इतिहासातील लहान मोठ्या गोष्टी


1. सारनाथ

आजची गोष्ट आहे फ्रेडरिक ऑस्कर ओर्टेल यांची.


मूळ जर्मन असलेले आणि नंतर ब्रिटिश नागरिक बनलेले फ्रेडरिक रुरकी इंजिनिअरिंग कॉलेजमधे शिक्षण घेण्यासाठी इ. स. 1832 मधे भारतात आले. इतिहासाची आवड, जाण असणारे फ्रेडरिक ऑस्कर ओर्टेल पुढे ब्रिटिश सरकारच्या पी डब्ल्यु डी खात्या मधे नोकरी करू लागले. या निमित्ताने ते भरपूर फिरले. आताचा म्यानमार, श्रीलंका इथेही त्यांनी काम केले. 

पुढे 1903 मधे ते वाराणसीला आले. 1904 मधे पुरातत्व खात्यासोबत काम करताना ज्यांनी सारनाथचे उत्खनन केले. आजचे भारताचे मानचिन्ह - अशोकचक्र  उत्खनन करून त्यांनीच वर काढले. सारनाथचे उत्खनन हा त्यांच्या आयुष्याचा इतका महत्वपूर्ण आणि आनंददायी भाग होता की नोकरी संपल्यावर परत मायदेशी इंग्लंडमधे आल्यावर, आपल्या घराचे नावही  त्यांनी ठेवलेले ते - "सारनाथ" 😃

---


2. जुन्या मुंबापुरीच्या काही गंमती जमती

* मुंबई इलाका म्हणजे सुरुवातीला अनेक सुटी सुटी बेटं होती. कुलाबा, मुख्य मुंबई, महालक्ष्मी, वरळी, माजगाव म्हातारपाखाडी, उमरखाडी,  शीव इत्यादी. या शिवाय आसपास लहान लहान 15-20 बेटंही होती.
शिवाय घारापुरी, दिवदिवे, कानेरी हुनेरी ही जरा लांबची बेटं.

* मुंबईचा मुख्य किल्ला(फोर्ट) बांधायला इ. स. 1669.-1716 अशी तब्बल 47 वर्ष लागली. 
या शिवाय माजगाव, शिवरी, शीव, माहिम, वरळी इथेही छोटे छोटे किल्ले ब्रिटिशांनी बांधले होते.

* मुख्य मुंबई बेटाचा 4/5 भाग समुद्राच्या पाण्याने भरून वहात असे तर केवळ 1/5 भागच जमीन म्हणून वापरण्या योग्य होता.
माहिम, वरळी, माटुंगे येथून लोकांना मुंबईत येताना मधली खाडी पायी ओलांडून येत. त्यामुळे आपोआपच पाय धुतले जात म्हणून त्या ठिकाणास पायधुणी नाव पडले.
* 1775 मधे कुलाब्याची दांडी (दीपगृह) बांधली गेली. 

* मुंबईत घुसणारे समुद्राचे पाणी अडवण्यासाठी 1780च्या आसपास ब्रिटिशांनी  वरळीचा बांध बांधला. तेव्हा गव्हर्नर होते हार्नबी व्हेलार्ड.
यावर त्या काळातल्या एका सुताराने मुंबईवर रचलेले श्लोक:

बांधला दरयांत सेतु जईसा श्रीरामे लंकेवरी
मोठा हुन्नर जांगळा खरचिले द्रव्यासि कोटीवरी
केली वाट सपाट खाडी अवघीं बुंजूनि ती टाकिली
जेठायीं मग ती महाभगवती लक्षूमि तें स्थापिली

* शीवचा पूल 1797 साली गव्हर्न डंकन यांनी बांधला. हा पहिला भारतातला पूल जिथे टोल आकारला गेला. गाडीच्या प्रकारानुसार (बैलगाडी/घोडा/घोडागाडी) अर्ध्या आण्यापासून एक रुपया पर्यंत टोल आकारला जात असे.

