Monday, March 3, 2025

आजच्या नोंदी - आंतरराष्ट्रीय राजकारण

  • नाटो मधल्या इतर सर्व देशांना अमेरिकेने म्हणजे ट्रम्प ने सध्या सांगितले की नाटो सैन्यातला वाटा प्रत्येकाने वाढवा नाहीतर रशियाला चिथावणी देऊन युद्ध सुरू करेन. आणि असे युद्ध सुरू झालं तर अमेरिका मदत करणार नाही.

  • नाटो मधले 53% देश हे पूर्वी रशियाखाली असणारे देश आहेत.

  • रशियामधे कम्युनिकेशन संपल्यानंतर या कर्मठ ख्रिश्चन धर्मानी डोकं वर काढला आहे. आणि या कर्मठ ख्रिश्चन लोकांचे महत्वाचे धर्मस्थळ हे युक्रेन मध्ये आहे.

  • पहिल्या महायुद्धानंतर सारखीच परिस्थिती सध्या झालेली दिसते. पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिकेने युरोपला प्रामुख्याने फ्रान्स इंग्लंड आणि या दोस्त राष्ट्रांना प्रचंड आर्थिक मदत केली होती. आणि युरोपला मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला होता.  हा कर्ज पुरवठा परत येणे अमेरिकेच्या आर्थिक दृष्टिकोनातून फार गरजेचं होतं. त्यामुळे सुरू झालेले युद्ध हे दोस्त देशच जिंकले पाहिजेत तरच हा पैसा अमेरिकेला परत मिळाला असता. सो युरोपियन युद्धात उतरणे अमेरिकेला भाग पडलं.

  • गेल्या 40-50 वर्षात अमेरिकेने विविध देशांना (मध्य युरोप दक्षिण युरोप उत्तर युरोप) केलेली आर्थिक मदत ही अशाच प्रकारची प्रचंड मोठी  होती. तीही प्रामुख्याने रशियाच्या विरुद्ध.

  • पण आता रशिया मधला कम्युनिझम संपला आहे आणि तिथे उजवी विचारसरणी किंवा ज्याला आपण हुकूमशाही विचारसरणी असे म्हणतो ती तिथे स्थापन होताना दिसते. अमेरिकेमध्येही लोकशाहीपेक्षा हुकूमशाही प्रवृत्तीच पुढे येताना दिसते आहे.

  • दुसऱ्या महिन्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये वैचारिक विरोध आणि सत्ता संघर्ष हे दोन्ही होते. ज्याच्यातून शीतयुद्ध निर्माण झाले.

  • आता विचारसरणी एकच पण सत्ता संघर्ष सारखा. त्यामुळे यात सगळे देश ओढले जाणार आहेत.

  • अमेरिकेला युक्रेन मधल्या नैसर्गिक साधन संपत्ती मधला 50 टक्के वाटा हवय आहे. अर्थातच रशियासही याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि मगाशी म्हटलं तसं धार्मिक इंटरेस्ट सुद्धा.

  • चीन या दोघांनाही हवा आहे तो एक मोठी सत्ता असल्यामुळे. तो आपल्या विरुद्ध बाजूला जाऊ नये याच्यासाठी आपल्या बाजूला या दोघांनाही हवा आहे

  • या सगळ्यातून आंतरराष्ट्रीय राजकारण प्रचंड तापले आहे.  पण प्रत्यक्ष मोठ्या युद्धात पडण्या इतके कोणीच सक्षम नाही. पण एकमेकांची ताकद आजमावणे चालू आहे. नजीकच्या काळात या देशांमधली सैन्य भरती आणि सशस्त्र निर्मिती याकडे आपल्याला लक्ष ठेवावे लागेल. होप या दोघांची महत्त्वाकांक्षा कंट्रोलमध्ये राहील.

  • दोन महायुद्धांमुळे युरोप आता खूप शहाणा झाला आहे. होता होईल तो युरोप भूमीवरती युद्ध होऊ देणार नाही. स्वाभाविकच आशिया प्रामुख्याने अरबस्थान किंवा मध्यपूर्व मध्ये ही रस्सीखेच होईल. अर्थातच अरबस्थानामध्ये किती खनिज तेल साठे शिल्लक आहेत; यावर युद्ध पुढे ढकलले जाऊ शकते.

  • वर वर पहाता पुतीन ट्रंप गळ्यात गळे घालताना दिसताहेत पण पुन्हा ही ही दुसऱ्या महायुद्धातल्या सारखी दिखावू मैत्रीच वाटतेय.

  • युद्धजन्य परिस्थिती तयार तर झाली आहे. पण कोणतेही राष्ट्र प्रत्यक्ष मोठ्या युद्धाला तयार झालेले नाही. त्यामुळे एक वेगळेच थंड युद्ध चालू राहील. दुसऱ्याच बळ तिसऱ्या करवी तपासणं हे या काळामध्ये घडण्याची शक्यता दिसते आहे. आणि त्याचंच उदाहरण युक्रेन आणि इस्राएल मधे दिसते आहे.

Saturday, March 1, 2025

युक्रेन - कड्याच्या टोकावर


 दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जशी कोरियाची झाली होती तशी सध्या युक्रेनची परिस्थिती झालेली दिसते आहे. म्हणजे त्यांना एक तर अमेरिकेची मदत हवी आहे; नाहीतर रशियाची मदत हवी. त्या दोघांपैकी कोणाचीही एकाची मदत नाही मिळाली तर युकेन संपणार हे गृहीत आहे. 

