"असं असं घडलं..." लेखिका - आरती खोपकर

सुरुवात  

प्रथमत: हे  स्पष्ट करते की या लेखमालिकेत अभ्यासपूर्ण वैचारिक लेख असले तरी संशोधनपर नसतील.  त्यामुळे माझी मतं इतकच यात अपेक्षित आहे. अर्थातच ही मतं अशीच उठली आणि मांडली अशी नाहीत, तर त्यांना पुरावे देत, स्पष्टिकरणं देत, इतिहासकारांची मतं सांगत मी काही लिहावं असं ठरवलय. कोणत्याही वादासाठी वाद अशाना माझा आधीच नमस्कार. आणि प्रत्येक गोष्टीचे मी स्पष्टिकरण, विवेचन केलच पाहिजे असे माझ्यावर बंधनही घालून घेत नाहीये. वुई अॅग्री टू डिफर हा मुख्य स्टँड असेल माझा.


तर इतिहास! नक्की काय म्हणजे इतिहास? अनेक काळ चर्चिला गेलेला हा विषय. त्याच्या सैद्धान्तिक चर्चेत मी इथे घुसणार नाही, आधीच म्हटलय की हा संशोधनपर लेख नाही. पण सर्वसामान्य जनतेत इतिहासाबद्दल असणाऱ्या समजांबद्दल, नावडीबद्दल, अतिरेकी आवडी बद्दल मला जरा बोलावसं वाटतय.
तर,
1.  इतिहास म्हणजे सनावळ्या, इतिहास म्हणजे गाडलेली मढी उकरून काढणं, इतिहास म्हणजे राजांच्या गोष्टी, .....
2.इतिहास का शिकायचा? तर भूतकाळावरून काही शिकायचं, भविष्यकाळाचा अंदाज घ्यायचा, वर्तमान काळ जगताना मागील चुका न करण्याची खबरदारी घ्यायची, इतिहास म्हणजे शास्त्र/ कला/ गोष्टी,....
3. इतिहास कोणाचा? जेत्यांचा( जे विजयी झाले त्यांचा), संघर्षांचा,  समाजांचा, समाजाने नाकारले त्यांचा, देशांचा, जगाचा, विचारप्रणालींचा,.....
4. इतिहास कसा लिहावा? देशप्रेमातून, विशिष्ठ समाजाच्या भूमिकेतून, विशिष्ठ विचारप्रणालीतून, एखाद्या व्यक्तिमहात्म्यातून....
....
बापरे किती ते प्रश्न, किती त्या चर्चा, किती ती मतांतरे! बिचारा इतिहास गुदमरून मरेल की हो  :)
तर ही सगळी चर्चा देऊ बासनात गुंडाळून. आपण साधं, सोेपं काहीतरी बोलुयात, कसं?

इतिहास या शब्दाचा अर्थ इति + ह + आस - असं असं घडलं.   History = His + story
आता काय घडलं कसं बरं सांगणार? काल मी पंतप्रधानांना भेटले असं मी म्हटलं तर समोरची व्यक्ती सहज थोडाच विश्वास ठेवणारे? माझ्या सांगण्यावर लोकांनी विश्वास ठेवायचा तर मला त्यासाठी पुरावे दिले पाहिजेत. मग मला फोटो दाखवावे लागतील, वृत्तपत्रातली कात्रणं दाखवावी लागतील, पंतप्रधानांनी केलेली स्वाक्षरी असलेलं पुस्तक दाखवावं लागेल,.... मगच लोकं यावर विश्वास ठेवतील, हो न?

तसच काल, 10 वर्षांपूर्वी, 1000 वर्षांपूर्वी काय घडलं सांगायचं तर त्यासाठी तसेच पुरावे हवेत. मग 30000 वर्षांपूर्वीची भिमबेटका येथील गुहेतली चित्र असतील. 4500 वर्षांपूर्वीची सिंधुसंस्कृतीतली वीट असेल, 1000 वर्षांपूर्वीचा विजयनगरचा किल्ला असेल,  400 वर्षांपूर्वीचा होन असेल नाहीतर 100 वर्षांपूर्वीचा कागदी दस्ताऐवज असेल.
ह्या पुराव्यांच्या आधारे मी त्या काळात काय घडले हे सांगू शकते.

पण माझा पंतप्रधानांबरोबर असलेला फोटो म्हणजे माझी त्यांची घनिष्ट मैत्री आहे हे स्पष्ट करत नाही. किंवा त्यांची स्वाक्षरी माझ्याजवळ असणं ही फार काही  सांगू शकत नाही. फोटो, स्वाक्षरी, ती स्वाक्षरी असलेल्या कागदातला मजकूर, वृत्तपत्रे अशा शक्य त्या सगळ्या पुराव्यांचा नीट अर्थ लावला तरच खरं काय ते कळेल.

म्हणजेच ऐतिहासिक पुरावे म्हणजे इतिहास नाही.  प्रसिद्ध इतिहासकार इ एच कार म्हणतात,  " इतिहास केवळ असा प्रकारच्या बाबींसाठी (पुरावे) इतिहासाच्या  सहाय्यक समजल्या जाणाऱ्या पुरातत्वविद्या, पुराभिलेखशास्त्र, नाणकशास्त्र, कालनिर्णयशास्त्र इ. शास्त्रांवर अवलंबून असतो. पण यातून मिळणारी तथ्ये म्हणजे इतिहासकारांचा जणू कच्चामाल, तो इतिहास नव्हे"
केवळ दस्तऐवज  आणि पुरावे म्हणजे इतिहास नव्हे तर  " समोर असलेल्या सर्व पुराव्यांचा नीट अभ्यास करून,  त्यातून ध्वनित होणाऱ्या विविध अर्थपूर्ण घडामोडींची सुसूत्र कहाणी मांडणं म्हणजे इतिहास"

तर अशीच कहाणी सांगण्याचा माझा प्रयत्न राहील. कधी गोष्टीरुप, कधी माहिती स्वरुप. पण तपशिलांचा मारा नाही करणार, सनावळ्यांच्या जाळ्यात नाही गुंतणार. मानवी समाजामधे "असं असं घडलं" ही "कहाणी" सांगेन, संशोधन निबंध संशोधकांसाठी; सामान्य माणूस रमतो तो गोष्टींमधे, कहाण्यांमधे! 
पण याचा अर्थ असा नाही की मी मनात येईन ते लिहेन.  नाही; लिहेन ते सगळं शक्य त्या सर्वपुराव्याना साक्षी मानूनच. हो ते लिहिण्याची पद्धत मात्र क्लिष्ट, पुराव्यांची यादी, सनावळ्या, कोणतीही अभिनिवेष, जाज्वल्य अभिमान वगैरे सगळं  दूर ठेऊन.  एक साधा सरळ आलेख, घडलेल्या इतिहासाचा; मानवी वाटचालीचा! 

___

दृष्टिकोन आणि भूमिका 

 दृष्टिकोन:

तर एक जपानी चित्रपट आहे. रोशोमान नावाचा. बघितलायत? अतिशय अप्रतिम चित्रपट. नसेल बघितलात तर आवर्जून बघा.  हा चित्रपट अकुतागावा यांच्या इन ग्रोव्ह या गोष्टी वरून प्रसिद्ध दिग्दर्शक अकुरा कुरोसावा यांनी दिग्दर्शीत केला.
एकच घटना वेगवेगळ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून कशी दिसू शकते याचे अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे हा चित्रपट. वाटल्यास इथेच थांबा, आणि तो चित्रपट बघून या, जेमतेम दिड तासाचा हा चित्रपट. पण आपली विचारप्रक्रिया उलटपुलट करून टाकणारा! 
आता अशी एखादी घटना आठवा, की जी तुम्ही प्रत्यक्ष बघितली/ अनुभवली होतीत आणि तीच घटना नंतर कोणीतरी तुम्हाला सांगितली/ वृत्तपत्रात त्याबद्दल वाचलत. आठवली?
माझी एक आठवण सांगते. 1974 चा काळ. माझी मोठी बहिण भोसला मिलिट्री स्कुलच्या कोर्सला गेलेली. खास मुलींना सैनिकी शिक्षणाचा अनुभव मिळावा म्हणून दिड महिन्याचे अतिशय व्हिगरस ट्रेनिंग यात दिले गेले. अगदी शारीरिक मेहनत, तलवारबाजी, रायफल शुटिंग, स्विमिंग, घोडसवारी, लढाईसाठीची स्ट्रॅटेजिक माहिती, अशा अनेक गोष्टींचा समावेश त्यात होता. अतिशय सुरेख अनुभव होता तो. तर त्याच्या निरोप समारंभात तेव्हाचे .... मंत्री आलेले. त्यांच्या हस्ते बक्षिस समारंभ झाला अन नंतर त्यांनी अध्यक्षीय भाषण केलं.
आम्ही सगळ्यांनी ते भाषण प्रत्यक्ष एेकलेलं.
या भाषणात मुलींना हे सैनिकी शिक्षण कशाला द्यायला हवं, त्यांना याचा काय उपयोग? नवऱ्याशी युद्ध करणार का, अशा धर्तीची अतिशय विचित्र विधानं महोदयांनी केलेली. सगळे पालक भयंकर चिडलेले. कारण एका अर्थाने या सजग पालकांचे वागणे कसे चुकीचे होते असच ते बोलत होते.
दुसऱ्या दिवशी मात्र वर्तमान पत्रांमधे सदर मंत्री कसे दूरदृष्टी असणारे आहेत, सैन्यातही महिला दल असलं पाहिजे, .... असे मांडले होते. आम्ही त्या बातम्या वाचून खरोखर चकित झालो. नराचा नारायण कसा केला जातो याचा अनुभव आम्ही त्या दिवशी घेतला.
आता तुम्ही म्हणील. ओके ठिके. मुद्दा कळला की एकाच घटनेला अनेक बाजू असतात, किंवा एकच घटना कशीही मांडली जाऊ शकते. याचा इतिहासाशी काय संबंध???
यस, इथेच तर खरा इतिहासाशी संबंध येतो. काल काय घडले किंवा 100 वर्षांपूर्वी काय घडले किंवा 1000 वर्षांपूर्वी काय घडले हे इतिहासात आपण अभ्यासतो. पण अभ्यासतो म्हणजे काय? तर एखाद्या इतिहास काराने त्या घटनेवर काय लिहिलय ते आपण अभ्यासतो. नाही पटत?
दोन उदाहरणं घेते. ब्रिटिश काळात 1857 च्या घटनेला सैनिकी असंतोष म्हटलं गेलं, स्वातंत्र्य लढ्यात याच घटनेला स्वातंत्र लढा म्हटलं गेलं तर आज या कडे उठाव म्हणून पाहिलं जातं. हे नुसते शब्दाला प्रतिशब्द नाहीत तर त्यामागे त्या त्या काळातील विचारप्रवाह स्पष्ट होतात.
दुसरी घटना. मराठ्यांचा इतिहास अभ्यासताना 2010 पर्यंत दादोबा कोंडदेवांना शिवाजीच्या कारकिर्दित दिले गेलेले महत्व आणि 2010 पासून बदललेली परिस्थिती.
या दोन्ही घटना मी फक्त उदाहरणांसाठी घेतल्यात. याच चांगले/ वाईट, योग्य / अयोग्य, अशी कोणतीच भूमिका मी घेत नाहीये. इतिहासकाराने ती कधीच घ्यायचीपण नसते. मला सांगायचय ते इतकच की एकच घटना, पण तिचे अर्थ कसे वेगवेगळे लावले जाऊ शकतात. काळ, परिस्थिती, लोकांची मतं, लोकांचे विचार, नवीन पुढे आलेले पुरावे, इतर गोष्टी,.... अनेक कारणांमधून एकच एक घटना वेगळी वाटू शकते, दिसू शकते, अगदी असूही शकते.
रोशोमानची पुन्हा आठवण करून देते.
तर हे असं आहे.

भूमिका:
नुसते पुरावे म्हणजे इतिहास नाही. त्या पुराव्यांचा अर्थ लावणे. काळ, परिस्थिती, इतर पुरावे, अर्थ लावणारी व्यक्ती अशा सगळ्यांचा प्रभाव या अर्थ लावण्यावर पडणार. मग खरा इतिहास? प्रत्यक्षात काय घडलं हे कसं कळणार? खरं तर प्रत्येक इतिहासकाराने लिहिलेला इतिहास हा त्याच्या नजरेतून पाहिलेला इतिहासच असतो.
सो इथे मी जे लिहिणार आहे ते सगळं माझ्या नजरेतून बघितलेला, मला जाणवलेला, मला समजलेला इतिहास असेल. हे एकदा स्पष्ट असले की वादंगांना इथे स्थान असणार नाही. ज्यांना हे लिखाण पटले नाही, त्यांनी हे सगळे सरळ ओलांडून पुढे जावे, आणि स्वत: त्यांना पटलेला, वाटलेला, समजलेला इतिहास लिहावा, वाचावा.
परत सांगते, याचा असाही अर्थ नाही, की मी जे लिहेन त्याला पुरावे नाहीत  माझे सगळे लिखाण अगदी " बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल " या उक्ती प्रमाणेच असेल . फक्त त्या पुराव्यांचा लावलेला अर्थ माझा असेल. उगाच पुराणातली सांगोवांगी गोष्टी मी लिहिणार नाही. पण त्याच बरोबर उगाच माझा मुद्दा पटवायला वादही घालणार नाहीये.
सो इतिहास! असे असे घडले ! हे माझ्या दृष्टीने, माझ्याकडे असलेल्या पुराव्यांवरून लिहिण्याचा हा प्रयत्न!
कधी एखादीच घटना लिहेन, कधी एकादा मागोवा घेईन, कधी पूर्णच आढावा घेईन, कधी एखाद्या व्यक्ती बद्दल लिहेन, कधी एखाद्या तत्वप्रणालीबद्दल.. हे मी जसं मनात येईल तसं लिहेन. जसजसे लिखाण होत जाईल तसतसे त्यांची रचना करत जाईन. खरे तर हे सगळं आधी लिहून, मग नीट संकलित करून इथे टाकायला हवं. पण त्याला मी खूप वेळ लावेन. आणि एखाद वेळेस माझ्याकडून कंटाळा केला जाईल. आताच इथे नोंदवले की हे सगळं लिहायचा तगादा माझा मलाच राहील. आणि मी उशीर केला तर तुम्हीही मला ढोसत रहाल biggrin
कधी एखादी माहिती तुम्हाला हवी वाटली तर कळवा, मी अभ्यास करून लिहायचा प्रयत्न करेन.
सर्वात महत्वाचे म्हणजे, मीही इतिहासाची अभ्यासक आहे. त्यामुळे काही गोष्टी मला माहित नसण्याचीही शक्यता आहे. पण मी त्या माहिती करून घेईन आणि मांडण्याचा प्रयत्न करेन. शक्य तिथे योग्य त्या पुस्तकांचा उल्लेख करेन, माहिती देईन.
या संपूर्ण लिखाणाची भाषा शक्य तेव्हढी साधी सोपी ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. इतिहास म्हणजे क्लिष्ट, कंटाळवाणा हा समज बदलण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच मुळे हे काही संशोधनपर( रिसर्च लेव्हलचे) लिखाण असणार नाही. तसे लिखाण लिहिण्याचे हे व्यासपीठही नाही याची जाणीव मला आहे.
माझ्यातल्या गंजलेल्या इतिहास अभ्यासकाला जरा बाहेर ओढून काढण्याची ही धडपड आहे. 
___

"... आणि मी मोठा झालो!"

(अश्मयुगातल्या रामची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )


रात्र झाली होती. आमची सर्वांची जेवणं झाली अन मग सगळे बाबांच्याभोवती जमले.
मुलं ओरडू लागली, "गोष्ट गोष्ट ! आज जंगलात काय काय झालं, त्याची गोष्ट ! "
मोठे बाबा हात वर करत म्हणाले, " अरे हो हो ! पण आधी सगळे शांत बसा बरं. आज रामचे बाबा गोष्ट सांगतील."
मी खुष झालो. आज माझे बाबा गोष्ट सांगणार !
सगळी मुलं गप्प बसून ऐकू लागली. छोटी मुलं आपापल्या आयांच्या मांडित जाऊन बसली.

" आज आम्ही डोंगरापलीकडच्या जंगलात गेलो होतो. आज तुम्ही जे लाल मुळे खाल्ले ना; ते त्या जंगलात खुप उगवतात. तुम्हाला ते जसे आवडतात तसे ते सशांनाही खुप आवडतात. त्यामुळे त्या जंगलात ससेपण खुप असतात. " बाबा सांगू लागले.

" रामचे बाबा ससे म्हणजे काय? " आमच्यातला नुकताच मोठा होउ लागणार्‍या बंटीने विचारले.

मोठे बाबा उठले आणि दिव्याजवळ गेले. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागली. दिव्यापलिकडच्या भिंतीवर आता मोठे बाबा मजेची चित्र दाखवणार म्हणून सगळे खुष झाले होते.

मोठ्या बाबांनी दिव्याची वात मोठी केली. आणि ते दिव्याच्या पलिकडे जाऊन उभे राहिले.
मग त्यांनी एक हात आडवा केला. दुसर्‍या हाताची बोटं त्या हातावर ठेवली.
आणि एका तालात दोन्ही हात उड्या मारत पुढे नेऊ लागले.
त्याबरोब्बर मागच्या भिंतीवर ससा आला अन उड्या मारू लागला.
मध्येच त्याने कान हलवले. मग तोंड हलवले.


पुन्हा उड्या मारत तो अंधारात पळून गेला.
मग मोठ्या आजोबांनी विचारलं, " कळला का ससा? "
"हां हां, म्हणजे मीनाच्या डोक्यावर भिंतीवर जे चित्र काढलय ते ? " बंटी म्हणाला.
आता बंटीला ससा म्हणजे काय ते बरोब्बर समजलं होतं.

तेव्हढ्यात सखादादा पुढे आला.
त्याने डोक्यापाशी हाताची दोन - दोन बोटं वर करून सश्यासारख्या उड्या मारायला सुरूवात केली.
मग काय आम्ही सगळेच सश्यासारख्या उड्या मारू लागलो.



बाबांची गोष्ट तशीच राहिली.
थोड्या वेळाने मोठे बाबा म्हणाले, "चला आता मुलांनी झोपायला जा. आम्हाला थोडं बोलायचयं आहे. " आम्ही सगळी छोटी मुलं उठलो आणि आईंबरोबर आत गेलो.

बाहेर सगळे बाबा थोडावेळ बोलले. मग तेही आले झोपायला.
माझे बाबा आले अन म्हणाले, " बरं का, मोठ्या बाबांनी सांगितलय; उद्यापासून रामलाही बाहेर घेऊन जायचय. तो आता मोठा होतोय. जंगलचे कायदे त्याने शिकायला हवेत. "
आई काळजी करत म्हणाली, " अहो, अजून लहानच आहे तो. इतक्यात कशाला? "

पण मला मात्र खुप आनंद झाला. मी मोठा झालोय अन उद्या मला जंगलात जायला मिळणार , अरे वा !
बाबा हसून म्हणाले, " अगं तुला तो कितीही मोठा झाला तरी तसच वाटेल. पण ते काही नाही. उद्या राम येईल आमच्याबरोबर. काय राम येणार ना? "
मी जोरजोरात हो म्हणून मान हलवली.

आता मला झोपच येईना. बाहेरचे रातकिड्यांचे, माकडांचे इतर प्राण्यांचे, खालच्या नदीच्या पाण्याचे आवाज ऐकत; त्यांना मनातल्या मनात सांगत बसलो; ' उद्या भेटूच!'

"राम, ए राम! अरे ऊठ ! तुला आज जंगलात ना जायचय? चल ऊठ ! " आई हाका मारत होती.
मी डोळे उघडले. बघतो तर काय अजून रात्रच होती.
"आई, झोपू दे ना थोडं अजून. आम्हाला सकाळी जायचय. अजून तर बाहेर अंधारच आहे."
"ऊठ राम," बाबांचा आवाज आला. " अरे आत्ता होईल पहाट ! आपल्याला खुप दूरवर जायचय. चल उशीर होईल. सगळे तयार झाले बघ !"

मग मात्र मी लगेच ऊठलो. पटकन तोंड धुतले, आईने दिलेले पाणी प्यायलो. आणि बाबांसमोर जाऊन उभा राहिलो.
"राम हा टोकेरी दगड धर हातात. पाडायचा नाही बरं का ! जंगलात टोकेरी दगड जवळ असलेला बरा. काल रात्री हा मी खास तुझ्यासाठी ठोकून, घासून तयार केलाय बरं का ! " बाबांनी बोलत बोलत हात पुढे केला.
त्यांच्या हाततला तो टोकेरी दगड घेताना कसलं भारी वाटलं, सांगू !












आईने माझ्या कमरेला एक वेल बांधली. मी त्या वेलीत तो दगड पोटाशी खोचून ठेवला. आईने एक मुळाही त्या वेलीत बांधला. म्हणाली, " भूक लागली तर खा बरं का ! "

हळूहळू गुहेच्या तोंडाशी सगळे बाबा अन मोठी मुलं जमली.
मोठ्या बाबांनी मला हाक मारली.
म्हणाले, " हं राम, आज तुझा पहिला दिवस ! सगळ्या मोठ्यांना नमस्कार करा ! "
मी लगेच सगळ्यांना वाकून नमस्कार केला.

"हं. शाब्बास! आता महत्वाचे ऐक !" मोठे बाबा सांगू लागले. मी नीट लक्ष देऊन ऐकू लागलो.
" जंगलात जाण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे एकट्याने कोठेही जायचं नाही. टोळीच्या शेवटी राहायचं नाही. सुरूवातीला काही दिवस टोळीच्या मध्यातच तू चालायचं. जंगलात आपले कान, डोळे, नाक उघडे ठेवायचे. पण तोंड मात्र अगदी बंद ठेवायचे. चालतानाही खाली बघून नीट चालायचं. बाकी सर्व गोष्टी तू हळूहळू शिकशीलच. "

आता मोठी आई पुढे आली.
मला जवळ घेऊन म्हणाली, " बरं का मुला, ही आपली टेकडी आणि गुहा लक्षात ठेव. आपल्या टेकडीची खूण म्हणजे हे मोठं झाड बरं का ! खुप लांबूनही लक्षात येतं हे झाड. त्याच्यावरच्या आगीच्या रंगाच्या फुलांचाही रंग लक्षात ठेव. त्याच्या मागच्या झाडांच्या पानांचा रंग लक्षात ठेव. इतर झाडांपेक्षा गडद रंगाची ही झाडं वेगळी दिसतं बघ !



आणि हो, एकटा कुठे जावू नको. मोठ्यांचे ऐक. गुहेच्या बाहेरच्या जगात खुप वाईट गोष्टी आहेत. काळजी घे. स्वतःला जप ! नीट जा हो." मोठ्या आईने पुन्हा एकदा मला जवळ घेतलं, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मला जरासं रडूच आलं. मग सगळे हसू लागले.

आई चटकन पुढे झाली माझे डोळे पुसले. अन म्हणाली " मोठा होतोय माझा सोन्या! "

" चला तर. सगळे आले ना? " मोठे बाबा म्हणाले.
आता मलाही घाई झाली होती जंगलात जाण्याची !
तेव्हढ्यात मोठ्या बाबांनी एक लांब वेल तोडली. तिचे एक टोक माझ्या हाताला बांधले अन दुसरे टोक माझ्या बाबांच्या हातात दिले. आता मी हरवण्याचा प्रश्नच नव्हता.

आणि मग आम्ही सगळे गुहेच्या बाहेर पडलो.

मग आम्ही सगळे टेकडी उतरू लागलो. हळूहळू उजेड होत होता. सूर्यदेव आकाशात आला. सगळीकडे चकचकीत उजेड झाला. आम्ही आता नदीच्या जवळ आलो. नदीत सगळ्यांनी स्वच्छ होऊन घेतलं. मला तर नदीत डुंबायला खुप मज्जा आली. मग बाहेर आलो.

तेव्हढ्यात मोठे बाबा ओरडले, " राम! हातातला वेल कुठे आहे? का काढलास ? "
मी घाबरलो, रडू लागलो. नदीत पाण्यात खेळताना तो कधी गळून पडला, हे कळलंच नव्हतं.
बाबाही मला हाका मारत धावत पुढे आले. ती वेल त्यांनी पुन्हा माझ्या हाताला बांधली, यावेळेस जरा जास्तच घट्ट !

मग आम्ही नदीच्या कडे कडेने थोडे वर जाऊ लागलो.
"बाबा, जंगल तर तिकडे खाली आहे. आपण वर का जातोय? " मी जरा जोरातच विचारलं.
"शूsss! राम हळू बोल बरं. बघ तो ससा घाबरून पळून गेला बघ. अशाने आपण शिकार कशी करणार? आणि दुसरं म्हणजे, आपल्याला जंगलात जायचं तर नदी ओलांडावी लागते. अन वरच्या अंगाला नदी छोटी असते. शिवाय तिथे मोठे मोठे दगड असल्याने त्यांच्यावरून नदीच्या पलिकडे जाणं सोपं जातं.



चल आता लवकर लवकर. आपल्याला टोळीच्या मध्ये राहायला सांगितलय ना मोठ्या बाबांनी ? " बाबांनी समजावलं.

जंगलातल्या माझ्या शिक्षणाची अशी सुरुवात झाली. जंगलात हळू का बोलायचं आणि नदी कोठून ओलांडायची याची माहिती आता मला मिळाली होती.

हळूहळू आजूबाजूची झाडं गच्च व्हायला लागली. वेगवेगळ्या पक्षांचे आवाज येत होते. मध्येच माकडं ओरडत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होती. बाबांनी हळुच सांगितलं, " आपण आलोय हे माकडांना समजलं की ते हे असं ओरडून म्हणजे हूल देऊन, सांगतात बरं का इतर प्राण्यांना ! "

तेव्हढ्यात मोठ्या बाबांनी हात वर केला अन ते थांबले. त्याबरोब्बर सगळे थांबले. मला आपोआप कळले, आता अजिबात आवाज करायचा नाही. मोठ्या बाबांनी बोटानी खूण केली. पुढे उजवीकडे थोडी मोकळी जागा होती. अन मध्ये गवताचे रान उगवले होते. सकाळच्या उन्हात खुप ससे छोटी झुडुपं उकरून त्या खालची गाजरं खात होते.

अरे वा ! आज पहिल्यांदा मी शिकार पाहणार होतो, नाही-नाही करणार होतो. बाबा, मोठे बाबा यांनी सांगितलेल्या कितीतरी शिकारीच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. पण आता मी ती शिकार प्रत्यक्ष पाहणार होतो. अनुभवणार होतो.

हळुहळु सगळे लांब लांब झाले. लांबूनच सगळ्यांनी त्या सशांभोवती गोल केला.


आणि खाली वाकून, हळुहळू, आवाज न करता सगळे जवळ येउ लागले. आता ससे आमच्या अगदी दोन हातांवर होते. मला तर त्यांना उडी मारून पकडावे वाटत होते. तेव्हढात एका माकडाला आमची चाहूल लागली अन त्याने हूल दिली. म्हणजे वेगळाच आवाज काढून सशांना सांगितलं, "माणसं आलीत."

माकडाच्या त्या आवाजासरशी सगळे ससे सुसाट पळत सुटले. मग आम्हीपण जलदी केली. पटापट त्या सशांवर आपले टोकेरी दगड मारले. काहींनी सशांवर उड्या मारल्या अन त्यांना हाताने पकडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळात मी पण एका सशाला पकडण्यासाठी धावलो. पण माझ्यापेक्षा तो ससा जास्ती अनुभवी होता ना ! तो माझ्या पायांतून उडी मारून पळून गेला. मध्येच काहींचे ओरडण्याचे आवाज ऐकू आले. सशांचेही ओरडणे ऐकू आले. मग थोड्यावेळाने सगळे शांत झाले.

प्रत्येकाने आपापले टोकेरी दगड शोधून काढले. आणि मग आम्ही सगळे एकत्र आलो. सगळ्यांनी मिळून हाताच्या बोटांइतके ससे पकडले होते. त्यातले काही जिवंत होते. मग मोठ्या बाबांनी बंटीच्या बाबांना हाक मारली. त्यांच्याकडे जुनी मोठी वेल होती. त्या वेलीने सगळे ससे एका वाळक्या फांदीला बांधून घेतले.

" चला आता आपण रताळी गोळा करूयात." मोठे बाबा म्हणाले.
मग मला बाबांनी रताळ्याचे झाड कसे ओळखायचे ते शिकवले. लांब, थोडीशी खरखरीत हिरवी पानं पाहून मी ते झाड जोरात ओढले. तशी फक्त काही पानं तुटून माझ्या हातात आली, अन मी मागे धाडकन पडलो. सगळी हसू लागली.

बाबांनी मला उठवले, म्हणाले, " अरे घाई करू नको. आधी सगळे समजून घे. मग कर. बरं का रताळे असे उपटू नको. हातात काहीच येत नाही. इतकं सोपं नसतं कोणतही काम ! " बाबा सांगू लागले. " हे बघ तुझ्याकडे तो टोकेरी दगड आहे ना? त्याने आधी या झाडाच्या खालची माती बाजूला करायची, ही अशी बघ." बाबा दाखवू लागले.


झाडाची मूळं अन त्याच्या खालचे रताळे मोकळे करून घायचे. मग ते ओढायचा. कळलं ? "

मी लाजलो. " बरं, बरं. " म्हणत कमरेशी खोचलेला टोकेरी दगड बाहेर काढला.
आता घाई न करता, बाबा कसं करताहेत ते बघत बघत, तसे करत मी हळूहळू रताळे बाहेर काढले. मला इतका आनंद झाला. मी मोठ्यांदा ओरडलो, "माझे रताळे, माझे रताळे ! " सगळ्यांनी मला शाब्बासकी दिली.


मोठ्या बाबांनी मला जवळ घेतलं. मला खुप अभिमान वाटला. रताळे माझ्या कमरेशी लटकवत मोठे बाबा म्हणाले, " आज जे जे रताळे तू काढशील ते सगळे तुझ्याजवळ ठेव. गुहेत गेल्यावर ते सगळी रताळी मोठ्या आईला दे आणि नमस्कार कर. ती सगळ्यांना तुझी रताळी वाटेल. आजची ही तुझी पहिली कमाई ! शाब्बास ! असेच कष्ट कर. आपल्या कुटुंबाला वाढव, सांभाळ ! शाब्बास पोरा ! "

मला खुप आनंद झाला होता. पहिल्यांदा वाटलं, 'नाही नाही , हे माझे रताळे आहे. तो मीच खाणार !' पण मग मला मोठ्या बाबांचं म्हणणं पटलं. मी आता मोठा होतोय. माझ्या आधी माझ्या कुटुंबाला मी दिलं पाहिजे. त्यामुळे सगळी रताळी मोठ्या आईलाच दिली पाहिजेत.