---

3. फुले एक उद्योगपती आणि प्रोत्साहक

म. ज्योतिबा फुलेंचे सामाजिक कार्य - सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य आपल्याला माहिती असते. स्त्रीशिक्षणाची सुरुवात  - मुलींची पहिली शाळा, सत्यशोधक समाजाची स्थापना, शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारावी- सरकारने त्यांच्यासाठी काम करावं म्हणून त्यांनी ओढलेला शेतकऱ्याचा आसूड ( ग्रंथ) हे आपल्याला माहित असते.
या सर्वांसोबत इतर अनेक महत्वाची कामं म. फुलेंनी केली. ज्याची माहिती आपल्याला क्वचितच असते. त्यातली काही आज माहिती करून घेऊ.
• " पुणे कमर्शिअल आणि कॉंट्रॅक्टिंग कंपनी" चे म. फुले हे कार्यकारी संचालक होते. ही कंपनी बांधकाम आणि व्यापार यात कार्यरत होती.
• या कंपनीने 1869 मधे बांधलेल्या बंडगार्डन पुलाचे सबकॉंट्रॅक्ट घेतलेले. खडी, चुना, दगड पुरवण्याचे काम त्यांनी केलेले. जो अजूनही - 150 वर्षांनंतरही उभा आहे. इतके भक्कम अन विश्वासार्ह कच्चामाल या कंपनीने पुरवला होता.
• कात्रजचा बोगदा, खडकवासला धरणाचा कालवा हेही फुलेंनीच बांधवले.
• याशिवाय इतरही पूल, धरणं, बोगदे, रस्ते फुलेंच्या कंपनीने बांधले. अन यातून मिळालेला सगळा पैसा सामाजिक कार्यासाठी वापरला.
• या कंपनीने पुस्तक प्रकाशनेही केली. तुकाराम तात्या पडवळ यांचे "जातिभेद विवेकसार" हे पुस्तक, ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले  " स्त्री पुरुष तुलना" ही पुस्तके त्यांनी प्रकाशित केली.
• सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सीही या कंपनीने घेतलेली.
• भाजीपाला विक्री आणि पुरवठा हेही कंपनी करत असे.
• शेती व उद्योग याचे व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळा म. फुलेंनी काढल्या. वयाच्या सहाव्या वर्षापासून मुलामुलींना असे शिक्षण देणारे भारतातील म. फुले हे पहिलेच!

म. फुलेंनी केवळ स्वत: च असे व्यवसाय केले असे नाही तर यापुढे जावून सत्यशोधक समाजातील आणि इतरांनाही त्यांनी उद्युक्त केले. अनेरांना उद्योग सुरु करण्याचे ते प्रोत्साहकही होते. उदाहरणार्थ  :
1. सत्यशोधक व्यंकू बाळोजी कालेवार यांनी 1889-1893 या काळात मुंबई महानगर पालिकेची इमारत बांधली.
2. कालेवार यांनीच मुंबई, पुणे, बडोदा
इथे अनेक भव्य आणि सुंदर इमारती बांधल्या.
3. सत्यशोधक रामय्या व्यंकय्या अय्यावरु यांनी भंडारदराचा जलाशय बांधला. तसेट बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडाही बांधला.
4. नरसिंग सायबू वडनाला यांनी भायखळ्याचा पूल, परळचे रेल्वे वर्कशॉप बांधले. तसेच मुंबईमधील अनेक कापड गिरण्याही बांधल्या.
5. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाईम्स ऑफ इंडियाची इनारत बांधली. तसेच सोलापूरची लक्ष्मीविष्णु कापड गिरणी बांधली. तसेच मुंबईतल्या खिमजी यांची कापड गिरणीही बांधली.

या सर्वांना म. फुले यांचे प्रोत्साहन, मदत असे. एका अर्थाने भारतातील बांधकाम उद्योगाला स्थिर करण्याचे काम न. फुलेंनी केले.