आताच्या परिस्थितीमध्ये तर युक्रेन कडे लढायला शस्त्र पण नाहीत. पैसा पण नाही. पैसा एक वेळ तो युरोप कडून उभा करू शकतो. पण तो पैसा उभा केल्यानंतर शस्त्रांची खरेदी करायची तर ती अमेरिके कडूनच करावी लागणार आहे. आणि अमेरिका त्याला तयार नाही.  

सो एक तर युक्रेनला अमेरिकेच्या पुढे नतमस्तक व्हायला लागणार आहे म्हणजेच युक्रेन संपला.  

किंवा अमेरिकेच्या पुढे नतमस्तक नाही झाला तर रशियाच्या विरुद्ध युद्धामध्ये पराभव पत्करावा लागेल.

युरोपने काही पुढाकार घेतला आणि युक्रेनच्या बाजूने उभे राहिले तर काही वेगळे घडू शकेल. पण ही पण शक्यता फार कमी आहे. कारण नाटोला अमेरिकेच्या विरुद्ध जाणं शक्य नाहीये आणि त्यामुळे नाटोही युक्रेंच्यासाठी अमेरिकेची दुश्मनी घेईल अशातली शक्यता नाही.


दुसरा म्हणजे युक्रेनने ज्या गोष्टी केल्या आतापर्यंत; स्पेसिफिकली बायडनच्या काळामध्ये त्या आज पुडे येत आहेत. बायडनच्या मुलाला - त्याची एक कंपनीमध्ये आहे युक्रेनमधे तिच्या मार्फत - प्रचंड फायदा  झालेला आहे. ट्रंपने याच्यावरती चौकशी करायला सुरुवात केली. तर युक्रेन मध्ये त्याची चौकशी करावी याच्यासाठी जेलेन्स्कीने विरोध केला. आणि त्यामुळे स्वाभाविकच ट्रम्प च्या विरोधी तो वागतोय अशी एक भूमिका ट्रंमच्या मनात उभी राहिलेली आहे.  

दुसरं म्हणजे जेव्हा आताची निवडणूक झाली अमेरिकेतली; तेव्हा  मागच्आया वेळी आपल्या मोदींनी जसे अब की बार ट्रंप सरकार केलं ;  तसं या वेळी अमेरिकेमध्ये जाऊन झेलेन्स्कीने बायडनच्या बाजूने ट्रंपच्या विरुद्ध प्रचार केला होता. 

सो ही दोन मोठी कारण आहेत की  ट्रंप पर्सनली झेलन्स्कीच्या विरोधात आहे.

अशा परिस्थितीमध्ये एक तर युक्रेननी आपला नेता बदलायची काहीतरी प्रोसेस केली पाहिजे किंवा त्याला अमेरिकेच्या पुढे नतमस्तक झालं पाहिजे किंवा रशियाशी तह करून युद्ध थांबवलं पाहिजे.
झेलन्स्कीला दिसत होतं की अमेरिकेशी ही चर्चा हा शेवटचा पर्याय आहे आपल्याला उभं राहायचं तर.  स्वतःला आणि देशाला सुद्धा.  त्यातून ट्रंप आणि पंतप्रधान; त्या दोघांनी त्याला इतकं प्रव्होक केलं की शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेली. तोच ट्रंपचा दृष्टिकोन होता या सगळ्या मीटिंगमध्ये असं काही लोकांचं मत आहे. 
तर त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये युक्रेन हा स्वतंत्र देश संपला अशातलीच परिस्थिती दिसते तरी आहे. त्यातून पुढच्या दोन-चार दिवसांमध्ये युरोपची भूमिका स्पष्ट होईल. त्यावर अन युक्रेन काय करतो बघू.

Monday, November 11, 2024

आडनावांची गोष्ट

कुलनाम(आडनाव) याचे पुरावे अगदी फार प्राचीन काळापासून काही प्रमाणात सापडत असले तरी त्यांचा सर्रास वापर होत नसे. धार्मिक बाबा, राजकीय बाबींसंदर्भात क्वचित याची गरज असे. दैनंदिन जीवनात याचा वापर नव्हता.

प्राचिन काळी गावापुरताच संपर्क प्रामुख्याने असे. सर्व गरजा गावातल्या गावातच भागवल्या जात असल्याने गावाबाहेर जाण्याची, संपर्काची फारशी गरज नसे.  स्वाभाविकच छोट्या गावातले बहुतांश लोकं एकमेकांना ओळखत असत. नुसते नाव पुरेसे असे. नाव अन चेहरा यावरून व्यक्ती ओळखणे शक्य होते; व्यक्ती कोणत्या कुटुंबातली हे ओळखणे शक्य असे. तसेच त्या  व्यक्तीचा व्यवसाय, समाजातले स्थानही माहिती असे.

वेगळ्या गावी जाण्याचा प्रसंग आला तर अमुक गावचा, अमुक व्यक्तीचा अमुक नातेवाईक ही ओळख पुरत असे. 


ब्रिटिश काळात हळूहळू गाव सोडणे गरजेचे होऊ लागले. पूर्वीचा गावगाडा हळूहळू बदलू लागला; शहरांचा उदय होऊ लागला. व्यापार, प्रशासन, कामकाज यासाठी वेगळी समाजरचना तयार होऊ लागली. आपले पिढीजात गाव सोडून इतरत्र जाणे भाग पडू लागले. अशा परिस्थितीमधे आपली ओळख टिकून रहावी, आपल्या मूळाशी संबंध टिकावा यासाठी व्यक्तीला आपले कुलनाम/ आडनाव लावणे गरजेचे वाटू लागले. तसेच समाजालाही बाहेरून आलेल्या व्यक्तीचा व्यवसाय, समाजातले स्थान याची सर्वसाधारण ओळख होण्यासाठीही हे आडनाव उपयोगी पडू लागले.

