Thursday, August 29, 2019

13. "या टोपी खाली, दडलंय काय?"

( डिस्क्लेमर : लेखातील सर्व छायाचित्रे नेटवरून साभार )


अंतराळातून पृथ्वीकडे पहाताना काही गोष्टी ठळकपणे  दिसतात. त्यातल्याच या तीन टोप्या ! असं म्हणतात की पृथ्वीच्या मध्यभागावर या तीन त्रिकोणी टोप्या आहेत. अजून नाहीओळखलंत ? वाळवंटात तीन त्रिकोणी टोप्या. बरोब्बर. आता बरोब्बर ओळखलंत.. इजिप्त मधले पिरॅमिड! जगातल्या आश्चर्यांमधील एक ! जणूकाही पृथ्वीने आपल्या डोक्यावर टोप्या ठेवल्यात अशीच दिसतात ती पिरॅमिड !

आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण शिकलो की, इजिप्त मधील राजांच्या या दफनभूमी आहेत. इजिप्तमधे राजाच्या मृत शरीरावर काही शस्त्रक्रिया करून, नंतर  त्यावर विविध रसायने लावून त्यांचे  जतन केले  जाई.यांनाच  ममी असे संबोधले  जाते. अन या ममी सुरक्षित राहाव्यात, कालानुरूप त्यांचे कुजणे होऊ नये म्हणून विशिष्ट पद्धतीच्या  इमारती बांधून, त्यात या ममी ठेवल्या गेल्या.  इजिप्त मध्ये असे बरेच पिरामिड सापडले आहेत. त्यापैकी महत्वाचे हे तीन !

अलीकडच्या काळात काही नवीन गोष्टी सापडत आहेत. काही नवी उत्खनन, काही नवीन पाहणी, काही नवीन अन्वयार्थ लावले जात आहेत. त्यातल्या एकाची थोडी माहिती, आज घेऊ.

गिझा इथले जे तीन पिरॅमिड आहेत त्यातीळ खुफरे पिरॅमिड कडे जाणारे जे दगडी बांधीव छोटे रस्ते आहेत त्याखाली एक शाफ्ट आहे.  ओसायरिस शाफ्ट. खरे तर या ठिकाणी सलग खडक आहे. हा खडक  खोदून शाफ्ट  तयार केलेला आहे. १९३३-३४ मध्ये सलीम हसन आणि यांच्या टीमने हा जमिनी खालचा शाफ्ट जगासमोर आणला. एक मजलाखाली  हा शाफ्ट उत्खनन करून त्यांनी मोकळा केला. परंतु त्या खाली जाणे त्यांना शक्य झाले नाही. 
पुढे १९९९ मध्ये झही हवास आणि त्यांच्या टीमने हे काम पुन्हा हाती घेतले. आणि जवळ जवळ ३० मीटर खोलवर उत्खनन  केले. एकाखाली एक अशा तीन टप्यामध्ये हा शाफ्ट आहे.

काय आहे या शाफ्टच्या पोटात? 

जमिनीच्या जवळ जवळ ८-१० फूट खाली एका भुयार तोंड दिसतं. 
  

पहिल्या टप्यावरून वर बघताना. 
या भुयारामध्ये आणि खाली पूर्ण खडक आहे. या भुयारातून सरळ पुढे गेले कि खोल खाली नऊ मीटर खडक खणलेला आहे. जेमतेम सहाफुटी लांबीरुंदीअसे  हे चौकोनी भुयार आहे.  खाली उतरण्यास आता लोखंडी  शिड्या लावल्या आहेत. नऊ मीटर खाली उतरले कि पहिला टप्पा येतो. या टप्यावर फार काही सापडले नव्हते.  

तिथून पुढे पुन्हा काही अंतर सरळ गेले कि दुसऱ्या टप्याकडे जाण्यासाठी पुन्हा खोलखाली सव्वा तेरा मीटर खोदले आहे. तिथेही लोखंडी शिडी उतरून खाली आले कि दुसरा टप्पा लागतो. 