मी उत्साहाने नवीन झाडं शोधू लागलो. पुन्हा हळूहळू माती बाजूला करून रताळी बाहेर काढू लागलो. मी आता नक्कीच मोठा झालो होतो. मी भराभर काम करू लागलो. काढलेली रताळी माझ्या कमरेतल्या वेलीत खोचू लागलो.

"राम, राम. आता पुरे."बाबा म्हणाले. " पहिल्याच दिवशी एकदम फार जोर करू नकोस. हात सोलून निघतील."
मी थांबलो. हातांकडे बघितलं तर सगळे लाल लाल झाले होते. हातावरची माती झटकत मी उभा राहिलो. पाठ दुखत होती अन हातही चुरचुरत होते.

मी आजूबाजूला बघितलं. बाकीच्यांनी खुप रताळी गोळा केली होती. त्यांच्या छोट्या छोट्या जुड्या त्यांनी वेलींनी बांधल्या.

आता आम्ही परत नदीकडे निघालो. नदीवर आल्यावर सगळे थांबले. सगळ्यांनी आपापले हात, पाय, तोंड नदीच्या पाण्यात धुतले. मलातर नदीच्या गार पाण्यातून हात बाहेर काढवतच नव्हते. बाबा म्हणाले तसे खरोखर हात सोलून निघाले होते. नखांत माती साचली होती. डोक्यावर माती उडाली होती. मग बाबांनी मला सरळ आंघोळच घातली

 :heehee: आता उन चढू लागलं होतं. सगळ्यांना भूकाही लागल्या होत्या. आम्ही भराभर गुहेच्या दिशेने चढू लागलो. लांबूनच आम्हाला पाहून लहान मुलं धावत पुढे आली. मला आठवलं , पूर्वी मीही असाच धावत येत असे. मुलांच्या मागोमाग आई होती. तिला बघताच मी धावत सुटलो. तिच्या कुशीत शिरलो. आईपासून इतका वेळ लांब मी पहिल्यांदाच राहिलो होतो.

तेव्हढ्यात आईचे लक्ष माझ्या हातांकडे गेलं. तिला तर रडूच फुटले. मी म्हटलं, " अगं आई, इतकं काही नाही दुखते." बाबाही रागवले, " अगं मोठा होतोय तो. थोडं लागणारच. त्याने जरा घट्ट्मुट्ट व्हायलाच हवय. आणि त्यापेक्षा त्याची कमाई बघ :) अरे राम, दाखव ना तुझे रताळे, तिला !"

मी आनंदाने कमरेला खोचलेले रताळे तिला दाखवले. तिने आनंदाने माझे मुके घेतले.
 "राम" मोठ्य बाबांनी हाक मारली. " राम , अरे तुझी पहिली कमाई मोठ्या आईला दे. " मी पुढे झालो. मोठ्या आईला नमस्कार केला. आणि हातातले रताळे तिला दिले. मोठ्या आईने खूप महत्वाच असल्यासारखे ते हातात घेतले. अन माझ्या आईला हाक मारली. " कौसल्या, यावर तुझा अधिकार बरं !"

आईनेही हसत ते हातात घेतले. "राम, सगळ्यांना नमस्कार कर बरं. आज तू मोठा झालास. कुटुंबाची जबाबदारी हळुहळू उचलायला लागलास. शब्बास ! " आईने मला जवळ घेत म्हटलं.

मग आम्ही सगळे जेवायला बसलो. मुळे, फळं आणि हो, मी काढलेल्या रताळ्याचा एक एक तुकडाही ! प्रत्येकाला मोठी आई वाढत होती. छोटी मुलं माझ्याकडे आदराने बघत होती. अन सगळे मोठे दादा आता माझ्या खांद्यावर हात ठेऊन माझ्याशी जंगलातल्या गप्पा मारू लागले.

 खरच, एका दिवसात मी मोठा झालो होतो.
___

"...  आणि मी मोठी झाले !"

(अश्मयुगातल्या सीतेची गोष्ट - काळ : सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा )
(डिसक्लेमर : कथा सांगताना थोडी लेखकाची स्वयत्तता वापरली आहे; जाता जाता मुलामुलींना पाळीबद्दल सोपी माहिती देता येईल या कारणास्तव)

पहाट झाली तशी आईच्या हाका सुरू झाल्या. " चला उठा सगळे, आता उजाडेल " मग हळुहळु सगळे उठले. बाबा, मोठेबाबा, सगळी मोठी मुलं लांबच्या जंगलात जायला निघाली. पाठोपाठ आई, गीताची आई, गीता, मी आणि सगळ्या बायका, मुली बाहेर पडल्या. मोठी आई, आणि छोटी आई मात्र गुहेच थांबल्या. आज छोट्या आईचे पोट खूपच दुखत होते. मधून मधून ती ओरडत, रडतही होती. मी विचारलं "तिला काय झालय?" पण आई हसून म्हणाली "कळेलच लवकर "

आमची गुहा तशी फार उंचावर नव्हती.



अगदी थोडं खाली उतरलं की लगेच मोठं रान होतं. मोठं गवत तिथे असे. आधी हिरवं गार अन आता पिवळं धमक.
आज ते कापायला जायचं असं आई म्हणत होती. आता त्यातून धान्याचे दाणे मिळणार होते.  खूप लहान पणापासून आई बरोबर इथे येत होते, त्यामुळे आज मला काही वेगळं वाटलं नाही. 


या रानात लाल बेरीची काही झाडंही होती. आम्ही मुली त्या बेरी गोळा करत असू. आजही आईला सांगून 
आम्ही मुली बेरीच्या झाडाजवळ आलो. एकमेकींना मदत करत आम्ही झाडावर चढलो. मस्त लालचुटूक्क बेरी लगडल्या होत्या. मग आम्ही थोड्या तोंडात टाकत, थोड्या खांद्यावरच्या झोळीत टाकत होतो. 


झाडावरून खाली बघितलं तर, सगळ्या आया खाली गवत कापत होत्या. कसा सरसर हात चालवत होत्या. त्याच्या हातातले दगडी विणे सपासप गवतावर चालत होते.


मध्येच मला हुक्की आली, आपणही कापुयात का गवत? मग मी झाडावरून खाली आले. आई जवळ गेले आणि म्हटलं, " आई मला पण शिकव ना, गवत कापायला. " आई हसली, म्हणाली " अगं थोडी मोठी हो, मग शिकवेन हं " मी नाराज झाले. तिला म्हटलं, " बघ मोठी झालेय की, तुझ्या खांद्या पर्यंत आलेय की " आई हसली, " तशी नाही वेडाबाई, कळेल तुला काही दिवसातच. जा आता सगळ्यांना गोळा कर. गुहेत परतायचय. "

मला काही कळलं नाही, मी अगदीच हिरमुसले आणि परत बेरीच्या झाडापाशी आले. " चला ग सगळ्या परत जायचय. " मी जारा घुश्यातच म्हटलं. मग आमची सगळी वरात परत आली. परत आलो तर दारातच मोठी आई हातात छोटसं गाठोडं घेऊन उभी होती. आई लगबगीने पुढे झाली. " अगबाई आला का नवीन पाहुणा? की पाहुणी? " आजी हसत म्हणाली " पाहुणी आहे हो, छोटीशी "

अरे हां, आई थोड्या दिवसांपूर्वी म्हणालेली, छोट्या आईला बाळ होणारे ! मग काय सगळे ओरडायला लागले, " नवीन बाळ, नवीन बाळ " मग मोठी आई रागावली, " हळु की जरा, बाळ घाबरेल." मग सगळ्यांनी हळूच बाळाला लांबूनच पाहिलं. छोटी आई आत झोपली होती. खूप दमलेली दिसली ती. "आई, छोटी आई तर आली नव्ह्ती आपल्या बरोबर गवत काढायला. मग ती इतकी का दमली ? " मी विचारलं. तशी हसून आई म्हणाली, " कळेल, मोठी झालीस न की कळेल आपोआप ! "
मी पुन्हा विचार करू लागले, कधी मोठी होणार मी? मग बाबा मंडळीही आली. सगळ्यांनी बाळाला बघितलं. सगळेच आनंदात होते.



तेव्हढ्यात बाळ रडायला लागले. इतकुसा आवाज त्याचा. मग मोठ्या आईने त्याला छोट्या आईकडे सोपवले. अन त्या दोघी आत गेल्या.

रात्री सगळ्यांनी बाळाचं नाव काय ठेवायचं यावर खल केला. मी म्हटलं , " बाळ, पिटुकल्या लाल लाल बेरी सारखं आहे, त्याला बेरीच म्ह्णूयात? " सगळेच हसायला लागले. मग छोटी आई म्हणाली, "  पिटुकली लाल म्हणुन लीला म्हणुयात तिला. " आणि मग सगळ्यांनाच ते नाव आवडलं.

रात्री मला सारखी गवत कापायची आणि छोट्या बाळांची स्वप्न पडत होती. एकदा तर गवत कापतना हातातला विळा चुकून पोटाला लागला असा भासही झाला. पोटात एकदम खूप दुखलं ही... अगदी दचकून जाग आली. शेजारी आईच्या जवळ जाऊन तिच्या कुशीत झोपले, तेव्हा जरा बरं वाटलं.


सकाळी आईने उठवलं. तर पुन्हा पोटात खूप दुखलं. माझा कळवळलेला चेहरा पाहून आईने काळजीने विचारले, " काय ग, काय झालं ? काही दुखतय का? "
 " आई पोटात खूप दुखतय.." मी रडतच  म्हटलं. "बरं मग तू पडून रहा आता. मी येते थोड्या वेळाने" आई म्हणाली. आणि भरभर चालत मोठ्या आईपाशी गेली. त्या दोघींचे काही तरी खुसूर-फुसूर झाले. तशी मोठी आई माझ्या जवळ आली. माझ्या जवळ बसून माझी तपासणी सुरू केली. नंतर माझ्या पोटावर हात ठेऊन अंदाज घेत बसून राहिली.


मग पुन्हा उठली आणि आईला काही तरी सांगितलं. मग आईने बाकीच्या सगळ्यांना नेहमीच्या कामांसाठी पाठवलं.

" आई मलाही जायचय बेरी काढायला " मी उठायचा प्रयत्न करत म्हटलं. तशी मोठी आई चटकन माझ्या जवळ आली. म्हणाली, " थांब इतक्यात नको उठूस. " मला काही कळेच ना? मोठी आई एरवी मला लवकर उठ, लवकर उठ म्हणायची. आज उलटं का म्हणतेय?

सगळे बाहेर, जंगलात, रानात गेले.  तशी आई माझ्या जवळ आली. मोठी आई आता काही महत्वाचे सांगणार याची जाणीव झाली मला. मी थोडी घाबरलेली. काय झालय मला? आता पोटात अजूनच कसं तरी होत होतं. उलटी होईल असंही वाटत होतं. अंगात अगदी ताकदच नाही असं वाटत होतं. आणी पोटात काहीतरी तुटत होतं, काही तरी सुटत होतं...

"सीता, मला वाटतं तू आता मोठी होतेयस." आई.
" म्हणजे आता मी गवत कापू शकेन ? " - मी
मोठी आई हसत म्हणाली. " अग हो , हो, किती घाई तुला? तशी तर मोठी होशीलच. पण त्याहून एक खूप छान मोठेपण येणारे तुला. "
" घाबरू नको बाळा. हे असं सगळ्या मुलींना होतं " - आई
" म्हणजे, असं पोटात दुखण? " - मी
" हो ग, प्रत्येक मुलीला मोठं झाल की दर काही दिवसांनी  पोट थोडं दुखतं. आणि पोटात साचलेली बाळासाठीची गादी साफही होते"
" म्हणजे? मला बाळ होणारे? मला नाही, मला नको बाळ... " मी जोरात रडत म्हतलं.
" अगं , इतक्यात नाही ग होणार तुला बाळ, नको घाबरू. आता फक्त बाळासाठी पोटात मऊ मऊ रक्ताची गादी तयार होते दर महिन्यात. आणि इतक्यात बाळ होणार नाही म्हणुन मग ती पोटातून बाहेर टाकली जाते. तेव्हा थोडं दुखतं सुरुवातीला. पण मग एकदा सवय झाली की नाही दुखत काही. " - मोठी आई.

" मऊ रक्ताची गादी? पण माझं पोट तर इतकुसं आहे, त्यात गादी कशी मावणार? आणि गादी तर मऊ गवताची असते, रक्ताची कशी?" - मी
" अग, पोटाच्या आत गवत कसं रहाणार? तुलाच टोचेल नं? म्हणुन आपल्या रक्ताचीच गादी असते पोटात. अगदी छोटीशी. बाळ पोटात आलं तर ती गादी मोठी होते अन मग बाळही त्यात मोठं होतं. आणि बाळ पोटात नाही आलं तर दर महिन्याला पोटातली रक्ताची गादी हळुहळु चार दिवसात बाहेर पडते. शू बाहेर पडते न तशी. पण शू कशी दिवसातून ७-८ वेळा बाहेर पडते तसं नाही होत."- आई
" ती गादी चार दिवस थोडी थोडी सारखी बाहेर येते.म्हणुन मग आपण कमरेला वेगळी पिशवी लावतो. आणि मग ती सकाळी पलीकडच्या छोट्या ओहळात धूवून टाकून पुन्हा वापरतो. घाबरू नको. मी आणि आई मदत करतो तुला सवय होई पर्यंत." - मोठी आई
" पण मग बाळ कधी येणार पोटात? मला नको इतक्यात बाळ बिळ. ते सारखं रडतं. " मी अगदीच बावचळले होते.
आई हसून म्हनाली. " नाही हं इतक्यात नाही येणार बाळ. तुला हवं तेव्हाच होईल हं. आणि त्यासाठी तुला आधी मित्र शोधावा लागेल. तो तुला आवडावा लागेल. मग बाळबीळ. हं "
मनात काही तरी हुळहुळलं, काय कळलं नाही .. मग म्हटलं, " हा मग ठिक. बरं आता मी जाऊ बेरी गोळा करायला? "
" नाही बाळा, आता हे चार दिवस थोडे सांभाळायचे. आपली ताकद थोडी कमी होते, पोट, पाय दुखू शकतात. म्हणुन हे चार दिवस गुहेतलीच कामं करायची, फारतर खाली फिरून यायचं. पण ही आपली हक्काची विश्रांती बरं " आई डोळे मिचकावत बोलली .
" आणि गवत कापणं? माझ्या विळा? " - मी
" हो ग बाई, आता तुला गवत कापणंही शिकवायचं. तुझ्यासाठी वेगळा विळा तयार करायचा. इतकच नाही तर गुहेतली चित्र कशी काढायची हेही शिकवेल मोठी आई. होना आई ? "-आई
" वॉव, मी मोठी झाले? गवत कापणार आता मी! आणि ती रंगीत मस्त चित्रही काढणार ! आई मला न छान नाच करावासा वाटतोय ! " - मी
" हो , हो, तू मोठी झालीस आता. सगळं शिकायचं आता. पण हळूहळू. गडबड नको हा. आधी आपण नवीन पिशवी कशी बांधायची शिकायचय, हो ना? " - मोठी आई
" हो, हो. चला आता आपण पलिकडच्या ओहळा कडे जाऊ. " - आई.

आम्ही बाहेर पडलो. मला आता खूप छान वाटत होतं. मी मोठी झाले होते. मला गवत कापता येणार, चित्रं काढता येणार, आणि नंतर मित्रही शोधायचाय अन बाळही... आईला मी नाही म्हटलं पण आत मनाच्या एका कोपर्‍यात मित्र, बाळ म्हटल्यावर लक्कन काहीतरी हललं होतं.

हो, मी मोठी झाले होते !

___

( ते बेरीचे झाड सोडता बाकीची चित्र मीच काढली आहेत फोटोशॉपमध्ये. बेरीचे झाड मीच काढलेल्या फोटोला बेर्‍या चिकटवल्यात अन जरा फोशॉ इफेक्ट दिलेत ;)  हे लिखाण पूर्णतः माझी कल्पनाशक्ती आणि तर्कशास्त्र यावर आधारित आहे. सो "पुरावे द्या" ह्याला यावेळी पास )

___

"सृजन : शेतीची सुरुवात !"


( स्थळ : लाखो वर्षापूर्वीची, एक अश्मयुगीन गुहा)

ऊन आता फारच कडक होऊ लागलं होतं. मुलं, बायका, पुरुष आता फार वेळ बाहेर जाईनाशी झाली. आसपासचे छोटे झरेही आटले. गुहेबाहेरचे गवतही पिवळे धम्मक झालं. झाडांचे शेंडेही हिरव्याची साथ सोडू लागले. सीतेला कसलीतरी चाहूल लागली होती. मनात  आत खूप काही आर्त, हूरहूर लावणारं वारं वाहू लागलं होतं. तिला रामाचा विरह आता अजिबातच सोसवेना. तो सतत बरोबर असावा असं वाटू लागलं.
कधी सकाळीच डोंगरामागच्या छोट्या झालेल्या नदीत पाय सोडून बसावं अन ऊन अंगाला अगदी भाजू लागलं तर मनसोक्त नदीमधे डुंबत रहावं, पाण्यापासून जराही दूर होऊ नये असं वाटू लागलं तिला. पण मग ऊन फारच तळपायला लागलं की राम तिला ओढून जवळच्या झाडांच्या सावलीत नेई. मग तिथे बसल्या बसल्या फळांच्या खाली पडलेल्या इवल्या इवल्या बिया ती गोळा करत बसे. राम शेजारी पडलेल्या वाळलेल्या फांद्या गोळा करी अन वाळक्या वेलींनी बांधून त्याची मोळी करे. मग ऊन्हाचा मारा अगदीच असह्य झाला की दोघे गुहेत परत येत.
अजून काही दिवस उलटले. अन एक दिवस, दिवस उगवलाच नाही. रात्रभर कसले कसले आवाज येत राहिले. अन मधेच लख्ख उजेड होई, जंगलातला काळाकुट्ट अंधार क्षणात उजळून निघे. अन मग जोरात सुरु झाला पाऊस!

साऱ्या आकाशातून जणू मोठी नदीच वाहू लागली साऱ्या जंगलावर. सगळे अतिशय आनंदले. गुहेच्या बाहेर आले. आणि आकाशातून पडणाऱ्या या नदीखाली चिंब भिजू लागले. मधेच उजेडाचा लखलखाट होऊ. आणि पुन्हा कडकडाट असा आवाज. लहानमुलं घाबरून आपल्या आयांच्या कुशीत लपत. सीतेलाही या आवाजाची भिती वाटे. पण आता आईपासून ती खूप दूर आलेली. मग ती चटकन रामाचा हात घट्ट पकडे. लखलख होई तशी ती चटकन रामाजवळ सरके. रामही तिला जवळ घेई अन हसून म्हणे, " अग किती घाबरतेस? आता काही दिवस हे असंच चालायचं."
" मग काही दिवस तू माझ्या अगदी जवळ रहा बरं सतत" ती हळूच म्हणायची. त्या दोघांच्या वागण्याकडे वडिलधारी मंडळी जरा दुर्लक्षच करत पण सहान मुलं बघून खुखु खिखि करत.
हळूहळू सगळेच चिंब भिजले. आता गार वाराही जोरात सुटला. सगळेच आता गारठू लागले. आणि एक एक करत सगळे गुहेच्या आत आले. मोठ्या बाबांनी शेकोटीत अजून लाकडं घातली, जाळ मोठा केला. सगळे त्या शेकोटी भोवती उब घेत बसून राहिले.

सीतेला माहिती होतं. आता हा पाऊस असाच खूप दिवस पडत राहील. ती लहान होती तेव्हापासून हा पाऊस तिला खूप आवडत असे. त्याहून जास्त आवडे, ते पाऊस आल्यानंतर आजुबाजूचे सगळे जंगल कसे नवे, ताजे, हिरवेगार होई, ते!  पावसाचे आणि या जंगलाच्या हिरवेपणाचे नाते तिने कधीचेच ओळखले होते. राम भेटल्यापासून तिला, तिचे आणि रामचे नातेही असेच काहीसे वाटायचे.
हा, त्या दोघांचा एकत्र असा दुसरा पाऊस! या आधीचा पाऊस झाला तेव्हा सीता नुकती रामच्या गुहेत रहायला आलेली. पण तेव्हा ती मनातल्या दु:खात इतकी बुडालेली की तो पाऊस तिला फारसा कळलाच नव्हता. आईबाबांना सोडून पहिल्यांदाच इतकी दूर आलेली ती. नवीन लोकं, नवीन गुहा, नवीन जंगल... ती खूप बावरली होती, गोंधळली होती. पण मग तिला हे सगळं ओळखीचं होत गेलं. रामच्या साथीत याही जंगलाचे हिरवे होणे ती अनुभवत गेली. पावसासारखाच राम तिचा सखा होत गेला.

खूप दिवस पाऊस सतत पडत राहिला. हळूहळू जमीन, माती-पाणी यांनी नरम, मऊ, उपजाऊ झाली. गेले काही दिवस सीतेने एक वेगळाच खेळ शोधून काढलेला. गुहेच्या एका बाजुला ती गोळा केलेल्या फळांच्या इवल्या इवल्या बिया मऊ झालेल्या मातीत ठेऊ लागली. कधी गोल आकारात, कधी एका एका रेषेत. कधी डोंगराच्या आकारात तर कधी झाडांच्या फांद्यासारख्या. मऊ मातीत काही वेळाने या बिया हळूच आत जात, नाहीशा होत.  असं करत तिने जमवलेल्या सगळ्या बिया त्या मऊ मातीत झोपून गेल्या, लपून गेल्या...

अन मग एके दिवशी सुर्याचे सोनेरी ऊन जंगलावरती पसरले. गुहे बाहेरचा पाऊस थांबला होता. सगळे आनंदाने बाहेर आले.  सीताही बाहेर आली. आणि चकितच झाली. तिने जिथे जिथे फळांच्या बिया ठेवल्या होत्या, तिथे काही काही छोटी छोटी पाने जमिनीतून वर डोकं करत होती. तिने उत्सुकतेने त्यातल्या एकाला हात लावला. तशी ती पानं हळूच तिच्या हातात आली. माती अजूनही खूप ओली, मऊ होती. त्यातून ही पानं सहज मातीतून सुटून तिच्या हातात आली. तिने नीट पाहिले. तर पानांच्या खाली तिला फळांची बी दिसली. हो हो, तीच बी, जी तिने गोळा केलेली, मऊ मातीत ठेवलेली. अन मातीत लपून गेलेली बी! पण त्या बी मधून ही पानं कशी बाहेर आली? तिला काहीच कळेना. तिने अजून 2-3 पानं काढून बघितली. एकाखाली होती तशीच बी. तर काहींच्या खाली नव्हती. तेव्हढ्यात तिला रामने हाक मारली. खाली नदीकडे चल म्हणून. सीता मग सगळे विसरली. आणि दोघे नदीकडे निघाले.

इतक्यात नदी किती मोठी झालेली! पाणी लालकाळे दिसत होते. नदी नुसती धो धो धावत होती. आता त्या नदीत उतरायची सीतेला भीती वाटली. ती परत फिरली. तिला काही गोष्टी आता अगदी नको वाटायला लागलेल्या. मोठे आवाज नकोत, फार माणसं नकोत, गुहेच्या एका कोपऱ्यात बसून रहायची.

अजून असेच काही दिवस गेले. सीता खूप दिवसांनी गुहे बाहेर आली. तिचे लक्ष गेले तर तिने ठेवलेल्या बियांमधून आलेली छोटी छोटी पानं आता दिसत नव्हती. ती थोडी पुढे झाली तर तिथे मात्र दोन छोटी झुडुपं  उभी होती अजूनही. तिला फार आवडली ती झुडुपं. आता सीता त्या झुडुपांपाशीच बराच वेळ असे. तसंही तिला आता फार हालचाल झेपत नव्हती. ती मग गुहेत नाहीतर त्या झुडुपांपाशीच बसायची. तिच्या हळूहळू दोन गोष्टी लक्षात आल्या. एक तर ही दोन छोटी झुडुपं अगदी नदीकाठच्या मोठ्या झाडांसारखी होती. त्यांची पानं, त्यांचा रंग, वास सगळं त्या झाडांसारखं होतं. आणि दुसरं, तिच्या पोटात मधेच काहीतरी जोरात हलत असे.

असेच अजून काही दिवस गेले... आता पाऊस अगदीच थांबलेला. सारे जंगल हिरवेगार झालेले. नेहमीप्रमाणे बायका, पुरुष धान्य गोळा करायला, शिकार करायला बाहेर पडली. सीतेला मात्र आता हे अगदीच जमेना. तिच्या पोटाचा घेरही खूप वाढलेला. खाली वाकताना त्रास होई. मोठ्या बायका आता तिची जास्त काळजी घेत होत्या. जास्त बाहेर जाऊ देत नव्हत्या. सीतेलाही गुहेबाहेरच्या त्या दोन झाडांजवळच बसावसं वाटे. आता ती दोन्ही झाडं चांगलीच मोठी झाली होती.

अजून काही दिवस असेच गेले. हवेतला गारठा आता खूपच वाढला होता. सीता आता अजूनच थकली होती. जेमतेम गुहेबाहेर येऊन बसे. ती दोन झाडं आता अगदी नदी जवळच्या झाडांसारखी दिसू लागली होती. सीता मनात म्हणाली " ही त्यांच्याहून लहान पण थेट त्यांच्यासारखीच. जणूकाही त्यांची बाळंच! ..." अन अचानक सीतेच्या मनात काही चमकलं. अन तेव्हाच तिच्या पोटातही जोरात काही हललं. ती जोरात ओरडली. पुन्हा पोटात एक कळ उमटली. ती पुन्हा कळवळली. तशी मोठ्या बायका धावत आल्या. त्यांनी तिला आधार देत गुहेत आणलं.

" आई, रामच्या आई,..." सीता कळवळत म्हणाली
" हो ग, हो पोरी कळतय मला. खुप दुखतय ना? थोडं सहन कर. " रामच्या आई तिला थोपटत म्हणाल्या.
" आई,  ती बाहेरची दोन झाडं.... आईग...."
" हा, हा, दमानं जरा. बोलू नको आता काही"
" आई, अहो ती नदी जवळच्या... झाडांची... आईग.... बाळं आहेत..."
" हो हो, बाळच होतय तुला. दम धर. थोडी कळ सोस, बोलू नको बाळा आता काही..."
" आई... आईग... अहो माझ्या बाळाबद्दल नाही, झाडाची बाळं.... आईग..."

अन मग अजून कितीतरी वेळा तिने कळा दिल्या... अन मग एका मोठ्या आई...ग... बरोबर एक नाजूक, छोटासा टॅह्यॉ एेकू आला. अन मग थोड्या वेळाने पुन्हा एका मोठ्या आई...ग बरोबर अजून एक टॅह्यॉ ...
" अगबाई दोन दोन झाडांचं काहीतरी बोलत होती न सीता? बघा दोन बाळं जन्माला आली" रामची आई आनंदाने बोलली. सीतामात्र अगदी थकून गेली होती. पण ती जास्त थकली होती यासाठी, कि जे ती सांगत होती, ते समजलच नव्हतं अजून कोणाला...

झाडांनापण बाळं होतात आणि ती आपण लावू शकतो हे सीतेला मात्र अगदी स्पष्ट कळलं होतं!

हिच ती शेतीची सुरुवीत होती! एका सृजनातून दुसरे सृजन समजले होते सीतेला. अन पुढे समजणार होते साऱ्या मानवजातीला! सृजन, मानवाला मिळालेले एक वरदान!

( अधिक माहिती : ही कथा असली तरी त्यामागची परिस्थिती खरी आहे. इतिहासात पुरावे असं सांगतात की शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. अर्थातच तत्कालिन भाषा कशी असेल, संवाद कसे असतील , इतर तपशील यांबाबत तार्किक अंदाजच बांधला आहे.  नावंही अर्थातच काल्पनिक पण परंपरेशी नाळ जोडणारी.)

___

" अश्म युग : सामान्य माहिती  "

अश्मयुग ! अश्म म्हणजे दगड ! म्हणजे दगडांचे युग ? नक्की काय असावं  अश्मयुग म्हणजे ? अगदी  प्रथम ( स्टोन एज ) हा शब्द वापरला गेला तो दॅनिश स्कॉलर ख्रिस्टिन जे. थॉम्सन यांनी, एकोणिसाव्या शतकात.  त्यांनी अगदी सुरुवातीच्या मानवी इतिहासाचे तीन प्रमुख टप्पे मांडले. अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग ( स्टोन एज, ब्रान्झ एज आणि आयर्न एज ) प्रामुख्याने विशिष्ठ काळात मानवाची हत्यारे ज्या वस्तूंपासून तयार झालेली सापडली; त्यांचे नाव त्या काळाल त्यांनी दिले.  ज्या काळात प्रामुख्याने दगडाचा वापर करून हत्यारे बनवली गेली त्या काळाला त्यांनी अश्मयुग हे नाव दिले.

दगडी हत्यारे कोठे कधी वापरली गेली हे ठरणार असल्याने त्यानुसार प्रत्येक प्रदेशात हा काळ बदलतो. पण सर्वसाधारणपणे पणे सुमारे अडिच मिलियन वर्षापूर्वीपासून आफ्रिकेमध्ये अश्मयुगीन मानव रहात होता. तर काही प्रदेशात इ. स. पूर्व  ३०००  वर्षामध्येही अश्मयुगीन मानवाचे अस्तित्व सापडते. प्रामुख्याने दगडी हत्यारे  वापरणारा मानव म्हनजे अश्मयुगीन मानव !

त्यातूनही अश्मयुग म्हणजे फक्त दगडी हत्यारे असे नव्हे तर नैसर्गिक साधनांचा हत्यारासाठी उपयोग करणारा मानव यात अपेक्षित आहे. दगड, लाकूड, प्राण्यांची हाडं - दात यांपासून हत्यारे तयार करणारा मानव म्हणजे अश्मयुगीन मानव !

अश्मयुगाचा काळ खूप मोठा आहे, त्यामुळे त्याचे काही  टप्पेही मानले जातात.  पॅलिओलिथिक एज किंवा जुने अश्मयुग, मेसोलिथिक किंवा मध्य अश्मयुग आणि निओलिथिक म्हणजे नव अश्मयुग ! या काळात अतिशय कमी लोकसंख्या, तीही अतिशय विखुरलेली अशी होती. या काळातील मानव हा प्रामुख्याने हंटर अँड गॅदरर म्हण्जे शिकारी आणि निसर्गातील फळ फळावल, धान्य  जमवून आपली उपजिवीका जगत होता.

शिकार केलेल्या प्राण्याचा अन्न आणि हत्यारं, वस्त्र यासाठी वापर केला जाई. मांस खाण्यासाठी, कातडी वस्त्र म्हणून तर हाडं-दात यांचा वापर हत्यारांमध्ये केला जाई.
जंगलातील जंगली बेरी- छोटी फळं, जंगलात उगवणारे जंगली पण खाण्या योग्य धान्य आणि फळं हेही त्याच्या आहारात होते.
प्राणी आणि ही जंगलसंपत्ती स्वाभाविकच एका ठिकाणची खाऊन संपत असे, त्यामुळे हा मानव सतत स्थलांतर करत राही. शिवाय या काळात वातावरणातही सतत बदल होत असल्याने हा मानव एका ठिकाणी वस्ती करून फार काळ रहात नसे.