या सर्वातून या काळात हळूहळू आडनाव ही संकल्पना समाजात रुजत गेली. 

---

Wednesday, November 6, 2024

अमेरिका समाज आणि राष्टाध्यक्ष निवडणूक 2024

अमेरिका प्रगत वाटते खरी पण तिथेही प्रचंड तफावत आहे. प्रामुख्याने शिक्षण आणि व्यवसाय या क्षेत्रात.

एक वर्ग आहे,  जो लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून 

मोठा आहे. हा प्रामुख्याने शेती करणारा आहे. भले मोठमोठी यंत्र दिमतीला असतील पण वृत्ती गावंढळच. शिक्षणही कमी. जोडीने ख्रिश्चन धर्म, चर्च यांचा मोठा धार्मिक पगडा. समाज मानस बरचसं मागासच आहे या वर्गाचं. हाच वर्ग बहुतांश मोठ्या प्रदेशात पसरला आहे. अनेक राज्यच्या राज्य हाच नागरिक दिसतो. परंपरागत, शेतकरी, नव्याला नाकारणारा, धर्माला चिकटून असणारा, जुन्या रुढी बाळगणारा. हा झाला अमेरिका( जसा भारत)

अन दुसरा वर्ग आहे तो शहरी, सुशिक्षित, कायदेक्षेत्रातील, उद्योगपती, मोठमोठी ऑफिसेस, फॅशन इंडस्ट्री, गँबलिंग इंडस्ट्री, फार्मसुटिकल, ऑटो इंडस्ट्री... वगैरे. हा समाज सुधारक, सुशिक्षीत, पैसेवाला, सरकारवर प्रभाव पाडणारा, धर्माचे प्राबल्य कमी असणारा, ख्रिश्चन, ज्यु, हिस्पॅनिक, एशियन वगैरे. यांच्या हातात आर्थिक, कायदेशीर, राजकीय पॉवर आहे. हा युनायटेड स्टेटस (जसा इंडिया)

व्हाईट सुप्रमसी आणि मेल सुप्रिमसी. दोन्ही पहिल्या गटाला महत्वाची वाटते. दुसऱ्याला नाही.

अजूनही बरेच फरक क्वाईन करता येतील. जे  मांडले ते महत्वाचे काही.

तर अमेरिकोतला पहिला वर्ग जो आहे त्याला ट्रंप आवडतो. कारण तो परंपरा, रुढी, धर्म, शेतकरी यांना उचलून धरतो.

तर दुसऱ्या वर्गाला म्हणजे शहरी वर्गाला तो नको आहे.


आता तिथल्या सरकार निर्मितीत दोन मुख्य भाग आहेत. राष्ट्रपती आणि सिनेट. दोन्हीची निवडणूक प्रक्रिया वेगवेगळी.

राष्ट्रपती निवडणुकीमधे प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या इलेक्ट्रोलर कॉलेजच्या सीटस आहेत. उदा. कॅलिफोर्निया 75 तर अलास्काला 3. असं व्हेरिएशन आहे. 

समजा कॅलीफोर्नियात  डेमोक्रॅटिकचे 50 आणि रिपब्लिकनचे 25 निवडून आले तरी मेजॉरिटी डेमो ची तर सगळ्याच्या सगळ्या 75 डेमोला जातात.

 राष्ट्रपती उमेदवाराच्या अटी

1. जन्मत: अमेरिकन हवा

2. 35 वर्ष वय हवं

3. अमेरिकेचा 14 की 15 वर्ष रहिवासी हवा


बस, आता इतकं पुरे.


Monday, October 21, 2024

आजचे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारत

 


जेव्हा एखादा हुषार माणसाला स्वत:च्याच बुद्धीला न पटणारं बोलावं लागतं. तेव्हा तो अडखळत बोलतो, अं, यु नो, इट्स लुक लाईक, नाउ लुक, आय विल गिव्ह 2-3 रिजन्स असं म्हणून एखादं आचरटसारखं कारण सांगतो... किती दिवस हा बुडबुडा फुगणारे?

अंतर्गत बाबतीत एकवेळ लोकांना देशभक्ती, ग्रेट संस्कृती या सगळ्याची अफू देऊन गुंगवू शकाल. पण आंतरराष्ट्रीय राजकारणातही हेच होऊ लागलं तर जगात हसं होईल अन गंभीर परिस्थिती उद्भवेल हे या हुषार लोकांना समजत नाही असं नाही, पण पक्ष आणि पक्षप्रमुखांचा इतका दट्या आहे की मग असं चाचरत, अतार्किक बोलत सुटावं लागतं.

