Sunday, November 6, 2022

लोकनायक जयप्रकाश नारायण

बिहारमधील गंगा--शरयू नद्यांच्या संगमाच्या गावी सिताबदियारा येथे ११ ऑक्टोबर १९०२ या दिवशी जयप्रकाश नारायण यांचा जन्म झाला. एक मध्यमवर्गीय, सरकारी अधिकारी असलेले हरसूदयाळ हे त्यांचे वडील आणि प्रेमळ आणि कर्तबगार फुलराणी ही त्यांची आई. जयप्रकाश लहानपणापासून शांत आणि गंभीर वृत्तीचे होते. त्यांचे शालेय शिक्षण पाटणा येथे झाले. मोठेपणी शास्त्रज्ञ व्हायचे या विचारांतून विज्ञान शाखेचे महाविद्यालयीन शिक्षण घेणे त्यांनी सुरू केले. दरम्यान बंगालमधील क्रांतिकारकांचे आणि त्यांच्या क्रांतिकार्याचे आकर्षण तरुण जयप्रकाशना वाटले. याच सुमारास बिहारचे नेते ब्रजकिशोर प्रसाद यांची कन्या प्रभावतींशी जयप्रकाश यांचा विवाह झाला. ब्रजकिशोर प्रसाद राष्ट्रीय चळवळीतील अनेक नेत्यांशी जवळून संबंधित होते. त्यांच्यामुळे राजेंद्रप्रसाद, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद इत्यादींशी जयप्रकाशांची ओळख झाली.

१९२० मध्ये म. गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली. सरकारी नोकऱ्या, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, परदेशी माल यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन म. गांधींनी जनतेला केले. १९२१ मध्ये जयप्रकाशांनी या अवाहनानुसार

महाविद्यालय सोडले आणि ते राष्ट्रीय चळवळीत उतरले. परंतु चौरीचौरा प्रकरणामुळे म. गांधींनी ही चळवळ मागे घेतली.

जयप्रकाश पुन्हा शिक्षणाकडे वळले. अमेरिकेत जाऊन शिक्षण घ्यायचे त्यांनी ठरवले. आवश्यक ते आर्थिक पाठबळे नसल्याने अमेरिकेत गेल्यानंतर मिळेल ते काम करून त्यांनी पैसा उभा केला आणि शिक्षण घेतले. वेळप्रसंगी मळ्यात, कारखान्यात, हॉटेलमध्ये वेटर अशी अनेक तऱ्हेची कामे त्यांनी केली, आणि शिक्षण चालू ठेवले. निसर्गविज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करता करता मार्क्स, लेनिन, मानवेंद्रनाथ रॉय, ट्रॉटस्की इत्यादींच्या साम्यवादी तत्त्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी केला. १९२९ मध्ये समाजशास्त्राची एम.ए. ही पदवी घेऊन जयप्रकाश भारतात परतले.

म. गांधींनी भेटण्यासाठी साबरमतीच्या आश्रमात जयप्रकाश गेले. तेथे म. गांधींनी जयप्रकाशांची आणि जवाहरलाल नेहरूंची ओळख करून दिली. दोन समान समाजवादी विचारवंतांची भेट झाली. नेहरूंनी अखिल भारतीय काँग्रेस च्या मजूर विभागाची सूत्रे जयप्रकाशांकडे सुपूर्द केली. मजुरांसाठीच्या विविध योजना जयप्रकाशांनी मांडल्या. दरम्यान म. गांधींनी मिठाचा सत्याग्रह पुकारला. जयप्रकाशही यात सहभागी झाले. याच लढ्यात त्यांना देशासाठी पहिली तुरुंगवासाची शिक्षा झाली. ही शिक्षा संपल्यानंतर पुन्हा मजूर विभागाचे काम त्यांनी सुरू केले. परंतु आईचा मृत्यू, वडिलांचे आजारपण, कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक अडचणी या सर्वांमुळे कडव्या मार्क्सवादी जयप्रकाशांना उद्योगपती बिर्लांकडे सचिव म्हणून काम स्वीकारणे भाग पडले.

भारतातील व जगातील घडामोडी, रशियातील मार्क्सवादाचा प्रत्यक्ष प्रयोग, भारतातील मार्क्सवादी चळवळीऐवजी समाजवादी तत्त्वज्ञानाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली.

दरम्यान, सविनय कायदेभंगाच्या चळवळीत १९३२ मध्ये म.गांधींना तसेच सर्व महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाली. त्यावेळच्या भारतमंत्र्यांना वाटले; काँग्रेस संपली, पण असे झाले नाही. जयप्रकाशांनी चळवळीची सूत्रे हाती घेतली. चळवळ पुन्हा उभी राहिली. अखेर जयप्रकाशांनाही अटक झाली. वृत्तपत्रांमध्ये बातमी झळकली. “काँग्रेस ब्रेन ॲरेस्टेड!”