जुने अश्मयुग साधारण अडिच मिलियन वर्षांपासून पहिल्या हिमयुगापर्यंत म्हणजे इ. स. पू ९६०० पर्यंतचे मानले जाते. हत्यारांबरोबरच दागिने, गुहेतील भित्ती चित्र यांतून या काळातील मानवाची थोडी माहिती मिळते.
मध्य अश्मयुग हे इ.स. पू. ९६००  पासून मानवाने शेती करायला सुरुवात करे पर्यंतचा काळ म्हणजे साधारण इ. स. पू  ७००० ते इ.स.पू. ४००० हा मानला जातो. याकाळात पृथ्वीवरचे वातावरण प्रचंड थंड ऐवजी हळूहळु गरम होत गेले. उत्तर धृवावरचा बर्फ वितळू लागला. स्वाभाविकच समुद्राची पातळी वर आली. त्यातून भूभागातही बरेच बदल झाले. साधारण इ. स. पू. ५००० पर्यंत आज जसा भूभाग आहे, खंड आहेत तशी विभागणी तयार झाली.
नव अश्मयुग हे मानवाने शेती करणे सुरू केले तेव्हापासून  ते तांब्याचा वापर सुरू केला इथपर्यंत मानले जाते.

___

स्थिर समाज आणि टोळ्यांचे राज्य 


शेतीचा शोध लागला आणि मानवाचे जीवन पालटूनच गेले. जिथे सपाट जमीन आहे, मऊ माती आहे आणि आसपास पाणी आहे आशा ठिकाणी शेती करता येते हे एव्हाना मानवाला कळले होते. त्याच मुळे आता डोंगरावरच्या  गुहेत न राहाता तो डोंगराखालच्या माळरानावर आला. जमीन सपाट करणे, ती उकरून मोकळी करणे, त्यात बिया टाकणे, पाऊस आला तर ठीकच नाहीतर नदीतून पाणी आणून घालणे, रोपांची काळजी घेणे, तयार कणसं तोडून ती नीट जपून ठेवणं यात मानवाचे वर्ष सरू लागले.


गुहेत असताना त्याला एक नैसर्गिक संरक्षण होते. गुहेची जागा पावसा उनापासून मानवाला वाचवत होती. इतकेच नव्हे तर वेळप्रसंगी हिंस्त्र प्राण्यापासून बचाव करायलाही ही गुहा उपयोगी पडत होती. गुहेच्या तोंडावर दगड सरकवला की  आतले सगळे सुरक्षित रहात. आता माळरानावर आल्यावर मात्र सुरक्षितता हा एक मोठाच प्रश्न उभा राहिला. ऊन पाऊस आणि हिंस्त्र प्राणी या तीनही गोष्टींपासून वाचायच होतं. 

यावरही मानवाने आपल्या बुद्धीचातुर्‍याने मात केली. जमिनीत खळगा करून जमिनीच्या खाली गुहा केली. त्यावरून गवत पसरलं. पण पावसात आजूबाजूचे पाणी आत वाहून येऊ लागलं. तशी मग त्याने खळग्याच्या भोवती दगड रचले, फटींमध्ये ओली माती भरली. वरून गवत टाकले. आता जमिनी खालची गुहा सुरक्षित झाली. हळूहळू त्याच्या लक्षात आले की अरेच्या खळगा कराची गरज नाही आपण दगड एकावर एक ठेवत उंच भिंत केली अन मातीने ती घट्ट केली अन वरून गवत टाकले की छान जमिनीवरची गुहा तयार होते. आशा रीतीने घराची निर्मिती झाली . काळानुरूप, त्या त्या जागेत उपलब्ध असणा-या वस्तूंनुरूप घरांची बांधणी बदलत गेली. आधी दगडांची मग त्या सह मातीची. पुढे  नुसती मातीची. कधी मातीसोबत गवत वापरले जाई. कधी जावळया. कधी झाडांच्या फांद्या, खोड... 

जमिनीवरच्या वास्तव्यात अजून एक मोठी भीती होती ती हिंस्त्र प्राण्यांची.  मानवाला अग्नी कसा वापरायचा आणि तो कसा तयार करायचा याची माहिती एव्हाना माहिती झाली होती. इतकेच नव्हे तर प्राणी या अग्नीला घाबरतात हेही माहिती झाले होते. याचाच उपयोग करून रात्री वसतीमध्ये अग्नी प्रजवलीत ठेवायची प्रथा सुरू झाली. शिवाय अग्नी सत्ता जागता ठेवला की तो पटकन हाताशी असणार होता. त्यामुळे अग्नी निर्माण करण्याचा खटाटोपही वाचणार होता. यातूनच वस्ती मध्ये एक तरी अग्नी सत्ता प्रज्वलित ठेवला जाऊ लागला. 

या बरोबरीने प्राण्यांना अटकाव व्हावा यासाठी वस्तीच्या सभोवताली काटेरी झाडांचे कुंपणही मानव घालू लागला. 

आशा रीतीने मानवाने शेती हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक मानून घेतला. शेती भोवतीच मानवी समाज विकसित होत गेली. 

अनेक ठिकाणी  हे घडत होते. जसा जशी स्थिरता येत गेली तसतशी मानवी वसाहत मोठी होत गेली. मग आपआपल्या वस्तीची कुंपणं वाढवली गेली. मानवांचा मोठा समूह तयार होत गेली. त्यांच्यातल्या शहाण्या सुरत्या / वयाने अनुभवी व्यक्ती यांच्या मताने त्या त्या समूहात कामकाज चाले. एक सुनियंत्रित अशी समाज रचना असणारी एक टोळी तयार होत असे. 

कधी कधी एखाद्या ठिकाणचे पाणी संपले किंवा तिथे प्राण्यांचा जास्त उपद्रव सुरू झाला तर ती टोळी  उठून वेगळी जागा शोधत असे. अशात एखाद्या ठिकाणी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या टोळ्या  येत. त्यांतल्या कोणी आपली वसाहत बांधायाची यावरून वाद होऊ लागले. कधी ते सामंजस्याने सोडवले गेले तर कधी कधी त्यांच्यात सरळ मारामारी होत असे. अन जी टोळी या मारामारीत  बलवान ठरे ती टोळी त्या ठिकाणावर आपला हक्क सांगत असे. यातून मग शस्त्र, लढण्याचे कौशल्य, लढाऊ योद्धे आणि सैन्य अशा संकल्पना पुढे आल्या. 

जसजसा टोळीतील लोकसंख्या वाढू लागली तसतशी कोणताही निर्णय घेणं अवघड होऊ लागलं. मग काही टोळ्यांमध्ये शहाण्यासुरत्या लोकांचे एक मंडळ तयार झालं, तर काही टोळ्यांमध्ये वयस्कर व्यक्तीच्या हाती सगळे निर्णय घेण्याचे अधिकार सोपवले गेले, तर काही टोळ्यांमध्ये ज्या व्यक्तीच्या अंगात जास्त ताकद होती त्याच्या हाती सगळे अधिकार आले. यातूनच हळूहळू राजकीय सत्ता ही संकल्पना तयार झाली. यातूनच राजा तयार झाला; राजेशाही सुरु झाली. 
अन मग या अशा वसाहती मोठ्या मोठ्या होत गेल्या. त्यांचे सैन्य उभे राहू लागले. स्वाभाविकच सुरक्षितता आली. अन मग ह्या वसाहती वाढत गेल्या, एका ठिकाणी स्थिरावत गेल्या. अनेक वर्ष एकाच ठिकाणी राहात असताना त्यांची म्हणून जीवन जगण्याची एक विशिष्ट पद्धती तयार झाली; म्हणजेच संस्कृती तयार झाली. 

जगात विविध ठिकाणी, प्रामुख्याने नाद्यांच्या काठावर, दोआबात, खोऱ्यात अशा अनेक संस्कृती आपल्याला दिसतात. याच त्या प्राचीन संस्कृती ! मेसोपोटेमियातील विविध संस्कृती,  इजिप्तची संस्कृती, सिंधु संस्कृती, चिनी संस्कृती,  माया संस्कृती, इंका संस्कृती, ॲझटेक संस्कृती, ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती या काही महत्वाच्या प्राचीन संस्कृती होत. 

___



काळ , समाज , कुटुंब - बदल 


काळाच्या एका टप्यावर निसर्गाने मानवामधे दोन मोठे बदल केले. आणि मानव इतर प्राण्यांहून वेगळा बनू लागला. एका बद्दल नेहमीच बोललं गेलं. दुसऱ्याचा मात्र अभावानेच उल्लेख झाला.

१. मानवाच्या मेंदूचा विकास झाला, त्याचे आकारमान वाढले. पर्यायाने त्याची बुद्धिमत्ता वाढली.

आणि

२. स्त्रीच्या प्रजनन काळाची सिमितता संपली. म्हणजेच विशिष्ठ काळातच तिची प्रजनन क्षमता असेल असे न रहाता ती कधीही प्रजनन करू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली.

या दोन्ही बदलांमुळे एका अर्थाने मानवी समुदाय, समाज निर्माण झाला असे म्हणावे लागेल.

बऱ्याच जणांना हे अतिरेकी, उगाच ताणलेलं विधान वाटू शकेल. परंतु बारकाईने विचार केला तर याची सत्यता पडताळून पहाता येऊ शकेल.

मानवी मेंदू विकसित झाला, स्वाभाविकच मानवाचे डोके मोठे झाले. परंतु हे असे मोठे डोके जन्मत: असणे अडचणीचे झाले असते. असे मोठे डोके घेऊन बाळ जन्मले असते तर आईच्या जिविताला धोका निर्माण झाला असता. स्वाभाविकच जन्मत: स्त्रीयोनीला झेपेल असाच बाळाच्या डोक्याचा आकार असेल अन जन्मानंतर काही काळ त्याची पूर्ण वाढ  होईल अशी योजना निसर्गत: झाली. याचा एक महत्वाचा परिणाम असा झाला की ही मेंदूची पूर्ण वाढ होई पर्यंत मानवी बाळाला संरक्षण, संगोपन अत्यावश्यक झाले. अगदी शब्दश:, स्वत:च्या पायावर उभं रहाण्यासाठी इतर प्राण्यांना जिथे 3-4 मिनिटं पुरतात तिथे मानवी बाळाला मात्र किमान 7-8 महिने लागतात. याचं कारण ही अपूर्ण वाढ हेच कारण! मग अशा अपूर्ण वाढ असलेल्या बाळाला पूर्ण वाढ होई पर्यंत आई, वेल प्रसंगी आजी, इतर सदस्य अत्यावश्यक झाले. का? तर एक बाळ वर्षाचं होतय तोवर त्याच्या आईला दुसरं बाळही होत असे. आणि मानवी बाळ तर किमान 4-5 वर्षा पर्यंत इतर प्राण्यांसारखं पळूही शकत नाही.

म्हणूनच मानवी मोठा मेंदू मानवाला बुद्धी तर देऊन गेलाच पण सोबत मानवी समुहाची, समाजाची देन ही देऊन गेला.

आता दुसरा मुद्दा! इतर प्राण्यांच्या मादीचा प्रजननकाळ सिमित असतो. त्याचमुळे मादी आणि नर यांचा शरीरसंबंधही विशिष्ट काळातच होतो. "मादी माजावर येणं" असा शूब्दप्रयोगही याच मुळे अस्तित्वात आहे. मानवी मादीबाबत मात्र निसर्गाने ही परिस्थिती बदलली. स्त्रीच्या प्रजनन क्षमतेला साधारण वयाची 16-45 ह्या कालावधीत स्त्री कधीही प्रजनन करू शकते, वर्षातला कोणताही काळ तिला ही क्षमता असेल अशी देणगी तिला मिळाली. स्वाभाविकच स्त्रीपुरुष शरीरसंबंध यांना निसर्गाचे फार कमी बंधन राहिले. आपापत: दोघांचे एकत्र असणे निसर्गाच्या बदलावर अवलंबून राहिले नाही.

एकीकडे अपूर्ण वाढ झालेले नाजूक बाळ अन स्त्रीपुरुषांचा सततचा संपर्क यातून मानवी समुदाय एकत्र होत गेला. त्यांचा एकसंध असा समाज बनत गेला.

सुरुवातीला प्रजनन ही प्रक्रिया प्रामुख्याने स्त्रीशी निगडित असल्याने आणि जन्मलेले बाळ आणि त्याची आई यांचे नाते जास्त स्पष्ट असल्याने एक स्त्री आणि तिची मुलं अशा स्वरुपाची समाजरचना तयार झाली. पुढे एक स्त्री, तिची मुलं, तिच्या मुलींची मुलं, त्यातील मुलींची मुलं असा समाज वाढत गेला. स्वाभाविकच मातृसत्ताक कुटुंबपद्धतीची ही सुरुवात होती.

या रचनेमधे प्रथम पुरुष एकाच कुटुंबात नसे. किंबहुना पुरुष त्यामानाने अजूनही भटका होता. एका गुहेतून दुसऱ्या गुहेत, एका जंगलातून दुसरे जंगल असा त्याचा वावर असे. स्त्रिया मात्र आपापल्या मातांच्या गुहेशी बांधल्या गेल्या.

या काळापर्यंत पुरुष आणि जन्मलेले बाळ यांचा अन्वयार्थ फार स्पष्ट नव्हता. त्यामुळे या काळात नातेसंबंधही स्पष्ट नव्हते. स्वाभाविकच नर आणि मादी हेच मुख्य नाते होते. मग एकाच कुटुंबातील स्त्रीपुरुषांचा शरीरसंबंध सहजी होत असे. अगदी मुलगी बाप, बहिण भाऊ, मुलगी काका असे संबंध अत्यंत सहज असत.

कालांतराने पुरुषाचा स्त्रीच्या प्रजननाशी असणारा संबंध जसजसा स्पष्ट होत गेला तसतशी पुरुष आणि बाळ यांच्यातला बाप अन मुल हे नाते उलगडत गेले. भाऊ आणि बहिण हेही नाते प्रस्थापित होत गेले. ही नाती जसजशी ठळक होत गेली तसतशी समाजरचना जास्त आखीवरेखीव होत गेली. याच काळात एक स्त्री आणि एक पुरुष अशी जोडी ठरत गेली. एकी अर्थाने लग्नसंस्थेची ही सुरुवात होती.

यानंतरचा टप्पा होता तो रक्ताच्या नात्यांमधे शरीरसंबंध टाळण्याचा. काही समाजात हे निषिद्ध मानलं गेलं तर काही ठिकाणी स्विकारलंही गेलं.

जिथे नाकारलं गेलं तिथे इतर समाजाशी हे नातं जोडलं गेलं.

हा जो संपूर्ण प्रवास आहे मानवी समाजाचा तो मानवाला रानटी जीवनापासून शेती समाजापर्यंत आणणारा.

या काळात सुरुवातीला शेती ही स्त्री करत होती तर जंगलातली शिकार, इतर कामं पुरुष करत होता. पण जसजसा हा समाज शेती करू लागला, तसतशी त्याची शिकारी अवस्था कमी होऊ लागली. शेतीतील नवनवीन शोध, पेरणी, नांगर यांचा शोध लागला, तशी जंगलाचे शिकारी जीवन मानवाने मागे टाकले. शिकारी सारखे अनिश्चित, प्रचंड ताकद आणि श्रमाचे काम करण्यापेक्षा त्यामानाने निश्चित फळ देणारे, दगदग कमी करणारे शेतीचे काम मानवाने अंगिकारले.

पुरुषही जेव्हा शेतीकडे वळले तेव्हा बाळांच्या वाढीकडे लक्ष वळवणे स्त्रीलाही सोपे गेले. हळुहळू शेती करणारी स्त्री बालसंगोपनाकडे वळली, तर शिकार करणारा पुरुष शेतीकडे वळला. एक जास्त स्थिर, नियमबद्ध समाजरचना उदयाला आली. कामांची विभागणी, मुलांचे संगोपन स्त्रीकडे आणि मुलांच्या वाढीसाठी खाद्य उत्पादनासाठी शेती पुरुषाकडे अशी होत गेली. आणि दोघांना मुलं वाढवण्यासाठी, एकमेकांची गरज असल्यामुळे या काळात खऱ्या अर्थाने लग्नसंस्था बळकट झाली असावी. अर्थात तरीही ही योजना 4-6 वर्षांसाठीच सुरुवातीला असावी.

कालांतराने शेतीसाठीची जमीन आणि तिची मालकी याबद्दल पुरुषांमधे संघर्ष सुरु झाला. जो जास्त ताकदवान, बळवान ( बळ=शारीरिक त्याचे आणि त्याच्या मुलांच्या संख्येचेही) त्याच्याकडे अधिक जमीन, अधिक कसदार, मुबलक पाणी असणारी जमीन अशी संरचना बनु लागली. एका अर्थाने टोळी प्रमुख आणि पुढे राजेशाहीची ही पाळंमुळं होती.

या काळापर्यंत बाळाचे जन्मदाते म्हणून स्त्री आणि पुरुष या दोघाची निश्चिती झाली होती. ही माझी मुले, हे माझे कुटुंब, ही माझी जमीन अशी मालकी हक्काची भावना वाढीस लागली होती. शेती हे जगण्याचे मुख्य साधन होते आणि त्यावर पुरुषाचे वर्चस्व वाढत गेले अन स्त्री कुटुंबाची निर्माती झाली. 

हळूहळू स्त्री अन पुरुषांची क्षेत्र बदलत गेली. कुटुंब, मुलांची वाढ, प्रजनन पद्धती, कुटुंबांतर्गत वावराचे संकेत हे सगळं स्त्रीकडे आलं. तर समाजाचे नियम, कायदे, शेती, तिथल्या पद्धती हे सगळं पुरुषांकडे आलं.

जेव्हा दोन समुदायांचे, समाजांचे संघर्ष झाले तेव्हा त्या त्या समाजातील पुरुषांचा लढवय्ये म्हणून महत्व अधोरेखित होत गेले. पुढे माझी शेती, माझी जमीन, माझी मुलं, तशीच माझी स्त्री अशी मनोरचना होत गेली.
प्राचिन काळात, राजेशाही काळात जमीन, अन्नधान्य, हत्यारं, मुलं ही जशी आपली मालकी, आपली संपत्ती तशीच स्त्री ही देखील आपली संपत्ती समजली जाऊ लागली. कुटुंबाचे सगळे अधिकार पुरुषांच्या हाती केंद्रित झाले. याच सुमारास लग्नसंस्था ही आयुष्यभराची योजना झाली असावी.

याचाच पुढचा भाग होता को म्हणजे जशी मी माझी जमीन वाढवू शकतो तशी माझी स्त्रियांची संख्याही वाढवू शकतो. मग जो जास्त बलवान तो अधिक स्त्रियांसोबत राहू लागला. आपले बळ वाढवायचे तर आपली अधिकाधिक मुलं असणे पुरुषाला उपयुक्त वाटू लागले. याच कालखंडात लग्नाला समाजमान्यता आणि राजमान्यता आवश्यक वाटू लागली.
मध्ययुगात तर परिस्थिती अजूनच बिकट झाली. परक्यांचे आक्रमण, त्यापासून माझे कुटुंब वाचवायचे तर त्याचे संरक्षण करायचे म्हणून त्यांना जास्त बंधनात टाकले गेले. आपली मुलं, स्त्री सुरक्षित रहायला हवी तर तिने घरातच, उंबरठ्याच्या आतच राहिले पाहिजे अशी काहीशी भूमिका स्वाकारली गेली. यातून स्त्री अधिकाधिक बांधली गेली, बंद दाराआड केली गेली. कुटुंब, त्यांची बांधणी जास्त कठोर झाली. जाती धर्म इतकच नव्हे तर गोत्र, गाव यांची बंधनं अतिशय काटेकोरपणे स्विकारली गेली.

असे असले तरी कौटुंबिक पातळीवर हा समाज खुप सक्षम होता. जीवन जगण्याच्या पद्धती खुप स्पष्ट होत्या. त्यावर आधारित सणसमारंभ, रिती पद्धती, रुढी यांची एक छान रचना तयार झाली होती. शिवाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान, अनुभव,  हस्तांतरण करण्याचीही एक पद्धत विकसित जाली होती अन ती पाळली जात होती. याचेही काही दोष, कमतरता होत्या ( जातिनिहाय/ कुटुंबनिहाय/ स्त्रि-पुरुष निहाय काम, ज्ञान वगैरे) पण त्या समाजरचनेत त्या कमतरता निभावल्या जात होत्या. 

प्रबोधन काळात इतर समाजांशी आलेला संपर्क, जीवन जगण्याच्या पद्धतीतला अमुलाग्र बदल यातून इथली समाजव्यवस्था बदलू लागली. हा बदल अगदी हळू होता, पण होता.

आता उपजिविकेची वेगळी साधने पुढे आली. कारकुनी, कारखान्यातील कामगार ही दोन नवीन क्षेत्र समोर आली.
यात
१. मालकी हक्क न येता काम आणि मोबदला होता.
२.जबाबदारी न येता मोबदला होता.
३. अधिकार न येता काम करणं होतं. या जीवनपद्धतीचा परिणाम येथील कुटुंब व्यवस्थेवर विविधांगांनी झाला.
(- क्रमश:)

___

"कोण कुठले? कोण आपण ?"

पृथ्वीवरील मानवी वसाहत आणि आपण

४५० कोटी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीची उत्पत्ती झाली. आणि साधारण ४२० कोटी वर्षांपूर्वी जीवसृष्टी निर्माण झाली.  
प्राणी जगताची सुरुवात साधारण  २५० कोटी वर्षांपुर्वी  झाली. आणि मानवाची निर्मिती साधारण तीस लाख वर्षांपूर्वी झाली.

असं असले तरी मानवाचा ज्ञात इतिहास मात्र जेमतेम पाचहजार वर्षातलाच !
का बरं असं  असावं ? तत्पूर्वीचा इतिहास काय असेल? त्याचे काही पुरावे आपल्याला सापडतात का? का बरं सापडत नाहीत ? पुरावे सापडत नाहीत म्हणजे  काही इतिहास नव्हताच? असे कसे बरं असेल? जरा पुन्हा एकदा मानवी उत्पत्ती आणि विकासाचा आढावा घेऊन बघुयात चला.

मानवाच्या निर्मिती यापासून पाहिले तर हा काळ तीन महत्वाच्या भागात विभागाला जातो. पाषाण युग (सुमारे पंचवीस लाख वर्षांपूर्वीपासून ) , कास्य युग (सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीपासून)आणि लोह युग ( सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीपासून) म्हणजे असे लक्षात येईल कि साधारण लोह युगापासून आपल्याला मानवाचा इतिहास माहिती आहे. त्या आधीचे कास्य युग त्यामानाने लहान होते. सुमारे साडेतीन हजार वर्षे. परंतु त्या आधीची  जवळ जवळ १८-२० लाख वर्षांचे काय ? तो इतिहास आज पूर्ण अज्ञात आहे.

आश्चर्य वाटावीतअसे काही जुने अवशेष सापडतात. उदा. गोबेकटी टेपे ( Gobekti Tepe ) तुर्कस्तान येथील संस्कृती , पेट्रा ( Petra ) जॉर्डन येतील संस्कृती ,  समुद्रात बुडालेल्या ग्रीक जहाजातील अनाकलनीय यंत्र, ईजिप्तमधील अनेक कोडी, वेरूळ लेणी, कुल्लर गुहा (द, भारत) या आणि अशा अनेक कोड्यांची  उत्तर आज आपल्याकडे नाहीत. 

मायावी समाजाची सुरुवात लाखो वर्षांपूर्वी झाली पण आपल्या हाती फारतर ५००० वर्षांपूर्वीचा इतिहास हातात आहे. अगदी फार तर ७००० वर्षांपूर्वीचा. मग त्या आधी लाखो वर्ष काय घडले? आपण समजतो अहो ती आणि तीच संस्कृती आहे, होती? कि या आधी काही संस्कृती होऊन गेल्या अन काळाच्या पडद्याआड त्या हरवून गेल्या? ११००० हजार वर्षांपूर्वी झालेल्या हिमयुगाने जुनी संस्कृती गिळंकृत केली? या आधीही अनेक हिमयुगीन येऊन गेली; त्यांनी किती माहिती आपल्या पोटात रिचविली ? अनेक समाजांमध्ये काही पुराणकथा सामान आढळतात; जसे कि महापूर आणि त्यातून वाचयासाठी बांधलेली महान नौका. किंवा अनेक धर्मीयांमध्ये काही सामान मान्यता आहेत. अनेक भाषांमध्ये काही सामानाता आहेत. या अशा अनेक उत्तरांचा शोध आज घेण्याचा प्रयत्न चालू आहे. 

आज  जगभर अनेक उत्खननं होत आहेत. अनेक ठिकाणी खूप मोठमोठी दगडी बांधकामं, कोरीव दगड सापडत आहेत. अनेक ठिकाणी पिरॅमिड सदृश भव्य इमारती सापडत आहेत. तसेच अनेक ठिकाणांच्या विविध कोरीवकामांमधून दिसणाऱ्या वस्तू फार नंतर अस्तित्वात आलेल्या दिसतात. उदा. सायकल, दुर्बिणी, विमानं, हेलिकॉप्टर्स, इ.  यांचे अर्थ लावणं अजून चालू आहे.

तसेच ज्या जुन्या इमारती, वस्तूंचा अर्थ लावला आहे त्याबाबतही काही नवे पुरावे पुढे येत आहेत. वेगवेगळ्या अभ्यासप्रणालींचा स्वीकार करून त्यांच्यामार्फत मिळणार-या माहितींचा साकल्याने विचार केला जातो आहे. खगोलशास्त्र ( Astronomy ), समुद्रशास्त्र (Oceanography), हवामानशास्त्र (Meteorology ), पुरपरीस्थितीचा अभ्यास करणारे शास्त्र ( ), भूविज्ञान  (geoscience), मानववंशशास्त्र ( genealogy), भाषिक मानववंशशास्त्र ( linguistic anthropology ),  या आणि अशा अनेक शास्त्रांमधून मिळणारी माहिती, त्यांचा एकमेकांशी असणारा संबध अभ्यासून त्यातून योग्य तो अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातून मिळणारी माहिती कधी जुन्या माहितीला बळकट करेल तर कधी जुनी गृहीतकं पूर्ण बदलावीही लागती. यासाठी मन, बुद्धी यांचा  मोकळेपणा स्वीकार करायला हवा. हजारो वर्षांचे आपले विचार, मतं एखाद वेळेस झुगारावी  लागतील. त्याची तयारी हवी. 

कधी काही उत्तरं मिळतात काही नाही. कधी त्यांचा मागोवा घेतला जातो. कधी आडकाठी केली जाते. आज गरज आहे ती स्वच्छ, खुल्या संशोधनपर नजरेची. आशा करूयात कि हि कोडी सोडवली जातील. यासर्वांबाबत एक स्वच्छ,  सकारात्मक,खुला दृष्टिकोन आज स्विकारण्याची गरज आहे. अर्थातच पुराव्यांनीशाच नवीन काही स्वीकारले जावे.
 
___

"असं होतं एक आटपाट जग  !"

 (आज जगांमध्ये एका छोट्याशा विषाणूने हाहाकार माजवला आहे. हिंदू धर्मात दशावताराची कल्पना मांडली आहे. प्रत्येक युगात एक एक अवतार जन्म घेतो अशी मान्यता. त्यानुरूप आता अपेक्षित असलेला अवतार हा  कली चा असणार आहे.  ! हा कली म्हणजे कोण, याबद्दल मात्र तपशील फारच कमी आहेत. सद्ध्याची  परिस्थिती अशी आहे कि कशावर विश्वास ठेवायचा, कशावर नाही याबद्दलच मनात संशय निर्माण झाला  आहे, मानवाच्या मनातील हा संशय हा तर कली नसेल? कि हा विषाणू म्हणजेच कली? प्रत्येकाच्या शरीरात घुसून पोखरणारा, मनात घुसून जगण्याचा आत्मविश्वास पोखरणारा ? खरं काय खोटं  काय त्या काळाच्या पोटातच सामावलंय. आज आपल्याला नाहीच कळू शकणार. म्हणून मग लेखकाचं स्वातंत्र्य घेऊन ही कथा रचली आहे। खरं खोटं काळच ठरवेल.  खऱ्या अर्थाने हा इतिहास ठरेल का हेही मला नाही माहिती. पण मनात आलं ती गोष्ट लिहिते ) 

एक आटपाट जग होतं. हो हो जग होतं. नगर नाही तर चक्क जग होतं. खुप मोठ्ठं होतं. त्याला इतिहासही मोठा होता. दहा हजार वर्षांचा. चकीत झालात ना ?
तर आज मी ही अशी वेगळीच गोष्ट सांगणार आहे, ऐकणार ना?

तर एक होतं आटपाट जग ! खुप मोठमोठी शहरं, खुप मोठमोठ्या इमारती, कितीतरी यंत्र, वाहनं, कितीतरी प्रगती केली होती त्या जगाने. त्यांच्या इमारती तर फार वेगळ्या, अतिशय भक्कम होत्या. कारण माहितीय का? त्या होत्या चक्क दगडांच्या, खरं तर खडकांच्या !

तुम्ही म्हणाल; हात्तीच्या ही तर आज गुहेत राहणा-या माणसाची गोष्ट सांगतेय.

नाही नाही, खरच; खुप प्रगती केलेल्या जगाचीच गोष्ट सांगतेय. पण त्यांच्या इमारती होत्या खडकांच्या. हे कसं शक्य आहे ना? तर ऐका हं !

त्या जगात अनेक वर्षांपूर्वी एका शात्रज्ञाने एक फार वेगळा शोध लावला. निसर्गातील विविध गोष्टींचा अभ्यास करताना त्याच्या मनात आलं की आपण दगडाचा अभ्यास का बरं करत नाही? वेगवेगळे धातू आपण शोधले, त्याचा वापर आपण करतो तर दगडाचा का नाही? आणि मग त्याने प्रयोगशाळेत खुप प्रयत्न केले आणि निसर्गात असतो तसाच दगड प्रयोगशाळेत त्याने तयार केला. त्या दगडाचा रंग जरा वेगळा, जरा लालसर होता. पण अतिशय मजबूत दगड त्याने निर्माण केला. महत्वाच हे की हा दगड विशिष्ट पद्धतीने वितळवता येत असे आणि त्याला विशिष्ठ पद्धतीने गार केला की तो हव्या त्या आकारात तयार होत असे.

या शोधामुळे झालं असं की जसं लोखंड वितळवून ते हव्या त्या साच्यात ओतून गार करून हवा तो आकार करता येतो; तशाच दगडाच्याही हव्या त्या वस्तू बनवता येऊ लागल्या. अन मग त्या काळात अनेक उत्तम उत्तम दगडी इमारती तयार झाल्या. अतिशय सुबक, सुंदर आणि अतिशय भक्कम ! शिवाय स्वतःचा लालसर छान रंगाच्या बरं का!

