Thursday, May 9, 2024

8. न्या. मा. गो. रानडे

भारताच्या इतिहासात एकोणिसावे शतक हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या शतकामध्ये सुरु झालेल्या प्रबोधन प्रक्रियेने येथील समाजाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. समाजातील अनेकविध गोष्टींमध्ये याच काळात मोठे आणि महत्वपूर्ण बदल घडून आले. येथील समाजजीवनातील धर्मकल्पना, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षणपद्धती, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, वाङमय, न्यायव्यवस्था या सर्वांवर प्रबोधनाने आपली छाप उमटवली.

राजा राममोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग, दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, म. फुले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गो.ग. आगरकर, लो. टिळक या आणि अशा अनेकांनी प्रबोधनाची धुरा सांभाळली.

सर्वांगीण सुधारणा हे भारतीय प्रबोधनाचे वौशिष्ट्य होय. समाजातील सर्व घटकांबाबत या प्रबोधन काळात विचारमंथन झाले. या प्रबोधनाचे एक उत्तम उदाहरण म्हणून न्या. म.गो. रानडेंचे विचार आणि कार्य यांकडे पाहता येते.

इ.स. १८४२ साली नाशिकमध्ये महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला. कोल्हापूर, मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश व पुढे सर्न्यायाधीश म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली. पुढे बदली निमित्याने पुण्यात आल्यावर न्या. रानडेंचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्व आघाड्यांवर कार्य सुरू झाले.

भारतीय समाज, भारतीय व पाश्चात्य परंपरा, भारतीय व पाश्चात्य ग्रंथ आणि भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान या सर्वांच्या सखोल अभ्यासातून त्यांच्या विचारांना खोली प्राप्त झाली होती. एकीकडे येथील संतपरंपरा आणि दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवाद या दोन्हींचा समन्वय येथील सुधारणेसाठी त्यांनी योग्य मानला.

न्या. रानडेंच्या मते, समाज हा एखाद्या सजीवाप्रमाणे असतो. समाजाची धर्म, राजकारण, अर्थकारण ही विविध अंगे एकमेकांशी संलग्न असून, एकमेकांना पूरक असतात. एका शरीराचे काही अवयव दुबळे आणि काही शक्तीमान असे असू शकत नाहीत. तसेच मानवी समूहाचे काही भाग सुधारलेले आणि काही भाग मागासलेले असू शकत नाहीत. समाजातील विविध भागांची एकत्रित प्रगती होणे हे न्या. रानडेंनी आवश्यक मानले.

भारतातील सामाजिक परिस्थितीचा विचार करताना येथील समाजातील विविध समस्यांबद्दल न्या. रानडेंनी विचार मांडले. धर्म, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षण, इ. बाबत सुधारणा त्यांनी सुचवल्या. येथील समाजव्यवस्थेमध्ये काही दोष आहेत आणि त्यात सुधारणा घडवून आणायच्या, तर काही मूलभूत बदल करावे लागतील याची जाणीव न्या. रानडेंनी करून दिली. येथील समाजातील दोष - उदा. कुपमंडूक वृत्ती, तुटकपणा, ग्रंथप्रामाण्य, जातीभेद, चुकीच्या रुढी-परंपरांना चिकटून राहणे, दैववाद, इतिहासाबद्दलची अनास्था या सर्वांना दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मांडले. कोणत्याही समाजामध्ये बदल सहजासहजी होत नाहीत, तसेच ते अचानकही होत नाहीत; यावर न्या. रानडेंचा विश्वास होता.

समाजात वेगवेगळ्या मनोवृत्तीचे लोक असतात आणि या सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा करावयाची असल्याने सुधारणेचे तीन मार्ग त्यांनी सुचवले. समाजातील काही बदल परंपरेचा, धर्माचा आधार घेऊन केले पाहिजेत; काही बदल बुद्धीला पटेल अशा तर्कशुद्ध विवेचनाने घडवून आणले पाहिजेत; तर काही बदलांसाठी प्रसंगी कायद्याची मदत घेतली पाहिजे असे न्या. रानडे मानत.

समाजव्यवस्थेतील बदल ताबदतोब साध्य होणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. सामाजिक सुधारणेसाठी विविध प्रवृत्तीच्या लोकांना आणि विविध संस्थांना एकत्र आणून सुधारणेस योग्य अशा वातावरण निर्मितीसाठी न्या. रानडेंनी प्रयत्न केले. सार्वजनिक सभेतील त्यांचे कार्य याची साक्ष देते.

भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करताना मुख्यत: तीन गोष्टींवर त्यांनी भर दिला. ब्रिटिश राज्यकर्ते गोळा करीत असलेली खंडणी, व्यापाराच्या बदललेल्या स्वरूपातून होणारी हानी आणि भारतीयांची उद्योगाप्रति असलेली उदासीनता.

ब्रिटिश राज्यकर्ते हिंदुस्थानामध्ये राहून राज्य करीत नसल्याने येथील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला. महसूल, इतर कर, अधिकार्‍यांचे पगार, कर्जाचे व्याज इ. मार्फत हिंदुस्थानातील पैसा इंग्लंडमध्ये जात होता. याला न्या. रनडेंनी 'खंडणी' मानले. ब्रिटिश काळात व्यापाराच्या स्वरूपात बदल झाला.

कच्च्या मालाची निर्यात आणि पक्क्या मालाची आयात वाढली. त्यामुळे येथे येणार्‍या पैशापेक्षा येथून बाहेर जाणार्‍या पैशामध्ये वाढ झाली. आकडेवारीच्या सहाय्याने न्या. रानडेंनी हे सिद्ध केले. येथील लोकांची बचत न करण्याची वृत्ती आणि उद्योगाप्रति असलेली उदासीनता यांमुळे येथील पैशाच्या वाढीला चालना मिळाली नाही, असे मत त्यांनी मांदले.

येथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकर्‍यांच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालणे, उद्योगीकरणाला प्रोत्साहन देणे, उद्योग व शेतीवर सरकारचे नियंत्रण असणे, व्यापारात समतोल राखणे इ. मार्ग त्यांनी सुचवले. तत्कालीन विविध आर्थिक विचारप्रणालींच्या सखोल अभ्यासातून त्यांनी, 'हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती आणि त्यावरचे उपाय' यावर विवेचन केले.

राजकीय संदर्भात विचार मांडताना कायद्याचे राज्य, कायद्याची अंमलबजावणी, जनतेचे हक्क आणि कर्तव्ये, समानता, संसदेतील प्रतिनिधित्व यांचे महत्व त्यांनी विशद केले. या सर्व गोष्टी प्राप्त करावयाच्या तर जनतेने आवश्यक तर सनदशीर मार्गांनी चळवळ उभी केली पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. मात्र ही चळवळ टप्प्या-टप्प्याने केली पाहिजे असे मतही त्यांनी मांडले. 'स्वाभाविक विकासक्रमाच्या अनुषंगाने जे नजिकचे उद्दिष्ट्य आपल्या दृष्टिपंथात येईल त्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आणि औचित्य व व्यासबुद्धी यांच्याशी सुसंगत अशा तडजोडीच्या वृत्तीने ते प्राप्त करून घायचे' असे धोरण ठेवण्याकडे न्या. रानडेंचा कल होता. म्हणूनच, सार्वजनिक सभेच्या मार्फत लोकांना राजकीय शिक्षण देण्याचा त्यांचा मानस होता.

न्या. रानडे हे स्वभावाने नेमस्त व संयमी होते. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश व अतिरेकीपणा हे त्यांच्या प्रकृतीमध्ये नव्हते, तसेच परंपरेचा धागाही त्यांनी तोडून टाकला नाही. प्रा. गं. बा. सरदार लिहितात त्याप्रमाणे, ' आतताईपणे परंपरेची मोडतोड करण्यापेक्षा संथपणे तिची पुनर्घटना करण्यावर त्यांची भिस्त होती.' मराठ्यांच्या इतिहासाचे परिशीलन करताना न्या. रानडेंची ही भूमिका दिसते.

न्या. रानडे यांच्यावरील पाश्चात्य उदारमतवादाचा प्रभाव, त्यांची समन्वयवादी वृत्ती आणि क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर त्यांचा असणारा विश्वास यांमुळे त्यांचे सुधारणेबाबतचे विचार आणि कृती ह्या नेमस्तवादी होत्या. कोणत्याही टोकाला न जाता, जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन, कोणालाही न दुखावणारे मार्ग त्यांनी स्वीकारले. लोकापवाद वा व्यक्ती दुखावल्या जाण्यापेक्षा वेळप्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांनी पसंत केले. कोणत्याही सुधारणेसाठी सक्तीपेक्षा संमतीलाच त्यांनी प्राधान्य दिले.

एकोणिसावे शतक सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. मध्ययुगीन परंपरा ते आधुनिक मूल्ये यांच्यातील तो संक्रमणकाळ होता. एकीकडे ब्रिटिश राजवटीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशपूर्व परंपरेची ओढ आणि दुसरीकडे मध्ययुगीन जीवनपद्धतीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशकालीन मूल्यांची ओढ अशी दोलायमान स्थिती त्या काळात होती. ब्रिटिश राज्याचे दोष दिसत होते; पण त्यामार्फत येणार्‍या आधुनिक मूल्यांचा स्वीकार आवश्यक वाटत होता. अन परंपरेतील दोष दिसत होते; पण आपल्या स्वराज्याचा उच्चार-आचार आवश्यक वाटत होता. या दोन्हींचा योग्य समन्वय न्या. रानडेंनी आपल्या विचार व कार्यात साधला होता.