----


4. विणकामाचा इतिहास

असे मानले जाते की सुयांच्या विणकामाचा शोध ढोल, नगारा तयार करण्यासाठी लागला असावा. नगा-यावरती जे कातडे असते ते  खालच्या भांड्याला (झाडाच्या पोकळ तुकड्याला वा नारळाच्या कवटीला) ताणून लावल्यावर ते नुसते बांधून सुटत असावे, म्हणून मग ते शिवण्याचा प्रयत्न झाला असावा. त्यासाठी हुकसारखे काही हत्यार वापरले असावे. या हुकच्या मदतीने  कातड्यातून पहिली साखळी घातली गेली असावी. हाच पहिला क्रोशा असावा.

सुयांवरचे विणकाम याचे मूळ अजून सापडलेले नाही. निश्चित स्त्रोत माहिती नाही. अगदी शोध घ्यायचा तर इ. स्. पू ५००० पर्यंत आपल्याला मागे जाता येते. लीला डी चाव्हस (Lila de Chaves)  या इतिहासकार आणि टेक्साटाल तज्ज्ञ यांच्या मतानुसार ग्रीस मध्ये गाठीं शिवाय एकमेकांत गुंफलेल्या कापडांच्या नोंदी आहेत. हे एका सुईवरचे विणकाम असण्याची दाट शक्यता आहे.

इ.स्. पू १५०० मध्ये हातांच्या बोटांनी दोरे एकमेकांत अडकवत विणण्याची कला मानवाने प्राप्त केली असल्याचे आढळते. बोटांच्या आधारे दो-याच्या वेणीसदृष्य विणकाम केलेले आढळते. 

इ. स्. २५६ मधील तीन विणलेले कापडाचे तुकडे सिरीयन शहरात – दुरा इथे सापडले. हे विणकाम हातानेच विणलेले, अर्थात सुयांवर – एक वा दोन असावे.

प्राचीन काळात भारत, तुर्कस्तान, अरबस्तान, चीन, उत्तर व दक्षिण अमेरिका अशा विविध ठिकाणी विणकाम केले जात असावे. 

अलीकडच्या काळात पहिला उल्लेख सापडतो तो १३९० मधला. प्रसिद्ध जर्मन चित्रकार  बरट्राम (Bertram) यांनी “ निटींग मेडोना “ हे चित्र काढले आहे. यात विणकाम करत असल्याचे चित्र त्यांनी रेखाटले आहे.

अठराव्या शतकाच्या सुरुवातीला चीन, भारत, अरबस्तान, येथून क्रोशा चे विणकाम पर्शियात आले. अन अठराव्या शतकाच्या शेवटी हे विणकाम युरोप मध्ये पोहोचले.

१८०० मध्ये इटालियन नन्स हे विणकाम करत. त्याच मुळे या विणकामाला “नन्स वर्क “ म्हटले गेले.  

प्रबोधन काळात युरोप मध्ये अनेक जुन्या कलांचा नव्याने पुनरुथान झाले. त्यातील एक क्रोशा. त्या काळातील स्त्रियांनी या कलेला पुन्हा जिवंत केले, वाढवले.

भारतात विसाव्या शतकात, नव्याने क्रोशा आणला तो स्कॉटलंड येथील मॅक्रे (  Macrae )  या दांपत्याने.

जाता जाता लोकरी बाबत व्हर्जिन वुल हा शब्द वापरला जातो. त्याची गंमत.
याचे दोन अर्थ आहेत. 
एक; दुसऱ्या महायुद्धामुळे त्या काळात युरोपमधे लोकर मिळणं अवघड झालं. तेव्हा मग तेव्हा जुने स्वेटर्स उसवून ती लोकर पुन्हा वापरली जात होती. ती वापरलेली लोकर अन नवीन कोऱ्या लोकरीला व्हर्जिन वुल हा शब्दप्रयोग वापरला गेला.

