Monday, August 17, 2020

10. असं होतं एक आटपाट जग

(आज अनेक ठिकाणच्या उत्खननांना समर्पक अशी उत्तरं सापडतातच असं नाही। म्हणून मग लेखकाचं स्वातंत्र्य घेऊन ही कथा रचली आहे। खरं खोटं काळच ठरवेल। खऱ्या अर्थाने हा इतिहास ठरेल का हेही मला नाही माहिती। पण मनात आलं ती गोष्ट लिहिली.) 

एक आटपाट जग होतं. हो हो जग होतं. नगर नाही तर चक्क जग होतं. खुप मोठ्ठं होतं. त्याला इतिहासही मोठा होता. दहा हजार वर्षांचा. चकीत झालात ना ?
तर आज मी ही अशी वेगळीच गोष्ट सांगणार आहे, ऐकणार ना?

तर एक होतं आटपाट जग ! खुप मोठमोठी शहरं, खुप मोठमोठ्या इमारती, कितीतरी यंत्र, वाहनं, कितीतरी प्रगती केली होती त्या जगाने. त्यांच्या इमारती तर फार वेगळ्या, अतिशय भक्कम होत्या. कारण माहितीय का? त्या होत्या चक्क दगडांच्या, खरं तर खडकांच्या !

तुम्ही म्हणाल; हात्तीच्या ही तर आज गुहेत राहणा-या माणसाची गोष्ट सांगतेय.

नाही नाही, खरच; खुप प्रगती केलेल्या जगाचीच गोष्ट सांगतेय. पण त्यांच्या इमारती होत्या खडकांच्या. हे कसं शक्य आहे ना? तर ऐका हं ।

त्या जगात अनेक वर्षांपूर्वी एका शात्रज्ञाने एक फार वेगळा शोध लावला. निसर्गातील विविध गोष्टींचा अभ्यास करताना त्याच्या मनात आलं की आपण दगडाचा अभ्यास का बरं करत नाही? वेगवेगळे धातू आपण शोधले, त्याचा वापर आपण करतो तर दगडाचा का नाही? आणि मग त्याने प्रयोगशाळेत खुप प्रयत्न केले आणि निसर्गात असतो तसाच दगड प्रयोगशाळेत त्याने तयार केला. त्या दगडाचा रंग जरा वेगळा, जरा लालसर होता. पण अतिशय मजबूत दगड त्याने निर्माण केला. महत्वाच हे की हा दगड विशिष्ट पद्धतीने वितळवता येत असे आणि त्याला विशिष्ठ पद्धतीने गार केला की तो हव्या त्या आकारात तयार होत असे.

या शोधामुळे झालं असं की जसं लोखंड वितळवून ते हव्या त्या साच्यात ओतून गार करून हवा तो आकार करता येतो; तशाच दगडाच्याही हव्या त्या वस्तू बनवता येऊ लागल्या. अन मग त्या काळात अनेक उत्तम उत्तम दगडी इमारती तयार झाल्या. अतिशय सुबक, सुंदर आणि अतिशय भक्कम ! शिवाय स्वतःचा लालसर छान रंगाच्या बरं का!

आता दगड कोरून शिल्प करण्याची गरजच नाही उरली. दगड वितळवायचा, हव्या त्या साच्यात ओतायचा. गार झाला की अप्रतिम सुंदर शिल्प तयार.

अशीच अनेक बाबतीत या जगाने प्रगती केली होती. त्या त्या प्रगतीची माहितीही त्याने लिहून ठेवली होती. असं सगळं छान चालू होतं. कधी कधी तिथल्या लोकांच्यामधे काही वाद होत असत. पण ते सोडवलेही जात. म्हणतात ना रामराज्य तसं अगदी आलबेल चाललेलं त्या जगात !

पण प्रत्येक गोष्टीत जसं काही संकट येतं तसच याही जगात झालं. नक्की कशामुळे कळलं नाही पण अचानक हवामान तापू लागलं. नदी नाले आटू लागले. जी जमीन अतिशय सुपीक होती ती कोरडी होऊ लागली. हळुहळू सगळीकडे वाळवंट तयार होऊ लागले. सगळे हवालदिल झाले. निसर्गाचा हा कोप का याचा शोध घेऊ लागले. पण काहीच कारण कळेना. तशात शास्त्रज्ञांनी शोध लावला की उत्तर आणि दक्षिण धृवांवरचे बर्फाचे डोंगर उष्णतेने वितळू लागले आहेत. आणि त्यामुळे समुद्राची पातळी उंचावते आहे.

जगामध्ये एकच भीतीची लाट उसळली. खुप जुन्या काळात त्यांच्या धार्मिक ग्रंथांमधे कधी काळी लिहून ठेवले होते की फार फार पूर्वी जगबुडी झाली होती. समुद्र उंचावला होता आणि सगळी शहरं, सगळ्या वसाहती त्यात बुडून गेल्या होत्या. पण आजवर ही एक गोष्ट म्हणुन तीही सांगोवांगी गोष्ट म्हणुन मजेत उडवून लावलेली सगळ्यांनी. पण आता हे भावी वास्तव म्हणुन समोर उभं राहिलं होतं. सगळी मानवी जमात धोक्यात आली होती. आजवर केलेली सगळी प्रगती पाण्यात वाहून जाणार होती.