आता दगड कोरून शिल्प करण्याची गरजच नाही उरली. दगड वितळवायचा, हव्या त्या साच्यात ओतायचा. गार झाला की अप्रतिम सुंदर शिल्प तयार.

अशीच अनेक बाबतीत या जगाने प्रगती केली होती. त्या त्या प्रगतीची माहितीही त्याने लिहून ठेवली होती. असं सगळं छान चालू होतं. कधी कधी तिथल्या लोकांच्यामधे काही वाद होत असत. पण ते सोडवलेही जात. म्हणतात ना रामराज्य तसं अगदी आलबेल चाललेलं त्या जगात !

पण प्रत्येक गोष्टीत जसं काही संकट येतं तसच याही जगात झालं. नक्की कशामुळे कळलं नाही पण अचानक हवामान तापू लागलं. नदी नाले आटू लागले. जी जमीन अतिशय सुपीक होती ती कोरडी होऊ लागली. हळुहळू सगळीकडे वाळवंट तयार होऊ लागले. सगळे हवालदिल झाले. निसर्गाचा हा कोप का याचा शोध घेऊ लागले. पण काहीच कारण कळेना. तशात शास्त्रज्ञांनी शोध लावला की उत्तर आणि दक्षिण धृवांवरचे बर्फाचे डोंगर उष्णतेने वितळू लागले आहेत. आणि त्यामुळे समुद्राची पातळी उंचावते आहे.

जगामध्ये एकच भीतीची लाट उसळली. खुप जुन्या काळात त्यांच्या धार्मिक ग्रंथांमधे कधी काळी लिहून ठेवले होते की फार फार पूर्वी जगबुडी झाली होती. समुद्र उंचावला होता आणि सगळी शहरं, सगळ्या वसाहती त्यात बुडून गेल्या होत्या. पण आजवर ही एक गोष्ट म्हणुन तीही सांगोवांगी गोष्ट म्हणुन मजेत उडवून लावलेली सगळ्यांनी. पण आता हे भावी वास्तव म्हणुन समोर उभं राहिलं होतं. सगळी मानवी जमात धोक्यात आली होती. आजवर केलेली सगळी प्रगती पाण्यात वाहून जाणार होती.

पण आता हाती फार काळ नव्ह्ता. शक्य तितक्या उंच डोंगरावर जाण्याचा विचार सगळे करू लगले. त्यातून अनेक संघर्ष घडू लागले. सगळ्यांनाच उंच डोंगरावर जायच होतं. पण हे शक्य नव्हतं. शेवटी सगळ्या महत्वाच्या व्यक्तींनी एकत्र येऊन ठरवलं की यावर काही उपाय केला पाहिजे, काही निर्णय घेतला पाहिजे. मग त्यांनी ठरवलं की आपल्या प्रगतीचे महत्वाचे टप्पे लिहून, काही अती महत्वाच्या गोष्टी घेऊन, काही लोकं जगातील सर्वात उंच पर्वतावर जातील. बाकी सर्वांनी आपल्या जवळच्या उंच डोंगरावर आसरा घ्यायचा.

शेवटी काहीच लोकं जिवंत रहाणार हे आता सर्वांना पटले होते. किमान तितपत शहाणपण, सामंजस्य त्या जगात अस्तित्वात होते. आणि मग म्हणूनच सर्व प्रगतीचे तपशील, महत्वाची यंत्र, काही हुषार माणसं आणि काही शहाणी माणसं, काही बलवान माणसं या ऊंच पर्वतावर जायला निघाले. यांमध्ये स्त्रिया, पुरुष, काही तरुण मुलंमुली यांचा समावेश होता.

बर्फ आता फारच भराभर वितळत होता. आधी समुद्रकिनार्‍यावरच्या शहरांचा त्याने घास घेतला. हळू हळू करत सर्वच सपाट प्रदेशात समुद्राच पाणी पसरलं. अन मग एक दिवस आकाश झाकाळून गेलं. वातावरणात एक भयाण शांतता आली. श्वासही घेता येणार नाही इतकी हवा विरळ झाली. अन जेमतेम काही तासातच पाण्याची एक प्रचंड राक्षसी लाट जमिनीवर धाऊन आली. सपाट जमीन, उंचवटे, छोटे छोटे डोंगर, मोठे डोंगर, अगदी उंच पर्वतही या लाटेने गिळंकृत केले. जगातला सर्वात मोठा पर्वत; जिथे महान लोक आश्रय घेऊन होते तिथेही या लाटेने तडाखा दिला.

जगाचा महाप्रलय ! संपूर्ण जग या प्रलयात पाण्याखाली बुडालं. आणि मग आली ठंडीची एक महाभयंकर मोठी लाट! अन मग अनेक वर्ष जगभर बर्फाचे राज्य सुरुच राहिले.

काय झालं त्या जगाचं? तिथल्या माणसांचं? तिथल्या प्रगतीच??????

अनेक प्रश्न प्रश्न प्रश्न !!!

उत्तरं कशाचीच नाहीत. मी म्हटलं ना सुरुवातीला; वेगळीच गोष्ट सांगणार आहे म्हणून !
कधी कधी या हरवलेल्या जगाचे काही पुरावे सापडतात कुठे कुठे. कधी एखाद्या टेकाडावर मोठमोठ्या दगडांची भल्या मोठ्या शिळा सापडतात; त्यावर अनाकलनीय  प्राण्यांची  शिल्प कोरलेली सापडता, कधी रेताड वाळवंटातील मोठ्या पिवळ्या खंदाकातील अनाकलनीय इमारती, कोरीव काम सापडतं. कधी एखाद्या उंच पर्वतावर एखाद्या प्रार्थना स्थळात काही अगम्य लिपीतली भुर्जपत्रे सापडतात. कधी एखाद्या उंच वाळवंटी पर्वतावरच्या गुहेतली पत्र, वस्तु. कधी एखाद्या पर्वतावरची अनाकलनीय बांधकामं. प्रचंड मोठी दगडी बांधकामं. जमिनी खालच्या नऊ स्तरावरच्या गुहा. एकाच खडकात उलटे कोरलेले प्रार्थनास्थळ. तर कधी खोल समुद्रात मोठमोठ्या दगडी इमारती ....

कितीतरी मोठी यादी आहे, न संपणारी. पण त्याचा अर्थ लावणं हे मात्र हातात नाही, काही पुरावे नाही, काही क्लुज नाहीत! काही नाही...

ना कोणी राजपुत्र आला संकटावर मात करायला. ना उत्तरं सांगायला कोणी ऋषी आले. ना जादुची कांडी फिरली. ना झोपलेल्या राजकन्येला कोणी उठवायला आलं. काहीच घडलं नाही या आटपाटच्या जगात. 

पण म्हटलं नं, वेगळीच गोष्ट सांगणार आहे आज...

तर असं होतं एक आटपाट जग, होतं का ? कि आपला माझ्याच कल्पनाविलास? काय की ! पण वर दिलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा होत नाही हे मात्र खरं !

---


प्राचीन कालखंड - 1


मानवी इतिहासातील हा सर्वात मोठा कालखंड आणि अतिशय कमी माहिती, पुरावे सापडणारा हा कालखंड ! असं मानलं जातं कि पहिल्या मानवाची नोंद दोन लाख वर्षांपूर्वीची सापडते. यातही विवाद आहेतच. काहींच्या मते  साठ लाख वर्षांपूर्वीपासून मानव पृथ्वीवर आहे. 

या संपूर्ण काळाबद्दल अनेक विवाद आहेत, अनेक मतंमतांतरे आहेत. कालनिश्चिती करता येत नसल्याने ही सर्व मते आपण मोकळेपणाने स्वीकारायला तयार असलं पाहिजे. जस जसे पुरावे समोर येत जातील त्यानुरूप स्वीकार करावा लागेल. परंतु आज तसं होताना दिसत नाही. काही सिद्धांत मानून त्यावर ठाम राहण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे अनेक कोड्यांची उत्तरं शोधणं अवघड होऊन बसते. म्हणूनच या कालखंडाबद्दल दोन वेगवेगळ्या भूमिकांमधून लिहिणार आहे. या भागात सध्या मान्य असलेल्या इतिहासाबद्दल लिहेन. 

तर मानवाची पहिली नोंद आपल्याला दोन लाख ( २,००,००० म्हणजेच इंग्रजीत Two hundred thousand ) वर्षांपूर्वीची सापडते. आफ्रिकेमध्ये हा पहिला मानव आपल्याला सापडतो. त्यानंतरची मोठी नोंद आहे ती ७०,००० ( सत्तर हजार ) वर्षांपूर्वी मानव आफ्रिकेतून बाहेर पडला हि आहे. आफ्रिकेतून बाहेर पडून पूर्वेला त्याने जायला सुरुवात केली. पुढची महत्वाची नोंद आहे ती साधारण १७००० (सतरा हजार) वर्षांपूर्वी पहिल्या वसाहती बांधल्या गेल्या. आणि त्यानंतर साधारण अकरा हजार वर्षांपूर्वी मानवाला शेतीचा शोध लागला अन इथून पुढे तो एका ठिकाणी वस्ती करून राहू लागला अन संस्कृतीची सुरुवात झाली. १०,००० (दहा हजार ) वर्षांपूर्वीची पहिली शहरं आपल्याला सापडतात. 

ही जी पहिली संस्कृती मानली जाते ती मेसोपोटेमिया या प्रदेशातली.म्हणजे आज जेथे  इराक, सीरिया आणि तुर्कस्थान हे देश आहेत तेथील प्राचीन संस्कृती.  प्रामुख्याने तैग्रिस आणि युफ्रिटीस  या दोन नद्यांमधल्या मधल्या सुपीक प्रदेशात अनेक संस्कृती निर्माण  झाल्या.



या प्रदेशाच्या आकारावरून याला सुपीक चंद्रकोर असंही म्हटलं जातं. तैग्रिस आणि युफ्रिटीस  या नद्यांच्या सुपीक जमिनीत अनेक संस्कृती निर्माण झाल्या, वाढल्या. सुमेरियन, अक्केडियन , बॅबिलोनियन, असिरियन, खाल्डियन अशा अनेकांनी आपली राज्य उभी केली. या सर्वांना मिळून मेसोपोटेमिया संस्कृती म्हटलं जातं.  
 पुढील भागांत या विविध संस्कृतींची माहिती घेउ. 
______

मेसोपोटेमियन संस्कृती 

नेटवरून साभार 

जगातील सृजनशील चंद्रकोर म्हणून ओळखला जातो तो भूभाग म्हणजे मेसोपोटेमिया! मेसोपोटेमिया चा मुळात अर्थच दोन नद्यांमधील भाग असा आहे. 

टायग्रिस आणि  युफरीतीस या नद्यांच्या  दोआबात वसलेली संस्कृती म्हणजे मेसोपोटोमिया संस्कृती. आजच्या कुवेत, इराक आणि सीरिया या देशामच्या भूमीवर हि संस्कृती सुमारे ५००० वर्षांपूर्वी  उदयाला अली अन समृद्ध झाली. बारा  हजार वर्षांपूर्वी पासून या भूभागात मानवाने वसाहत  केलेली आढळते. या दोन नद्यांचे  मुबलक पाणी आणि तेथील सुपीक जमिनी मुळे या ठिकाणी मानवी वसाहत स्थिरावत गेली. 

या नद्यांच्या  किनारी, या नद्यांच्या  लहान लहान प्रवाहांच्या काठावर या टोळ्या राहू लागल्या. अस्मयुगीन माणूस शेतीचा शोध लागल्यावर कसा नद्यांच्या  जवळ वसाहत करू लागला हे आपण मागे बघितलेच आहे. 

अनेक टोळ्या या भूभागात वसाहत करून राहू लागल्या. या टोळ्यांमधूनच ६  हजार वर्षांपूर्वी याती ल काही शहरे विकसित होत गेली.  इ स पूर्व  चार  ते साडेतीन हजार च्या सुमारास उर, उरुक , बॅबिलिन, अक्कड असुर अशी काही गावे मोठी झाली. सत्तेसाठी स्पर्धा असणारी ही  शहरे होती. एका काळात अक्केडियनांनी यांवर  वर्चस्व मिळवलं, तर काही काळानंतर  अक्केरीयन आणि बॅबिलोनियन अशी दोन साम्राज्ये निर्माण   झाली.  युद्ध- स्पर्धा चालू  असूनही या राज्यामध्ये प्रगतीही झाली. अनेक मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्या. राजवाडे,  मंदिरे याला ते झिगुरात  म्हणत, देवाशी संवाद साधण्यासाठी हि झिगुरात  असत. 

मानव जसजसा एका ठिकाणी शिरावर गेली, त्याची शेती विकसित झाली. तस तसा त्याच्या जगण्यासाठीचा लढा कमी होत गेला. अन्नधान्य मिळवण्यासाठीची त्याची रोजची धावपळ आता कमी झाली. शेती करून वर्षभराचे  अन्नधान्य साठवणे आता त्याला जमू लागले. स्वाभाविकच थोडे स्थैर्य  आणि  मोकळा वेळ त्याला उपलब्ध झाला. याचाच उपयोग त्याने अनेक नवीन गोष्टींचा  अभ्यास करण्यासाठी वापरला. त्यातून अनेक शोध, माहिती, ज्ञान त्याने प्राप्त केले.

यातूनच या संस्कृतीने  अनेक बाबतीत प्रगती केली. गणित, खगोल, काळ, वर्ष यांची विभागणी. यातील अगदी महत्वाची प्रगती होती ती म्हणजे लेखन पद्धतीची. आपली माहिती संग्रहित  करून ठेवणे या संस्कृतीला जमले. त्याच मुळे  आपल्याला या संस्कृतीची तपशीलवार माहिती मिळते. इ स पु ३२०० सुमारास उदयाला आलेल्या या लेखन पद्धती ला क्युनिफार्म असे संबोधले जाते. ओल्या मातीच्या पाटी वरती लाकडी त्रिकोणी आकाराच्या काडीने हि लिहिली जाई.  बाबिलोनियातील राजा हम्मुराबी याचे राज्यशासनाची  कायदेसंहिता हि या लिपीत लिहिलेली सर्वात जुनी अन महत्वाची कायदेसंहिता  .

या संस्कृतीचे आणखीन   एक वैशिष्ट्य म्हणजे यांनी  बांधलेल्या कमानी  कमानी आणि घुमट .  शिवाय  या शहरां च्या वेशी मोठ्या तटबंदीने सुरक्षित असत. 

राजवाड्यांमधील  भिंतीवरच्या  तत्कालीन महत्वाच्या घटनांची चित्र काढली जात. 

कालांतराने असिरीया शहराने आपले सामर्थ्य वाढवले. 

 या राज्याचे वैभव, श्रीमंती इतकी होती कि अनेक आक्रमकांना त्याचे आकर्षण होते. यातूनच इ स पाय ५४० च्या सुमारास पर्शियन राजाने मेसोपोटेमियावर आक्रमण केले आणि जिंकले . आणि अनेक वर्ष या परकीयांचे वर्चस्व मेसोपोटेमियावर राहिले.  

कालांतराने हि  संस्कृती नामशेष झाली. आणि इराकच्या वाळवंटाच्या वाळूत हि संस्कृती हरवून गेली. परंतु त्यांनी  दिलेली लिपी, कायदे, खगोल, गणित यातील प्रगती हि सर्व संस्कृतीची वैशिष्ट्ये हि  त्यांची  मानवी समाजाला मिळालेली देन  आहे. 

अशा रीतीने  पूर्वीचा रानटी- हंटर गंदरार- माणूस केवळ शेतकरी  झाला असे नाही तर त्याच बरोबर अनेक कौशल्य करणारा हि बनला. शेतकरी,  बांधकाम करणारा, कारागीर, सुतार, चित्रकार, शिल्पकार,  पुजारी, शिक्षक,  राजा, युद्ध करणारा सैनिक आणि लेखन कला असणारा लेखकही. 

------

"दडलंय काय, या टोपी खाली ? "


( डिस्क्लेमर : लेखातील सर्व छायाचित्रे नेटवरून साभार )


अंतराळातून पृथ्वीकडे पहाताना काही गोष्टी ठळकपणे  दिसतात. त्यातल्याच या तीन टोप्या ! असं म्हणतात की पृथ्वीच्या मध्यभागावर या तीन त्रिकोणी टोप्या आहेत. अजून नाहीओळखलंत ? वाळवंटात तीन त्रिकोणी टोप्या. बरोब्बर. आता बरोब्बर ओळखलंत.. इजिप्त मधले पिरॅमिड! जगातल्या आश्चर्यांमधील एक ! जणूकाही पृथ्वीने आपल्या डोक्यावर टोप्या ठेवल्यात अशीच दिसतात ती पिरॅमिड !




आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण शिकलो की, इजिप्त मधील राजांच्या या दफनभूमी आहेत. इजिप्तमधे राजाच्या मृत शरीरावर काही शस्त्रक्रिया करून, नंतर  त्यावर विविध रसायने लावून त्यांचे  जतन केले  जाई.यांनाच  ममी असे संबोधले  जाते. अन या ममी सुरक्षित राहाव्यात, कालानुरूप त्यांचे कुजणे होऊ नये म्हणून विशिष्ट पद्धतीच्या  इमारती बांधून, त्यात या ममी ठेवल्या गेल्या.  इजिप्त मध्ये असे बरेच पिरामिड सापडले आहेत. त्यापैकी महत्वाचे हे तीन !

अलीकडच्या काळात काही नवीन गोष्टी सापडत आहेत. काही नवी उत्खनन, काही नवीन पाहणी, काही नवीन अन्वयार्थ लावले जात आहेत. त्यातल्या एकाची थोडी माहिती, आज घेऊ.

गिझा इथले जे तीन पिरॅमिड आहेत त्यातीळ खुफरे पिरॅमिड कडे जाणारे जे दगडी बांधीव छोटे रस्ते आहेत त्याखाली एक शाफ्ट आहे.  ओसायरिस शाफ्ट. खरे तर या ठिकाणी सलग खडक आहे. हा खडक  खोदून शाफ्ट  तयार केलेला आहे. १९३३-३४ मध्ये सलीम हसन आणि यांच्या टीमने हा जमिनी खालचा शाफ्ट जगासमोर आणला. एक मजलाखाली  हा शाफ्ट उत्खनन करून त्यांनी मोकळा केला. परंतु त्या खाली जाणे त्यांना शक्य झाले नाही. 
पुढे १९९९ मध्ये झही हवास आणि त्यांच्या टीमने हे काम पुन्हा हाती घेतले. आणि जवळ जवळ ३० मीटर खोलवर उत्खनन  केले. एकाखाली एक अशा तीन टप्यामध्ये हा शाफ्ट आहे.

काय आहे या शाफ्टच्या पोटात? 

जमिनीच्या जवळ जवळ ८-१० फूट खाली एका भुयार तोंड दिसतं. 
  

पहिल्या टप्यावरून वर बघताना. 
या भुयारामध्ये आणि खाली पूर्ण खडक आहे. या भुयारातून सरळ पुढे गेले कि खोल खाली नऊ मीटर खडक खणलेला आहे. जेमतेम सहाफुटी लांबीरुंदीअसे  हे चौकोनी भुयार आहे.  खाली उतरण्यास आता लोखंडी  शिड्या लावल्या आहेत. नऊ मीटर खाली उतरले कि पहिला टप्पा येतो. या टप्यावर फार काही सापडले नव्हते.  

तिथून पुढे पुन्हा काही अंतर सरळ गेले कि दुसऱ्या टप्याकडे जाण्यासाठी पुन्हा खोलखाली सव्वा तेरा मीटर खोदले आहे. तिथेही लोखंडी शिडी उतरून खाली आले कि दुसरा टप्पा लागतो. 

दुसऱ्या टप्याकडे जाताना 

या दुसऱ्या टप्याच्या  मध्यात सलग आयताकार खोली आहे आणि तिच्या आजूबाजूला शवपेट्या ठेवण्यासाठी सहा खोल्यांसारखी जागा तयार केली आहे. या टप्यावर अनेक भांडी, वस्तू सापडल्या होत्या. याशिवाय सहापैकी दोन खोल्यांमध्ये दोन भल्या मोठ्या दगडी पेट्याही,  झाकणांसह  सापडल्या.  अंदाजे ७ फूट लांब , चार फूट रुंद आणि सहा फूट उंच अशा प्रचंड मोठ्या पेट्या आहेत. आश्चर्य म्हणजे  या पेटयांचा दगड संपूर्ण इजिप्त मध्ये कुठेही सापडत नाही. ह्या पेट्या इतक्या छोट्या भुयारून खाली कशा आणल्या, का आणल्या या कशाचीच उत्तरे आज आपल्याजवळ नाहीत. 
डावीकडे दगडी पेटी दिसतेय. शेजारी उभी आलेली व्यक्ती पाहिली कि पेटीची भव्यता लक्षात येईल.  


या टप्याच्या खाली पुन्हा साडे सात मीटर खोदलेले आहे. इथे जायचे भुयार अजूनच लहान आहे. फारतर चार बाय चार फुटाचे.
तिसऱ्या टप्याकडे जाताना 

 इथून खाली उतरले कि तिसरा टप्पा येतो. इथेही मोठी आयताकार खोली आहे. मध्यात पुन्हा एक दगडी पेटी आहे. खोलीच्या दुसऱ्या टोकाला, दोन वेगवेगळ्या दिशांना वर चढत जाणारी,  अतिशय लहान भुयारे आहेत. तिथून पुढचा मार्ग अजून शोधता आलेला नाही. 

या टप्यातील आश्चर्यजनक गोष्ट तर अजून सांगितलीच नाही. या खोली मध्ये ; भर वाळवंटी प्रदेशातल्या, जमिनी पासून तीस मीटरहून खोल जागेत , जिथे सूर्याचा प्रकाशही जाऊ शकत नाही, जिथे जमिनी वर दूरपर्यंत पाणी दिसत नाही कि एकही झाड दिसत नाही अशा या ठिकाणी, पिरॅमिडच्या टोपी खाली काय दडलं आहे? तर अतिशय स्वच्छ अगदी स्फटिकाप्रमाणे असणारे पाणी ! खोटं वाटलं ना? हा बघा फोटो. अतिशय अपुरा प्रकाश असूनही, त्या पाण्यात उभ्या असलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब सहजी दिसते आहे. 

तिसऱ्या टप्यातले स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पाणी 

हे काय आहे?  इतके खाली कठीण खडकातून का खोदले गेले? त्या अवाढव्य दगडी पेट्या तिथे का नेल्या? कशा नेल्या? खाली असणारी छोटी भुयारं अजून कुठे जातात? तिसऱ्या टप्यामध्ये असलेले पाणी तिथे का आहे? ते कोठून आले, येते? भूगर्भात इतके पाणी असूनही जमिनीवर एकही झाड का नाही? हे स्थापत्य कसे केले? कोणी केले? काय हत्यारं, कोणती यंत्र वापरली गेली? कोणत्या काळात हे केले गेले? .... एक नाही अनेक प्रश्न ! पण कशाचेच संयुक्तिक उत्तर नाही. 

शेवटी मनात इतकाच येतं  " या टोपी खाली, दडलंय काय? "

____

मला भावलेले लोथल

 (आधी अगदी थोडक्यात  माहिती देते आणि ही माहिती एक इतिहासाची अभ्यासक म्हणून देतेय.

अधिक तपशीलवार माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहेच)
सिंधु संस्कृती :  इ. स. पूर्व 3200 ते इ. स. पूर्व 1600 या कालखंडामधे सिंधु- सरस्वती नद्यांच्या खोऱ्यामधे ही संस्कृती विकसित झाली. 1920-21 मधे या प्राचीन संस्कृतीचा शोध लागला. दयाराम सहानी, डॉ. देवदत्त भांडारकर, राखालदास बॅनर्जी, जॉन मार्शल, सर मॉर्टिमर व्हीलर अशा विविध संशोधकांनी या संस्कृतीची जगाला ओळख करून दिली. मोहेंजोदारो, हराप्पा, मेहेर गढ, कोट दिजी, राखी गढ, कालीबंगन, चन्दुदारो, देसलपूर, धोलावीरा, सुरकोटडा, कुंतासी, रंगपूर, रोजडी,लोथल, अशी जवळजवळ 1500 साईट्स सापडल्या आहेत.


नियोजनबद्ध नगर बांधणी, चौरस आकाराची शहरे, सार्वजनिक स्नानगृहे, बंदिस्त बांधलेली सांडपाण्याची व्यवस्था, वर्गानुरुप गावरचना, काटकोनात छेदणारे रस्ते, पक्क्या विटांचा वापर, 4 : 2 : 1 अशा प्रमाणातल्याच विटांचा वापर, बालेकिल्ला, कोठारं, अग्निकुंडे, बांधीव विहिरी, बांधीव गोदी( डॉकयार्ड), मुद्रा,  गोमेद, अकिका दगडाच्या मण्यांचे अलंकार, स्टिएटाईट या मऊ दगडाचे अतिसुक्ष्म मणी आणि त्यांचे अलंकार, मातीची पक्की भांडी, परदेशांशी व्यापार, जलमार्गाने व्यापार, लेखन कला, वजने, शेती, शेतीसिंचन,  खतांचा वापर, तांब्याचा वापर आणि व्यापार, शंखांचे दागिने, कापड, मातीची पक्की खेळणी, सप्तमातृका, ब्रान्झची नर्तकी ही या संस्कृतीची काही वैशिष्ट्ये.
भूकंप, नद्यांचे पूर, बदललेली नैसर्गीक परिस्थिती, आक्रमणं यापैकी काही कारणांनी ही संस्कृती लयाला गेली. या बद्दल नक्की पुरावे नाहीत. पण एक अत्यंत प्रगत संस्कृती इथे नांदत होती.)


(डिसक्लेमर  : हे मला जसं भावलं लोथल तसं लिहिलय. हा काही संशोधनपर लेख नाही. संशोधनपर लेख लिहिण्यासाठी वेगळा फोरम वापरेन )

इयत्ता सहावीतली पहिली आठवण आहे लोथलची! शाळेत सर्वसामान्यपणे इतिहास हा नावडीचा विषय असतो मुलांचा. पण माझ्याबाबतीत मात्र उलटच झालं. आणि याचं कारण होतं ते आमच्या इतिहासाच्या कुलकर्णीबाई. त्या इतिहास आणि पीटी असं दोन्ही घेत. आणि पीटी, त्यासोबत येणारे खेळ हे माझे फार प्रिय. माझ्या मोठ्या बहिणी भारी हुशार, अभ्यासू आणि शांत. मी मात्र दांडगोबा, अभ्यासापेक्षा खेळाकडे लक्ष असणारी आणि चुळबुळी. त्यामुळेच शाळेत खोखो, लंगडी आणि अगदी कब्बडीमधेही मी नेहमी मी टीम मधे असे. त्यामुळे पीटीच्या कुलकर्णी बाईंची मी लाडकी होते आणि त्या माझ्या लाडक्या बाई होत्या. स्वाभाविकच त्या शिकवत असलेला इतिहास हा विषयही आवडू लागला. त्यांची इतिहास शिकवायची पद्धतही खूप छान होती. आधी गोष्टी सांगून धड्यात काय आहे हे सांगत आणि मग धडा शिकवत. याच वर्षी प्राचीन इतिहास शिकायला होता. अन त्यातच मोहेंजोदारो, हराप्पा, लोथल ही नावं ओळखीची झाली. सिंधुसंस्कृतीशी माझी नाळ जुळली ती तेव्हापासूनच.

पुढे अकरावीत माझे लाडके सर आणि मार्गदर्शक गुरु डॉ. राजा दीक्षित भेटले. त्यांच्यामुळे तर इतिहासाकडे बघण्याचा अजूनच नवा दृष्टिकोन मला मिळाला. अकरावीतच लोथलची जास्त माहिती मिळाली. अभ्यासक्रमातून आणि त्याहीपेक्षा दीक्षितसरांच्या लेक्चर्समधून. तेव्हापासून या सिंधुसंस्कृतीचे गारुड मनावर बिंबले होते. हराप्पा, मोहेंजोदारो, रुपड, कालीबंगन, चन्हुदारो, लोथल या ठिकाणचे उत्खनन, तिथल्या साईट्स बघायची एक अनामिक इच्छा मनात कोरली गेली.

पण पुढे इतिहास आणि पुरातत्वशास्त्र यातला फरक लक्षात आला आणि इतिहासाची ओढ- एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाची भूल  जास्त पडली, अन मग मी इतिहासाकडे वळले. मग पुढे डॉ. अरविंद देशपांडे सरांसारखे अतिशय हुषार, विचारवंत, हाडाचे शिक्षक, गुरु मार्गदर्शक म्हणून लाभले अन इतिहासातच मी गुंगून गेले.

पण मनामधे खोलवर सिंधू संस्कृतीतली स्नानगृहं, आखीव रेखीव नगररचना, सांडपाण्याची भुयारी व्यवस्था, सार्वजनिक विहिरी, वैशिष्ट्यपूर्ण वीट, धर्मगुरुची मूर्ती, सप्तमातृका, मण्यांचे अलंकार, लोथलची प्रसिद्ध गोदी, विविध मुद्रा- नाणी, वजनांचे प्रकार, खेळणी, अशा कितीतरी गोष्टी कोरल्या गेल्या. त्या प्रत्यक्ष बघायला हव्यात ही एक इच्छा मनात आत जिवंत राहिली.

मधे अनेक वर्ष गेली. जवळचे दायमाबाद बघून यावे; एखादे तरी उत्खनन बघावे असे कितीदा तरी ठरवले पण प्रत्यक्ष  जाणं मात्र झालच नाही..अशीच बरीच वर्ष गेली...

अन मग अचानक नवऱ्याचे एक प्रोजेक्ट अहमदाबादला सुरू झाले. अन मग मी 4-5 दिवस तिथे जायचे ठरवले, तशी ही मनात खोलवर असलेली इच्छा सुळ्ळकन वर आली. लोथल, अहमदाबादपासून केवळ दोन तासाच्या अंतरावर होतं. मग बसून सगळा प्लान केला. अहमदाबाद मधे काय काय बघायचं. ते मी एकटी फिरून बघू शकणार होते. पण लोथल ला मात्र नवऱ्याला घेऊन जायचं, त्यालाही हा अनुभव मिळावा असं वाटलं. त्यानुसार सुटीच्या दिवशी आम्ही लोथलला निघालो. तिथे खूप ऊन असेल, साईटवर फिरायचं म्हणजे ऊन फार व्हायच्या आधीच पोहोचावं म्हणून पहाटेच निघालो.