दुसरं; हल्ली हा शब्द लहान, कोकरांच्या पहिल्यांदा काढलेल्या फरमधून केल्या जाणाऱ्या लोकरीला हा शब्द वापरला जातो. जी लोकर खूप सॉफ्ट असते. अर्थातच या कोकराची फर एका वर्षात पुन्हा वाढते अन ती परत काढली जाते पण तिचं व्हर्जिन असणं मात्र गेलेलं असतं   ;)

---


५. भारताचा प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक देशामध्ये, देशाचा प्रमुख हा लोकांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीने निवडलेला असतो. एक निश्चित नियम समूह म्हणजेच राज्यघटना (संविधान), देशातील लोकांनी सर्वसंमतीने स्विकारलेली असते. अशा देशात सर्व शासकीय कार्यालये व पदं ही देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात.


इ. स. १९४७ मधे भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताने राज्यकारभारासाठी प्रजासत्ताक पद्धती स्विकारायचे ठरवले. त्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती तयार केली गेली. या समितीने अतिशय सखोल अभ्यास करून भारताची राज्यघटना (संविधान) तयार केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात, २६ जानेवारी १९३० रोजी जवाहरलाल नेहरु यांनी तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. या प्रसंगाची आठवण म्हणून, २६ जानेवारी १९५० रोजी भारताने ही राज्यघटना स्विकारली आणि लागू केली गेली. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
या दिवशी, दर वर्षी राजधानी नवी दिल्ली येथे मोठे संचलन आयोजित केले जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. अनेक देशांच्या प्रमुखांना तसेच भारतातील विविध क्षेत्रातील माननीयांना आमंत्रित केले जाते.

प्रथम वीरगतिप्राप्त सैनिकांना  श्रद्धांजली वाहिली जाते. तसेच सैन्यातील पराक्रमींना अशोक चक्र, किर्ती चक्र हे पुरस्कार दिले जातात. नंतर विविध शौर्य पुरस्कार दिले जातात.
त्या नंतर तीनही सैन्य दलांचे (पायदळ, नौदल, वायुदल) यांचे संचलन होते. विविध शस्त्रास्त्रे, रणगाडे, विमाने यांचेही संचलन होते; भारताच्या लष्करी सामर्थ्याची ती एक झलक असते. नंतर प्रत्येक राज्याचे एक एक संचलन होते. यात आपापल्या संस्कृतींची झलक, राज्याचे नागरिक सादर करतात. महाराष्ट्राचा चित्ररथ आपले प्रतिनिधित्व करतो.
२६ जानेवारी रोजी सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी संस्था, खाजगी संस्था, कार्यालये, ग्रामपंचायत, अशा सर्व ठिकाणी ध्वजवंदन केले जाते.
भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५० या दिवशी साजरा झाला. आज आपण आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहोत. आपले प्रजासत्ताक चिरायु होवो!
जय हिंद, जय भारत, जय भारतीय जनता!

---

6. दूरदर्शी जपानी सम्राट
योरितोमो नो मिनामोतो

(११४७ - ११९९)