दुसऱ्या टप्याकडे जाताना 

या दुसऱ्या टप्याच्या  मध्यात सलग आयताकार खोली आहे आणि तिच्या आजूबाजूला शवपेट्या ठेवण्यासाठी सहा खोल्यांसारखी जागा तयार केली आहे. या टप्यावर अनेक भांडी, वस्तू सापडल्या होत्या. याशिवाय सहापैकी दोन खोल्यांमध्ये दोन भल्या मोठ्या दगडी पेट्याही,  झाकणांसह  सापडल्या.  अंदाजे ७ फूट लांब , चार फूट रुंद आणि सहा फूट उंच अशा प्रचंड मोठ्या पेट्या आहेत. आश्चर्य म्हणजे  या पेटयांचा दगड संपूर्ण इजिप्त मध्ये कुठेही सापडत नाही. ह्या पेट्या इतक्या छोट्या भुयारून खाली कशा आणल्या, का आणल्या या कशाचीच उत्तरे आज आपल्याजवळ नाहीत. 
डावीकडे दगडी पेटी दिसतेय. शेजारी उभी आलेली व्यक्ती पाहिली कि पेटीची भव्यता लक्षात येईल.  


या टप्याच्या खाली पुन्हा साडे सात मीटर खोदलेले आहे. इथे जायचे भुयार अजूनच लहान आहे. फारतर चार बाय चार फुटाचे.
तिसऱ्या टप्याकडे जाताना 

 इथून खाली उतरले कि तिसरा टप्पा येतो. इथेही मोठी आयताकार खोली आहे. मध्यात पुन्हा एक दगडी पेटी आहे. खोलीच्या दुसऱ्या टोकाला, दोन वेगवेगळ्या दिशांना वर चढत जाणारी,  अतिशय लहान भुयारे आहेत. तिथून पुढचा मार्ग अजून शोधता आलेला नाही. 

या टप्यातील आश्चर्यजनक गोष्ट तर अजून सांगितलीच नाही. या खोली मध्ये ; भर वाळवंटी प्रदेशातल्या, जमिनी पासून तीस मीटरहून खोल जागेत , जिथे सूर्याचा प्रकाशही जाऊ शकत नाही, जिथे जमिनी वर दूरपर्यंत पाणी दिसत नाही कि एकही झाड दिसत नाही अशा या ठिकाणी, पिरॅमिडच्या टोपी खाली काय दडलं आहे? तर अतिशय स्वच्छ अगदी स्फटिकाप्रमाणे असणारे पाणी ! खोटं वाटलं ना? हा बघा फोटो. अतिशय अपुरा प्रकाश असूनही, त्या पाण्यात उभ्या असलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब सहजी दिसते आहे. 

तिसऱ्या टप्यातले स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पाणी 

हे काय आहे?  इतके खाली कठीण खडकातून का खोदले गेले? त्या अवाढव्य दगडी पेट्या तिथे का नेल्या? कशा नेल्या? खाली असणारी छोटी भुयारं अजून कुठे जातात? तिसऱ्या टप्यामध्ये असलेले पाणी तिथे का आहे? ते कोठून आले, येते? भूगर्भात इतके पाणी असूनही जमिनीवर एकही झाड का नाही? हे स्थापत्य कसे केले? कोणी केले? काय हत्यारं, कोणती यंत्र वापरली गेली? कोणत्या काळात हे केले गेले? .... एक नाही अनेक प्रश्न ! पण कशाचेच संयुक्तिक उत्तर नाही. 

शेवटी मनात इतकाच येतं  " या टोपी खाली, दडलंय काय? "

Tuesday, August 27, 2019

9. कोण कुठले, कोण आपण ?

पृथ्वीवरील मानवी वसाहत आणि आपण

४५० कोटी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीची उत्पत्ती झाली. आणि साधारण ४२० कोटी वर्षांपूर्वी जीवसृष्टी निर्माण झाली.  
प्राणी जगताची सुरुवात साधारण  २५० कोटी वर्षांपुर्वी  झाली. आणि मानवाची निर्मिती साधारण तीस लाख वर्षांपूर्वी झाली.

असं असले तरी मानवाचा ज्ञात इतिहास मात्र जेमतेम पाचहजार वर्षातलाच !
का बरं असं  असावं ? तत्पूर्वीचा इतिहास काय असेल? त्याचे काही पुरावे आपल्याला सापडतात का? का बरं सापडत नाहीत ? पुरावे सापडत नाहीत म्हणजे  काही इतिहास नव्हताच? असे कसे बरं असेल? जरा पुन्हा एकदा मानवी उत्पत्ती आणि विकासाचा आढावा घेऊन बघुयात चला.

मानवाच्या निर्मिती यापासून पाहिले तर हा काळ तीन महत्वाच्या भागात विभागाला जातो. पाषाण युग (सुमारे पंचवीस लाख वर्षांपूर्वीपासून ) , कास्य युग (सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीपासून)आणि लोह युग ( सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीपासून) म्हणजे असे लक्षात येईल कि साधारण लोह युगापासून आपल्याला मानवाचा इतिहास माहिती आहे. त्या आधीचे कास्य युग त्यामानाने लहान होते. सुमारे साडेतीन हजार वर्षे. परंतु त्या आधीची  जवळ जवळ १८-२० लाख वर्षांचे काय ? तो इतिहास आज पूर्ण अज्ञात आहे.