आज खरं तर जागतिक राजकारणात भारत एकटा पडत चाललाय. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, चीन, रशिया, इस्राएल हे सशस्त्र मोठे देश आणि पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव या सारखे छोटे शेजारी देशांचीही मैत्री भारत गमावून बसला आहे. मग उगा पाकिस्तानशी गळाभेट करणं. ज्या रशियाला डावे डावे म्हणून अन नेहरुंना त्यांचे पित्ते म्हणून पाण्यात पाहिलं, ज्याचे कझाकिस्तानबरोबर युद्ध थांबवल्याची ग्वाही मिरवली, आज त्याच रशियाशी मैत्री जोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

एका दुसऱ्या घटनेने पूर्ण आंतरराष्ट्रीय संबंधच नव्याने रचायचे हा अतिशय बालिशपणा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात वैचारिक भूमिका, व्यापार, अर्थकारण, शस्त्रास्त्र देवघेव आणि मोठ्या काळातला स्पॅन फार महत्वाचा असतो. 

आज अमेरिकेच्या प्रेमात अन दोन वर्षात रशियाशी मैत्री. आज कझाकिस्तानची बाजू अन वर्षभरात रशियाशी मैत्री. असं आंतरराष्ट्रीय राजकारण करू लागलात तर इतर सर्व राष्ट्र तुमचा विचार कितपत गंभीरपणे करतील याबाबत शंकाच आहे.

ज्या भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच अलिप्तराष्ट्र संघटना उभारण्यात पुढाकार घेतला, इतकेच नव्हे तर या संघटनेला अनेक देशांसह बलिष्ट केले. इतके की अमेरिका रशिया शीतयुद्धाला मोठा अडसर उभा केला. आज त्या भारताचे स्थान पार घालवले आहे असं वाटू लागलय.

या साऱ्यातून भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणातली आपली पत पार घालवली आहे असही खेदाने म्हणावं लागतय...


Thursday, August 1, 2024

सोनोपंत दांडेकर

(संकलनपर)

 (२० एप्रिल १८९६ — ९ जुलै १९६८). महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे विख्यात भगवत भक्त, श्री सार्थ ज्ञानेश्वरीचे संशोधक, संपादक आणि संतवाड्.मयाचे अभ्यासक. त्यांचे मूळ नाव शंकर वामन दांडेकर असून ते सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर या नावाने अधिक परिचित होते.

मूळचे माहिमचे पम नंतर पुण्यात. फर्गसन महाविद्यालयातून बीए. पुढे प्लेटोचे तत्वज्ञान यावर एम ए.

शिक्षण प्रसारक मंडळी चे आजीव सदस्य. पुढे सप महाविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक.

भारतीय,पाश्चात्य दोन्ही तत्वज्ञानांचा प्रचंड अभ्यास.ज्ञानेश्वरीचे संशोधक, संपादक. संत वाड्मयाचा अभ्यास. डॉ राधाकृष्णन यांनीही त्यांच्या ज्ञान अन अभ्यासाचे कौतुक केलेले. 

नंतर नू म विचे मुख्याध्यापक. नंतर रुईयात उप प्राचार्य. अन नंतर स प मधे प्राचार्य.

प्रसाद मासिकाचे काही काळ संपादक. भारतीय.तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष. 

पंढरपूरची वारी नेमाने करत. निवृत्ती नंतर नेवासे इथली ज्ञानेश्वरांच्या मंदीराचे पुनरुज्जीवन. ज्ञानदेवांच्या पैस भोवती मोठे देऊळ बांधले. अनेक देवळांचे पुनरुज्जीवन,डागडुजी. 


ज्ञानेश्वरीची अर्थासह संशोधित आवृत्ती काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे सोनोपंतांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. यान्वये तयार झालेल्या सार्थ ज्ञानेश्वरी मधली त्यांची प्रस्तावना फार मोलाची.

गावोगावी कीर्तने-प्रवचने करून सर्वसामान्य लोकांना नीतिधर्माचा उपदेश करून त्यांना अंधश्रद्धामुक्त असा सन्मार्गाचा रस्ता दाखविला. शिवाय त्यांनी ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, भावार्थ रामायण इत्यादी संत-साहित्य संशोधित करून शुद्ध स्वरूपात लोकांपुढे ठेवले.

ज्ञानेश्वरी, बरोबरच नामदेव गाथा, भावार्थ रामायण इत्यादी संत-साहित्य संशोधित करून शुद्ध स्वरूपात लोकांपुढे ठेवले. ज्ञानदेव आणि प्लेटो, ईश्वरवाद, अध्यात्मवादाची मूलतत्त्वे, अभंग-संकीर्तन—भाग १,२,३, ज्ञानदेव चरित्र, वारकरी पंथाचा इतिहास, गीतेच्या श्लोकावर प्रवचने, जोग महाराजांचे चरित्र इ. मौलिक ग्रंथ लिहिले.

धार्मिक ग्रंथांची पारायणे करण्यापेक्षा त्यातले विचार आचरणात आणा; धर्माला अध्यात्माची जोड द्या; धर्म म्हणजे आत्मधर्म, तो साधण्यासाठी भक्तिप्रधान, उदार भागवतधर्माची गरज आहे, असे विचार त्यांनी मांडले.

महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या अंतःकरणात प्रेमादराचे स्थान मिळविले. जुन्या परंपरा आणि नव्या कल्पना यांमध्ये भावभक्तीचा जिवंत जिव्हाळा निर्माण करून त्यांची सोनोपंतांनी सोज्ज्वळ सांगड घातली.

संतांचा धर्म आणि विद्यमान अणुयुगाचे मर्म यांचा समन्वय त्यांच्या विचारात, उक्तीत आणि वृत्तीत आढळतो. भक्तिमार्गाला अद्ययावत शास्त्रशुद्ध कल्पनांची जोड देऊन सोनोपंतांनी या पंथाला व्यापक, नित्य, नवे, चैतन्ययुक्त आणि बुद्धिप्रामाण्यवादी रूप दिले.