जपानच्या भविष्यकालीन समृद्धीचा दूरगामी विचार करून त्यासाठी तिथली राज्य व प्रशासकीय व्यवस्था लावण्यात पुढ़ाकार घेणारा सरसेनापती म्हणून योरितोमो नो मिनामोतो ओळखला जातो. बाराव्या शतकात त्याने जपानमधील व्यवस्थेची जी घड़ी बसवली तिच्या पायावरच जवळपास इ.स. १८६७ पर्यंत जपानमधील कारभार व व्यवहार चालू राहिले. म्हणजे सहाशे-सातशे वर्ष पुढचा विचार योरितोमोने केला होता. जपानमधील समृद्वीस कारणीभूत ठरलेल्या 'शोगुन' परंपरेचा जनक म्हणून इतिहासाने
योरितोमोच्या कामाची नोंद घेतली आहे.
जपानमध्ये बाराव्या शतकाच्या सुमारास अस्तित्वात असलेल्या
शासनव्यवस्थेत विशेष संरक्षणाच्या गरजेतून 'सामुराई या योद्धावर्गाचं वर्चस्व वाढू लागलं होतं. योरितोमो हा मिनामोतो या सामुराई घराण्यातला लढ़वय्या. त्या वेळी सामुराईमध्ये दोन घराणी महत्त्वची ठरली. ताइरा घराणं
आणि मिनामोतो घराणं! या दोन्ही घराण्यांत सम्राटावर प्रभाव पाडण्याची सतत स्पर्धा होती, बाराव्या शतकात या स्पर्धेने गंभीर वळण घेतलं.
मिनामोतो घराण्याचा योशितोमो युद्धात मारला गेला. योशितोमो मिनामोतोचा मुलगा योरितोमो पुढ़े होजो घराण्यात वाढला. ताइरा घराण्याचं वर्चस्व दूर करण्यासाठी सम्राटाने इतर सामुराईंना आवाहन केलं. या आवाहनाला 'होजो' घराण्याच्या पाठिब्याने योरितोमोने प्रतिसाद दिला. त्यासाठी इतर अनेक लष्करी घराण्यांना त्याने संघटित केलं. एका अर्थाने सम्राटाप्रती निष्ठावान असणाच्या सामुराईचा यारतामा नेता बनला.
११८० ते ११८५ या काळात झालेले 'जेपी' युद्ध हे ताइरा आणि मिनामोतो घराण्यांचा कस ठरविणारं होतं. या युद्धाच्या शेवटच्या टप्यात योरितोमो एकदम प्रकाशात आला. ताइरा घराण्याचा पूर्ण पराभव करून सम्राट आणि राजदरबार याचे स्थान आणि महत्व योरितोमोने अबाधित राखलं. स्वाभाविकच योरितोमोच्या पुढील वाटचालीस सम्राट आणि राजदरबार यांनी पाठिबा दिला. ११९२ मध्ये सम्राटाने योरितोमोला 'शोगुन' (सरसेनापती) ही पदवी दिली.
योरितोमोच्या महत्त्वावर शिक्कामोतब झालं ते त्याने बसवलेल्या प्रशासकीय व्यवस्थेमुळे. कारण त्यातून त्याची दूरदृष्टी दिसून आली. योरितोमोने आपलं स्थान क्योटोऐवजी होन्शू विभागातील कामाकुरा इथे बळकट करण्याचं ठरविलं. कामाकुरा इथून सर्वं प्रशासन यंत्रणा योरितोमोने उभी केली. आत्तापर्यंत जपानमध्ये अनेक अंतर्गत संघर्ष, युद्ध झाली होती. परंतु जेंपी युद्ध इतरांपेक्षा वेगळे होतं. एकतर या युद्धात अनेक निष्ठावान लष्करी घराणी एकत्र आली आणि दुसरे, या युद्धानंतर घटनात्मक आणि संस्थात्मक प्रशासन निर्माण केलं गेलं, ही नवी यंत्रणा आर्थिक आणि राजकीय दोन्हीं पातळ्यांवर कार्यरत झाली. या यंत्रणेमार्फत प्रत्येक प्रांतामध्ये योरितोमोने आपले हस्तक नेमले. हे हस्तक महसूल वसुली, न्यायनिवाडा आणि संरक्षण ही तीनही कामं करत, आपल्या घराण्यातील आणि आपल्या विश्वासातील माणसं
योरितोमोने प्रत्येक प्रांतात नेमली. या प्रांताधिकार्यांना त्यांच्या कामाबद्दल जमिनी, बिरुदं दिली जात. त्यातून त्यांचा सन्मान तर होईच, पण राजसत्तेविषयीची निष्ठाही वाढीला लागे.