जयप्रकाशांना नाशिकच्या जेलमध्ये ठेवण्यात आले. तेथे अनेक समविचारी मित्र त्यांना भेटले. जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आच नरेंद्रराव, राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे, मिनू मसानी, युसूफ मेहेरअल्ली इत्यादि नेत्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कामगार, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, विद्यार्थी या सर्वांना एकत्र आणावयाचे ठरवले. या सर्व नेत्यांचा लोकशाही समाजवादावर विश्वास होता. आणि राष्ट्रीय चळवळीत त्यांचा सहभाग

होता. यातूनच १८ मे १९३४ मध्ये 'काँग्रेस समाजवादी पक्ष' ही काँग्रेसांतर्गत संघटना उभी राहिली. पक्षाचे संघटन मंत्री म्हणून जयप्रकाशांची नेमणूक झाली. प्रचारासाठी काँग्रेस सोशालिस्ट नावाचे वृत्तपत्र जयप्रकाशांनी अशोक मेहतांच्या

मदतीने चालवले.

१९३४ च्या काँग्रेस अधिवेशनात विधिमंडळाच्या निवडणुका लढविण्या ठरवले गेले. परंतु जयप्रकाशांनी याला विरोध केला. काँग्रेसचे अनेक नेते त्यामुळे नाराज झाले. पुढे म. गांधींनी जयप्रकाशांचे मत मान्य केले. याच सुमारास

कामगारांची ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस फुटण्याची शक्यता निर्माण झाली. ही फूट थांबविण्यासाठी जयप्रकाशांनी यशस्वी प्रयत्न केले. पुढे मुंबई, उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब, बंगाल आदि प्रांतांत कामगार संघटना रुजल्या. महायुद्ध काळात

जमशेटपूरच्या टाटांच्या लोखंड कारखान्यातील मजूर संघटनेच्या कामात जयप्रकाश स्वतः उतरले. तेथील तार कंपनीच्या कामगारांच्या संपाचे नेतृत्वही त्यांनी केले. याच सुमारास महायुद्धात भारताला ओढण्याबाबत सरकारविरुद्ध लिहिल्यामुळे जयप्रकाशांना अटक झाली.

तुरुंगातही ते स्वस्थ बसले नाहीत. तुरुंगातील कार्यकर्त्यांना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान इत्यादि विषय ते शिकवित. तुरुंगातून सुटका झाल्यावर देशव्यापी लढ्याच्या दृष्टीने संघटना मजबूत करण्यासाठी जयप्रकाशांनी विविध प्रांतातून दौरे काढले. परंतु सरकारने त्यांना पुन्हा अटक केली. देवळी जेलमध्ये त्यांची रवानगी झाली. या तुरुंगात राजबंद्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाला सुरुवात झाली. जयप्रकाशांनी एकतीस दिवसांचे उपोषण केले. अखेर सरकारला त्यांच्या मागण्या मान्य करणे भाग पडले.

१९४२ मध्ये त्यांना हजारीबाग तुरुंगात हलविण्यात आले. याच सुमारास म. गांधींनी चले जाव चळवळ सुरू केली. या चळवळीत भाग घेता यावा म्हणून

जयप्रकाशांनी साहसपूर्ण रीतीने तुरुंगातून पलायन केले. तुरुंगातून बाहेर पडल्यावर राष्ट्रीय चळवळ तीव्र करण्यासाठी जयप्रकाशांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले. गनिमी पद्धतीचे सैनिकी शिक्षण देण्यासाठी आझाद रस्ते संघटनेच्या अनेक शाखा उभ्या केल्या. ब्रिटिश राज्यातील हिंदी पोलीस आणि सैनिकांना स्वातंत्र्य लढ्यात गावकऱ्यांना सामील करून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ब्रिटिश सरकारने जयप्रकाशांना पकडण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु जयप्रकाशांनी भूमिगत राहून कार्य चालूच ठेवले. १९४३ मध्ये अमृतसर येथे त्यांना अटक झाली. लाहोर येथील तुरुंगात त्यांचा अतिशय छळ करण्यात आला.

दुसरे महायुद्ध संपता संपता भारताच्या स्वातंत्र्याच्या विविध योजना मांडल्या जाऊ लागल्या. जयप्रकाशांची तुरुंगातून सुटका झाली. स्वतंत्र भारतामध्ये समाजवादाची स्थापना व्हावी, या विचाराच्या नेत्यांनी १९४८ मध्ये स्वतंत्र समाजवादी पक्ष स्थापन केला.

शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी जयप्रकाशांनी किसान पंचायतीची स्थापना केली. शेतकऱ्यांना स्वतःला अन्यायाची जाणीव व्हावी आणि त्या अन्यायाविरुद्ध त्याने स्वतःच उभे राहावे अशी रचनात्मक शिकवण जयप्रकाशांनी दिली.गावांचा, खेड्यांचा उद्धार करण्यासाठी गावकऱ्यांनीच एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. सरकारी कृपेवर अवलंबून राहता कामा नये, हे सांगून त्यासाठी त्यांनी अनेक गावांमध्ये भूसेना स्थापन केल्या.