तत्त्वज्ञान, अध्यात्म हे ग्रंथांत ठेवावयाचे विषय नाहीत. ते सरळ, सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य सोनोपंतांनी जन्मभर केले. पाश्च्यात्त्य आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला. त्याचे फलित म्हणजे त्यांचा प्लेटो व ज्ञानेश्वर यांच्यावरील ज्ञानदेव आणि प्लेटो हा तुलनात्मक ग्रंथ होय.

Monday, June 10, 2024

पद्मसंभव

 


हिमालय परिसरात बुद्धां प्रमाणेच पद्मसंभव  ही देखिल अतिशय आदराची, पूजनीय व्यक्ती!

पद्मसंभव हे एक गुढच आहे. यांचा निश्चित काळ ज्ञात नाही. काहींच्या मते, ते आठव्या शतकात होऊन गेले. तर काहींच्या मते ते पहिल्या शतकातच होऊन गेले.

प्रसिद्ध प्राचीन नालंदा विद्यापीठात पद्मसंभव शिकले. त्यांनी प्रगाढ अभ्यास केला. त्यांची हुषारी, अभ्यास आणि व्यासंग पाहून नालंदामधेच त्यांची अध्यापक म्हणून नेमणूक झाली. अनेक वर्ष त्यांनी तिथे शिकवले.

दरम्यान आजच्या लडाख परिसरात बौद्ध मॉनेस्ट्री निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले. परंतु अनेकदा प्रयत्न करूनही तसे घडेना. काही ना काही विघ्न येत असे. शेवटी या विघ्नांचा नाश केवळ पद्मसंभवच करू शकतील अशा विचारांतून तेथील महंतांनी पद्मसंभव यांना विनंती केली. अन त्याला मान देऊन पद्मसंभव लडाखला गेले.

पद्मसंभव यांनी आपल्या ज्ञान, तंत्र यांमार्फत तेथील वाईट शक्तींना पराभूत केले. आणि तिथल्या महंतांना वाईट शक्तींशी लढताना स्वत: च्या आत असणारे सामर्थ्य जागवण्याचा मंत्र अन तंत्र शिकवले. त्यांची ही शिकवण बौद्ध धर्मामधे समाविष्ट केले गेली.
पद्मसंभव यांचा भर तंत्रविद्येवर जास्ती होता. हिंदु धर्मातील नाथ संप्रदायातील तंत्रविद्या आणि पद्मसंभव यांची तंत्रविद्या यात साम्य आढळते.

अशी नवीन पद्धत शिकवणारा हा दुसरा बुद्ध!  एकीकडे जास्तीत जास्त जीवनाशी जोडणारी आणि दुसरीकडे जास्तीत जास्त अध्यात्मिक पातळीवर जागृती करणारी अशी ही पद्मसंभव यांची शिकवण!

लडाख सारख्या अतिशय टोकाच्या ( एक्स्ट्रिम) निसर्गामधे रहाण्यासाठी ही विचारसरणी अतिशय उपयुक्त ठरली. आणि म्हणूनच पद्मसंभव यांना बुद्धांच्या बरोबरच मानाचे स्थान बौद्ध धर्मामधे आहे.

Thursday, May 9, 2024

8. न्या. मा. गो. रानडे

भारताच्या इतिहासात एकोणिसावे शतक हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या शतकामध्ये सुरु झालेल्या प्रबोधन प्रक्रियेने येथील समाजाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. समाजातील अनेकविध गोष्टींमध्ये याच काळात मोठे आणि महत्वपूर्ण बदल घडून आले. येथील समाजजीवनातील धर्मकल्पना, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षणपद्धती, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, वाङमय, न्यायव्यवस्था या सर्वांवर प्रबोधनाने आपली छाप उमटवली.

राजा राममोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग, दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, म. फुले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गो.ग. आगरकर, लो. टिळक या आणि अशा अनेकांनी प्रबोधनाची धुरा सांभाळली.

सर्वांगीण सुधारणा हे भारतीय प्रबोधनाचे वौशिष्ट्य होय. समाजातील सर्व घटकांबाबत या प्रबोधन काळात विचारमंथन झाले. या प्रबोधनाचे एक उत्तम उदाहरण म्हणून न्या. म.गो. रानडेंचे विचार आणि कार्य यांकडे पाहता येते.

इ.स. १८४२ साली नाशिकमध्ये महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला. कोल्हापूर, मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश व पुढे सर्न्यायाधीश म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली. पुढे बदली निमित्याने पुण्यात आल्यावर न्या. रानडेंचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्व आघाड्यांवर कार्य सुरू झाले.

भारतीय समाज, भारतीय व पाश्चात्य परंपरा, भारतीय व पाश्चात्य ग्रंथ आणि भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान या सर्वांच्या सखोल अभ्यासातून त्यांच्या विचारांना खोली प्राप्त झाली होती. एकीकडे येथील संतपरंपरा आणि दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवाद या दोन्हींचा समन्वय येथील सुधारणेसाठी त्यांनी योग्य मानला.