साडे आठपर्यंत लोथलला पोहोचलो तर खरं. पण तिथे कोणीच दिसेना. डावीकडे एक गेट तिथे कुलूप, समोर एक गेट, तिथे वर म्युझियमची पाटी पण तिथेही कुलूप. आता काय करायचं असा विचार करे पर्यंत तिथले रखवालदार आले.
म्युझियम दहाला उघडेल इतक्यात नाही असं सांगितलं त्यांनी. मी विचारलं "और साईट, साईट कब देख सकेंगे हम? "

साईट ह्या शब्दाने जादू केली. रखवालदारांना समजलं की मला लोथलची माहिती दिसतेय. त्यांनी लगेच हसत डावीकडचे कुलूप उघडले. "हा आईये, साईट आप देख सकते हो अभी. "
मग मी त्यांच्याशी थोडी दोस्ती केली, मी इतिहासाची प्राध्यापक आहे आणि महाराष्ट्रातून आलेय म्हटल्यावर त्याने फारच प्रेमाने सगळी साईट फिरवून दाखवली.

तर साईटवर पाऊल टाकलं, समोरच लोथल, सिंधु संस्कृतीची माहिती देणारा फलक दिसला. आणि मला अचानक भरून आलं. अखेर इतक्या दिवसांची, नव्हे वर्षांची इच्छा आज पुरी होतेय.



दहा बारा पावसं पुढे गेले अन माझं लक्ष उजवी कडे गेलं...
तिथे विहीर होती. गोलाकारात विटांनी बांधलेली...  तिला कॅमेरात पकडलं. अन पुढे  झालो.




उजवीकडे नजर गेली आणि ओ माय गॉड... इतकी वर्ष फक्त चित्रांमधे बघितलेली लोथलची सुप्रसिद्ध गोदी!


मी लांबून बघतच राहिले, एक क्षण माझा माझ्यावर विश्वास बसेना. साडेचार हजार वर्षापूर्वीचा इतिहास माझ्यासमोर उभा होता.  मी रखवालदारांना लिचारलं, "यही डॉकयार्ड है ना?" मला दिसत होतं पण तरीही विचारल्या शिवाय रहावेना. अन मी मंत्रमुग्ध झाल्यासारखी ओढले गेले.

किती मोठी, किती प्रचंड मोठी गोदी होती ती. पक्या विटांनी बांधलेली. माझ्या डोळ्यात मावेना. बघा  तो लाल गोल दिसतोय? साधारण मध्यात एक माणूस उभा होता . चित्रावर क्लिक केलात की चित्र मोठ होईल मग निट  दिसेल.

मी पुढे पुढे जात गेले. नजरेसमोरचा तो प्रचंड मोठा डॉकयार्ड कोरडा ठक्क होता,

पण मनानेच माझ्या डोळ्यांना  साडेचार हजार वर्षांपूर्वीची गजबजलेली गोदी दिसत होती. 215* 37 मीटर लांबरुंद आणि 8 मीटर खोल. समोरून भोगावो नदीतून येणारी मोठी जहाजं, माल उतरवणारे लोकं, मागे जास्तीचे पाणी समुद्रात नेऊन सोडणारी नाली/ कालवा, या नालीतून सगळे पाणी समुद्रात सोडून दिल्यावर कोरडी होणारी गोदी, मग त्या कोरड्या गोदीमधे बोटींची होणारी दुरुस्ती....


शब्दात नाहीच मांडता येत तो सगळा अनुभव....


एकीकडे माझी कॉमेंट्री सुरू होती. इतकावेळ रखवालदार  काय काय सांगत होता, पण आता तोही माझं बोलणं एेकू लागला. सोबत नवऱ्याचा बंगाली मित्र होता त्यामुळे हिंदीत माझी बडबड चाललेली. नदी कुठे, समुद्र कुठे, समुद्रातून नदीमार्गे बोटी कशा येत, व्यापार कोणा कोणाशी चालत असे, काय वस्तु विकल्या जात, का काय सांगत होते मी. ..


अन मग एकदम स्तब्ध झाले...

माझ्या समोर पसरलेली प्रचंड मोठी गोदी अन मी, बस बाकी सगळं हरवलच. हलकेच नवऱ्याने हलवलं मला. चल पुढे जाऊत म्हटलं, तशी भानावर आले. समोर आता 215 * 65 मीटर लांबरुद पण फक्त दोन मीटर उंच विटांची भिंत दिसत होती, माझे डोळे पाणावले...



मग उलटं वळून मागे आलो. तस समोर टेकाड दिसू लागलं, त्यावरच्या भिंती... शप्पथ! जुन्या शहरात आले होते मी.


समोर गोदाम होतं, थोडं उंचावर. खाली मोठा चौथरा, त्यावर इमारतीचा ढाचा! आता अर्धवट पडलेल्या भिंती, कधीकाळी कितीतरी मौल्यवान वस्तुंचा कडेकोट बंदोबस्त करणाऱ्या...



आम्ही अजून थोडं पुढे आलो. आता उजवीकडे नगर वसलेलं.


अगदी काटेकोर ओळीत बांधलेली घरं, स्नानगृह.
शेजारून विटांनी बांधून बंदिस्त केलेली सांडपाण्याची व्यवस्था; प्रत्येक चौकात गोलाकारात वळवलेली.





तिथेच एक वीट सुटीच वर होती, तिलाही कॅमेरात घेतलं.



थोडं पुढे गेलो तर तिथे कुंभाराची गोल आकारात बांधलेली भट्टी दिसली.


तिला वळसा घालून पुढे झालो अन लोखंडी जाळी खाली बंदिस्त केलेले दागिने तयार करायच्या कारखान्यातली भट्टी दिसली. इथे तयार केले जाणारे दागिने अतिशय कौशल्यपूर्ण होते. आजही या दागिन्यांच्या निर्मितीचे गुढ उकलले नाहीये. पुढे सविस्तर सांगते त्या बद्दल.


डावीकडे खालच्या बाजूला अजूनही बरेच उत्खनन व्हायचे आहे पण पुरातत्वखात्याकडे असलेल्या अपुऱ्या निधीमुळे सगळे तसेच वाट बघत राहिलेय... कितीतरी मोठा इतिहास अजून मातीखाली दबलाय, बाहेर येण्याची वाट बघत. अगदी जड अंतकरणाने उलटे फिरलो. पुन्हा वाटेतल्या सगळ्या इमारती भिंती न्याहाळत परत आलो.


पण पुन्हा पावलं गोदीकडे वळली. नवऱ्याला म्हटले थांब आलेच. मला एकटीला तिला भेटायचे होते. आता जरा अजूनच जवळ आले, थोडी खाली वाकले आणि त्या भितींवरून हात फिरवला.


अनामिक हूरहूर दाटून आली. खाली बघितलं, तळाला भेगा पडल्या होत्या. गेली दोन वर्ष तिथे पाऊसच पडला नव्हता, पाणी पार आटून गेलं होतं...तो तळच अजून काही सांगू पहात होता पण माझीच ग्रहणशक्ती अपुरी पडली. पुन्हा डोळे भरून आले. नवऱ्याने आवाज दिला तशी उभी राहिले, पाय निघत नव्हता, पुन्हा एकदा डोळ्यांमधूनच गोदीला कवेत घेतलं अन परतले.

बाहेर पडताना रखवालदारांना धन्यवाद दिले, तर तो म्हणाला, "बहेनजी, आते तो बहोत सारे लोग, लेकिन यहाँकी इटोंको सुनते बहोत कम लोग!" एक कटक सलाम केला त्याने.  मी नमस्कार करून पुढे झाले. नवऱ्याने नंतर सांगितले की रखवालदार पैसे घ्याला तयारच नव्हता; "ये तो मेरी ड्युटी है, मेरा अच्छा नसीब है के मै यहाँ काम करता हू " म्हणत होता. पण त्याच्या नातीच्या शिक्षणासाठी ठेव म्हटल्यावर घेतले त्याने. त्या स्थानाचे महत्व त्याला पुरेपूर कळले आहे हे पाहून खूप छान वाटलं.

हे ते रखवालदार, तिथल्या दुसऱ्या विहिरी सोबत



बाहेर आलो तर म्युझियमचे गेट उघडलेले. मग आत गेलो पण तिकिट देणारी व्यक्ती अजून यायची होती. तिथे बाहेर बसायची छान सोय होती, छान बाग तयार केलेली. मग तिथे झाडांवरचे पक्षी निरखण्यात आणि त्यांचे फोटो काढत मी पुन्हा आजमधे आले.

थोड्याच वेळात म्युझियम उघडलं आणि आम्ही आतला खजिना बघायला गेलो. इथे मात्र कॅमेरा मना होता. आत शिरल्या शिरल्या ते  स्टिएटाईटचे प्रसिद्ध मणी दिसले, दिसले म्हणण्यापेक्षा भल्यामोठ्या भिंगामधून बघावे लागले. हो, अतिशय बारीक म्हणजे मोहरीच्या दाण्याहूनही लहान असे मणी, त्यांना बारीक भोक पाडलेले. भिंगातून बघताना त्यांचा सुबकपणा अजूनच जाणवला. पुढे गोमेदच्या मण्यांचे दागिने होते. हे गोमेद हा अतिशय कणखर दगड. त्याच्यापासून लांबट चपटे मणी बनविण्याचा कारखाना साईटवर बघितला होता. हा दगड भाजला की त्याचा रंग गडद लाल होतो. त्यावर नंतर कोरून त्यावर काही रासायनीक प्रक्रिया करत आणि हा कोरलेला भाग पांढरा बनत असे. हे काम त्या दागिन्यांच्या कारखान्याच्या भट्टीत होत असे.

पुढे अनेक भांडी, मोठमोठ्या सुरया, भांडी, हत्यारं, साधनं होती. मध्यात लोथलचा नकाशा होता.

उजवीकडे एक आर्टिफिशियल बरियल ( मृतांना पुरण्याची जागा) तयार केली होती. लोथलमधे सापडलेले दोन मूळ सांगाडे काचेच्या पेटीत बंदिस्त ठेवलेले. माझं मन पुन्हा भरून आलं... हे आपले पहिले वंशज असतील! काय आणि कशा प्रकारचं आयुष्य यांनी अनुभवलं असेल... साडेचार हजार वर्षांची पोकळी अशी सट्टकन संपली, माझी त्यांची नाळ जुळली. न कळत मनात कृतज्ञता भरून आली. या लोकांनी सुरु केलेली, समृद्ध केलेली संस्कृती मला आजपर्यंत घेऊन आलीय.

पुढे गेले तर, व्यापारासाठी उपयुक्त अशी वजनं आणि तराजू समोरच्या काचेमागे दिसला. वजन करता यावं, वस्तुची निश्चित किंमत ठरवता यावी यासाठीची ही वजनं. तुम्हाला डोळ्यासमोर किलो, 500 ग्रॅम अशी वजनं आली न? पण छे, ही वजनं अतिशय छोटी होती. सगळ्यात मोठं वजन आपल्या सापशिडीतल्या चौकोनी फाशापेक्षा थोडं उजवं. अन सगळ्यात छोटं वजन तर मुगाच्या डाळीच्या दाण्या एवढं. आश्चर्य वाटलं? इतक्या लहान वजनाची वस्तूही इथे विकली जायची. हो, सुरुवातीला जे अगदी छोटे मणी बघितले न भिंगातून, त्यांचा व्यापार होत असे, शिवाय गोमेदचे मणी. हे अतिशय महाग असत. त्यामुळे अगदी छोटी वजनंही वापरावी लागत. ह्या मण्यांना तेव्हा पश्चिम आशियात खूप मागणी असे.

थोडं पुढे आले अन चेहऱ्यावर हसू आले. यस हीच ती सिंधु संस्कृतीतली लहान मुलांसाठी तयार केलेली खेळणी. बैलगाडी, चिमणी, पोपट, शिटी, चाकावर फिरणारा पक्षी, किती किती वैविध्य! जो समाज मुलांच्या खेळण्यासाठी इतकी मेहनत घेतो तो नक्कीच किती तरी पुढारलेला असेल नाही?

आता निघायची वेळ झालेली. पुढे अजून एक महत्वाचा टप्पा होता ( त्याबद्दल पुन्हा केव्हातरी)
पाय तर निघत नव्हते. मग बाहेर काऊंटरला पुस्तकांची चौकशी केली. म्हटलं फोटो काढता आले नव्हते तर इथले काही पुस्तक, काही ब्रॉशर मिळाले तर घ्यावे. पण तिथल्या कर्मचाऱ्याने अतिशय वाईट वाटून सांगितले, " बहेनजी किताबे खतम हो गयी है. और नयी एडिशन निकालने के लिये हमारे विभाग के पास पैसे नहिं है"
भारतातील इतिहासाबद्दलची अनास्था पुन्हा एकदा जाणवली. नवीन संशोेधन, उत्खनन इतकेच नव्हे तर पुस्तकं ज्यातून निधी जमा होऊ शकतो, तीही छापायला निधी नाही ... :(
असो
पुढच्या वाटेवर मी गप्पच होते. डोळ्यासमोरून ती गोदी, त्या भिंती, विहिर, भट्टी, गोदाम हलतच नव्हते. लोथल, मनात भरून राहिलं होतं. इतक्या वर्षांची इच्छा अचानक पूर्ण झाली. मनात ही सगळी चित्र आता जन्मभर जागती राहतील ___/\___


____

"कोरलंय काय, या डोंगरावरती ? "

( लेखातील छायाचित्र By Saqib Qayyum - Own work, CC BY-SA 3.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=31036234 आणि नेटवरून साभार


परवा आपण  पृथ्वीच्या पाठीवर ठेवलेल्या टोपीखालची गंमत बघितली. आज आपण एका उंच डोंगराच्या डोक्यावर काय कोरलं बघुयात. याठिकाणाच नाव आहे सिगरिया ! आता तुम्हालाओसायरिस आणि सिगरिया यात काही साम्य हि दिसेल. अगदी नावापासून, हो ना?  OSIRIS and SIGARIYA पण या दोन जागा एकमेकींपासून खूप लांब आहेत/ ओसायरिस आहे इअफ्रिकेत उत्तरेला तर सिगरिया आहे आशिया मध्ये दक्षिणेला . श्रीलंका या आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये हा चमत्कार आपल्याला बघायला मिळतो. तशी हि जागा  आता बहुतेकांना माहिती असते. जागतिक वारसा म्हणून घोषित आणि संरक्षित आहे. बहुतांश श्रीलंका पर्यटना मध्येही याचा समावेश असतो.

श्रीलंकेच्या मध्यात असलेल्या डांबूला या गावाजवळ एक प्रचंड मोठी शिळा आहे. तिचेच नाव सिगारिया (म्हणजे  सिंहगिरी )


असं म्हट्लन जातं कि कश्याप राजाने (इ.स. ४७७ -४९५) या सिंहगिरीवरती आपली राजधानी वसवली. परंतु त्याच्या मृत्यूनेणार हि वसाहत ओस पडली.
काहीं पुरावे असे सांगतात कि तिसऱ्या शतकापासून चवदाव्या शतका पर्यंत इथे बुद्ध विहार होते. बॊध्द साधकांनी अनेक गुहा कोरून तिथे आपली साधना केली.

त्यांनतर सिगारियाचा जगाला विसर पडला. पुढे १८३१ मेजर जोनाथन फोर्ब्स या ब्रिटिश अधिकाऱ्याला याबाबत माहिती मिळाली. अन तेव्हापासून आधुनिक जगाला या ठिकाणाची माहिती  मिळाली. पुढे १८९० मध्ये काही प्रमाणात उत्खनन झाले. १९८२ मध्या श्रीलंकेच्या सरकाराने  यावर पुन्हा काम सुरु केले. आणि आता हे ठिकाण आधी म्हटल्याप्रमाणे जागतिक वारसा म्हणून जाहिर केले गेले आहे .

६६० फूट उंच असलेल्या या उभ्या कातळाच्यावरती एक आश्चर्य आहे. या कातळावरती जाण्यासाठी कोणतीही नैसर्गिक वाट नाही. सुरुवातीला काही दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर सुरेख रचलेली बाग लागते.



विविध चौकोनी दगडी हौद त्यात पाणी आणि आसपास सुरेख हिरवळ. काही अंतर गेल्यानंतर मात्र आपण उभ्या कातळापाशी  येतो.



 आणि समोर असते ती अतिशय अवघड अशी लोखंडीशिड्यांची माळ. तीही तशी नवीन आहे. जरा बाजूला नजर फ़िरवली कि या कातळाला सिगारिया का म्हणातात याची पहिली प्रचिती येते.


कातळातून कोरलेला सिहंचा पंजा .

समोरच्या अतिशय उंच, चढाच्या जवळ जवळ १२०० पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण सिगारियाच्या वरती पोहचतो.  खाली बघताना फार विहंगम दृश्य दिसतं.




या कातळाच्या वरती चढून गेल्यानंतर आपल्याला हा नजारा दिसतो.

___


मध्ययुग 


इतिहासात प्राचिन, मध्ययुगीन आणि आधुनिक हे तीन प्रमुख कालखंड.
प्राचीन आणि आधुनिक युगांच्या मधले हे युग  म्हणून मध्य युग. यालाच अंध: काराचे युगही म्हटले जाते.

कसे होते हे मध्य युग, का होते अध:काराचे?

प्राचीन काळी राजेशाही अस्तित्वात होती. मोठी मोठी साम्राज्ये होती. कालांतराने एव्हढी मोठी साम्राज्ये चालवणे अवघड होत गेले. काही राजांची पुढची पिढी तितकी बलवान राहिली नाही. राज्य कारभारासाठी वेगवेगळ्या प्रदेशात राजाने आपले अधिकारी- सरदार- सरंजामदार नेमले होतेे. त्या त्या प्रदेशातले ते अधिकारी बनले.  हळूहळू हेच राजाचे सरदार बलवान होऊ लागले. एका अर्थाने आपापल्या विभागात ते सत्ताधिश बनू लागले. आणि राजाचे साम्राज्यावरचे  नियंत्रण सुटू लागले. राजा नाममात्र होऊ लागला.

जगभर बहुतांशी ठिकाणी साधारण अशीच परिस्थिती निर्माण झाली. हळूहळू मोठ्या साम्राज्याची छोटी छोटी राज्ये तयार झाली. यालाच सरंजामशाही ही म्हटले जाते.  इंग्रजीत यालाच फ्युडॅलिझम म्हटले जाते. आणि सरंजामदारांना फ्युडल लॉर्ड्स.

य़ा युगाला अंध:काराचे, ब्लॅक एज असेही म्हटले गेले. त्याची कारणे बघताना आपोआपच या काळाची ओळख आपल्याला होऊन जाऊन जाईल.

राजकीय परिस्थिती तर आपण पाहिली. एका बलवान राजाकडून छोट्या छोट्या अनेक सरदार, सरंजामदारांकडे सत्ता गेली. कधी कधी तर सत्ता नेमकी कोणाची याचा पत्ताही लागेनासा झाला. आपला राजा कोण या बाबत प्रजा आंधळी झाली म्हणून हे अंध: काराचे युग.

तशात सत्ता मिळवण्यासाठी सतत संघर्ष झाले. अगदी वडिल- मुलगा, दोन सख्खी भावंडं, भावजय- दिर, काका-पुतण्या अशा विविध नात्यांमधे अगदी जिवावर उठण्या इतका संघर्ष सतेसाठी झाला या काळात.
आणि हे अत्यंत स्वाभाविक म्हणून मानले गेले. राजाच्या मुलाने राजा विरुद्ध केलेले बंड हा जणुकाही पायंडा पडून गेला.

त्याच बरोबर सतत बाजू बदलणे, आज एका राजाचा सेनापती तर पुढील काळात दुसऱ्याचीच नोकरी स्विकारणे हेही घडत होते. आज एकाची मनसब उद्या दुसऱ्याची. हे सहज होत होते.

सामान्य जनताही कधी एका राजाच्या वर्चस्वाखाली तर पुढे दुसऱ्याच राजाचे नागरिक होऊ लागली. एकाच व्यक्तीला दोन दोन विरुद्ध राजांना कर द्यावा लागत असे.  एव्हढेच नाही तर वर्षातला आठ महिने व्यक्ती शेतकरी असे तर उरलेले चार महिने तीच व्यक्ती सैनिक असे.

एकुणातच निष्ठा हा प्रकार बदलता राहिला. कशाचीच शाश्वती राहिली नव्हती.

सामाजिक बाबतीत या काळात अनेक बंधने, नियम आले. त्या त्या प्रदेशापुरतीच गरज भागवणे, इतर प्रदेशांशी संबंध न ठेवणे होऊ लागले. आपला वावराचा परिघ लहान झाला की आपली दृष्टी, दृष्टिकोनही संकुचित होत जातो, तसंच या काळात झालं. धार्मिक बंधने वाढली. रुढी परंपरा यांची जाचक बंधने आली. विचारांची कवाडं मिटली गेली.  एका अर्थाने समाजाने स्वत:ला बंदिस्त अंधारात कोंडून ठेवले. म्हणून हे अंध:काराचे युग.

आर्थिक बाबतीतही संकुचितता आली. आधी राजेशाहीत मोठा पैसा राजाच्या हाती केंद्रित होता. स्वाभाविकच राजदरबार श्रीमंत होता. व्यापारासाठी लागणारा, गुंतवणुकीसाठी लागणारा पैसा उपलब्ध होता. शिवाय जहाजबांधणी, भांडवल यासाठीही हे उपयुक्त होते. पण आता राजेशाहीची जागा सरंजामशाहीने घेतली. स्वाभाविकच आर्थिक सत्ताही विभागली गेली. अनेक छोटे छोटे सरदार, सरंजामदार झाले आणि एकसंध मोठी आर्थिक सत्ताही विकेंद्रित झाली. व्यापार, जहाजबांधणी, भांडवल यासाठी मोठा, खेळता पैसा राहिला नाही. यामुळे समाजाचा आर्थिक विकास थांबला म्हणून हे अंध:काराचे युग.

लष्करी आघाडीवर ही याचा परिणाम झाला. पूर्वी एक मोठे सैन्य राजाच्या नेतृत्वाखाली होते. आता त्याचीही विभागणी झाली. सरदार सरंजामदार आपल्या प्रदेशापुरते सैन्य ठेऊ लागले. शिवाय या सरदार- सरंजामगारांचे आपापसात वाद, भांडणं, युद्ध होऊ लागली. छोट्या छोट्या पण सततच्या कुरबुरी चालूच राहिल्या.

याच सुमारास इतर धर्मीयांची आक्रमणे, संपर्क, प्रभावही होऊ लागला. यातून आपला धर्म टिकवण्यासाठी धर्माची बंधने, नियम अजून कठोर केली गेली.

एकुणातच प्रजेला कोणाचाच भरवसा राहिला नाही. आपला तारणकर्ता कोण याबाबत एक संदिग्धता समाजात निर्माण झाली. सततची युद्धे, खालावलेले जीवनमान, आर्थिक उतरती कळा, धार्मिक छळ आणि धर्मांधता, पडलेल्या दुष्काळांतून वर येण्यासाठी राजाची मदत नाही,.... या आणि अशा अनेक गोष्टींमुळे या युगातला अंध:काराचे युग मानले जाते.

भारतात मध्ययुग कधी सुरु झाले याबद्दल मतभिन्नता आहे. काहींच्यामते  गुप्त साम्राज्यानंतरचा काळ म्हणजे साधारण इ.स. 650 पासून मध्ययुगाचा काळ धरला जातो. तर काहींच्यामते  इ.स. 1000 मधल्या तुर्कांच्या आक्रमणापासून मध्ययुग; तर काहींच्या मते   इ.स.1206 पासून सुरु झालेल्या गुलाम वंशाच्या दिल्ली सल्तनत पासून.
पण ते असो.

आता आपल्याला लक्षात घ्यायचय ते इतकच की मोठी मोठी साम्राज्य मोडून पडली आणि त्याची छोटी छोटी छकलं तयार झाली. अन या छोट्या प्रदेशापुरते स्थानिक राज्यकर्ते आले. समाजात रुढीपरंपरांचा पगडा वाढला. सततची छोटी युद्ध सुरु झाली. विज्ञाना पेक्षा मान्यतांना स्विकारले जाऊ लागले. समाज अधिकाधिक शेतीवर अवलंबून राहू लागला. व्यापार, इतर जगाशी संपर्क कमी होऊ लागला. आपापसातला संशय, अविश्वास वाढू लागला. सामान्य जनतेला वाली उरला नाही.....
हे सगळे घडले तो काळ म्हणजे मध्ययुग, अंध:काराचे युग!

___

मध्ययुग आणि महाराष्ट्र 


( डिसक्लेमर : शिवाजी इतका हृदयाच्या जवळचा आहे की त्याला अहोजाहो म्हणताच येत नाही. तेव्हा कोणाच्या भावना दुखावल्या वगैरे जाऊ नयेत हिच इच्छा!
आदरार्थी बहुवचन! मराठी भाषेचं हे वेगळेपण कधी कधी भयंकर त्रासाचं ठरतं. माझ्यापुरता मध्यम मार्ग मी सर्वच वैचारिक लिखाणांपुरता काढला. तो म्हणजे आधुनिक कालखंडातील प्रत्येकाला आदरार्थी बहुवचन लावेन. प्राचीन, मध्ययुगीन काळातली व्यक्ती कितीही आदरणीय असली तरी तो आदर मी लिखाणात केवळ आदरार्थी बहुवचन वापरून करण्याएेवजी त्या व्यक्तीचे मोठेपण मांडून व्यक्त करेन.
आधुनिक कालखंड हा जास्त जवळचा असल्याने ह्या कालखंडातल्या व्यक्ती, अगदी जिवंत असण्याचीही शक्यता अाहे. तेव्हा या कालखंडातील सर्व, अगदी सर्व व्यक्तींना मात्र मी हे आदरार्थी बहुवचन वापरेन. काहींना हे खटकण्याची खूप शक्यता आहे. पण यात केवळ एक सोय अभिप्रेत आहे.)
____________