योरितोमोने आखुन दिलेली ही प्रशासन व्यवस्था पुढे ७०० वर्ष जपानमध्ये अबाधित राहिली. म्हणूनच जपानमधील समृद्धीचा पाया घालणारा राज्यकर्ता म्हणूनही योरितोमोचं महत्त्व आहे.
सम्राट आणि राजदरबार यांचें महत्त्व आणि प्रभाव टिकवून ठेवण्यात
योरितोमोचे वेगळेपण होतं. संपूर्ण सत्ता खऱ्या अर्थाने 'शोगुन' म्हणून योरितोमो राबवीत असला तरी सम्राटाला दूर सारून योरितोमो स्वतः सत्ताधीश बनला नाही. पण 'शोगुन' म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करून त्याने जपानी राज्याची घड़ी बसवण्यात मोठा वाटा
उचलला. त्यासाठी त्याने लावलेली यंत्रणा 'शोगुन पद्धती' म्हणूनच ओळखली जाऊ लागली,
योरितोमो आणि त्याच्या वंशजांनी आपलं प्रशासन कामाकुरा इथून चालवलं. म्हणूनच या संपूर्ण कालखंडाला 'कामाकुरा कालखंड' असं संबोधलं जातं. घोड्यावरून पडल्याचं निमित्त झालं आणि इ. स. ११९९ मध्ये योरितोमोचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर होजो या घराण्याकडे (योरितोमोच सासर) शोगुन पद गेलं.
चौदाव्या शतकात आणि सोळाव्या शतकात घराणी बदलली, परंतु शोगुन आणि त्याच्या प्रशासन व्यवस्थेत बदल झाला नाही. एका अथनि मध्ययुगीन जपानचा संपूर्ण इतिहास म्हणजे योरितोमो नो मिनामोतो याने निर्माण केलेल्या शोगुन प्रशासन
व्यवस्थेचा इतिहास आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
- ---

7. आत्मकेंद्रीत जपान: अर्थात प्राचीन जपान

उगवत्या सूर्याचा देश अर्थात निपॉन म्हणजेच जपान! आशियातला हा छोटासा देश.मोजक्या बेटांनी तयार झालेला. क्युशू, शिकोकू, होक्काईदो, होन्शू ही चार बेटं ही जपानची मुख्य भूमी.

प्रामुख्याने या बेटांवरील लोकांनी स्वत:ला जगापासून सतत लांब ठेवले. आपली संस्कृती, आपली शुद्धता जपण्यासाठी इतर कोणालाही जपानी भूमीवर उतरायची परवानगी नव्हती अन जपान मधील कोणालाही बाहेर जायची परवानगी नव्हती.
काही चिनी जहाजं, काही कोरियातली जहाजं याला अपवाद होती. परंतु हा संपर्कही अगदी शक्य तितका कमी ठेवला जाई.

जपान हा अतिशय चिंचोळा भूभाग. चारी बाजुंनी समुद्र. दक्षिण, उत्तर आणि पूर्व या तीनही बाजुंना पसरलेला पॅसिफिक महासागर, पश्चिमेला चीन आणि जपान मधला जपानी समुद्र. जपान पासून पूर्वेकडचा पॅसिफिक महासागर खूप खोल आहे. तर चिन आणि जपान यामधला समुद्र हा अतिशय खळबळ असलेला, सतत वादळे होणारा समुद्र आहे. स्वाभाविकच जपान या चहुबाजूंनी वेढलेल्या समुद्रामुळे तसाही जगापासून तुटलेला होता.
जपानच्या भूमीची विचार करताना अजून एक महत्वाची गोष्ट माहिती करून घेतली पाहिजे. ही भूमी अतिशय भूकंप प्रवण आहे. सततचे भूकंप ही जपानची नेहमीची एक समस्या आहे. सतत होणाऱ्या भूकंपांमुळे सतत घरं, इमारती  कोसळणं, हे नित्याचं होतं. स्वाभाविक पुन्हा पुन्हा घरं बांधणं. हलक्या स्वरुपाची पण कणखर घरं बांधणं हे त्यांच्या आयुष्याचा अपरिहार्य घटक बनला.
भूकंपाबरोबरच चारी बाजुंनी समुद्र  असल्याने उसळणाऱ्या राक्षसी लाटा अन भूभाग अतिशय चिंचोळा असल्याने देशाच्या सर्व भूभागात समुग्राचे पाणी घुसणे हेही होते.
या समस्यांशी तोंड देताना येथील लोकांची मनोधारणाही बदलत गेली. अतिशय कामसू, कष्टाळू, सतत काम करणारी मनोवृत्ती इथे तयार झाली. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यायला सज्ज अशी लोकं. त्यामुळे एकमेकांना मदत करणे, समाजाने एकरुपपणे काम करणे, एकमेकांना धरुन रहाणे असा अतिशय घट्ट समाज इथे निर्माण होत गेला.