न्या. रानडेंच्या मते, समाज हा एखाद्या सजीवाप्रमाणे असतो. समाजाची धर्म, राजकारण, अर्थकारण ही विविध अंगे एकमेकांशी संलग्न असून, एकमेकांना पूरक असतात. एका शरीराचे काही अवयव दुबळे आणि काही शक्तीमान असे असू शकत नाहीत. तसेच मानवी समूहाचे काही भाग सुधारलेले आणि काही भाग मागासलेले असू शकत नाहीत. समाजातील विविध भागांची एकत्रित प्रगती होणे हे न्या. रानडेंनी आवश्यक मानले.

भारतातील सामाजिक परिस्थितीचा विचार करताना येथील समाजातील विविध समस्यांबद्दल न्या. रानडेंनी विचार मांडले. धर्म, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षण, इ. बाबत सुधारणा त्यांनी सुचवल्या. येथील समाजव्यवस्थेमध्ये काही दोष आहेत आणि त्यात सुधारणा घडवून आणायच्या, तर काही मूलभूत बदल करावे लागतील याची जाणीव न्या. रानडेंनी करून दिली. येथील समाजातील दोष - उदा. कुपमंडूक वृत्ती, तुटकपणा, ग्रंथप्रामाण्य, जातीभेद, चुकीच्या रुढी-परंपरांना चिकटून राहणे, दैववाद, इतिहासाबद्दलची अनास्था या सर्वांना दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मांडले. कोणत्याही समाजामध्ये बदल सहजासहजी होत नाहीत, तसेच ते अचानकही होत नाहीत; यावर न्या. रानडेंचा विश्वास होता.

समाजात वेगवेगळ्या मनोवृत्तीचे लोक असतात आणि या सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा करावयाची असल्याने सुधारणेचे तीन मार्ग त्यांनी सुचवले. समाजातील काही बदल परंपरेचा, धर्माचा आधार घेऊन केले पाहिजेत; काही बदल बुद्धीला पटेल अशा तर्कशुद्ध विवेचनाने घडवून आणले पाहिजेत; तर काही बदलांसाठी प्रसंगी कायद्याची मदत घेतली पाहिजे असे न्या. रानडे मानत.

समाजव्यवस्थेतील बदल ताबदतोब साध्य होणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. सामाजिक सुधारणेसाठी विविध प्रवृत्तीच्या लोकांना आणि विविध संस्थांना एकत्र आणून सुधारणेस योग्य अशा वातावरण निर्मितीसाठी न्या. रानडेंनी प्रयत्न केले. सार्वजनिक सभेतील त्यांचे कार्य याची साक्ष देते.

भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करताना मुख्यत: तीन गोष्टींवर त्यांनी भर दिला. ब्रिटिश राज्यकर्ते गोळा करीत असलेली खंडणी, व्यापाराच्या बदललेल्या स्वरूपातून होणारी हानी आणि भारतीयांची उद्योगाप्रति असलेली उदासीनता.

ब्रिटिश राज्यकर्ते हिंदुस्थानामध्ये राहून राज्य करीत नसल्याने येथील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला. महसूल, इतर कर, अधिकार्‍यांचे पगार, कर्जाचे व्याज इ. मार्फत हिंदुस्थानातील पैसा इंग्लंडमध्ये जात होता. याला न्या. रनडेंनी 'खंडणी' मानले. ब्रिटिश काळात व्यापाराच्या स्वरूपात बदल झाला.

कच्च्या मालाची निर्यात आणि पक्क्या मालाची आयात वाढली. त्यामुळे येथे येणार्‍या पैशापेक्षा येथून बाहेर जाणार्‍या पैशामध्ये वाढ झाली. आकडेवारीच्या सहाय्याने न्या. रानडेंनी हे सिद्ध केले. येथील लोकांची बचत न करण्याची वृत्ती आणि उद्योगाप्रति असलेली उदासीनता यांमुळे येथील पैशाच्या वाढीला चालना मिळाली नाही, असे मत त्यांनी मांदले.

येथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकर्‍यांच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालणे, उद्योगीकरणाला प्रोत्साहन देणे, उद्योग व शेतीवर सरकारचे नियंत्रण असणे, व्यापारात समतोल राखणे इ. मार्ग त्यांनी सुचवले. तत्कालीन विविध आर्थिक विचारप्रणालींच्या सखोल अभ्यासातून त्यांनी, 'हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती आणि त्यावरचे उपाय' यावर विवेचन केले.

राजकीय संदर्भात विचार मांडताना कायद्याचे राज्य, कायद्याची अंमलबजावणी, जनतेचे हक्क आणि कर्तव्ये, समानता, संसदेतील प्रतिनिधित्व यांचे महत्व त्यांनी विशद केले. या सर्व गोष्टी प्राप्त करावयाच्या तर जनतेने आवश्यक तर सनदशीर मार्गांनी चळवळ उभी केली पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. मात्र ही चळवळ टप्प्या-टप्प्याने केली पाहिजे असे मतही त्यांनी मांडले. 'स्वाभाविक विकासक्रमाच्या अनुषंगाने जे नजिकचे उद्दिष्ट्य आपल्या दृष्टिपंथात येईल त्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आणि औचित्य व व्यासबुद्धी यांच्याशी सुसंगत अशा तडजोडीच्या वृत्तीने ते प्राप्त करून घायचे' असे धोरण ठेवण्याकडे न्या. रानडेंचा कल होता. म्हणूनच, सार्वजनिक सभेच्या मार्फत लोकांना राजकीय शिक्षण देण्याचा त्यांचा मानस होता.