शेतकऱ्यांप्रमाणे भारतातील एक महत्त्वाचा गट म्हणजे तरुण विद्यार्थी वर्ग या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी नॅशनल युनियल ऑफ स्टुडंटस ही संघटना स्थापन केली. तसेच कामगार संघटना- किसान संघटना, अखिल भारतीय रेल्वे कामगार

संघटना, कृषक मजदूर संघटना इत्यादि संघटनांच्या उभारणीतही जयप्रकाशांचा मोठा

सहभाग होता.

१९५२ मध्ये भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. पंडित नेहरूंवर समाजवादाचा प्रभाव असल्याने, स्वतंत्र भारतातील भावी कार्यवाही संदर्भ व समाजवादाचा विचार करण्यासाठी १९५३ मध्ये पंडित नेहरूंनी जयप्रकाशांना भेटीसाठी बोलविले. या भेटीत जयप्रकाशांनी चौदा कलमी कार्यक्रम मांडला; परंतु

याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही मात्र होऊ शकली नाही. दरम्यान विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. या चळवळीत जयप्रकाश उतरले. १९५४ च्या गया येथील सर्वोदय संमेलनात जयप्रकाशांनी महत्त्वाची कामगिरी बजाविली. याच संमेलनात त्यांनी स्वत:च्या जीवनदानाची घोषणा केली.

भूदान-ग्रामदान-ग्रामस्वराज्य या चळवळी चालू असताना त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाकडेही लक्ष होते. रशियाच्या पूर्व युरोपमधील साम्यवादी साम्राज्यावादावर टीका करून जगाला सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला. चीन-भारत मैत्रीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्याचा गौरव १९६५ मध्ये मॅगसेस पुरस्काराने केला गेला. हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जागतिक शांततेसाठीच्या कार्याबद्दल त्यांना दिला गेला.

भारतातील बिहार राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी विविध संघटना त्यांनी उभ्या केल्या. बंगालमधील नक्षलवादी चळवळीला थोपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांचे मनपरिवर्तन घडवून, त्यांना समर्पित होण्यास जयप्रकाश यांनी उद्युक्त केले. शिक्षण व निवडणूक प्रणालींमधील सुधारणांसाठी 'यूथ फॉर डेमॉक्रसी' हा अपक्षीय कार्यक्रम त्यांनी सुरू केला. या आणि अशा अनेकविध चळवळी, कार्यक्रम, कृती, विचार जयप्रकाशांनी स्वातंत्र्योत्तर भारतात रुजविल्या.

जयप्रकाशांच्या आयुष्यातील आणखीन एक महत्वाचे पर्व म्हणजे आणीबाणीचा काळ. आणीबाणीच्या काळात जयप्रकाशांनी स्वयंप्रकाशित दीपस्तंभाचे कार्य केले. देशाला हुकूमशाहीच्या गर्तेतून बाहेर काढावयाचे तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असे जयप्रकाशांचे मत होते.

आणीबाणी जाहीर झाली आणि लगेचच जयप्रकाशांना अटक झाली. तुरुंगातच सर्व पक्षांतील विचारवंतांना एकत्र करण्याचे आणि एकमेकांना समजून घेण्याचे काम त्यांनी केले. १९७६ मध्ये जयप्रकाशांच्या निमंत्रणामुळे समाजवादी पक्ष, जनसंघ, संघटना काँग्रेस, भारतीय लोकदल या पक्षांची एकत्रित बैठक झाली. त्याचे फलित म्हणून जनता पक्ष स्थापन झाला. जयप्रकाशांनी जनतेला आवाहन केले. “या निवडणुकीत देशाचे पुढील पन्नास वर्षांचे भवितव्य ठरणार आहे. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही यातून निवड करायची आहे.” जयप्रकाशांच्या या आवाहनाला भारतीय जनतेने प्रतिसाद दिला. १९७७ च्या निवडणुकीत जनता पक्ष बहुमताने निवडून आला.

आणीबाणीत जे झाले ते पुन्हा होऊ नये, स्वातंत्र्याची गळचेपी पुन्हा होऊ नये, लोकशाही अन् स्वातंत्र्य तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचावे, यासाठी जयप्रकाशांनी सर्वंकष क्रांतीची कल्पना मांडली. लोकांची व युवकांची शक्ती पुन्हा वर उसळून येते आहे. तिचा उपयोग भारतीय समाजात रचनात्मक दृष्टीने संपूर्ण क्रांतीकडे करण्यासाठी कसा करावयाचा ते पाहावयाचे आता राहिले आहे. असे जयप्रकाशांनी मांडले. या सर्वकष क्रांतीसाठी देशभर दौरा करावयाचा त्यांचा मानस होता; परंतु प्रकृतीने साथ दिली नाही. त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर ८ ऑक्टोबर १९७९ रोजी जयप्रकाशांनी जगाचा निरोप घेतला.

---






No comments:

Post a Comment