ब्रिटिश राज्यातली राजकीय धोरणे, आर्थिक धोरणे, शेतकर्‍यांवरील अन्याय, पाश्चात्य आर्थिक विचारप्रणाली यांविरुद्ध त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट मांडणी केली. आणि त्याच बरोबर पाश्चात्य उदारमतवाद, उद्योगशीलता, व्यक्तीवाद त्यांनी तितक्याच स्वच्छ आणि स्पष्टपणे उचलून धरला. येथील चुकीच्या रुढी-परंपरा, ग्रंथप्रामाण्य यांवर बोट ठेवले. आणि येथील मराठ्यांच्या इतिहासाचे अत्यंत संयमित असे परिशीलनही केले. पाश्चात्य संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये स्वीकारताना आपल्या संतपरंपरेचे श्रेष्ठत्वही त्यांनी अधोरेखित केले.

तत्कालिन समाजाची नस त्यांनी बरोब्बर ओळखली होती. ' येथील समाज स्थितीशील आणि पुराणप्रिय आहे. जरा कुठे नव्याचा वास आला की तो बुजतो.' त्यामुळे कोणताही बदल सुचवताना तो नवा आहे असे सांगण्यापेक्षा जुन्या परंपरेचे हे नवे रूप आहे असे सांगण्याचा प्रघात न्या. रानडेंनी पाडला. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांचा उपयोग त्यांच्या मतपरिवर्तनासाठी केला, तर समाजपरिवर्तनासाठी ते अत्यंत उपयोगी साधन ठरेल, असे ते मानत.

एकविसाव्या शतकात, आज भारतासमोर पुन्हा पूर्वीसारखी दुही उभी आहे. एकीकडे पाश्चात्यांचे आर्थिक वर्चस्व व त्यातून उदभवणारे तोटे दिसताहेत. परंतु त्यामार्फत येणार्‍या माहिती-तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य आहे. दुसरीकडे येथील 'विकसनशील' परिस्थितीतील अपूर्णता व दोष दिसताहेत. परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची ऊर्मीही आहे. या नव्या संक्रमणावस्थेत न्या. रानडेंचे समन्वयवादी, संयमित परंतु अचूक व नि:संदिग्ध विचार मार्गदर्शक ठरावेत. भारतीय संस्कृतीतील सातत्य आणि पाश्चात्य संस्कृतीतील बदल या दोन्हींचा मिलाफ आपण कसा साधू यावर आपला भावी इतिहास अवलंबून राहील.

(सिरिजसाठी रिपोस्ट)

Saturday, May 4, 2024

आजची गरज

 सुधारकांची सिरिज लिहिते आहे त्यामागे काही विचार आहे.  त्याकाळात विभागलेला समाज जोडण्यासाठी शिक्षण, समाज सुधारणा, जातीभेदांचे खंडन असा गोष्टी या सुधारकांनी केल्या. सर्व समाजाला एकत्र करून पुढे नेले. म्हणून तर आपल्या समाजात स्त्रीशिक्षण, बालविवाह बंदी, विधवापुनर्विवाहाला चालना, सर्वांना शिक्षण, सर्वांना नोकरीव्यवसायाची संधी, जातीभेद नष्ट होत गेला.