न्या. रानडे हे स्वभावाने नेमस्त व संयमी होते. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश व अतिरेकीपणा हे त्यांच्या प्रकृतीमध्ये नव्हते, तसेच परंपरेचा धागाही त्यांनी तोडून टाकला नाही. प्रा. गं. बा. सरदार लिहितात त्याप्रमाणे, ' आतताईपणे परंपरेची मोडतोड करण्यापेक्षा संथपणे तिची पुनर्घटना करण्यावर त्यांची भिस्त होती.' मराठ्यांच्या इतिहासाचे परिशीलन करताना न्या. रानडेंची ही भूमिका दिसते.

न्या. रानडे यांच्यावरील पाश्चात्य उदारमतवादाचा प्रभाव, त्यांची समन्वयवादी वृत्ती आणि क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर त्यांचा असणारा विश्वास यांमुळे त्यांचे सुधारणेबाबतचे विचार आणि कृती ह्या नेमस्तवादी होत्या. कोणत्याही टोकाला न जाता, जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन, कोणालाही न दुखावणारे मार्ग त्यांनी स्वीकारले. लोकापवाद वा व्यक्ती दुखावल्या जाण्यापेक्षा वेळप्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांनी पसंत केले. कोणत्याही सुधारणेसाठी सक्तीपेक्षा संमतीलाच त्यांनी प्राधान्य दिले.

एकोणिसावे शतक सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. मध्ययुगीन परंपरा ते आधुनिक मूल्ये यांच्यातील तो संक्रमणकाळ होता. एकीकडे ब्रिटिश राजवटीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशपूर्व परंपरेची ओढ आणि दुसरीकडे मध्ययुगीन जीवनपद्धतीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशकालीन मूल्यांची ओढ अशी दोलायमान स्थिती त्या काळात होती. ब्रिटिश राज्याचे दोष दिसत होते; पण त्यामार्फत येणार्‍या आधुनिक मूल्यांचा स्वीकार आवश्यक वाटत होता. अन परंपरेतील दोष दिसत होते; पण आपल्या स्वराज्याचा उच्चार-आचार आवश्यक वाटत होता. या दोन्हींचा योग्य समन्वय न्या. रानडेंनी आपल्या विचार व कार्यात साधला होता.

ब्रिटिश राज्यातली राजकीय धोरणे, आर्थिक धोरणे, शेतकर्‍यांवरील अन्याय, पाश्चात्य आर्थिक विचारप्रणाली यांविरुद्ध त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट मांडणी केली. आणि त्याच बरोबर पाश्चात्य उदारमतवाद, उद्योगशीलता, व्यक्तीवाद त्यांनी तितक्याच स्वच्छ आणि स्पष्टपणे उचलून धरला. येथील चुकीच्या रुढी-परंपरा, ग्रंथप्रामाण्य यांवर बोट ठेवले. आणि येथील मराठ्यांच्या इतिहासाचे अत्यंत संयमित असे परिशीलनही केले. पाश्चात्य संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये स्वीकारताना आपल्या संतपरंपरेचे श्रेष्ठत्वही त्यांनी अधोरेखित केले.

तत्कालिन समाजाची नस त्यांनी बरोब्बर ओळखली होती. ' येथील समाज स्थितीशील आणि पुराणप्रिय आहे. जरा कुठे नव्याचा वास आला की तो बुजतो.' त्यामुळे कोणताही बदल सुचवताना तो नवा आहे असे सांगण्यापेक्षा जुन्या परंपरेचे हे नवे रूप आहे असे सांगण्याचा प्रघात न्या. रानडेंनी पाडला. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांचा उपयोग त्यांच्या मतपरिवर्तनासाठी केला, तर समाजपरिवर्तनासाठी ते अत्यंत उपयोगी साधन ठरेल, असे ते मानत.

एकविसाव्या शतकात, आज भारतासमोर पुन्हा पूर्वीसारखी दुही उभी आहे. एकीकडे पाश्चात्यांचे आर्थिक वर्चस्व व त्यातून उदभवणारे तोटे दिसताहेत. परंतु त्यामार्फत येणार्‍या माहिती-तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य आहे. दुसरीकडे येथील 'विकसनशील' परिस्थितीतील अपूर्णता व दोष दिसताहेत. परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची ऊर्मीही आहे. या नव्या संक्रमणावस्थेत न्या. रानडेंचे समन्वयवादी, संयमित परंतु अचूक व नि:संदिग्ध विचार मार्गदर्शक ठरावेत. भारतीय संस्कृतीतील सातत्य आणि पाश्चात्य संस्कृतीतील बदल या दोन्हींचा मिलाफ आपण कसा साधू यावर आपला भावी इतिहास अवलंबून राहील.

(सिरिजसाठी रिपोस्ट)

Saturday, May 4, 2024

आजची गरज

 सुधारकांची सिरिज लिहिते आहे त्यामागे काही विचार आहे.  त्याकाळात विभागलेला समाज जोडण्यासाठी शिक्षण, समाज सुधारणा, जातीभेदांचे खंडन असा गोष्टी या सुधारकांनी केल्या. सर्व समाजाला एकत्र करून पुढे नेले. म्हणून तर आपल्या समाजात स्त्रीशिक्षण, बालविवाह बंदी, विधवापुनर्विवाहाला चालना, सर्वांना शिक्षण, सर्वांना नोकरीव्यवसायाची संधी, जातीभेद नष्ट होत गेला.

