Sunday, April 2, 2017

20. मध्य युगाचा शेवट आणि प्रबोधन काळाची सुरुवात

निसर्गाच्या घडामोडीतील मानवची निर्मिती काही  लाख वर्षांपूर्वीची .  त्यातही आजच्या मानवाचा इतिहास  गेल्या एक लाख  वर्षांपासूनचा.
या संपूर्ण इतिहासाचे दोन प्रमुख भाग पडतात. इतिहासपूर्व  काळ आणि ऐतिहासिक काळ .
ऐतिहासिक कालखंडाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे तीन मुख्य भाग पडतात.  प्राचिन प्रगत संस्कृतीचा काळ साधारण इ.स.पू. ५००० ते इ.स. ५०० पर्यंत मानला जातो. सुमेरियन, चिनी, इजिप्त, सिंधु, ग्रीक, रोमन या काही महत्वाच्या संस्कृती. शेती, व्यापार, शासनव्यवस्था, विज्ञान, कला, साहित्य अश विविध अंगांनी या संस्कृत्यानी आपली प्रगती साध्य केली.

कालांतराने या संस्कृती काही कारणांनी एकतर नामशेष झाल्या अथवा तेथील राज्यकर्ते दुर्बळ बनले.  त्यामुळे या संस्कृतीं मधली प्रगती थंडावली.  येथून  पुढील  काळात त्या त्या मानवी समाजामध्ये शिथिलता, धर्माचे प्राबल्य, कर्मकांडांचे महत्व आणि एकूणच आहे त्या परिस्थितीत राहण्याचा कल निर्माण झाला.  स्वाभाविकच प्रगती नाही, नवे विचार नाहीत, नवीन शोध नाहीत अशी काहीशी स्थितिशील जीवनपद्धती या मानवी समुहांनी स्विकारली.  म्हणूनच या कालखंडाला अंधकाराचे युग, तमोयुग असे म्हटले गेले.  हेच ते मध्ययुग!
प्रदेश परत्वे या मध्ययुगाचा कालखंड वेगवेगळा होता. युरोपमध्ये साधारण सहावे ते तेरावे शतक, आशिया खंडात नवव्या शतकापासून ते अठराव्या शतका पर्यंत तमोयुग मानले जाते.
साचेबंदपणा, अराजकता, अंधश्रद्धा, अस्मानता, काम आणि मोबदला याचे विषम वाटप ही या मध्ययुगाची काही ठळक वैशिष्ठ्ये !
कालांतराने याही परिस्थितीमधे बदल होऊ लागला. समाजातील सरंजामदार, धर्मगुरु यांचे महत्व कमी होऊ लागले. राजा, व्यापारीवर्ग, मध्यमवर्ग यांचे स्थान महत्वाचे बनू लागले. ख्रिश्चन मुस्लिम धर्मीयांमधे संघर्ष होऊ लागला. युरोपमधील लोकांचा इतर खंडातील लोकांशी संपर्क वाढू लागला. भौगोलिक शोध, राजसत्तेचा वाढता प्रभाव, नवीन शास्त्रीय शोध, कलेच्या क्षेत्रातील नवीन विचार-प्रयोग सुरु झाले. धर्माबाबत विचार सुरु झाला.
समाजातील ह्या नवीन वैशिष्ठांनी युक्त अशा काळाला प्रबोधन कालखंड ( रेनेसाँ पिरियड) असे संबोधले जातेे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद इ. नवीन आधुनिकतेची मुल्ये या प्रबोधन काळाची देन आहेत.  

या सर्व घडामोडींची सुरुवात झाली ती एका वेगळ्याच घटनेमुळे ! त्याकाळातही युरोपमधील देशांचा  आशिया खंडातील देशांशी  यांचा व्यापार  चालत असे, हा व्यापार  प्रामुख्याने खुष्कीच्या मार्गाने- जमिनीवरील रस्त्यामार्फत. या व्यापारीमार्गावरती एक महत्वाचे ठिकाण होते ते म्हणजे कॉन्स्टॅन्टिनोपल! 
मध्ययुगाच्या शेवटी शेवटी अरबस्थानातील मुस्लिम टोळ्यांची ताकद वाढत गेली. अरबस्थानातील तेव्हाची प्रगतीहि  आपण पाहिली . या त्यांच्या प्रगतीमुळे त्यांची ताकद वाढत गेली. आणि १४५३ मधे या अरबस्थानातील मुस्लिम टोळ्यांनी कॉन्टंटिनेपल जिंकून घेतले. तसं बघायला गेले तर त्या काळात एखादे शहर, एखादा देश जिंकण हरणं सतत होत होतं, कारण या काळात सतत लढाया होतच असत. पण कॉन्टंटिनपलची गोष्टच वेगळी होती. ज्याचा कॉन्टंटिनपलवर कब्जा त्याचा युरोप व आशियाच्या व्यापारावर ताबा. अशी परिस्थिती होती. 

