाहिजे. मग त्यांनी ठरवलं की आपल्या प्रगतीचे महत्वाचे टप्पे लिहून, काही अती महत्वाच्या गोष्टी घेऊन, काही लोकं जगातील सर्वात उंच पर्वतावर जातील. बाकी सर्वांनी आपल्या जवळच्या उंच डोंगरावर आसरा घ्यायचा.

शेवटी काहीच लोकं जिवंत रहाणार हे आता सर्वांना पटले होते. किमान तितपत शहाणपण, सामंजस्य त्या जगात अस्तित्वात होते. आणि मग म्हणूनच सर्व प्रगतीचे तपशील, महत्वाची यंत्र, काही हुषार माणसं आणि काही शहाणी माणसं, काही बलवान माणसं या ऊंच पर्वतावर जायला निघाले. यांमध्ये स्त्रिया, पुरुष, काही तरुण मुलंमुली यांचा समावेश होता.

बर्फ आता फारच भराभर वितळत होता. आधी समुद्रकिनार्‍यावरच्या शहरांचा त्याने घास घेतला. हळू हळू करत सर्वच सपाट प्रदेशात समुद्राच पाणी पसरलं. अन मग एक दिवस आकाश झाकाळून गेलं. वातावरणात एक भयाण शांतता आली. श्वासही घेता येणार नाही इतकी हवा विरळ झाली. अन जेमतेम काही तासातच पाण्याची एक प्रचंड राक्षसी लाट जमिनीवर धाऊन आली. सपाट जमीन, उंचवटे, छोटे छोटे डोंगर, मोठे डोंगर, अगदी उंच पर्वतही या लाटेने गिळंकृत केले. जगातला सर्वात मोठा पर्वत; जिथे महान लोक आश्रय घेऊन होते तिथेही या लाटेने तडाखा दिला.

जगाचा महाप्रलय ! संपूर्ण जग या प्रलयात पाण्याखाली बुडालं. आणि मग आली ठंडीची एक महाभयंकर मोठी लाट! अन मग अनेक वर्ष जगभर बर्फाचे राज्य सुरुच राहिले.

काय झालं त्या जगाचं? तिथल्या माणसांचं? तिथल्या प्रगतीच??????

अनेक प्रश्न प्रश्न प्रश्न !!!

उत्तरं कशाचीच नाहीत. मी म्हटलं ना सुरुवातीला; वेगळीच गोष्ट सांगणार आहे म्हणून !
कधी कधी या हरवलेल्या जगाचे काही पुरावे सापडतात कुठे कुठे. कधी एखाद्या टेकाडावर मोठमोठ्या दगडांची भल्या मोठ्या शिळा सापडतात; त्यावर अनाकलनीय  प्राण्यांची  शिल्प कोरलेली सापडता, कधी रेताड वाळवंटातील मोठ्या पिवळ्या खंदाकातील अनाकलनीय इमारती, कोरीव काम सापडतं. कधी एखाद्या उंच पर्वतावर एखाद्या प्रार्थना स्थळात काही अगम्य लिपीतली भुर्जपत्रे सापडतात. कधी एखाद्या उंच वाळवंटी पर्वतावरच्या गुहेतली पत्र, वस्तु. कधी एखाद्या पर्वतावरची अनाकलनीय बांधकामं. प्रचंड मोठी दगडी बांधकामं. जमिनी खालच्या नऊ स्तरावरच्या गुहा. एकाच खडकात उलटे कोरलेले प्रार्थनास्थळ. तर कधी खोल समुद्रात मोठमोठ्या दगडी इमारती ....

कितीतरी मोठी यादी आहे, न संपणारी. पण त्याचा अर्थ लावणं हे मात्र हातात नाही, काही पुरावे नाही, काही क्लुज नाहीत! काही नाही...

ना कोणी राजपुत्र आला संकटावर मात करायला. ना उत्तरं सांगायला कोणी ऋषी आले. ना जादुची कांडी फिरली. ना झोपलेल्या राजकन्येला कोणी उठवायला आलं. काहीच घडलं नाही या आटपाटच्या जगात. 

पण म्हटलं नं, वेगळीच गोष्ट सांगणार आहे आज...

तर असं होतं एक आटपाट जग, होतं का ? कि आपला माझ्याच कल्पनाविलास? काय की ! पण वर दिलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा होत नाही हे मात्र खरं !