जेव्हा जेव्हा समाजात दुफळी माजवली जाते, भेदाभेद अधोरेखित (हायलाईट)  केला गेला तेव्हा तेव्हा इथला समाज गर्ततेत गेला. अन जेव्हा जेव्हा समाज एकोप्याने चालला, एकमेक भेद असून- ते स्विकारून, हे विश्वची माझे घर ही बंधुत्वाची भावना घेऊन चालला तेव्हा तेव्हा आपला समाज जास्त घट्ट बनला, जास्त सुधारलेला झाला.
इतिहास हे सतत सांगतो अन तरीही आपण पुन्हा पुन्हा समाजातल्या दुफळीला वर काढतो. 
यातून कोणाचा नक्की फायदा होतो? ज्या समाजातल्या घटकाला आपण वेगळे काढू पहातो, तो घटक हजारो वर्ष आपलाच आहे न? शरीराचा एखादा भाग दुखावला,जास्त अटेंक्शन मागू लागला तर तो तोडून टाकतो का आपण? की त्याला योग्य ते अटेक्शन देऊन, त्याची नीट देखभाल करून त्याला सुधारतो?
करोडो लोकांमधल्या काहींनी चुका केल्या म्हणून त्यांच्या सगेसोयऱ्यांसकट त्यांना समाजबहिष्कृत करणार का, रादर करू शकणार का आपण? अन मग असे हाताची बोटं दुखावली म्हणून हातच छाटून टाकून सशक्त समाज बनणार का आपण?
अन चुका कोणाकडून होत नाहीत? प्रत्येक व्यक्ती कधी न कधी चुकते. समाजाचा प्रत्येक घटक कधी न कधी चुकतो.
दलित वर्गाला उच्चवर्णीयांनी चुकीची वागणूक दिलीच न? मग उच्चवर्णीयांना छाटून टाकलं का समाजाने?
सॉरी कोणाला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, कोणी दुखावले गेले तर माफीही मागते🙏🏻
पण समाजातली ही दुफळी अजिबात बघवत नाही, जीव कासावीस होतो. म्हणून लिहिलं. विष भराभर पसरत चाललय, त्यावर उतारा केवळ प्रेमाचा आहे, सहानुभूतीचा आहे, सहसंवेदनेचा आहे! 
एकमेकांना सावरूत, मदत करू. सनातन धर्म हेच सांगतो, विश्वबंधुत्व सांगतो.

Wednesday, May 1, 2024

7. कृष्णशास्त्री चिपळूणकर (1824-1878)


कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म पुण्यातला. लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून तर ओळखले जात. पुण्यातल्या पाठशालेमध्ये त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले त्यांची हुशारी पाहून त्यांचे गुरुजन त्यांना, बृहस्पती म्हणून संबोधत. पुढे आपल्या गुरूंच्या आपल्या आदेशानुसार पुना कॉलेजमध्ये इंग्रजीचा अभ्यास करायला कृष्णशास्त्रांनी सुरुवात केली. संस्कृत व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. अलंकार, न्याय व धर्म या तीनही शास्त्रांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. याशिवाय अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि इतर विषयांचेही अध्ययन त्यांनी केले. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी 1852 मध्ये अनुवादक म्हणून सरकारी नोकरीमध्ये प्रवेश केला. पुढे पुण्याच्या पाठशाळेमध्ये त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम केले.  दक्षिणा प्राइस कमिटीचे काही काळ ते चिटणीस होते. पुना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. कृष्णशास्त्री हिंदू धर्माचे कट्टर पुरस्कर्ते होते.  ख्रिश्चन मिशनरींच्या धर्मप्रसाराला आणि हिंदू धर्मविरूद्ध ते करत असलेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी चिपळूणकरांनी "विचारलहरी" नावाचे वृत्तपत्र काही काळ चालवले. पुना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य असताना "शाळापत्रक" हे नियतकालिकेही त्यांनी चालवले.

मराठी ग्रंथकार म्हणून कृष्णशास्त्रांना मान्यता मिळाली. अलौकिक बुद्धिमत्ता, संस्कृत आणि इंग्रजी शब्दांना भाषांवरील प्रभूत्व आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे जनमानसात त्यांना मान प्राप्त झाला. पाश्चात्य साहित्याचा त्यांचा खूप अभ्यास होता. पौर्वात्य आणि पश्चिमी ज्ञान प्रवाहांचा संगम त्यांच्यामध्ये झालेला होता.

कृष्णशास्त्रींनी कालिदासांच्या मेघदूताचा केलेला मराठी अनुवाद अतिशय गाजला. शास्त्रीय विषयांवरील लेखनही सोपे करून दाखवण्याची हातोटी त्यांची होती. आरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी हा ग्रंथ कृष्णशास्त्रींनी मराठीत आणला, आणि अद्भुतरम्य कथाविश्वाचे दालन मराठी साहित्याला उपलब्ध करून दिले.

कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी अनेक ग्रंथ लिहिले.  अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी, पद्यरत्नावली, सॉक्रेटिस्टचे चरित्र, रसेलस, अनेक विद्यामूलतत्व संग्रह,  अर्थशास्त्र परिभाषा, मराठी व्याकरणावरील निबंध, संस्कृत व्याकरणावरील निबंध अशा विविध विषयांवर चिपळूणकरांनी लेखन केले.
ग. त्र्यं. माडखोलकरांनी यांनी लिहिल्या प्रमाणे, ‘‘कृष्णशास्त्री हे आधुनिक महाराष्ट्राचे पहिले भाषाप्रभु, पहिले शब्दशिल्पी, पहिले शैलीकार साहित्यिक!" होत.
---