फाल्गुन वद्य तृतिया नुकतीच होऊन गेली. शिवजयंतीचा उत्सव पार पडला. मध्ययुगात होऊन गेलेला एक आगळावेगळा राजा! आज त्याच्या बद्दल बोलणार आहे.
लक्षात आलं ना मी का मध्ययुग निवडलं. शिवाजी म्हटलं प्रत्येक मराठी माणसाला भरून येतं, अभिमानाने मान ताठ होते. राजा असावा तर असा, अशी भावना मनात येते.
या शिवाजी बद्दल इतकं लिहिलं गेलय, जातय की मी नवीन काय सांगणार?
आजकाल व्हॉट्स अपच्या माध्यमातून तर महापूर लोटतो ज्ञानसागराचा. तिथे काही विरोध केला, पुरावे मागितले की लगेच मानभंग वगैरे होतात. त्यामुळे अशा कोणत्याच गोष्टींबद्दल मी बोलणार नाही.
मी बोलणार आहे ते फक्त आणि फक्त मध्ययुगातील एक वेगळी दृष्टी असणार्‍या , स्वत:चा वेगळा ठसा पाडणार्‍या, त्याकाळाची बंधने ओलांडून पुढे जाणार्‍या एक दूरदृष्टी असलेल्या , समंजस, सहृदय, कर्तव्यकठोर अशा शहाजी आणि शिवाजी या पितापुत्रांविषयी ! शहाजी, शिवाजी कसे घडले , कोणत्या परिस्थितीत घडले , त्यांचे वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न करते. खूप मोठा विषय, पण थोडक्यात मांडणार आहे.
तर मध्ययुगात महाष्ट्रात यादवांचे राज्य मोडून बहामनी राज्य आलेलं. पण त्याचीही विभागून पाच वेगवेगळी शकलं झालेली. पैकी महाराष्ट्रात उत्तरेकडची मुघल सत्ता, अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही आशा तीन वेगवेगळ्या सत्तांचे आलटून पालटून नियंत्रण होते. सतत कोणाचा न कोणाचा सत्ता संघर्ष , युद्ध चालत होती. शिवाय स्थानिक वतनदारांचे एकमेकांशी असणारे संघर्षही चालूच असत. जोडीने वेळोवेळी पडणारे दुष्काळ, कोणीच वाली नसल्याने न मिळणारी मदत, यामुळे महाराष्ट्रातील जनता अगदीच हवालदिल झाली होती. अनेक गावे ओस पडली होती. अनेक कुटुंबे आपली वहिवाटीची जमीन सोडून परागंदा झालेली. एकंदरच कोणाचाच पायपोस कोणाच्याच पायात नाही; अंदाधुंदी, कोणी वाली नाही, युद्ध, अस्थिरता, असा अतिशय असंतोषाचा काल महाराष्ट्र अनुभवत होता.
इतिहासातील गुप्त साम्राज्य, यादव राजवट, वाकाटक राजवट, विजयानगराचे साम्राज्य अशा अनेक उत्तम राजपदांचा अनुभव असल्यामुळे मध्ययुगातील जनतेला अन्याय, असुरक्षितता खूपच जास्त जाणवत होती.
या परिस्थितीत वेरुळच्या एका घराण्याने पुढाकार घेतला. मालोजी आणि विठोजी भोसले या भावंडांनी आपले लष्करी कर्तृत्व निजामशाही मध्ये राहून दाखवले. मालोजीचा पुत्र शहाजी यानेही आपले लष्करी कर्तृत्व सिद्ध केले.
शहाजीचा काळ तर अजूनच अंदाधुंदीचा होता. सतत कटकारस्थाने, युद्धे चालू होती. तत्कालिन सर्व राज्यकर्ते; मुघल सम्राट , निजामशहा, आदिलशहा हे आपापल्या वर्चस्वाखाली जास्तीत जास्त प्रदेश आणण्यासाठी कोणतेही विधीनिवेश पाळत नव्हते. स्वाभाविकच प्रत्येक सरदार, वतनदार सतत सत्ताबदल करत. शहाजीचीही परिस्थिती अशीच होती. कधी निजामशाही; तिथे दगाफटका झाला कि आदिलशाहीकडे . तिथे कमी महत्व मिळाले कि पुन्हा निजामशाही. तिथे कारस्थाने झाली कि मुघलांकडे. तिथे दगाफटका झाला कि पुन्हा आदिलशाही, तिथे अंदाधुंदी कि पुन्हा निजामशाही. अशी त्रिस्थळी यात्रा सतत सुरु होती.
या सगळ्यात शहाजीच्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या.
१. मुगलांचा दक्षिणेत शिरकाव होता कामा नये.
२. स्वत:च्या अधिकारातला काही परगणा- प्रांत हवा.
३. स्थानिक लोकांचे राज्य असायला हवे.
४. त्यासाठी काही हुशार, जिवाला जीव देणार्‍या आणि निष्ठावान व्यक्ती शोधून त्यांना आपल्याशी जोडून घेतले पाहिजेत.
यादृष्टीने शहाजीने हालचाली सुरु केल्या.
१. पुणे, सुपे, चाकण येथील वतनदारी आपल्या नावावर करून घेतली. निजामशाही, आदिलशाही इतकेच नव्हे तर मुघलांकडूनही त्या वेगवेगळ्या वेळी मान्य करून घेतले.
२. महाराष्ट्रात निजामशाही वा आदिलशाही बलवान व्हावी यासाठी प्रयत्न केले.
३. शिवाजीची रवानगी पुण्याला केली.
४. शिवाजी बरोबर अत्यंत हुशार, निष्ठावान, विश्वासू अशा व्यक्तींचे "प्रधान मंडळ" सोबत दिले.
५. वेळोवेळी शिवाजीच्या आक्रमक हालचालींची पाठराखण निजामशाही-आदिलशाहीमधे केली.
शहाजीचा हा सगळा विचार, कृती निश्चितच मध्ययुगाचा विचार करता फार वेगळी होती. मध्ययुगातून महाराष्ट्राला वेगळी दिशा मिळालेली दिसते ती शहाजीच्या कारकिर्दीपासून! शहाजीने हे सगळे अतिशय विचारपूर्वक, नियोजनबद्ध केलेले दिसते. हीच दूरदृष्टी , नियोजन पुढे शिवाजीनेही दाखवलेले दिसते.
शिवाजीचा जन्म फाल्गुन वद्य तृतिया, शके १५५१; इंग्रजी कॅलेंडर नुसार स.न. १९ फेब्रुवारी १६३० . अत्यंत धामधुमीचा - मुघलांच्या आक्रमणाचा काल. सुरुवातीची, बालपणीची सहा वर्षे शिवाजी सह्याद्रीच्या गडकोटांवर होता. पुढे सहा वर्षे बंगळूरला शहाजीच्या बरोबर होता. १६४१ मध्ये वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी शिवाजीला शहाजीने जिजाबाई,दादोबा कोंडदेव यांच्या बरोबर पुण्याला पाठवले. पेशवे, मुजुमदार, डबीर, सबनीस असे स्वतंत्र अधिकारी; सोबत घोडदळ, पायदळ, पिढीजात विश्वासू अमात्य, अध्यापक, उंच ध्वज, विपुल द्रव्य असे सगळे सोबत पाठवले. शिवाय शहाजीने आपल्या मावळ वतनातील पोट मोकासा म्हणून ३६ गावेही शिवाजीच्या नावे केली.
एका अर्थाने स्वतंत्र, स्वायत्त असा छोटा राजा म्हणूनच शिवाजीची पाठवणी शहाजीने केली. पुढे आपल्या दोन सरदारांना "राजश्री शिवाजी पुणे येथे आहेत, तिथे इमाने सेवा करा" असेही सांगितले. या सर्वातून शहाजीने नियोजनबद्ध, परिस्थितीचा साधकबाधक विचार करून प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल केलेली दिसते.
शिवाजीला या सर्वाची खूप लहानपणापासून जाणीव असावी. पहिल्या बारा वर्षात वडिलांची धडपड, मते, कर्तृत्व आणि त्यांनी पाहिलेले स्वायत्त-स्वराज्याचे स्वप्न निश्चितच शिवाजीला माहिती होते. याचेच पडसाद आपल्याला शिवाजीच्या कारकिर्दीत दिसतात. पुण्यात आल्या नंतर पहिल्या चार वर्षातच आसपासच्या परिसरात - बारा मावळ प्रांतात आपला दबदबा शिवाजीने निर्माण केला. १६४२-४७ या काळात शिवाजी, दादोबा कोंडदेव, आणि सहकार्यांनी एक फार मोठे कार्य केले. कौल देऊन गावं वसवण्याचे. अनेक वर्षांच्या अंदाधुंदी मुळे जमीन, गावं उजाड झाली होती. ही जमीन लागवडी खाली आणणे, गावं वसवणे, ती स्थिर करणे, लोकांना अभय देणे-आश्वस्थ करणे, जमीन लागवाडीसाठी हत्यारे-पैसा-बीबियाणं पुरवणं. पेरणीपासून धान्य हाती येईपर्यंतचा ६-७ महिन्यांच्या काळात युद्ध-नासाडी होणार नाही याचे विश्वास देणे आणि टिकवणे. भावी काळात या सर्वातून निर्माण झालेल्या धनधान्यावर कर लावून तो वसूल करणं. ही सगळी व्यवस्था या पहिल्या ४-५ वर्षाय मावळ प्रांतात शिवाजी आणि सहकार्यांनी प्रत्यक्षात आणली. जनतेचा विश्वास संपादन केला. जनतेचे जीवन सुरक्षित, मूळपदावर आणले. त्यासाठी वेळप्रसंगी स्थानिक बलवान वतनदारांना दंड - शासन केले.
हे सर्व करत असताना शिवाजीने सर्वात जास्त कमावला तो म्हणजे " लोकांचा विश्वास" ! या कालखंडा मध्येच त्याने आपले अतिशय निष्ठावान सहकारी मिळवले. येसाजी कंक, बाजी पालसकर, बाजी प्रभू देशपांडे , मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, तानाजी मालुसरे, हंबीरराव असे अनेक सच्चे, कर्तृत्ववान, आणि आपापल्या क्षेत्रातले श्रेष्ठ सहकारी शिवाजीने मिळवले.
पुढे जावळीच्या चंद्रराव मोरेंपासून अफजलखान, शाहिस्तेखान, आग्राभेट, दक्षिण मोहिम, राज्याभिषेक पर्यंतचे सगळे तपशील सर्वांना माहितीच आहेत. अगदी शालेय पातळीवर याचा अभ्यास आपण केलाय. तेव्हा, मध्ययुगाचा विचार करताना शिवाजीचे जाणवलेले वेगळेपण फक्त मांडायचा प्रयत्न आता करणार आहे. ( मागचा लेख डोळ्यासमोर ठेवलात तर हे वेगळेपण जास्त ठळक होईल)
शिवाजीने आपल्या अधिपत्याखाली अनेक छोट्या- मोठ्या वतनदारांना एकत्र आणले. बारा मावळ, जावळी, महाराष्ट्रातील अनेक वतनदार, या सर्वांना एकत्र आणून स्वराज्य उभे केले. चाळीस हजार होन इतक्या वतनापासून एक कोटी होन वतनापर्यंत हे राज्य वाढवले.
राजकीय स्तरावर मुघलांचा दक्षिण शिरकाव शिवाजीने थोपवून ठेवला. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज अशा परकीय आक्रमकांना महाराष्ट्रापासून दूर ठेवण्याचे कामही शिवाजीने केले. महाराष्ट्राची सीमा थेट कर्नाटका पर्यंत वाढवली.
हे स्वराज्य उभे करत असतानी वडील शहाजी यांचे पूर्ण मार्गदर्शन आणि पाठिंबा शिवाजीला होता. किंबहुना शहाजीने तयार केलेल्या पार्श्वभूमीवरच शिवाजीने स्वराज्य उभे केले. आणि वेळोवेळी शहाजीचा सल्ला, पाठिंबा त्याने मिळवला. तसेच आपल्या मुलाला- संभाजीलाही त्याच दृष्टीने घडवले. अगदी गरज भासली तेव्हा संघर्षापेक्षा समन्वय आणि सामंजस्याने प्रश्न सोडवला.
कोणत्याही वर्चस्वाखाली न जाता स्वत:चे राज्य उभे केल्यामुळे शिवाजीने "सतत बाजू बदलणे" हे मध्ययुगाचे धोरणही स्वीकारले नाही. उलट आपल्या राज्यात आलेल्या प्रत्येक वतनदार, सैनिक, अधिकारी , जनता यांच्या मध्ये त्याने निष्ठा निर्माण केली. शिवाजी बद्दलचा आदर, विश्वास वाढीस लागला. आणि त्याचे कर्तृत्व पाहून मध्ययुगात हरवत चाललेली निष्ठा पुन्हा प्रस्थापित झाली.
आर्थिक बाबतीत शिवाजीने अनेक नवीन पावलं उचलली. शेतीचे मोजमाप योग्य करण्यासाठी, त्यात सारखेपण आणण्यासाठी शिवकाठी वापरली जाऊ लागली. जमिनीची प्रतवारी ठरवली गेली. त्यानुसार कर आखणी , आकारणी सुरु झाली. करव्यवस्थेत समानता आली. सततच्या युद्धांपासून सुटका झाल्यामुळे आणि संरक्षणामुळे शेतीची घडी बसू लागली. त्यातून उत्पन्न आणि त्यातून ठराविक कर राज्याकडे जमा होऊ लागला. या राज्याकडे येणाऱ्या कराचा अतिशय काटेकोर हिशोब ठेवला जाऊ लागला. स्वाभाविकच राज्याची आर्थिक बाजू बळकट होऊ लागली. याचा उपयोग व्यापार, सैन्य, आरमार आणि किल्ले उभारणीसाठी झाला.
लष्कराची बाजूही शिवाजीने बळकट केली. राज्याच्या रक्षणासाठी लष्कर किती महत्वाचे आहे हे त्याने जाणले. त्यानुसार लष्कराची बांधणी केली. त्यांना योग्य आणि पुरेसा दारुगोळा, हत्यारं मिळतील अशी व्यवस्था केली. कमी सैनिकांमध्ये मोहिम यशस्वी करण्यासाठी गनिमी कावा ही पद्धती विकसित केली. सैनिकांशी अतिशय चांगले संबंध आणि युद्धातील प्रत्यक्ष सहभाग यातून शिवाजी बद्दलचा आदर, त्याच्या प्रति असणाऱ्या निष्ठा वाढीस लागल्या. यातून शिवाजीचे मावळे हे एक अभूतपूर्व रसायन बनले. जिवाला जीव देणारे सैनिक, अधिकारी याची उदाहरणे म्हणून बाजी प्रभू देशपांडे आणि जीवा महाला ही नावे पुरावीत.
शिवाजीने महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. या राज्याला बाह्य आक्रमणांपासून सतत सुरक्षित केले. आदिलशाही, निजामशाही, मुघल इतकेच नव्हे तर पाश्चात्य सत्तांनाही योग्य ते बंध घातले. मध्ययुगीन त्रस्त जनतेला आश्वस्त केले.
राज्यांतर्गत सुरक्षितता, स्वास्थ्य आणले. जनतेचा मनातली भीती, असुरक्षितता पूर्णत: दूर केली. तत्कालिन राजांचे जनतेप्रति असणारे दुर्लक्ष ही परिस्थिती शिवाजीने बदलली. तो लोककल्याणकारी राजा बनला. सामान्य, स्थानिक लोकांचे हित जपणारा राजा, एक उत्तम शासनकर्ता म्हणून शिवाजी मध्ययुगात वेगळा उठून दिसतो. शासनासमोर सर्व सारखे ही आधुनिक काळातली संकल्पना शिवाजीने काही अंशी मध्ययुगातच स्वीकारलेली दिसते.स्त्रियांना मानाची वागणूक ही देखिल तत्कालिन परिस्थितील वेगळी उठून दिसणारी.
राज्यकारभाराच्या स्तरावर योग्य, अनुभवी व्यक्तींची अतिशय नेमकी पारख शिवाजीने केली. करवसूली, हिशोब तपासणी आणि विनियोगावरील योग्य पकड, यातून मराठी राज्याची आर्थिक परिस्थिती उत्तम केली. शेतजमिनीची प्रतवार मोजणी, योग्य कर आकारणी, वसुली आणि अतिशय स्वच्छ , पारदर्शी अर्थव्यवस्था शिवाजीने निर्माण केली. जोडीने न्यायव्यवस्थेतील निरपेक्षपणाही जपला . जात, धर्म, नातेवाईक कसलाही भेदभाव या न्यायव्यवस्थेत ठेवला नाही.
एकुणातच मध्ययुगातील सर्व अंधःकारमय बाजू दूर करणारी अशी ही शिवाजीची कारकिर्द! आणि म्हणूनच वेगळी, मानाची, अभिमानाची !
आज या निमित्ताने शहाजी आणि शिवाजीला एक कडक सलाम ____/\____

___

शिवाजी आणि सुरत लूट : वस्तुस्थिती 


( इथे शिवाजीला एकेरी उल्लेखले आहे, त्यात त्याचा उपमर्द करायचा अजिबात हेतू नाही हे कृपया लक्षात घ्यावे. )
शिवाजी - इंग्रज संबंध - महत्वाच्या घटना :
१. राजापूर वखार, १६६० : १६५९ मध्ये अफजल खानावर विजय मिळवल्या नंतर मराठी फौजा कोकणात उतरल्या. त्यांनी दाभोळपर्यंत मजल मारली. दाभोळचा आदिलशाही अधिकारी राजापूरला पळून गेला. त्याचा पाठलाग करीत मराठी सैन्य राजापूरला पोहोचले. राजापूरचा सुभेदार अब्दुल करीमने घाबरून आपली जहाजे घेऊन पळू लागला. तेव्हा राजापूरच्या इंग्रजांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. ( कारण त्याने इंग्रजांकडून कर्ज घेतले होते, अन तो पळून गेला असता तर इंग्रजांचा आर्थिक तोटा झाला असता. ) मराठ्यांनी त्याचा ताबा मागितला. परंतु इंग्रजांनी ते मानले नाही. तेव्हा मराठ्यांनी राजापूर वखारीवर हल्ला केला. इंग्रजाचा राजापूरमधील दलाल बालाजी याला मराठ्यांनी पकडले.
२. राजापूर वखार, १६६१: सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. या वेढ्यासाठी आवश्यक असा दारुगोळा इंग्रजांनी पुरवला होता. शिवाय इंग्रजी सैन्यही या वेढ्यात सामिल झाले होते. पुढे याच वर्षी शिवाजीने राजापूरवरती मोठी फौज पाठवली. आणि राजापूर वखार लुटवली. जमिनीखालची संपत्ती मिळवण्यासाठी पूर्ण वखार खणून काढली. काही इंग्रजी अधिकार्‍यांना मराठ्यांनी ताब्यातही घेतले. पुढे अनेकदा या कैद्यांबद्दल इंग्रजांनी शिवाजीशी पत्रव्यवहार केला. अखेर १६६३ मध्ये या कैद्यांची शिवाजीने सुटका केली.
३. सुरत लूट १६६४ : सुरत लूटताना परकीय वखारी लुटण्याचा शिवाजीचा अजिबात विचार नव्हता. त्यानुसार कोणत्याही वखारीला हात लावला गेला नाही. इंग्रजांच्या वखारी शेजारी हाजी सैय्यद बेग या श्रीमंत व्यापार्‍याचा वाडा होता. त्यामुळे आपल्या वखारीला धोका होऊ नये म्हणून इंग्रजांनी त्याला संरक्षण द्यायचे ठरवले. परंतु मराठ्यांनी हा वाडा लुटला. इंग्रजांनी मराठ्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजीने निरोप पाठवला की इंग्रजांनी नुकसानभरपाई म्हणून तीन लाख रुपये मराठ्यांना द्यावेत. परंतु त्याबद्दल कोणताच तगादा न लावता मिळालेली लूट घेऊन शिवाजी परतला.
४. सुरत लूट, १६७० : याही वेळेस परकीयांच्या वखारींना धक्का लावला गेला नाही.
५. राजापूर वखार, १६७२ : १६६१ च्या घटनेमुळे राजापूर वखारीचे जे नुकसान झाले होते त्याबद्दल इंग्रजांनी वेळोवेळी शिवाजीशी पत्रव्यवहार केला. अखेर १६७२ मध्ये शिवाजीने पाच हजार होन नुकसान भरपाई देण्याचे तत्वतः कबूल केले.
६. हुबळी वखार १६७३ : आदिलशाहीशी चाललेल्या युद्धा दरम्यान मराठ्यांनी हुबळीची इंग्रजांची वखार लुटली.
७. राजापूर वखार १६७४ : पुन्हा चर्चा होऊन शिवाजीने नऊ हजार होनांची नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. ही भरपाई इंग्रजांनी राजापूरमधल्या जकातीतून इंग्रजांनी ती वसूल करून घ्यावी असे ठरले.
८. राज्याभिषेकाच्या वेळेस १६७४ मध्ये इंग्रजांशी पुन्हा बोलणी झाली. शिवाजीने नुकसान भरपाई देण्याचे तत्वतः कबूल केले परंतु अखेर पर्यंत त्याने ही नुकसानभरपाई दिली मात्र नाही.
या शिवाय काही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, इंग्रजांनी वेळोवेळी शिवाजीच्या कारभारात हस्तक्षेप केला, शिवाजीच्या अनेक शत्रूंना त्यांनी दारुगोळया पासून सैन्य पुरवण्यापर्यंत मदत केली होती.
या सर्व बाबींचा विचार आपण आजच्या काळात न करता मध्ययुगातल्या संदर्भात विचार केला पाहिजे. त्या वेळची राजकीय परिस्थिती, शत्रू-मित्र या संदर्भातली त्या काळची गणिते आणि मध्ययुगातील राजकारण याचा संदर्भ लक्षात ठेऊन विचार केला पाहिजे.

___

मध्ययुगाचा शेवट आणि प्रबोधनकाळाची सुरुवात 

निसर्गाच्या घडामोडीतील मानवची निर्मिती काही  लाख वर्षांपूर्वीची .  त्यातही आजच्या मानवाचा इतिहास  गेल्या एक लाख  वर्षांपासूनचा.
या संपूर्ण इतिहासाचे दोन प्रमुख भाग पडतात. इतिहासपूर्व  काळ आणि ऐतिहासिक काळ .
ऐतिहासिक कालखंडाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे तीन मुख्य भाग पडतात.  प्राचिन प्रगत संस्कृतीचा काळ साधारण इ.स.पू. ५००० ते इ.स. ५०० पर्यंत मानला जातो. सुमेरियन, चिनी, इजिप्त, सिंधु, ग्रीक, रोमन या काही महत्वाच्या संस्कृती. शेती, व्यापार, शासनव्यवस्था, विज्ञान, कला, साहित्य अश विविध अंगांनी या संस्कृत्यानी आपली प्रगती साध्य केली.

कालांतराने या संस्कृती काही कारणांनी एकतर नामशेष झाल्या अथवा तेथील राज्यकर्ते दुर्बळ बनले.  त्यामुळे या संस्कृत्यांमधली प्रगती थंडावली.  येथून  पुढील  काळात त्या त्या मानवी समाजामध्ये शिथिलता, धर्माचे प्राबल्य, कर्मकांडांचे महत्व आणि एकूणच आहे त्या परिस्थितीत राहण्याचा कल निर्माण झाला.  स्वाभाविकच प्रगती नाही, नवे विचार नाहीत, नवीन शोध नाहीत अशी काहीशी स्थितिशील जीवनपद्धती या मानवी समुहांनी स्विकारली.  म्हणूनच या कालखंडाला अंधकाराचे युग, तमोयुग असे म्हटले गेले.  हेच ते मध्ययुग!
प्रदेश परत्वे या मध्ययुगाचा कालखंड वेगवेगळा होता. युरोपमध्ये साधारण सहावे ते तेरावे शतक, आशिया खंडात नवव्या शतकापासून ते अठराव्या शतका पर्यंत तमोयुग मानले जाते.
साचेबंदपणा, अराजकता, अंधश्रद्धा, अस्मानता, काम आणि मोबदला याचे विषम वाटप ही या मध्ययुगाची काही ठळक वैशिष्ठ्ये !
कालांतराने याही परिस्थितीमधे बदल होऊ लागला. समाजातील सरंजामदार, धर्मगुरु यांचे महत्व कमी होऊ लागले. राजा, व्यापारीवर्ग, मध्यमवर्ग यांचे स्थान महत्वाचे बनू लागले. ख्रिश्चन मुस्लिम धर्मीयांमधे संघर्ष होऊ लागला. युरोपमधील लोकांचा इतर खंडातील लोकांशी संपर्क वाढू लागला. भौगोलिक शोध, राजसत्तेचा वाढता प्रभाव, नवीन शास्त्रीय शोध, कलेच्या क्षेत्रातील नवीन विचार-प्रयोग सुरु झाले. धर्माबाबत विचार सुरु झाला.
समाजातील ह्या नवीन वैशिष्ठांनी युक्त अशा काळाला प्रबोधन कालखंड ( रेनेसाँ पिरियड) असे संबोधले जातेे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद इ. नवीन आधुनिकतेची मुल्ये या प्रबोधन काळाची देन आहेत.  

या सर्व घडामोडींची सुरुवात झाली ती एका वेगळ्याच घटनेमुळे ! त्याकाळातही युरोपमधील देशांनी आशिया खंडातील देश यांचा व्यापार  चालत असे, तो प्रामुख्याने खुष्कीच्या मार्गाने- जमिनीवरील रस्त्यामार्फत. या व्यापारीमार्गावरती एक महत्वाचे ठिकाण होते ते म्हणजे कॉन्स्टॅन्टिनोपल! 
मध्ययुगाच्या शेवटी शेवटी अरबस्थानातील मुस्लिम टोळ्यांची ताकद वाढत गेली. अरबस्थानातील तेव्हाची प्रगतीहि  आपण पाहिली . या त्यांच्या प्रगतीमुळे त्यांची ताकद वाढत गेली. आणि १४५३ मधे या अरबस्थानातील मुस्लिम टोळ्यांनी कॉन्टंटिनेपल जिंकून घेतले. तसं बघायला गेले तर त्या काळात एखादे शहर, एखादा देश जिंकण हरणं सतत होत होतं, कारण या काळात सतत लढाया होतच असत. पण कॉन्टंटिनपलची गोष्टच वेगळी होती. ज्याचा कॉन्टंटिनपलवर कब्जा त्याचा युरोप व आशियाच्या व्यापारावर ताबा. अशी परिस्थिती होती. 

आता पर्यंत या व्यापारावर युरोपीय ख्रिश्चन व्यापाऱ्यांचा मक्ता होता. पण व्यापारी मार्गावरचे मोक्याचे ठिकाण,  कॉन्स्टॅन्टिनोपल मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हाती गेले. अन सगळा खेळ पालटला. पूर्वी व्यापारी ख्रिश्चन अन राज्यकर्तेही ख्रिश्चन. त्यामुळे या व्यापाराला चालना मिळावी म्हणून ख माफक असत. पण आता राज्यकर्ते मुस्लिम अन व्यापारी ख्रिश्चन. स्वाभाविक राज्यकर्त्यांनी कर वाढवले. जो व्यापार पूर्वी अतिशय फायद्याचा होता; आता तो इतका फायद्याचा राहील नाही. स्वाभाविकच आता काय करता येईल? ज्यान्वये पूर्वी सारखा व्यापार फायदेशीर होईल असा विचार करणे भाग पडले. 
अन मग त्यातून कॉन्स्टॅन्टिनोपलच्या ऐवजी दुसरा कोणता मार्ग आपल्याला सापडू शकतो का याचा प्रयत्न सुरु झाला. अनेक खलाशी पुढे झाले. अनेक ख्रिश्चन, युरोपीय राजांनी आर्थिक मदत या खलाशांना देऊ केली. एकुणात व्यापार पुन्हा फायद्याचा व्हावा हि सर्वच युरोपियन लोकांची गरज होती. अन जसे प्रयत्न सुरु झाले; नवे मार्ग सापडत गेले. कोलंबस हा खलाशी नवा मार्ग शोधता शोधता चुकून नवीन भूमीवर  अमेरिकेच्या बेटांवर गेला. तर वास्को ग गामा हा संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून थेट भारतात पोहोचला. तर मॅगेलन याने पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणाच केली. 

एकदा कामाणूस विचार करू लागला कि हे विचार करणे सर्वच बाबतीत तो करू लागतो. या नवीन व्यापारी मार्गांबाबतही तसाच झाले. जर व्यापारासाठी नवीन मार्ग सापडू  शकतो तर इतर बाबतीतही काही वेगळे मार्ग असू शकतील का याचा विचार मध्ययुगीन माणूस करू लागला. मग यातूनच विविध कला- चित्र कला, शिल्पकला, संगीत यांत काही नवीन विचार, प्रयोग सुरु झाले. इतकेच नाही तर एकुणातच आपल्या जीवनपद्धतीबाबत माणूस नवीन विचार करू लागला. मग राजा, देव, धर्म, मूल्य, तत्त्वज्ञान या सर्वांबाबत विचार सुरु झाले. 

तशात आता पर्यंत ख्रिश्चन धर्म हाच श्रेष्ठ धर्म असे युरोपीय जगात मानत होते. पण असे असूनही ख्रिश्चन आणि मी इस्लाम धर्मीय यांच्यातील युद्धात आता फक्त ख्रिश्चनांचाच विजय अशी परिस्थिती राहिली नाही. आपण समजतो त्यापेक्षा प्रत्याक्षात काही वेगळे घडू शते, वेगळे असू शकते. आपण आजपर्यंत मानत होतो त्यापेक्षा वेगेळे वास्तव असू शकते याची सुस्पष्ट जाणीव युरोपीय समाजाला होऊ लागली. यामुळे धर्माबाबत नवीन विचार मांडले जाऊ लागले. 

या सर्व घडामोडींमुळे आजवर जे जे मानले ते ते पुन्हा तपासून बघायची प्रेरणा युरोपमध्ये निर्माण झाली. यातूनच मग अनेक नवनवे विचार, तत्वज्ञान, नवनव्या पद्धती युरोपमध्ये मांडलया जाऊ लागल्या. आपली आजवरची सर्व जीवनपद्धती पुन्हा तपासून पाहिली जाऊ लागली. यालाच रेनासान्स किंवा प्रबोधन असे म्हटले जाते. प्र -बोधन म्हणजे प्रकर्षाने बोध होणे - समजणे. दिसणे आणि पाहणे, माहिती आणि ज्ञान. यात जो फरक आहे तो यात  अपेक्षित आहे. एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असते पण तरी ती आपल्याला जाणवत नाही वा आपले लक्ष जात नाही, हे पाहणे वा माहिती.  पण जेव्हा त्या गोष्टी बद्दल आपल्या नीट जाणीव होते , आपल्या मनात त्या  गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद होते तेव्हा ते दिसणे असते, ते ज्ञान असते.  चवदाव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत युरोपमध्ये हे असे  प्रत्येक गोष्टीबाबत जाणीवपूर्वक ज्ञान होणे घडू लागले. आणि म्हणून या काळाला युरोपचा प्रबोधन काळ असे म्हटले जाते. या प्रबोधन काळात काय काय बदल झाले ते आपण पुढे पाहू. 
___

लोकशाही समाजवाद 

यामध्ये दोन विचारसरणी एकत्र आल्या आहेत. लोकशाही आणि समाजवाद
लोकशाही म्हणजे काय हे बहुतांशी आपणास माहिती असते. समाजवाडा बद्दल मात्र काही शंका मनात असू शकतात.
लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. अगदी साधी सोपी, सरळ व्याख्या म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून केलेले राज्य. परंतु हि व्याख्या अतिशय सोपी, खरं तर अतिशय डायल्युट पातळ केलेली व्याख्या आहे. फार पूर्वी ग्रीक नागरराज्यामध्ये लोकशाहीची सुरुवात झाली. कालांतराने परिस्तितीनुरूप त्यात बदलही होत गेले. आज प्रामुख्याने वास्तवात आहे ती लोकशाही म्हणजे अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही. यामध्येहि काही प्रकार आहेत, परंतु आता त्या तपशिलात जायला नको. इतकंच माहिती असू द्या कि एखाद्या देशातील लोक सार्वत्रिक मतदानाने आपले प्रतिनिधी निवडून देतात. आणि हे प्रतिनिधी लोकांच्यावतीने राज्याचा कारभार चालवतात.

लोकशाही हि प्रामुख्याने राज्यव्यवस्था कशी चालावी या संदर्भात आहे. तर समाजवाद हा समाजातील उत्पादनांच्या साधनांच्या मालकी बाबत आहे. कोणत्याही समाजामध्ये उत्पादनाची साधने असतात. जसे कि जमीन, कारखाने, कलाकौशल्याची साधने, कार्यालये, उद्योग, व्यापार, पर्यटन, असे सर्व ज्यातून अर्थ/ पैसा उत्पन्न होतो अशा सर्व गोष्टी. ह्या उत्पादनांच्या साधनांवर कोणाचा अधिकार असेल ह्यावरून त्या त्या समाजाची अर्थव्यवस्था ओळखली जाते.

या दोन्हीची एकत्रित  व्यवस्था म्हणजे लोकशाही समाजवाद.म्हणजे  एखाद्या समाजामध्ये राज्यकारभाराचे अधिकार लोकनियुक्त प्रतिनिधींकडे सोपवले असतील. आई समाजातील सर्व उत्पादनांच्या साधनांचें अधिकार या लोकनियुक्त सरकार कडे सोपवलेले असतील.
या व्यवस्थेमध्ये सरकारही लोकांचे आणि उत्पादनाची साधने अशा लोकांच्या सरकारकडे असल्यामुळे लोकांचे जास्तीत जास्त भले कसे होईल हे राजकीय आणि आर्थिक बाबतीतही बघितले जाईल. समाजाच्य जडणघडणीतील रहा आणि राजकारण असे लोकोपयोगी असले कि आपोआपच असा समाज जास्ती प्रगती करेल, जास्ती  सुखी असेल असे मानले जाते.

___


उजवी आणि डावी विचारसरणी 

परंपरावादी  आणि सुधारणावादी अशा विचारसरणीच्या लोकांसाठी ह्या संज्ञा प्रामुख्याने वापरल्या जातात.याची सुरुवात फ्रान्समध्ये झाली. तेथील लोकसभेतील बैठक व्यवस्थेवरून हि नावे पडली. परंपरावादी नेते उजव्या बाजूला बसत असत. तर नव्या विचारांचे सुधारणावादी नेते डावीकडे बसत असत. यावरून हे नावे पडली.

प्रत्यक्षात खुप वैचारिक वैविध्य या दोन प्रणालीत आहेत. इतकेच नव्हे तर या दोन मुख्य विचारसरणीच्या अंतर्गतही अनेक वेगवेगळे विचारप्रवाह वाहतात. प्रामुख्याने जरी राजकारणात या संज्ञा वापरल्या जात असल्या तरी मुळातून या तत्त्वप्रणाली आहेत. 


उजवी विचारसरणी हि अधिकारशाही, वर्गीकरण, श्रेणिबद्धता, उतरंड , कर्तव्य, परंपरा,राष्ट्रवाद या विचारांना प्राधान्य देते. उजव्या विचारसरणीचे लोक हे; परंपरावादी, भांडवलशाहिला प्रोत्साहन देणारे, साम्राज्यवादी, एकाधिकारशाही , फॅसिस्ट ( सर्वंकष सत्तावादी ), प्रतिगामी विचारांचे, पुराणमतवादी मानले जातात.

आता यात आलेल्या सर्व संज्ञाचा अर्थ समजून घेऊ.