आश्चर्य वाटावीतअसे काही जुने अवशेष सापडतात. उदा. गोबेकटी टेपे ( Gobekti Tepe ) तुर्कस्तान येथील संस्कृती , पेट्रा ( Petra ) जॉर्डन येतील संस्कृती ,  समुद्रात बुडालेल्या ग्रीक जहाजातील अनाकलनीय यंत्र, ईजिप्तमधील अनेक कोडी, वेरूळ लेणी, कुल्लर गुहा (द, भारत) या आणि अशा अनेक कोड्यांची  उत्तर आज आपल्याकडे नाहीत. 

मानवी समाजाची सुरुवात लाखो वर्षांपूर्वी झाली पण आपल्या हाती फारतर ५००० वर्षांपूर्वीचा इतिहास हातात आहे. अगदी फार तर ७००० वर्षांपूर्वीचा. मग त्या आधी लाखो वर्ष काय घडले? आपण समजतो अहो ती आणि तीच संस्कृती आहे, होती? कि या आधी काही संस्कृती होऊन गेल्या अन काळाच्या पडद्याआड त्या हरवून गेल्या? ११००० हजार वर्षांपूर्वी झालेल्या हिमयुगाने जुनी संस्कृती गिळंकृत केली? या आधीही अनेक हिमयुगीन येऊन गेली; त्यांनी किती माहिती आपल्या पोटात रिचविली ? अनेक समाजांमध्ये काही पुराणकथा सामान आढळतात; जसे कि महापूर आणि त्यातून वाचयासाठी बांधलेली महान नौका. किंवा अनेक धर्मीयांमध्ये काही सामान मान्यता आहेत. अनेक भाषांमध्ये काही समानता आहेत. या अशा अनेक उत्तरांचा शोध आज घेण्याचा प्रयत्न चालू आहे. 

आज  जगभर अनेक उत्खननं होत आहेत. अनेक ठिकाणी खूप मोठमोठी दगडी बांधकामं, कोरीव दगड सापडत आहेत. अनेक ठिकाणी पिरॅमिड सदृश भव्य इमारती सापडत आहेत. तसेच अनेक ठिकाणांच्या विविध कोरीवकामांमधून दिसणाऱ्या वस्तू फार नंतर अस्तित्वात आलेल्या दिसतात. उदा. सायकल, दुर्बिणी, विमानं, हेलिकॉप्टर्स, इ.  यांचे अर्थ लावणं अजून चालू आहे.

तसेच ज्या जुन्या इमारती, वस्तूंचा अर्थ लावला आहे त्याबाबतही काही नवे पुरावे पुढे येत आहेत. वेगवेगळ्या अभ्यासप्रणालींचा स्वीकार करून त्यांच्यामार्फत मिळणार-या माहितींचा साकल्याने विचार केला जातो आहे. खगोलशास्त्र ( Astronomy ), समुद्रशास्त्र (Oceanography), हवामानशास्त्र (Meteorology ), पूरपरिस्थितीचा अभ्यास करणारे शास्त्र ( ), भूविज्ञान  (geoscience), मानववंशशास्त्र ( genealogy), भाषिक मानववंशशास्त्र ( linguistic anthropology ),  या आणि अशा अनेक शास्त्रांमधून मिळणारी माहिती, त्यांचा एकमेकांशी असणारा संबध अभ्यासून त्यातून योग्य तो अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातून मिळणारी माहिती कधी जुन्या माहितीला बळकट करेल तर कधी जुनी गृहीतकं पूर्ण बदलावीही लागती. यासाठी मन, बुद्धी यांचा  मोकळेपणा स्वीकार करायला हवा. हजारो वर्षांचे आपले विचार, मतं एखाद वेळेस झुगारावी  लागतील. त्याची तयारी हवी. 

कधी काही उत्तरं मिळतात काही नाही. कधी त्यांचा मागोवा घेतला जातो. कधी आडकाठी केली जाते. आज गरज आहे ती स्वच्छ, खुल्या संशोधनपर नजरेची. आशा करूयात की ही कोडी सोडवली जातील. यासर्वांबाबत एक स्वच्छ,  सकारात्मक, खुला दृष्टिकोन आज स्विकारण्याची गरज आहे. अर्थातच पुराव्यांनीशीच नवीन काही स्वीकारले जावे.