इ. स. च्या पहिल्या शतकापासून जपानच्या इतिहासाची नोंद सापडते;  पण अगदी तुरळक. त्यातही दुसऱ्या शतकातली हिमिको राणी, तिचा राज्यकारभार याबाबत माहिती मिळते. तिच्यानंतर इयो आणि इतरही काही राण्यांनी अधिकार गाजवला.  या राण्या प्रत्यक्ष राज्यकारभार करत होत्या.
जनतेमधील लष्करी समुह - सामुराई हा फार प्रतिष्ठेचा वर्ग होता. राजाप्रती अतिशय निष्ठा असणारा हा वर्ग होता. राजाचा मृत्यु झाला तर स्वत:च्या पोटात तलवार खुपसून मृत्यूला कवटाळत,  इतकी ही निष्ठा पराकोटीची असे. साधारण सातव्या शतकात या सामुराईंचा प्रमुख म्हणजेच शोगून (पंतप्रधान) याचे महत्व वाढू लागले.
परकियांची आक्रमणेही  ( अगदी कुविख्यात मंगोल आक्रमक, कुबलाई खानचेही) या शोगून अन सामुराईंनी वेळो वेळी परतवली

पुढे बाराव्या शतकात मिनामातो नो योरितोमो (मागत्या भागात याचीच माहिती आपण घेतलेली) ह्याने या शोगून पदाचे महत्व प्रस्थापित केले. देशभर आपले हस्तक नेमणे, स्थानिक करवसुली, प्रशासन, संरक्षण अशा सर्व गोष्टी शोगूनच पहात असे.

आधुनिक काळात युरोप मधे औद्योगिक क्रांती झाल्यावर युरोपीय सत्तांना आपला व्यापार वाढवण्यासाठी इतर देशांशी संपर्क वाढवावा वाटू लागला. दसे ते भारत, आफ्रिका, चीन मधे गेले तसेच ते जपानमधेही गेले. परंतु जपानने आपली संस्कृती शुद्ध ठेवण्यासाठी या परकियांना प्रखर विरोध केला. अगदी परकिय बोट वादळात सापडून जपानी किनाऱ्याला लागली तरी त्यावरील लोकांना जपानने अभय देणे नाकारले.
याला पहिले मोठे आव्हान दिले ते अमेरिकेने. खरं तर अमेरिका कितीतरी मैल लांब; संपूर्ण
पॅसिफिक ओलांडून पार पश्चिमेला असलेला अमेरिका. पण या अमेरिकेला जपानमधे हितसंबंध निर्माण झाले. अमेरिकेचा कमोडर पेरी या नाविक अधिकाऱ्याच्या दोन भेटींमधे जपानची अलिप्तता पार मोडून पडली.
या बद्दल आणि जपानने केलेला स्वत: चा कायापालट याबद्दल  पुन्हा कधीतरी बोलुत.
----


8. पेयपान


आज  आपण एक वेगळाच इतिहास बघणारोत. जरा निवांत आहात? चला मग कॉफीचा कप घ्या ☕ कॉफी पीत पीत गप्पा मारू. 

एव्हाना तुम्ही ओळखलं असेलच, हो, बरोब्बर. आज कॉफीचा इतिहास शोधूयात.


कॉफी मूळ आफ्रिकेतली. येमेन मधली. काहींच्या मते इथिओपियातली. साधारण नववे शतक. तिथून कॉफीचा व्यापार सुरु केला तो मात्र अरबांनी. संपूर्ण जगभराचा कॉफीच्या व्यापाराचा त्यांनी ताबाच घेतला.

कॉफीची प्रमुख दोन जाती आहेत; रोबस्टा आणि अरेबिका.