१. अधिकारशाही : समाज / राज्याचे सगळे अधिकार एका व्यक्तीच्या हाती असतील.
२. वर्गीकरण : समाजातील सर्व लोकांचे वर्गानुरूप विभाजन केले असेल.
३. श्रेणीबद्धता : समाजातील हे वर्गीकरण पायऱ्यापायऱ्यांच्या स्वरुपात असेल.
४. उतरंड : या पायऱ्यांची एक न बदलणारी उतरंड  असेल
५. परंपरा : समाजातील वर्षानुवर्षे चालता आलेल्या परंपरांंना जपले जाईल.
६. राष्ट्रवाद : आपल्या देशाबद्दल आत्यंतिक प्रेम अणि आदर असेल.
७. भांडवलशाही : समाजातील उत्पादनाची साधने, त्यांची मालकी अणि सर्व अधिकार समाजातील काहीच व्यक्तींच्या होती असतील.
८. साम्राज्यवाद : आपल्या देशाच्या उन्नत्तीसाठी इतर देशांवर अधिकार गाजवून, त्यांचे स्वातंत्र्य झिडकारुन त्यांच्यावर राज्य करणे .
९. एकाधिकारशाही : देशाचे सर्व राजकीय अधिकार एका व्यक्तीच्या हाती असणे .
१०. सर्वंकष सत्तावादी : देशातील सर्वच्या सर्व अधिकार एकाच व्यक्तीच्या हाती असावी असे मानणारे.
११. प्रतिगामी विचार : जुन्या काळाप्रमाणेच विचार, काळाप्रमाणे न बदलणारे विचार.
१२. पुराणमतवादी : परंपरेने चालत आलेले/ लिहून ठेवलेलेच नियम पाळणारे.

डावी विचारसरणी हि स्वातंत्र्य, समानता, बंधुता,अधिकार, प्रगती, आणि आंतरराष्ट्रीयता (संस्कृतमध्ये म्हणतो तसे वसुधैैव कुटुुंबकम) मानणारी विचारसरणी होय. अणि डावे विचारवंत हे, अराजकतावादी, साम्यवादी, लोकशाही समाजवादी, प्रगतिशील, उदारमतवादी, पुरोगामी मानले जातात.

आता यात आलेल्या सर्व संज्ञाचा अर्थ समजून घेऊ.

१. स्वातंत्र्य : व्यक्तीला काहीही करण्यासाठी मुभा असणे.  कोणाच्याही परवानगीची गरज नसणे
२. समानता : समाजातील सर्व व्यक्ती समान असणे.
३. बंधुता : समाजातील सर्व व्यक्ती एकमेकांशी प्रेमाच्या भावनेने जोडलेल्या असतील.
४. अधिकार : प्रत्येक व्यक्तीला आपले आचार, विचार, कृती निवडण्याचे परवानगी असणे .
५. प्रगती : समाजात नवीन विचारांना परवानगी असेल आणि त्याआधारे नवीन आयाम शोधले जातील.
६. आंतरराष्ट्रीयता : एका विशिष्ट देशापुरतेच आपले कर्तव्य न ठेवता, संपूर्ण जगाच्या भल्याचा विचार करणे.
७. अराजकतावादी :  समाजावरती राजकीय सत्तेचा अंकुश अमान्य असणे. किंवा समाजाच्या जीवनपद्धतीत  राजकीय सत्तेचा कमीत कमी प्रभाव असेल.
८. साम्यवादी :  अशी राज्यव्यवस्था जिथे कामगारांचे राज्यसंस्थेवर नियंत्रण असेल.
९. लोकशाही समाजवाद : अशी राज्यव्यवस्था जिथे समाजाच्या उत्पादनांच्या साधनांवर लोकनियुक्त सरकारचे नियंत्रण असेल.
१०. उदारमतवादी : समाजामध्ये विविध विचार, आचार, कृतींना सामान पातळीवर मानले जाईल.
११. पुरोगामी : काळ आणि परिस्थितीनुरूप बदलांना मान्यता देणारे.

___

न्या. महादेव गोविंद रानडे 


भारताच्या इतिहासात एकोणिसावे शतक हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या शतकामध्ये सुरु झालेल्या प्रबोधन प्रक्रियेने येथील समाजाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. समाजातील अनेकविध गोष्टींमध्ये याच काळात मोठे आणि महत्वपूर्ण बदल घडून आले. येथील समाजजीवनातील धर्मकल्पना, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षणपद्धती, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, वाङमय, न्यायव्यवस्था या सर्वांवर प्रबोधनाने आपली छाप उमटवली.
राजा राममोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग, दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, म. फुले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गो.ग. आगरकर, लो. टिळक या आणि अशा अनेकांनी प्रबोधनाची धुरा सांभाळली.
सर्वांगीण सुधारणा हे भारतीय प्रबोधनाचे वौशिष्ट्य होय. समाजातील सर्व घटकांबाबत या प्रबोधन काळात विचारमंथन झाले. या प्रबोधनाचे एक उत्तम उदाहरण म्हणून न्या. म.गो. रानडेंचे विचार आणि कार्य यांकडे पाहता येते.
इ.स. १८४२ साली नाशिकमध्ये महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला. कोल्हापूर, मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश व पुढे सर्न्यायाधीश म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली. पुढे बदली निमित्याने पुण्यात आल्यावर न्या. रानडेंचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्व आघाड्यांवर कार्य सुरू झाले.
भारतीय समाज, भारतीय व पाश्चात्य परंपरा, भारतीय व पाश्चात्य ग्रंथ आणि भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान या सर्वांच्या सखोल अभ्यासातून त्यांच्या विचारांना खोली प्राप्त झाली होती. एकीकडे येथील संतपरंपरा आणि दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवाद या दोन्हींचा समन्वय येथील सुधारणेसाठी त्यांनी योग्य मानला.
न्या. रानडेंच्या मते, समाज हा एखाद्या सजीवाप्रमाणे असतो. समाजाची धर्म, राजकारण, अर्थकारण ही विविध अंगे एकमेकांशी संलग्न असून, एकमेकांना पूरक असतात. एका शरीराचे काही अवयव दुबळे आणि काही शक्तीमान असे असू शकत नाहीत. तसेच मानवी समूहाचे काही भाग सुधारलेले आणि काही भाग मागासलेले असू शकत नाहीत. समाजातील विविध भागांची एकत्रित प्रगती होणे हे न्या. रानडेंनी आवश्यक मानले.
भारतातील सामाजिक परिस्थितीचा विचार करताना येथील समाजातील विविध समस्यांबद्दल न्या. रानडेंनी विचार मांडले. धर्म, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षण, इ. बाबत सुधारणा त्यांनी सुचवल्या. येथील समाजव्यवस्थेमध्ये काही दोष आहेत आणि त्यात सुधारणा घडवून आणायच्या, तर काही मूलभूत बदल करावे लागतील याची जाणीव न्या. रानडेंनी करून दिली. येथील समाजातील दोष - उदा. कुपमंडूक वृत्ती, तुटकपणा, ग्रंथप्रामाण्य, जातीभेद, चुकीच्या रुढी-परंपरांना चिकटून राहणे, दैववाद, इतिहासाबद्दलची अनास्था या सर्वांना दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मांडले. कोणत्याही समाजामध्ये बदल सहजासहजी होत नाहीत, तसेच ते अचानकही होत नाहीत; यावर न्या. रानडेंचा विश्वास होता.
समाजात वेगवेगळ्या मनोवृत्तीचे लोक असतात आणि या सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा करावयाची असल्याने सुधारणेचे तीन मार्ग त्यांनी सुचवले. समाजातील काही बदल परंपरेचा, धर्माचा आधार घेऊन केले पाहिजेत; काही बदल बुद्धीला पटेल अशा तर्कशुद्ध विवेचनाने घडवून आणले पाहिजेत; तर काही बदलांसाठी प्रसंगी कायद्याची मदत घेतली पाहिजे असे न्या. रानडे मानत.
समाजव्यवस्थेतील बदल ताबदतोब साध्य होणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. सामाजिक सुधारणेसाठी विविध प्रवृत्तीच्या लोकांना आणि विविध संस्थांना एकत्र आणून सुधारणेस योग्य अशा वातावरण निर्मितीसाठी न्या. रानडेंनी प्रयत्न केले. सार्वजनिक सभेतील त्यांचे कार्य याची साक्ष देते.
भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करताना मुख्यत: तीन गोष्टींवर त्यांनी भर दिला. ब्रिटिश राज्यकर्ते गोळा करीत असलेली खंडणी, व्यापाराच्या बदललेल्या स्वरूपातून होणारी हानी आणि भारतीयांची उद्योगाप्रति असलेली उदासीनता.
ब्रिटिश राज्यकर्ते हिंदुस्थानामध्ये राहून राज्य करीत नसल्याने येथील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला. महसूल, इतर कर, अधिकार्‍यांचे पगार, कर्जाचे व्याज इ. मार्फत हिंदुस्थानातील पैसा इंग्लंडमध्ये जात होता. याला न्या. रनडेंनी 'खंडणी' मानले. ब्रिटिश काळात व्यापाराच्या स्वरूपात बदल झाला.
कच्च्या मालाची निर्यात आणि पक्क्या मालाची आयात वाढली. त्यामुळे येथे येणार्‍या पैशापेक्षा येथून बाहेर जाणार्‍या पैशामध्ये वाढ झाली. आकडेवारीच्या सहाय्याने न्या. रानडेंनी हे सिद्ध केले. येथील लोकांची बचत न करण्याची वृत्ती आणि उद्योगाप्रति असलेली उदासीनता यांमुळे येथील पैशाच्या वाढीला चालना मिळाली नाही, असे मत त्यांनी मांदले.
येथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकर्‍यांच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालणे, उद्योगीकरणाला प्रोत्साहन देणे, उद्योग व शेतीवर सरकारचे नियंत्रण असणे, व्यापारात समतोल राखणे इ. मार्ग त्यांनी सुचवले. तत्कालीन विविध आर्थिक विचारप्रणालींच्या सखोल अभ्यासातून त्यांनी, 'हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती आणि त्यावरचे उपाय' यावर विवेचन केले.
राजकीय संदर्भात विचार मांडताना कायद्याचे राज्य, कायद्याची अंमलबजावणी, जनतेचे हक्क आणि कर्तव्ये, समानता, संसदेतील प्रतिनिधित्व यांचे महत्व त्यांनी विशद केले. या सर्व गोष्टी प्राप्त करावयाच्या तर जनतेने आवश्यक तर सनदशीर मार्गांनी चळवळ उभी केली पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. मात्र ही चळवळ टप्प्या-टप्प्याने केली पाहिजे असे मतही त्यांनी मांडले. 'स्वाभाविक विकासक्रमाच्या अनुषंगाने जे नजिकचे उद्दिष्ट्य आपल्या दृष्टिपंथात येईल त्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आणि औचित्य व व्यासबुद्धी यांच्याशी सुसंगत अशा तडजोडीच्या वृत्तीने ते प्राप्त करून घायचे' असे धोरण ठेवण्याकडे न्या. रानडेंचा कल होता. म्हणूनच, सार्वजनिक सभेच्या मार्फत लोकांना राजकीय शिक्षण देण्याचा त्यांचा मानस होता.
न्या. रानडे हे स्वभावाने नेमस्त व संयमी होते. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश व अतिरेकीपणा हे त्यांच्या प्रकृतीमध्ये नव्हते, तसेच परंपरेचा धागाही त्यांनी तोडून टाकला नाही. प्रा. गं. बा. सरदार लिहितात त्याप्रमाणे, ' आतताईपणे परंपरेची मोडतोड करण्यापेक्षा संथपणे तिची पुनर्घटना करण्यावर त्यांची भिस्त होती.' मराठ्यांच्या इतिहासाचे परिशीलन करताना न्या. रानडेंची ही भूमिका दिसते.
न्या. रानडे यांच्यावरील पाश्चात्य उदारमतवादाचा प्रभाव, त्यांची समन्वयवादी वृत्ती आणि क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर त्यांचा असणारा विश्वास यांमुळे त्यांचे सुधारणेबाबतचे विचार आणि कृती ह्या नेमस्तवादी होत्या. कोणत्याही टोकाला न जाता, जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन, कोणालाही न दुखावणारे मार्ग त्यांनी स्वीकारले. लोकापवाद वा व्यक्ती दुखावल्या जाण्यापेक्षा वेळप्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांनी पसंत केले. कोणत्याही सुधारणेसाठी सक्तीपेक्षा संमतीलाच त्यांनी प्राधान्य दिले.
एकोणिसावे शतक सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. मध्ययुगीन परंपरा ते आधुनिक मूल्ये यांच्यातील तो संक्रमणकाळ होता. एकीकडे ब्रिटिश राजवटीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशपूर्व परंपरेची ओढ आणि दुसरीकडे मध्ययुगीन जीवनपद्धतीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशकालीन मूल्यांची ओढ अशी दोलायमान स्थिती त्या काळात होती. ब्रिटिश राज्याचे दोष दिसत होते; पण त्यामार्फत येणार्‍या आधुनिक मूल्यांचा स्वीकार आवश्यक वाटत होता. अन परंपरेतील दोष दिसत होते; पण आपल्या स्वराज्याचा उच्चार-आचार आवश्यक वाटत होता. या दोन्हींचा योग्य समन्वय न्या. रानडेंनी आपल्या विचार व कार्यात साधला होता.
ब्रिटिश राज्यातली राजकीय धोरणे, आर्थिक धोरणे, शेतकर्‍यांवरील अन्याय, पाश्चात्य आर्थिक विचारप्रणाली यांविरुद्ध त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट मांडणी केली. आणि त्याच बरोबर पाश्चात्य उदारमतवाद, उद्योगशीलता, व्यक्तीवाद त्यांनी तितक्याच स्वच्छ आणि स्पष्टपणे उचलून धरला. येथील चुकीच्या रुढी-परंपरा, ग्रंथप्रामाण्य यांवर बोट ठेवले. आणि येथील मराठ्यांच्या इतिहासाचे अत्यंत संयमित असे परिशीलनही केले. पाश्चात्य संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये स्वीकारताना आपल्या संतपरंपरेचे श्रेष्ठत्वही त्यांनी अधोरेखित केले.
तत्कालिन समाजाची नस त्यांनी बरोब्बर ओळखली होती. ' येथील समाज स्थितीशील आणि पुराणप्रिय आहे. जरा कुठे नव्याचा वास आला की तो बुजतो.' त्यामुळे कोणताही बदल सुचवताना तो नवा आहे असे सांगण्यापेक्षा जुन्या परंपरेचे हे नवे रूप आहे असे सांगण्याचा प्रघात न्या. रानडेंनी पाडला. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांचा उपयोग त्यांच्या मतपरिवर्तनासाठी केला, तर समाजपरिवर्तनासाठी ते अत्यंत उपयोगी साधन ठरेल, असे ते मानत.
एकविसाव्या शतकात, आज भारतासमोर पुन्हा पूर्वीसारखी दुही उभी आहे. एकीकडे पाश्चात्यांचे आर्थिक वर्चस्व व त्यातून उदभवणारे तोटे दिसताहेत. परंतु त्यामार्फत येणार्‍या माहिती-तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य आहे. दुसरीकडे येथील 'विकसनशील' परिस्थितीतील अपूर्णता व दोष दिसताहेत. परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची ऊर्मीही आहे. या नव्या संक्रमणावस्थेत न्या. रानडेंचे समन्वयवादी, संयमित परंतु अचूक व नि:संदिग्ध विचार मार्गदर्शक ठरावेत. भारतीय संस्कृतीतील सातत्य आणि पाश्चात्य संस्कृतीतील बदल या दोन्हींचा मिलाफ आपण कसा साधू यावर आपला भावी इतिहास अवलंबून राहील.
___

नियतीशी संकेत 

१५ ऑगस्ट १९४७, भारत स्वतंत्र झाला. येथे झालेले विचारमंथन, घेतलेले अथक परिश्रम, सोसलेल्या हालअपेष्टा या सर्वांचे चीज झाले.
पं. जवाहरलाल नेहरू - आपल्या आदराचे स्थान. स्वातंत्र लढ्यातील नेते, भारताचे पहिले पंतप्रधान, उत्तम प्रशासक, आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्दी, 'शांतीदूत', इतिहासकार, तत्वज्ञानी आणि मुलांचे चाचा नेहरू; एकाच व्यक्तिमत्वाचे किती विविध पैलू !
स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जनतेने निवडून दिलेल्या घटनासमितीच्या, १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या अधिवेशनात पं. नेहरूंनी भाषण केले. भूतकाळाची योग्य जाण, वर्तमानकाळाचे सजग भान आणि भविष्याचे आव्हान या तिन्हींचे चित्रण पं. नेहरूंच्या या भाषणात आपल्याला दिसते.
पं नेहरूंचे भाषेवरील , भावनांवरील, विचारांवरील आणि घटनेच्या अन्वयर्थावरील प्रभूत्व त्यांच्या शब्दाशब्दात आपल्याला दिसते. त्यांची स्वतंत्र्य लढ्याप्रति असलेली आत्मियता- अभिमान, घडलेल्या दुर्दैवी घटनांबद्दलचे भावस्पर्शी दु:ख आणि उज्ज्वल भवितव्यासाठी उत्कट तळमळ या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या या भाषणात दिसते. खरे तर मूळातून वाचावे असे हे भाषण! (http://www.svc.ac.in/files/TRYST%20WITH%20DESTINY.pdf)
माझ्या अल्पमतीने केलेला त्याचा हा मराठी भावार्थ.
" फार वर्षांपूर्वी आपली नियतीशी ही भेट निश्चित झाली होती. आणि आज आपली प्रतिज्ञा पूर्णत्वाने नव्हे परंतु ब-याच अंशी प्रत्यक्षात घेण्याचा क्षण आला आहे. मध्यरात्रीच्या या प्रहरी, जेव्हा जग झोपले आहे, भारत जागा होतोय; जीवनाप्रति आणि स्वातंत्र्याप्रति ! इतिहासात क्वचितच येणा-या क्षणी आपण जुन्याकडून नव्याकडे जात आहोत. एका युगाचा अंत होतो आहे. अन वर्षानुवर्षे दडपलेला राष्ट्राचा आत्मा आज मुक्त होत आहे. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी; भारतभूमीप्रति, तिच्या जनतेप्रति आणि त्याहून ही महान अशा मानवतेप्रति आम्ही समर्पित होऊ अशी प्रतिज्ञा करणे हे अत्यंत औचित्यपूर्ण ठरेल.
इतिहासाच्या ब्राह्ममुहूर्तावर भारतभूमीने आपला न संपणारा शोध सुरू केला. शतकानुशतके अविरत संघर्ष करून अन जयापजयाचे डोंगर पार करून ! चांगल्या- वाईट प्राक्तनातही भारताची दृष्टी या शोधापासून कधीही ढळली नाही किंवा ज्या आदर्शांनी तिला सामर्थ्य दिले त्यांचे विस्मरणही तिला कधी झाले नाही. आपला अंधःकारमय गतकाळ आज संपतो आहे. भारताला पुन्हा एकदा स्वत्वाची जाणिव होते आहे.
आज आपण साजरी करत असलेली उद्दिष्टपूर्ती ही; आपली वाट पाहणा-या विजयश्रीच्या प्रासादाची केवळ एक पायरी आहे. प्रश्न आहे तो, ही संधी प्राप्त करण्याइतका सुज्ञपणा आणि भावी आव्हाने पेलण्याइतके सामर्थ्य
आपल्यात आहे का?
स्वातंत्र्य आणि सत्ता यांच्या जोडीने जबाबदारीही येते. भारताच्या सार्वभौम जनतेचे प्रतिनिधित्व करणा-या या घटनासमितीवर फार मोठी जबाबदारी आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी तिच्या निर्मितीच्या सर्व वेदनांतून आपण गेलो आहोत; त्यातील दु:खद आठवणींनी आपले अंतःकरण जड झाले आहे; त्यातील काही वेदनांचा सल अजूनही आपण अनुभवित आहोत. असो. भूतकाळ संपला आहे अन भविष्यकाळ आपल्यासमोर उभा आहे.
हा भविष्यकाळ सहजसाध्य किंवा आरामदायक नाही. अविरत आणि प्रचंड प्रयत्नांतूनच आपण वेळोवेळी केलेली आणि आज करणार आहोत ती प्रतिज्ञा, आपण पूर्ण करू शकू. भारताची सेवा म्हणजे लाखो पीडितांची सेवा, दारिद्र्य-अज्ञान-रोगराई यांचे निर्मूलन करणे आणि संधींच्या विषमतेचे उच्चाटन करणे. प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला गेला पाहिजे अशी आपल्या पिढीतील महामानवाची महत्वाकांक्षा आहे. हे आपल्या आवाक्यापलिकडचे असेल; परंतु जो पर्यंत अश्रू आहेत, दु:ख आहे तोपर्यंत आपले कार्य संपणार नाही.
आणि म्हणूनच आपण सोसले पाहिजे, काम केले पाहिजे, कठोर परिश्रम केले पाहिजेत; तरच आपली स्वप्ने साकार होऊ शकतील. जी भारताची स्वप्ने आहेत, इतकेच नव्हे तर संपूर्ण जगाची आहेत, सर्व राष्ट्रांची आहेत, सर्व जनतेची आहेत. आज मानव एकमेकांशी अनेकविध धाग्यांनी जोडला गेला आहे की एकमेकांशिवाय जगणे त्याला अशक्य आहे. शांतता ही विभागता येत नाही; त्याच प्रमाणे स्वातंत्र्यही, त्याच प्रमाणे आता वैभवसंपन्नताही आणि या एकमेव जगातील सर्वनाशही; आता फार काळ इतरांपासून फुटून - वेगळे असे एकट्याचे काही असणार नाही.
ज्याचे आम्ही प्रतिनिधी आहोत अशा भारतीय जनतेला आम्ही आवाहन करतो की, त्यांनी या उदात्त साहसात श्रद्धा आणि विश्वासाने आमच्या मागे उभे रहावे. आताची ही वेळ क्षूद्र आणि घातक टीकेची, अनिष्ट चिंतनाची वा दुस-यावर दोषारोपण करण्याची नाही. जेथे भावी पिढी सुखाने नांदेल अशा स्वतंत्र भारताच्या प्रासादाची उभारणी आपण केली पाहिजे. मान्यवर, मी असा प्रस्ताव करण्याची विनंती करतो की, असा निर्णय घेतला जावा की -
१. मध्यरात्रीच्या शेवटच्या ठोक्यानंतर या घटना समितीमधील उपस्थित असलेले सर्व सदस्य पुढील प्रतिज्ञा करतील :
भारतीय जनतेने त्याग आणि यातना सोसून स्वातंत्र्य मिळवले. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी मी,... घटना समितीचा सदस्य म्हणून भारताच्या आणि येथील जनतेच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेईन, की ज्या योगे ही प्राचीन भूमी तिचे जगातील सुयोग्य स्थान प्राप्त करून जागतिक शांततेसाठी व मानवतेच्या कल्याणासाठी मनोभावे भरीव सहयोग देईल.
२. या प्रसंगी जे सदस्य उपस्थित नाहीत, तेही अशीच प्रतिज्ञा ( राष्ट्रपती जे बदल सुचवतील त्यानुरुप) समितीच्या पुढच्या सत्रात करतील. "
( पूर्वप्रकाशित : "माध्यम" - टिळक महराष्ट्र विद्यापीठ. पुन:प्रकाशानासाठी परवानगी दिल्याबद्दल मा. डॉ. दीपक टिळक सरांचे आभार )
___

काश्मीरचा इतिहास भाग १,२,३

( डिसक्लेमर : इथे शक्य तितका निरपेक्ष इतिहास लिहिते आहे. फॅक्टस काय आहेत हे सर्वांपर्यंत पोहोचावं हा उद्देश.सध्या अर्धवट माहिती आणि सरसकट विधानं अशी परिस्थिती आसपास आहे. म्हणूनच  इथे या लेखनात कोणतेही मूल्यमापन, चूकबरोबर असं पूर्णत: टाळले आहे. आशा आहे त्याच दृष्टिकोनातून वाचले जाईल. इथल्या अनेक जणी अभ्यासू आहेत. माझ्या लिखाणात काही सुधारणा असतील तर जरूर कळवा, शक्यतो संदर्भासकट. सो मला माझं लिखाण तपासून पहाता येईल. धन्यवाद!)

भाग १.

“Paradise is a promise no god bother to keep. There’s only now, and tomorrow nothing will be the same, whether we like it or not.

- Heidi Heilig


प्राचीन काळात काश्मीर हा प्रदेश नेहमीच स्वतंत्र, सार्वभौम होता. अनेक आक्रमक आले, गेले. अनेकदा हा प्रदेश आक्रमकांच्या नियंत्रणाखाली आला, कालांतराने पुन्हा स्वतंत्र झाला.

काश्मीरचा पहिली ओळख सापडते तो कश्यप ऋषींच्या संदर्भात. कश्यप ऋषींनी त्यांच्या बरोबरच्या लोकांच्या साठी काश्मीर मधील तळे कोरडे केले आणि वसती साठी जागा तयार केली. यावरून कश्यापा + मीर = काश्मीर असे नाव पडले असे मानले जाते.

आणखीन एक कथा आहे ती राजा जंबू याची. हा राजा शिकारी साठी तावी नदी किनारी फिरत फिरत आला. आणि या प्रदेशाच्या तो प्रेमात पडला. त्याने इथे आपले गाव वसवले. त्याच्या नावावरून जम्मू हे नाव पडले असे मानले जाते.

पहिले मोठे झाले आक्रमण झाले ते इ. स पू. ३२६च्या दरम्यान, अलेक्झांडर द ग्रेट याचे. काश्मीर मधले एक गाव अजूनही त्याची आठवण ठेऊन आहे. अलेक्झंडरच्या घोड्याच्या नावावरून बुफिया हे गाव ओळखले जाते. तिथे त्याची समाधी आहे.

काश्मीर मध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांना, धर्मांना सामावून घेतेले गेले. अगदी सुरूवातीला हिंदू धर्मातील शैव पंथाचा इथे प्रसार झाला. अमरनाथ हे त्यांचे प्रसिद्ध दैवत! पुढे इ. स.२५० आसपास बौद्ध धर्माचाही इथे प्रसार झाला. खैबर खिंडीतून आलेल्या मुस्लिम आक्रमकांबरोबर मुस्लिम धर्माचाही इथे प्रसार झाला. पुढे नंद ऋषींनी इथे सूफी संप्रदाय वाढवला. हे सर्व धर्मीय एकोप्याने काश्मीर मध्ये रहात होते. त्यांची म्हणून एक वेगळी जीवनसरणी हळूहळू तयार होत गेली. जेवणाची विशिष्ट पद्धत – वाजवान. वेशभूषा. राहणीमान. कला.

जम्मूतील हिंदू संस्कृती, तिबेट मधली बौद्ध संस्कृती आणि मध्य आशियातील मुस्लिम संस्कृती यांचा मिलाफ बनून सर्वच बाबतीत एक वेगळी, स्वतंत्र संस्कृती काश्मीरमध्ये तयार होत गेली.

चवदाव्या शतकात , सुलतानी राजवटीमध्ये मुस्लिम जनतेमध्ये वाढ होत गेली. परंतु अल्पसंख्यांक हिंदूंनी राजदरबारातील प्रशाकीय जागा मिळवल्या. जोडीने व्यापार, शिक्षण यातही हिंदूंनी आपला जम बसवला. समाजातील सधन समाजात त्यांचा समावेश होता. मात्र मुस्लिम जनता प्रामुख्याने शेती आणि कलाकारी मध्ये काम करत राहिली.

सोळाव्या शतकात सुलतानशाही संपवून मुघल सत्ता उत्तर हिंदुस्थानात आली, काश्मिर मध्येही. परंतु  इ. स. १७७५ मध्ये अफगाणी टोळ्यांनी काश्मीर जिंकून घेतला. इ. स. १८१९ पर्यन्त अतिशय जुलमी अशी ही राजवट काश्मीरवर आपली सत्ता टिकवून होती.

इ. स. १८०० पासून शिखांनी आपला प्रभाव वाढवला. काश्मीर पर्यन्त त्यांनी आपले राज्य वाढवले. राजा रणजीत सिंग या अतिशय बलाढ्य राजाच्या नेतृत्वाखाली सर्वच उत्तर हिंदुस्थानात शिखांनी आपले बस्तान बसवले. रणजीत सिंग यांनी गुलाबा सिंग या डोगरा जमाती मधल्या नेत्याला काश्मीर मध्ये पाठवले. जोरावर सिंग या सेनानीच्या मदतीले गुलाब सिंग यांनी काश्मीर वरती आपले राजी प्रस्थापित केले काश्मीर व्हॅली, जम्मू आणि लडाख हे सर्व प्रांत गुलाबासिंग ने आपल्या अधिपत्याखाली आणले. एका अर्थाने आज जो काश्मीर आपण पहातो, तो गुलाबसिग यांनी प्रथम निर्माण केला. (इ. स. १८३४) इतकेच नव्हे तर लडाख, गिलगीट, बल्टिस्थान, गारटोक ( मान सरोवरा पर्यंत ) असे प्रांत जिंकून काश्मीरच्या सीमा अफगाणिस्तान, रशिया, चीन आणि तिबेट पर्यंत ताणल्या.


आज आपण जो काश्मीर ओळखतो तो काश्मीर गुलाब सिंग यांनी निर्माण केला. यात उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दोन महत्वाच्या राजकीय मुत्सद्देगिरी गुलाब सिंगाने केल्या.

उत्तरेकडे आधी बघितल्याप्रमाणे लडाख, गिलगिट,बाल्टीस्थान, गारटोक  असे प्रांत जिंकून काश्मीरच्या सीमा वाढवल्या. शिवाय त्यांना मान्यताही मिळवली.

१८४१ मध्ये गुलाब सिंगाचा सेनापती जोरावर सिंग  आपल्या सैन्यासह तिबेटमध्ये धार्मिक पर्यटनासाठीगेला होता. तेव्हा टोयो या ठिकाणी चीन आणि तिबेट या दोघांनीं मिळून त्याच्यावर हल्ला चढवला. जोरावर सिंग आणि त्याचे सैनिक अतिशय  शौर्याने लढले. परंतु  चीन आणि तिबेट यांच्या एकत्रित आणि अचानक झालेल्या आक्रमणात ते टिकू शकले नाहीत.  या युद्धात जोरावर सिंह आणि त्याचे ४००० सैनिक यात मारले गेले. त्यांचे शौर्य इतके वाखाणण्याजोगे होते कि शत्रूने जोरावर सिंग याची समाधी टोयो येथे बांधली. आजही अनेक पर्यटक त्याला भेट देतात.

या पराभवांनंतर चीन, तिबेट आणि काश्मीरचा राजा गुलाबसिंग यांच्यात चुशुल चा करार केला गेला (१८४२) हा तह अतिशय महत्वाचा ठरला. आणि अनेक वर्ष हा पाळला गेला. या तहानुसार प्राचीन काळापासून चालत आलेल्या सीमा तिघांनींहि मान्य केल्या. याशिवाय पूर्वापार चालत असलेला तीनही प्रदेशातील व्यापार तसाच चालू ठेऊ असेही ठरले. याशिवाय युद्धात झालेली हानी भरून काढण्यासाठी,  गुलाबसिंग यांना मान सरोवरा जवळील तीन गावानं जहागीर म्हणूनही देण्यात आली . एका अर्थाने गुलाब सिंगाचे काश्मीर मधले ( प्रामुख्याने लडाख मधले ) प्राबल्य चीन, तिबेट दोघांनीं मान्य केले.
आधी म्हटल्याप्रमाणे हा करार अतिशय सामंजस्याने  तिघांनीं स्वीकारला आणि मोठ्या काळासाठी अवलंबलाही ! अशा रीतीने गुलाब सिंगांनी उत्तरेकडच्या काश्मीरच्या सीमा निश्चित केल्या.

