कुलनाम(आडनाव) याचे पुरावे अगदी फार प्राचीन काळापासून काही प्रमाणात सापडत असले तरी त्यांचा सर्रास वापर होत नसे. धार्मिक बाबा, राजकीय बाबींसंदर्भात क्वचित याची गरज असे. दैनंदिन जीवनात याचा वापर नव्हता.
प्राचिन काळी गावापुरताच संपर्क प्रामुख्याने असे. सर्व गरजा गावातल्या गावातच भागवल्या जात असल्याने गावाबाहेर जाण्याची, संपर्काची फारशी गरज नसे. स्वाभाविकच छोट्या गावातले बहुतांश लोकं एकमेकांना ओळखत असत. नुसते नाव पुरेसे असे. नाव अन चेहरा यावरून व्यक्ती ओळखणे शक्य होते; व्यक्ती कोणत्या कुटुंबातली हे ओळखणे शक्य असे. तसेच त्या व्यक्तीचा व्यवसाय, समाजातले स्थानही माहिती असे.
वेगळ्या गावी जाण्याचा प्रसंग आला तर अमुक गावचा, अमुक व्यक्तीचा अमुक नातेवाईक ही ओळख पुरत असे.
ब्रिटिश काळात हळूहळू गाव सोडणे गरजेचे होऊ लागले. पूर्वीचा गावगाडा हळूहळू बदलू लागला; शहरांचा उदय होऊ लागला. व्यापार, प्रशासन, कामकाज यासाठी वेगळी समाजरचना तयार होऊ लागली. आपले पिढीजात गाव सोडून इतरत्र जाणे भाग पडू लागले. अशा परिस्थितीमधे आपली ओळख टिकून रहावी, आपल्या मूळाशी संबंध टिकावा यासाठी व्यक्तीला आपले कुलनाम/ आडनाव लावणे गरजेचे वाटू लागले. तसेच समाजालाही बाहेरून आलेल्या व्यक्तीचा व्यवसाय, समाजातले स्थान याची सर्वसाधारण ओळख होण्यासाठीही हे आडनाव उपयोगी पडू लागले.
या सर्वातून या काळात हळूहळू आडनाव ही संकल्पना समाजात रुजत गेली.
---