अरबस्थानातील लोकांना कॉफी पिणेही फार आवडू लागले. प्रामुख्याने उच्च वर्गातले, विचारी, पुढारी लोक सतत कॉफी पिण्यात वेळ घालवू लागले. शेवटी असे होऊ लागले की लोकं काम न करता कॉफीच पीत बसून राहू लागले 🙆🏻‍♀️ मग राजाने हुकूम काढला. कॉफी पिणं यावर बंधनं घातली. अगदी कॉफी पिणे हा गुन्हा बनवला. हळूहळू जनता शहाणी झाली अन कॉफीचा पाश दूर झाला. 

पण व्यापार मात्र चालूच राहिला.

अरबस्थानातील मक्का आणि मदिना ही मुस्लिम धर्माची प्रमुख स्थळं. तिथेही कॉफीचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे.  हज यात्रेला आलेले यात्रेकरू कॉपीची चटक जगभर पसरवू लागले.


असाच एक सुफि संत कर्नाटकातून हज यात्रेला मक्केला पोहोचला. "बाबा बूदान" हे त्याचे नाव. त्याची यात्रा मक्केला सफल झालीच. पण जोडीने त्याला कॉफीची चवही कळली अन तिचा मोहही. त्याने ठरवले की या कॉफीची चव आपण आपल्या मित्रमंडळींनाही दिलीच पाहिजे. पण तेव्हा सहजी कॉपी बिया आणणे शक्य नव्हते. व्यापारी बंधने फार कडक होती. कॉफी तर सर्वात महाग, अगदी सोन्याशी स्पर्धा करणारी! त्यामुळे मग बाबा बूदान याने कॉफीच्या चार- सात बिया आपल्या दाढीमधे लपवल्या आणि परतीच्या प्रवासाला लागला. अशा रितीने मध्ययुगातच तस्करीची सुरुवात झाली.

मजल दरमजल करत, दाढी अन त्यातल्या कॉफी बियांना सांभाळत बूदान बाबा आपल्या गावी, चिकमंगळूरला पोहोचले. तिथे चंदगिरी डोंगरावर त्यांनी या बिया रुजवल्या. अन अशा रितीने कॉफी भारतात पोहोचली. कुर्ग अन आसपासचे वातावरण कॉफीच्या शेतीला उपयुक्त होते. त्यामुळे या ठिकाणी भारतात प्रथम कॉफीची लागवड सुरु झाली.


थांबा थांबा. इतक्यात जाऊ नका. काय आहे न, हल्ली कॉफी पिणं हे अतिशय प्रतिष्ठेचं झालं आहे. जितकी महाग कॉफी तितकी प्रतिष्ठा जास्ती. पण बघा हं. एकदा तपासून पहा. सर्वात महाग कॉफी तर तुम्ही पीत नाही आहात न?  नाव सांगू म्हणता? तिचं नाव आहे कॉफी लुवाक. बघा बरं कॉफीच्या बाटलीवरचं नाव. नाही? नक्की, नाही नं? हुश्श्य 🥲

का?  अहो या कॉफीचा प्रवास फार विचित्र आहे हो🫢  

सिव्हिट कॅट ही एक मांजरीची जमात. साधी सुधी नाही, कॉफीच्या फळांमधलं सर्वात चविष्ट फळ ओळखण्याची क्षमता असणारी ही मांजर जमात. तर ही मांजर कॉफीच्या झाडावरची सर्वात चविष्ट, रसाळ फळं खाते. फळांचा गर तर ती पचवते पण त्यातली बी काही ती पचवत नाही आणि प्रा:तकालिन विधीतून ती त्या बिया जमिनीवर टाकून देते 💩🫘


या बिया मग गोळा केल्या जातात, स्वच्छ धुवून वाळवल्या जातीत अन त्याची पावडर केली जाते. हीच कॉफी म्हणजे सुप्रसिद्ध, सर्वात महाग कॉफी, लुवाक कॉफी! काय मग? करणार का धाडस, सर्वात महाग कॉफी पिण्याचं ?  😛

---

No comments:

Post a Comment