पुढे राजा रणजित सिंहाच्या मृत्यू नंतर अनेक शीख राज्ये कमकुवत होऊ लागली. काळाची पावले ओळखून गुलाब सिंगाने नव्याने प्रस्थापित होत असलेली सत्ता, ईस्ट इंडिया कंपनीशी संपर्क वाढवला. कंपनीच्या कर्नल हेनरी लॉरेन्स यांच्याशी दोस्ती केली.

पहिल्या शीख ब्रिटिश युद्धापासून  गुलाब सिंग लांब राहिला (१८४५-४६). ब्रिटिशांनी पंजाब प्रांत जिंकून घेतला. रणजित सिंगांच्या वंशज दुलीप सिंग याचा पराभव झाला. त्याच्याशी ब्रिटिशांनी लाहोर करार केला आणि त्याची सत्ता संपुष्टात आली.  इतकेच नव्हे तर, त्याचा आता काश्मीरवरचा तथाकथित अधिकारही संपला. आणि गुलाब सिंग आता  स्वतंत्र राजा बनला. यावर शिक्कामोर्तब झाले ते अमृतसरच्या कराराने. ब्रिटिशांनी या करारान्वये गुलाब सिंग हा काश्मीरचा सार्वभौम राजा आहे हे मान्य केले. आणि वेळप्रसंगी गुलाब सिंग ब्रिटिशांकडून जमीन विकत घेऊ शकेल हेही मान्य केले. ( भावी काळात हा अतिशय महत्वाचा मुद्दा ठरला.) हे घडून आले याचे कारण होते ते म्हणजे  गुलाब सिंग आणि हेनरी लॉरेन्स यांची मैत्री.
यान्वये १८४६ मध्ये गुलाब सिंग यांनी शीख साम्राज्याचा भाग ब्रिटिशांकडून तेव्हाच्या ७५ लाख नाणकशाही रुपये देऊन विकत घेतला. शीख ब्रिटिश युद्धांचा झालेला खर्च ब्रिटिशांनी वसून केला.

अशा रीतीने दक्षिणेकडील काश्मीरच्या सीमाही गुलाब सिंगांनी निश्चित केल्या. एका अर्थाने जुलै २०१९ पर्यंत जों  काश्मीर आपण ओळखत होतो, त्याची पूर्ण निर्मिती गुलाब सिंग यांच्या मुत्सद्देगिरीचे फळ होते.

१८४६ ते १९४७ या काळात डोगरा घराण्याकडे काश्मीरची सत्ता होती. संरक्षण व्यवस्था, परराष्ट्र खाते, आणि दळणवळण हे मात्र ब्रिटिशांनी आपल्याकडेच ठेवले.

भाग २.

आता पर्यंत  पण काश्मीरमधली परिस्थिती काय होती ते पाहिले. काश्मीरमध्ये गुलाब सिंगांचे राज्य तयार करण्यासाठी ब्रिटिशांनीही मदत केली. एक मोठा भूभाग ब्रिटिशांनी गुलाब सिंग यांना विकला. यामागे ब्रिटिशांची कुटनिती होती. ती समजण्यासाठी आता आपल्याला थोडी आंतरराष्ट्रीय राजकारणाची, त्यातही युरोपची  माहिती घ्यावी लागेल.

प्राचीन काळापासून युरोप मध्ये काही साम्राज्ये फार महत्वाची होतो. काही देशांतील राज्यांनी आपला प्रभाव युरोपवर पाडला होता. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल आणि रशिया हे ते देश. रशिया हा देश  युरोप, आशिया दोन्ही खंडात पसरलेला, भला मोठा देश. उत्तरेकडे प्रचंड मोठी सागरी किनारपट्टी असलेला देश. परंतु तिचा काहीही फायदा नव्हता. कारण वर्षातले आठ महिने तिथे बर्फ असे. स्वाभाविकच   दुसरीकडची सागरीकिनार पट्टी रशियाला हवी होती. त्याचे कारण अर्थातच व्यापार हे होते. आणि हि किनारपट्टी रशियाला  भूमध्य समुद्रामध्ये ( मेडिटरेनियन समुद्र) हवी होती. त्यामुळे युरोप, आफ्रिका दोन्ही कडे व्यापार करणे सोपे जाणार होते. तर भारतातून दक्षिणेला इतर आशियातील देशांशी व्यापार करणे रशियाला सोपे जाणार होते.

आता थोडा नकाशाही पाहावा लागेल.

निळी रेषा बर्फ़ाळ किनारा दाखवतेय. तर हिरवी रेषा व्यापारासाठी रशियाला हवा असलेला मार्ग दाखवतेय.

इंग्लंडच्या दृष्टीने भारतातले त्यांचे साम्राज्य अतिशय महत्वाचे होते. आणि इंग्लंड- भारत  व्यापार प्रामुख्याने भूमध्य समुद्र (मेडिटरेनियन सी ) मधूनच असे. याच मार्गावर रशिया येऊ पाहात होता. त्यामुळे इंग्लंड आणि रशिया यांच्यात तणाव होता. काश्मीर प्रश्नामध्येही हेच घडले.  शिवाय इंग्लंड हा भांडवलशाही देश तर त्या विरुद्ध रशिया हा साम्यवादी देश होता. (साम्यवाद हे तत्वज्ञान भांडवलशाही तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध आहे. ) रशिया आणि  तत्कालीन हिंदुस्तान यांची उत्तरेला सीमा समान होती.





इ.स. १९३० मध्ये चीनने सिकयांग प्रांत अफगाणिस्तान कडून जिंकून घेतला. आणि चीनही तत्कालीन हिंदुस्तानच्या सीमेवर येऊन ठेपला.

रशिया आणि चीन या दोन्ही सत्तांपासून हिंदुस्तानातील सत्ता सुऱक्षित ठेवायची तर काश्मीर हे राज्य स्वतंत्र राहिलं तर उपयोगी पडेल असं ब्रिटिशांना वाटत होतं. (इंग्रजी मध्ये याला बफर स्टेट म्हणतात तर मराठीत उंट राज्य)
यासर्व दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी  गुलाब सिंगांच्या काश्मीर उभारणीला हातभारच लावला.

तर १९४७ मध्ये काश्मीरमध्ये हि परिस्थिती होती. माउंटबॅटन योजनेनुसार हिंदुस्तानची फाळणी होणार हे तत्कालीन सर्व पक्षांनी मान्य केले. या योजनेनुसार मुस्लिम बहुसंख्य असलेले दोन प्रदेश, म्हणजे काश्मीरच्या पश्चिमेकडचा प्रदेश आणि पूर्व बंगाल हे मिळून पाकिस्तान हा देश आणि बाकीचा भारत  असे दोन स्वतंत्र देश निर्माण होणार होते. बाकी रियासतींना (प्रिंसली स्टेट्स ) तीन पर्याय होते. एक तर भारतात सामील व्हायचे , पाकिस्तानात सामील व्हायचे अथवा स्वतंत्र राहायचे. अनेक रियासतींनी भारत वा पाकिस्तान मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. परंतु काहींनी स्वतंत्र राहणे स्वीकारले.

काश्मीरमध्ये राजा हरी सिंग हा डोगरा राजा  त्यावेळेस सत्तेवर होता. त्याला असे वाटत होते कि काश्मीर एक स्वतंत्र देश म्हणून राहावा. (कारण अनेक वर्ष -शंभर वर्षे, स्वतंत्रच असण्याची सवय काश्मीरला होती . ) किमान विचार करायला काही वेळ घेऊन मगच भारत वा पाकिस्तान मध्ये सामील व्हायचे हे काश्मीर ठरवेल; तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी काश्मीर बाबत जैसे थे परिस्थिती ठेवावी असे राजा हरी सिंग यांचे मत होते.

पाकिस्तानाला काश्मीर प्रामुख्याने दोन कारणांसाठी हवा होता. १. काश्मीर हा बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेला प्रदेश होता. आणि त्याहूनही महत्वाचे; २. पाकिस्तानात येणाऱ्या सहाही  नद्यांचे स्रोत काश्मीर मध्ये होते. एका अर्थाने पूर्ण पाकिस्तानच्या पाण्याच्या सगळ्या नाड्या काश्मीरकडे होत्या. सिंधू, झेलम, चिनाब, सतलज, रावी आणि  सहा नद्या म्हणजे पाकिस्तानचा जीवनस्रोत होत्या. तो स्रोत परकीय देशाकडे न राहाता आपल्याच देशात यावा असा पाकिस्तानचा प्रयत्न होता.

दरम्यान काश्मीरमध्येही स्वातंत्र चळवळ सुरु झालेली होती. तेथील राजेशाही संपून लोकांचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी १९३२ पासून प्रयत्न सुरु झाले होते. सुरुवातीला मुस्लिम कॉन्फरन्स स्थापन झाली. पुढे हिचे नाव बदलून नॅशनल कॉन्फरन्स असे या पक्षाचे नाव ठेवले गेले. १९४७ पर्यंत काश्मीरमधली लोकशाही चळवळही जोर धरू लागली होती.

तर काश्मीर मध्ये हि अशी  परिस्थिती १९४७ च्या सुमारास होती. शंभर वर्ष स्वतंत्र असणारा काश्मीर आता एका मोठ्या स्थलांतराकडे वाटचाल करत होता.

( लिहिण्याच्या ओघात कधी ब्रिटन / इंग्लंड, ब्रिटिश / इंग्रज असे लिहिले गेले आहे. दोन्हीचा अर्थ एकाच अपेक्षित आहे याची कृपया नोंद घ्यावी )

भाग ३.

आधी बघितल्याप्रमाणे १९३२ मध्ये काश्मीरमध्ये राजेशाही विरुद्ध जनतेची चळवळ उभी राहू लागली. मुस्लिम कॉन्फरन्स आणि पुढे नॅशनल कॉन्फरन्स हे पक्ष जोर धरू लागले. शेख महंमद अब्दुल्ला हे या चळवळीचे प्रमुख नेते होते. चळवळीचा वाढता जोर पहाता ती दडपण्यासाठी राजा हरी सिंग यांनी १९४६ मध्ये शेख अब्दुल्लाआणि अनेक नेत्यांना अटकेत टाकले.

काश्मीरमधली हि लोकशाही चळवळ तत्कालीन काँग्रेसला योग्य वाटत होती. शिवाय पंडित नेहरू हे स्व:ता काश्मिरी असल्याने त्यांनी या चळवळीला पाठींबा दिला. शेख अब्दुल्ला आणि त्यांची खास मैत्री होती. अब्दुल्लाच्या सुटकेची मागणी करण्यासाठी नेहरू मे १९४६ मध्ये काश्मीर मध्ये गेले. परंतु राजा हरी सिंगांनी नेहरूंना अटक करून त्यांची रवानगी काश्मीर बाहेर केली.
जुलै १९४७ मध्ये म . गांधी काश्मीरमध्ये आले. म. गांधींच्या या सभेत काश्मीरमधील जनतेने दिलेल्या घोषणा फार महत्वाच्या होत्या. भारत/ पाकिस्तान किंवा म . गांधी / ब . जिना यांच्या बद्दल त्या नव्हत्या, तर " बागी अब्दुला कि जय !" अशा होत्या. या सभेत म . गांधींनीहि फार आग्रह धरला नाही. " राजाने न घाबरता आपल्याला हवा तो निर्णय घ्यावा परंतु शेख अब्दुल्लाना मोकळं करावं" असं  म. गांधींनी सांगितले.

ऑगस्ट १९४७ मध्ये  भारत, पाकिस्तान स्वतंत्र झाले. काश्मीर बाबत राजा हरी सिंगाच मत होतं कि "जैसे थे परिस्थितीच राहावी, म्हणजेच काश्मीर हा स्वतंत्र राहील" असे मत त्यांनी मांडले. अधिक विचार करण्यासाठी त्यांना वेळही हवा होता. पाकिस्तान काश्मीरला सामील करून घेण्यास उत्सुक होता.( याची दोन कारणे आपण आधी बघितली आहेतच, -बहुसंख्य  मुस्लिम जनता आणि नद्यांचे स्रोत)

राजा हरी सिंगाकडून कोणतेच उत्तर येत नाही बघून पाकिस्तानने  ऑपरेशन गुलमर्ग सुरु केले. या ऑपरेशन मार्फत पख्तुनी पठाणी टोळ्या काश्मीरमधे पाठवल्या गेल्या. (या टोळ्या म्हणजे पाकिस्तानी सैन्य नव्हते.) या पख्तुनी पठाणी टोळ्यांनी  काश्मीरच्या उत्तर सीमेवरून घुसून अल्पसंख्य हिंदूंची कत्तल सुरु केली. त्याला प्रतिउत्तर म्हणून जम्मूमध्ये हिंदूंनी मुस्लिमांवर अत्याचार करायला सुरुवात केली. आणि पूर्ण काश्मीरमध्ये जातीय दंगली उसळल्या.

भारत सरकारने राजा हरी सिंग यांना विनंती केली कि हा क्षोभ कमी करायचा तर शेख अब्दुल्ला यांची सुटका करा. राजा हरी सिंग यांनाही लक्षात आले कि चिघळणारी परिस्थिती काबूत आणायची तर आता शेख अब्दुल्लाना सोडणे आवश्यक आहे. परंतु यामुळे पाकिस्तानचा असा समाज झाला कि आता काश्मीरवरती भारताचा प्रभाव वाढतो आहे. पाकिस्तानने शेख अब्दुल्ला आणि इतर काश्मिरी नेत्यांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरु केले. परंतु अब्दुल्ला यांचे मत अजून नक्की ठरत नव्हते. त्यांचे मत - "आधी राजेशाही बरखास्त करू. लोकांचे स्वातंत्र्य मिळवू  आणि नंतर इतर विचार करु. आणि भारत/ पाकिस्तान जे आपल्या अटी मान्य करतील तिथे सामील  होऊ. " असे होते.

दरम्यान ऑक्टॉबर १९४७ मध्ये पख्तुनी पठाणी टोळ्यांनी अचानक मोठे आक्रमण केले. आता त्यांचे नेतृत्व पाकिस्तानी सैन्याचे ब्रिगेडियर अकबर खान आणि स्थानिक पंजाबी नेता सरदार शौकत हयात यांच्याकडे होते.  उरी, बारामुल्ला, इथे प्रचंड लुटालूट झाली.

याच सुमारास सरदार इब्राहिम या पेशाने वकील असलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली मुझफराबाद, पूंच , मीरपूर या उत्तर सीमेवरच्या  प्रांतांनी स्वतः: ला स्वतंत्र घोषित केले. ( जो आज पाक व्याप्त काश्मीरचा भाग आहे. )

सगळीकडून हल्ले होऊ लागले तसे राजा हरी सिंगाने भारताकडे मदत मागितली.

१९४७ च्या सुरुवातीसच. भारत आणि पाकिस्तान फाळणी होणार हे निश्चित झाले होते. काश्मीरमधील उत्तरेचा गिलगिट हा प्रदेश जो १९३५ मध्येच राजा हरीसिंगांकडून ब्रिटिश सरकारने ६० वर्षांसाठी  भाड्याने घेतला होता, आणि जिथे कॅप्टन विल्यम ब्राऊन याची पोलिटिकल एजंट म्हणून नेमणूक केली होती. फाळणीनंतर हा प्रांत पाकिस्तानात जावा अशी ब्रिटिशांची इच्छा होती. याचे कारण म्हणजे भावी भारत हा समाजवादी विचारांचा असण्याची शक्यता जास्ती होती. आणि अशा परिस्थितीत स्वतंत्र भारत हा रशियाचा मित्र म्हणून उभा राहण्याची शक्यता होती. तर पाकिस्तान मात्र रशियाशी मैत्री करण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे जा गिलगिट प्रांत पाकिस्तानकडे राहाता तर रशियाला भूमध्य समुद्रात येण्यासाठी आडकाठी करता आली असती.

राजा हरीसिंगांचे पंतप्रधान रामचंद्र काक हे होते. त्यांना  काँग्रेसचे अजिबात प्रेम नव्हते, उलट जीनांशी मात्र त्यांची दोस्ती होती. स्वाभाविकच पंतप्रधान काक यांचा सल्ला मानून काश्मीर पाकिस्तानात सामील होईल अशी शक्यता जास्त होती.  हे ओळखून सत्तांतराच्या केवळ १५ दिवस आधी ब्रिटिशांनी गिलगिट प्रांत राजा हरीसिंगांना परत केला. तसेच कॅप्टन  ब्राऊन यांना जम्मू काश्मीरच्या सैन्याचे सर्व अधिकार दिले.

दरम्यान म. गांधींच्या प्रभावातून राजा हरिसिंग यांनी स्वातंत्र्याच्या केवळ ४ दिवस आधी रामचंद्र काक यांना पदच्युत केले. आणि काश्मीर भारताबरोबर जाईल अशी परिस्थिती दिसू लागली. भावी काळात गिलगिट प्रांत भारतात राहणे ब्रिटिशांना नको होते. आणि म्हणून कॅप्टन ब्राऊन यांनी मुस्लिम सैन्याला पाठबळ देत जम्मू काश्मीरच्या गव्हर्नरलाच पदच्युत केले. आणि गिलगिट प्रांत पाकिस्तानात सामील झाल्याचे जाहीर केले. कॅप्टन ब्राऊन यांच्या या कृतीला ब्रिटिश सरकारचा पाठिंबा होता हे पुढे निश्चित झाले. १९४८ मध्ये कॅप्टन ब्राऊन यांचा ब्रिटिश सरकारने  MBE (Most Excellent Order Of The British Empire) हा पुरस्कार देऊन गौरव केला, यावरूनच हे स्पष्ट व्हावे. इतकेच नव्हे तर पुढे पाकिस्ताननेही कॅप्टन ब्राऊन यांना सितारा ए पाकिस्तान हा सर्वोच पुरस्कारही दिला.

अशा रीतीने पूँछ प्रांत, आझाद काश्मीर आणि गिलगिट प्रांत पाकिस्तानात सामील झाले. काश्मीरचे तुकडे पडू लागले. सीमेवरील सततच्या आक्रमणांनी हि परिस्थिती अजूनच चिघळू लागली.  आक्रमक टोळ्यांना अटकाव करणे गरजेचे होते.

परंतु १९४७-४८ मध्ये कारगिलच्या पुढे लष्करी हालचाली करण्यायोग्य असे रस्ते नव्हते. त्यामुळे होणाऱ्या टोळ्यांच्या आक्रमणांना मागे ढकलणे हे आव्हानात्मक होते. त्याऐवजी या टोळ्यांची जे मूळ स्रोत होते त्यावर हल्ला करणे लष्कराला जास्त योग्य वाटत होते. परंतु यात दोन मुद्दे होते. एक तर त्यासाठी मूळ पाकिस्तानी भूमीवर हल्ले चढवावे लागले असते आणि हे सरळ सरळ भारताने पाकिस्तानवर केलेले  युद्ध मानले गेले असते.
आणि दुसरे हि सर्व कार्यवाही पंजाबमधून करावी लागली असती. जो पंजाब अजूनही फाळणीच्या जखामांमधून पुरता सावरला नव्हता.

या सगळ्या धामधूम मध्ये शेवटी प्रत्यक्ष युद्ध नको म्हणून शेवटी भारताने संयुक्त राष्ट्रसंघटनेकडे (युनो) धाव घेतली. व्ही. के. मेनन यांनी भारताची बाजू युनोमध्ये अतिशय सविस्तर मांडली. एप्रिल १९४७ मध्ये युनोने पाकिस्तानला सर्व प्रकारचे सैन्य काश्मीरमधून बाहेर काढण्यास सांगितले. भारतानेही सुरक्षीतता  आणि शांतता यासाठी लागेल तेव्हढेच सैन्य काशीरमध्ये ठेवावे असेही सांगितले. त्यांनतर युनोचे शिष्टमंडळ काश्मीर मध्ये जाऊन सार्वमत घेईल असे सांगितले.  परंतु हे दोन्ही देशांना मान्य झाले नाही.

दरम्यान शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली काश्मीर मध्ये सरकार स्थापन झाले. राजा हरिसिंग हे राज्याचे प्रमुख ( हेड ऑफ द स्टेट) झाले. आणि एका अर्थाने काश्मीर भारताचा भाग बनले. परंतु तरीही काश्मीरमधली परिस्थिती अतिशय प्रक्षोभकच होती. युनोने सांगूनही काश्मीरमध्ये युद्ध चालूच होते. सप्टेंबर १९४८ मध्ये पाकिस्तानी सैन्य पुढे पुढेच येत होते. त्यांना भारतीय सैन्याने द्रास, कारगिल येथ पर्यंत अडवले. मुख्यत: श्रीनगर ते लडाख हा महामार्ग भारतीय सैन्याने सुरक्षित केला. परंतु सैन्याला आगेकूच करण्याची परवानगी पं.  नेहरूंनी दिली नाही. याबाबात आजही खूप उहापोह केला जातो. त्या वेळी जर भारतीय सैन्याला पुढे जाण्याची परवानगी मिळाली असती तर आज काश्मीर प्रश्न शिल्लकच राहिला नसता, असेही मांडले जाते.

पं. नेहरूंनी हा असा निर्णय का घेतला असावा हे त्या काळातील काही राजकीय घडामोडींची  माहिती करून घेतल्या तर समजू शकते.

शेख अब्दुल्ला, ज्याच्या नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये सरकार स्थापन झाले होते. त्यांचा या बाबतचा दृष्टिकोन या सर्व निर्णय प्रक्रियेवर परिणाम करणारा होता.  काश्मीर हे  आपल्याला जरी एकसंध राज्य वाटत असले तरी तशी परिस्थिती नाही. काश्मीर मध्ये जम्मू, काश्मीर खोरे ( श्रीनगर आणि आसपासचा भाग ), लडाख हे जसे तीन मुख्य भूप्रदेश आहेत, तसेच काश्मिरी जनतेमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या भाषानुरूप  त्यांचे नेतेही वेगवेगळे होते. प्रामुख्याने जे लोक काश्मिरी भाषिक होते, त्या लोकांवर शेख अब्दुल्लाचा प्रभाव होता. परंतु जे पंजाबी भाषा बोलणारे होते ते काश्मिरी मात्र अब्दुल्लाचे कितपत ऐकतील याची खुद्द अब्दुल्ला यांनाही खात्री नव्हती. द्रास, कारगिल याप्रांतांच्या पश्चिम-उत्तरेकडील प्रांत हे पंजाबी भाषा बोलणारे होते. स्वाभाविकच त्यांच्यावर शेख अब्दुल्ला यांचा प्रभाव फार नव्हता. अशा परिस्थितीत  अतिशय कष्टपूर्वक, सैन्याने बाजी लावून समजा उत्तरेकडचे प्रांत जिंकले असते तरी ते टिकवणे खूप अवघड होते. सैन्याने हे प्रांत जिंकूनही तेथे शांतता राखणे, तेथील नागरिकांना भारताचा भाग बनवणे कितपत जमेल याची ना अब्दुल्लाना खात्री होती, ना पं. नेहरूंना. तशात आजाद काश्मिर आणि गिलगिट या प्रांतांनी आधीच आपले स्वातंत्र्य घोषित केले होतेच. त्यांना पुन्हा भारतात सामील होण्याबद्दल वळवणे हेही अवघडच जाणार होते.

हे सगळे चालू असताना नवस्वतंत्र भारताची सर्व व्यवस्था लावण्याचे एक मोठे काम चालू होते हेही विसरता कामा नये. नुकते मिळाले स्वातंत्र्य टिकवायचे , त्यासाठी आवश्यक अशी अनेक अतिशय महत्वपूर्ण कामे चालू होते. स्वतंत्र  सार्वभौम भारताची राज्यघटनेने तयार  करणे , संसदीय संरचना निर्माण करणे, सार्वत्रिक निवडणुकांची तयारी, भारतातील प्रशाकीय संरचना  उभी करणे, न्यायव्यवस्थेची संरचना भारतीय करणे, एकूणच संपूर्ण भारताची रचनांना करण्याचे अतिशय जिकिरीचे, आव्हानपूर्ण काम  करावयाचे होते. अशा परिस्थितीत केवळ काश्मीर प्रश्न धसास न लावता; तो शक्य तितका सोडवणे आणि युद्ध थांबवून एक किमान शांतता प्रस्थापित करणे हे तत्कालीन सर्वच नेत्यांना योग्य वाटले. भावी बलाढ्य देश निर्मिती साठी अखेर ३१ डिसेंबर १९४८ ला युद्ध समाप्तीची घोषणा केली गेली.

एकुणातच भारताचा राज्यकारभार सुरळीत चालू व्हावा यासाठी संपूर्ण भारतभर शांतता असणे निकडीचे होते. काश्मीरमध्येही शांतता राहायची तर तेथील जनतेला लोकशाहीतील सर्व अधिकार देणे आवश्यक होते. यात मोठा अडथळा होता तो काश्मिरी राजवटीचा, राजपदाचा! जोवर तेथे राजवट अस्तित्वात राहील तोवर तिथे लोकशाही प्रस्थापित  झाली नसती. त्यामुळे भारत सरकारकडून राजा हरिसिंग यांना पद सोडण्यासाठी आवाहन करण्यात आले. राजा हरिसिंग यांना हा प्रचंड मोठा धक्का होता. इतकेच नव्हे तर राज्य, देशाच्या भल्यासाठी त्यांनी काश्मीरही  सोडावा असेही सुचवले गेले. अखेर देश आणि  जनतेच्या भल्यासाठी राजा हरिसिंग यांनी राजपदाचा त्याग केला. राजपुत्र करणसिंग यांना प्रतिनिधी म्हणून नेमूनत्यांना  शेख अब्दुल्ला यांच्याकडे पाठवण्यात आले. तिथे करणसिंग केबिनेटलाही भेटले.

दरम्यान युनो मार्फत नवीन प्लान मांडला गेला. डिकन्स यांनी हा प्लान मांडला. त्यांनी सुचवले कि जम्मू, लडाख येथे हिंदू लोकसंख्या जास्ती असल्याने ते प्रांत भारतात सामील केले जावेत आणि गिलगिट, पूंछ येथे मुस्लिम लोकसंख्या अधिक म्हणून ते प्रांत पाकिस्तानात सामील केले जावेत. काश्मीर व्हॅली मध्ये सार्वमत घेऊन त्याचा निर्णय घेतला जावा. परंतु पाकिस्तानला हे अमान्य होते. लडाख, जेथून सर्व प्रमुख पाकिस्तानी नद्या उगम पावत होत्या त्या प्रांतांवरचा हे हक्क गमावणं पाकिस्तानला मान्य नव्हतं. अनेक चर्चा होऊन अखेर हाही प्लान नाकारला गेला.

दरम्यान ऑकटोबर १९५० मध्ये काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला यांनी एक मोठा कायदा आणला. जमीनदारी नष्ट करणारा कायदा. खरे पहाता हा अतिशय प्रगतिशील विचार होता. भारतातही अनेक ठिकाणी अशा स्वरूपाचा कायदा १९४९ ते ५१ दरम्यान सर्व राज्यांमध्ये आणला गेला होता. काश्मीर मध्ये प्रामुख्याने जम्मूतील हिंदू, आणि काश्मीर व्हॅलीतील पंडित जमीनदार होते. या कायद्याने कसेल त्याची जमीन हे मान्य केले त्यामुळे स्वाभाविकच अनेक हिंदू आणि पंडित यांचे मोठे नुकसान झाले.

युनोमधून काही घडत नसल्याने सार्वमताऐवजी निवडणुकांचा मार्ग शेख अब्दुल्ला यांनी अवलंबायचा ठरवला आणि निवडणुका जाहीर केल्या. अल्पसंख्य हिंदूंच्या पक्षाने; प्रजा परिषदेने या निवडणुकांवर बहिष्कार घातला. नोव्हेंबर १९५१ मध्ये  नेशनल कॉन्फरन्स ने सत्ता स्थापन केली. नवीन स्थापन झालेल्या असेंब्लीनें राजपद नष्ट करून, सदर ए रियासत हे काश्मीर मधील घटनात्मक प्रमुख पद निर्माण केले. काश्मीरमधली राजेशाही कायद्याने संपुष्टात आली . करणसिंग  हे पहिले सदर ए रियासत म्हणून काश्मीरचे प्रमुख बनले. हे पद राज्यपालांच्या पदासारखे होते.
यानंतरची मोठी घोषणा होती ती म्हणजे ज्यांच्या जमिनी जमीनदारी नष्ट करण्याच्या कायद्यान्वये गेल्या होत्या त्यांना कसलीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही याची. याला प्रजा परिषदे हिंसक विरोध करायला सुरुवात केली. एकीकडे राज्यांतर्गत हिंसाचार बळावलेला अन दुसरीकडे राज्याची घडीही बसवायची या कात्रीमध्ये काश्मिरी सरकार सापडले. पुन्हा एकदा भारतासरकाराकडे मदत मागितली गेली. त्यान्वये काश्मीर आणि भारत सरकार यांच्यात दुसरा करार केला गेला - दिल्ली करार १९५२. काश्मीर सरकार आणि भारत सरकार यांच्यातील घटनात्मक आणि संस्थात्मक संरचना या करारान्वये ठरवली गेली.
एका अर्थाने काश्मीरला भारताचा भाग म्हणून मान्य करण्यासाठी हा करार महत्वपूर्ण ठरतो. या करारामध्ये काही अतिशय महत्वपूर्ण गोष्टी होत्या.
१. काश्मीर भारताचा भाग असेल. 
२. संस्थानांच्या विलीनीकरणाचा जो मूळ कायदा होता त्यातील कलमे काश्मीरला लागू असतील, त्याशिवाय राज्यघटनेतील नियम, कायदे यांना काश्मीर बांधील नसतील . 
३. काश्मीरच्या  असेंब्लीनें हे मान्य केलेलं असेल .  

या शिवाय काही विशेष सवलतीं काश्मीरला दिल्या गेल्या. जसे की काश्मीरचा  स्वतंत्र झेंडा असेल. काश्मीरचे मुखपद काश्मीरचे पंतप्रधान म्हणून ओळखले जाईल. हे सगळे प्रत्यक्षात येण्यासाठी भारताच्या राज्यघटनेमध्ये ३७० ए  हे नवीन कलम समाविष्ट केले गेले.
या करारामुळे काश्मीर राज्याला अपेक्षित स्वायत्तता मिळाली आणि काश्मीर भारतात सामीलही झाले.
(क्रमश: पुढील भाग जरा सावकाशीने लिहेन)

___

No comments:

Post a Comment