जेव्हा जेव्हा समाजात दुफळी माजवली जाते, भेदाभेद अधोरेखित (हायलाईट)  केला गेला तेव्हा तेव्हा इथला समाज गर्ततेत गेला. अन जेव्हा जेव्हा समाज एकोप्याने चालला, एकमेक भेद असून- ते स्विकारून, हे विश्वची माझे घर ही बंधुत्वाची भावना घेऊन चालला तेव्हा तेव्हा आपला समाज जास्त घट्ट बनला, जास्त सुधारलेला झाला.
इतिहास हे सतत सांगतो अन तरीही आपण पुन्हा पुन्हा समाजातल्या दुफळीला वर काढतो. 
यातून कोणाचा नक्की फायदा होतो? ज्या समाजातल्या घटकाला आपण वेगळे काढू पहातो, तो घटक हजारो वर्ष आपलाच आहे न? शरीराचा एखादा भाग दुखावला,जास्त अटेंक्शन मागू लागला तर तो तोडून टाकतो का आपण? की त्याला योग्य ते अटेक्शन देऊन, त्याची नीट देखभाल करून त्याला सुधारतो?
करोडो लोकांमधल्या काहींनी चुका केल्या म्हणून त्यांच्या सगेसोयऱ्यांसकट त्यांना समाजबहिष्कृत करणार का, रादर करू शकणार का आपण? अन मग असे हाताची बोटं दुखावली म्हणून हातच छाटून टाकून सशक्त समाज बनणार का आपण?
अन चुका कोणाकडून होत नाहीत? प्रत्येक व्यक्ती कधी न कधी चुकते. समाजाचा प्रत्येक घटक कधी न कधी चुकतो.
दलित वर्गाला उच्चवर्णीयांनी चुकीची वागणूक दिलीच न? मग उच्चवर्णीयांना छाटून टाकलं का समाजाने?
सॉरी कोणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, कोणी दुखावले गेले तर माफीही मागते🙏🏻
पण समाजातली ही दुफळी अजिबात बघवत नाही, जीव कासावीस होतो. म्हणून लिहिलं. विष भराभर पसरत चाललय, त्यावर उतारा केवळ प्रेमाचा आहे, सहानुभूतीचा आहे, सहसंवेदनेचा आहे! 
एकमेकांना सावरूत, मदत करू. सनातन धर्म हेच सांगतो, विश्वबंधुत्व सांगतो.

Wednesday, May 1, 2024

7. कृष्णशास्त्री चिपळूणकर (1824-1878)


कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म पुण्यातला. लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून तर ओळखले जात. पुण्यातल्या पाठशालेमध्ये त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले त्यांची हुशारी पाहून त्यांचे गुरुजन त्यांना, बृहस्पती म्हणून संबोधत. पुढे आपल्या गुरूंच्या आपल्या आदेशानुसार पुना कॉलेजमध्ये इंग्रजीचा अभ्यास करायला कृष्णशास्त्रांनी सुरुवात केली. संस्कृत व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. अलंकार, न्याय व धर्म या तीनही शास्त्रांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. याशिवाय अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि इतर विषयांचेही अध्ययन त्यांनी केले. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी 1852 मध्ये अनुवादक म्हणून सरकारी नोकरीमध्ये प्रवेश केला. पुढे पुण्याच्या पाठशाळेमध्ये त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम केले.  दक्षिणा प्राइस कमिटीचे काही काळ ते चिटणीस होते. पुना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. कृष्णशास्त्री हिंदू धर्माचे कट्टर पुरस्कर्ते होते.  ख्रिश्चन मिशनरींच्या धर्मप्रसाराला आणि हिंदू धर्मविरूद्ध ते करत असलेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी चिपळूणकरांनी "विचारलहरी" नावाचे वृत्तपत्र काही काळ चालवले. पुना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य असताना "शाळापत्रक" हे नियतकालिकेही त्यांनी चालवले.

मराठी ग्रंथकार म्हणून कृष्णशास्त्रांना मान्यता मिळाली. अलौकिक बुद्धिमत्ता, संस्कृत आणि इंग्रजी शब्दांना भाषांवरील प्रभूत्व आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे जनमानसात त्यांना मान प्राप्त झाला. पाश्चात्य साहित्याचा त्यांचा खूप अभ्यास होता. पौर्वात्य आणि पश्चिमी ज्ञान प्रवाहांचा संगम त्यांच्यामध्ये झालेला होता.

कृष्णशास्त्रींनी कालिदासांच्या मेघदूताचा केलेला मराठी अनुवाद अतिशय गाजला. शास्त्रीय विषयांवरील लेखनही सोपे करून दाखवण्याची हातोटी त्यांची होती. आरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी हा ग्रंथ कृष्णशास्त्रींनी मराठीत आणला, आणि अद्भुतरम्य कथाविश्वाचे दालन मराठी साहित्याला उपलब्ध करून दिले.

कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी अनेक ग्रंथ लिहिले.  अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी, पद्यरत्नावली, सॉक्रेटिस्टचे चरित्र, रसेलस, अनेक विद्यामूलतत्व संग्रह,  अर्थशास्त्र परिभाषा, मराठी व्याकरणावरील निबंध, संस्कृत व्याकरणावरील निबंध अशा विविध विषयांवर चिपळूणकरांनी लेखन केले.
ग. त्र्यं. माडखोलकरांनी यांनी लिहिल्या प्रमाणे, ‘‘कृष्णशास्त्री हे आधुनिक महाराष्ट्राचे पहिले भाषाप्रभु, पहिले शब्दशिल्पी, पहिले शैलीकार साहित्यिक!" होत.
---