पण आता हाती फार काळ नव्ह्ता. शक्य तितक्या उंच डोंगरावर जाण्याचा विचार सगळे करू लगले. त्यातून अनेक संघर्ष घडू लागले. सगळ्यांनाच उंच डोंगरावर जायच होतं. पण हे शक्य नव्हतं. शेवटी सगळ्या महत्वाच्या व्यक्तींनी एकत्र येऊन ठरवलं की यावर काही उपाय केला पाहिजे, काही निर्णय घेतला पाहिजे. मग त्यांनी ठरवलं की आपल्या प्रगतीचे महत्वाचे टप्पे लिहून, काही अती महत्वाच्या गोष्टी घेऊन, काही लोकं जगातील सर्वात उंच पर्वतावर जातील. बाकी सर्वांनी आपल्या जवळच्या उंच डोंगरावर आसरा घ्यायचा.

शेवटी काहीच लोकं जिवंत रहाणार हे आता सर्वांना पटले होते. किमान तितपत शहाणपण, सामंजस्या त्या जगात अस्तित्वात होते. आणि मग म्हणूनच सर्व प्रगतीचे तपशील, महत्वाची यंत्र, काही हुषार माणसं आणि काही शहाणी माणसं, काही बलवान माणसं या ऊंच पर्वतावर जायला निघाले. यांमध्ये स्त्रिया, पुरुष, काही तरुण मुलंमुली यांचा समावेश होता.

बर्फ आता फारच भराभर वितळत होता. आधी समुद्रकिनार्‍यावरच्या शहरांचा त्याने घास घेतला. हळू हळू करत सर्वच सपाट प्रदेशात समुद्राच पाणी पसरलं. अन मग एक दिवस आकाश झाकाळून गेलं. वातावरणात एक भयाण शांतता आली. श्वासही घेता येणार नाही इतकी हवा विरळ झाली. अन जेमतेम काही तासातच पाण्याची एक प्रचंड राक्षसी लाट जमिनीवर धाऊन आली. सपाट जमीन, उंचवटे, छोटे छोटे डोंगर, मोठे डोंगर, अगदी उंच पर्वतही या लाटेने गिळंकृत केले. जगातला सर्वात मोठा पर्वत; जिथे महान लोक आश्रय घेऊन होते तिथेही या लाटेने तडाखा दिला.

जगाचा महाप्रलय ! संपूर्ण जग या प्रलयात पाण्याखाली बुडालं. आणि मग आली ठंडीची एक महाभयंकर मोठी लाट! अन मग अनेक वर्ष जगभर बर्फाचे राज्य सुरुच राहिले.

काय झालं त्या जगाचं? तिथल्या माणसांचं? तिथल्या प्रगतीच??????

अनेक प्रश्न प्रश्न प्रश्न !!!

उत्तरं कशाचीच नाहीत. मी म्हटलं ना सुरुवातीला; वेगळीच गोष्ट सांगणार आहे म्हणून !
कधी कधी या हरवलेल्या जगाचे काही पुरावे सापडतात कुठे कुठे. कधी एखाद्या उंच पर्वतावर एखाद्या प्रार्थना स्थळात काही अगम्य लिपीतली भुर्जपत्रे सापडतात. कधी एखाद्या उंच वाळवंटी पर्वतावरच्या गुहेतली पत्र, वस्तु. कधी एखाद्या पर्वतावरची अनाकलनीय बांधकामं. प्रचंड मोठी दगडी बांधकामं. जमिनी खालच्या नऊ स्तरावरच्या गुहा. एकाच खडाकात उलटे कोरलेले प्रार्थनास्थळ. तर कधी खोल समुद्रात मोठमोठ्या दगडी इमारती ....

कितीतरी मोठी यादी आहे, न संपणारी. पण त्याचा अर्थ लावणं हे मात्र हातात नाही, काही पुरावे नाही, काही क्लुज नाहीत! काही नाही...

ना कोणी राजपुत्र आला संकटावर मात करायला. ना उत्तरं सांगायला कोणी ऋषी आले. ना जादुची कांडी फिरली. ना झोपलेल्या राजकन्येला कोणी उठवायला आलं.

काहीच घडलं नाही या आटपाटच्या जगात. पण म्हटलं नं, वेगळीच गोष्ट सांगणार आहे आज...

तर असं होतं एक आटपाट जग!

---

नुकतीच एक चर्चा ऐकली. जिऑलॉजिसिटची मुलाखत आहे. जरूर पहा, ऐका https://youtu.be/zSjnvlDWwrE

No comments:

Post a Comment