----

नुकतीच एक चर्चा ऐकली. जिऑलॉजिसिटची मुलाखत आहे. जरूर पहा, ऐका 


https://youtu.be/zSjnvlDWwrE

Monday, February 14, 2022

अफगाणिस्तानच्या निमित्ताने

 शीतयुद्ध काळात अमेरिका अन रशिया यांतील सत्तासंघर्षामधे अनेक देश बळी पडले। त्यातून जिथे विवेकी आणि विचारी राज्यकर्ते व तत्वज्ञ नव्हते, जिथे धर्मांधता, आधुनिक तंत्र-मुल्य-विचार यांकडे डोळसपणे बघणं नव्हतं अशा अनेक राष्ट्रांचा गैरफायदा अमेरिका रशिया दोघांनी घेतला।

अनेक आफ्रिका आशियातील देश याला बळी पडले।

पण भारत, इजिप्त, इस्राएल, जपान यासारखे देश वेगळे राहिले। भारताने स्विकारलेला अलिप्ततावाद आणि अलिप्त राष्ट्र संघटेनेची उभारणी हा फार फार महत्वाचा मुद्दा हल्ली विसरला जातो। नवस्वतंत्र भारताला आर्थिक मदत हवी होती तंत्रज्ञानाची मदत हवी होती। ही घेताना परराष्ट्राचे वर्चस्व मात्र नको होते। याचसाठी नेहरुंनी अलिप्तराष्ट संघटना इजिप्त आणि इतर राष्ट्रांच्या सोबतीने उभी केली। यातील बहुसंख्य देशांनी आपले आधुनिकीकरण, औद्येगिकरण बरेचसे यशस्वी केले। याच मुळ् या देशांतील लोकशाही टिकली वाढीस लागली स्थिरावली।

आणि या सर्वांमागे भारतासंदर्भात धर्मनिरपेक्षता नक्कीच उपयोग पडली। अन्यथा छोटेछोटे तुकडे असलेला दुसरा युरोप व्हायला वेळ लागला नसता।

मुळात भारत म्हणून एकसंध असा एक बंध भारताला नाही। तरीही भारत टिकून राहिला तो आपल्या सर्वसमावेशक अशा राज्यघटनेमुळे आणि तिचा योग्य अर्थ अन मान ठेवणाऱ्या राज्यकर्त्या अन प्रशासकांमुळे। यांनीही चुका केल्या। अगदी आणिबाणीसारखी घोर चूक केली। तरीही देशाचे देश म्हणून अस्तित्व, एकसंध अस्तित्व अबाधित राखले। इथली दुफळी मिटवायचा प्रयत्न केला।

हे कितीही दुर्लक्षित केलं तरी नाकारता येण्यासारखं नाही। भले आपला देश इंग्लंड झाला नाही, अमेरिका झाला नाही। पण आपला देश पाकिस्तान वा इराण वा इराक वा अफगाणिस्तानही झाला नाही। याचे भान आपण विसरतो आहोत।


आज अफगाणिस्तान बाबत कोणाही भारतीयाने बोलताना लिहिताना प्रचंड सावध असलं पाहिजे। अफगाणिस्तान अन आपल्या सीमा यांतली समीपता ही कधीही ओलांडली जावू शकते। आपण आपल्या धर्म संस्कृतीचा जितका डांगोरा पिटू तितका तालिबान जास्त आक्रमक होऊ शकतो। तालिबानची शक्ती फार कमी लेखू नये। 

रशियाने जवळजवळ पूर्ण अफगाणिस्तान गिळंकृत करूनही तालिबान तगले।

पुढे १० वर्ष नाकावर टिचून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात राहिलं। अखेर अगदी ट्रंपसारख्या आक्रमक अमे अध्यक्षालाही पाऊल मागे घ्यावं वाटलं। 

आणि गेल्या ४-५ महिन्यातली त्यांची घोडदौड पहाता भारतीयांनी जपूनच रहायला हवं। 

याच भान बिजेपी सरकारलाही आहे म्हणूनच याच काळात काश्मीरवासियांना पुन्हा जवळ केलं जातय।

सामान्य माणूस म्हणवन हे भान आपल्यालाही हंवं। वरवरच्या बातम्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यातली दरी समजली तर हे नक्की कळू शकेल