आता पर्यंत या व्यापारावर युरोपीय ख्रिश्चन व्यापाऱ्यांचा मक्ता होता. पण व्यापारी मार्गावरचे मोक्याचे ठिकाण,  कॉन्स्टॅन्टिनोपल मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हाती गेले. अन सगळा खेळ पालटला. पूर्वी व्यापारी ख्रिश्चन अन राज्यकर्तेही ख्रिश्चन. त्यामुळे या व्यापाराला चालना मिळावी म्हणून ख माफक असत. पण आता राज्यकर्ते मुस्लिम अन व्यापारी ख्रिश्चन. स्वाभाविक राज्यकर्त्यांनी कर वाढवले. जो व्यापार पूर्वी अतिशय फायद्याचा होता; आता तो इतका फायद्याचा राहील नाही. स्वाभाविकच आता काय करता येईल? ज्यान्वये पूर्वी सारखा व्यापार फायदेशीर होईल असा विचार करणे भाग पडले. 
अन मग त्यातून कॉन्स्टॅन्टिनोपलच्या ऐवजी दुसरा कोणता मार्ग आपल्याला सापडू शकतो का याचा प्रयत्न सुरु झाला. अनेक खलाशी पुढे झाले. अनेक ख्रिश्चन, युरोपीय राजांनी आर्थिक मदत या खलाशांना देऊ केली. एकुणात व्यापार पुन्हा फायद्याचा व्हावा हि सर्वच युरोपियन लोकांची गरज होती. अन जसे प्रयत्न सुरु झाले; नवे मार्ग सापडत गेले. कोलंबस हा खलाशी नवा मार्ग शोधता शोधता चुकून नवीन भूमीवर  अमेरिकेच्या बेटांवर गेला. तर वास्को ग गामा हा संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून थेट भारतात पोहोचला. तर मॅगेलन याने पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणाच केली. 

एकदा का माणूस विचार करू लागला कि हे विचार करणे सर्वच बाबतीत करू लागतो. या नवीन व्यापारी मार्गांबाबतही तसाच झाले. जर व्यापारासाठी नवीन मार्ग सापडू  शकतो तर इतर बाबतीतही काही वेगळे मार्ग असू शकतील का याचा विचार मध्ययुगीन माणूस करू लागला. मग यातूनच विविध कला- चित्र कला, शिल्पकला, संगीत यांत काही नवीन विचार, प्रयोग सुरु झाले. इतकेच नाही तर एकुणातच आपल्या जीवनपद्धतीबाबत माणूस नवीन विचार करू लागला. मग राजा, देव, धर्म, मूल्य, तत्त्वज्ञान या सर्वांबाबत विचार सुरु झाले. 

तशात आता पर्यंत ख्रिश्चन धर्म हाच श्रेष्ठ धर्म असे युरोपीय जगात मानत होते. पण असे असूनही ख्रिश्चन आणि मी इस्लाम धर्मीय यांच्यातील युद्धात आता फक्त ख्रिश्चनांचाच विजय अशी परिस्थिती राहिली नाही. आपण समजतो त्यापेक्षा प्रत्यक्षात काही वेगळे घडू शकते, वेगळे असू शकते. आपण आजपर्यंत मानत होतो त्यापेक्षा वेगेळे वास्तव असू शकते याची सुस्पष्ट जाणीव युरोपीय समाजाला होऊ लागली. यामुळे धर्माबाबत नवीन विचार मांडले जाऊ लागले. 

या सर्व घडामोडींमुळे आजवर जे जे मानले ते ते पुन्हा तपासून बघायची प्रेरणा युरोपमध्ये निर्माण झाली. यातूनच मग अनेक नवनवे विचार, तत्वज्ञान, नवनव्या पद्धती युरोपमध्ये मांडलया जाऊ लागल्या. आपली आजवरची सर्व जीवनपद्धती पुन्हा तपासून पाहिली जाऊ लागली. यालाच रेनासान्स किंवा प्रबोधन असे म्हटले जाते. प्र -बोधन म्हणजे प्रकर्षाने बोध होणे - समजणे. दिसणे आणि पाहणे, माहिती आणि ज्ञान. यात जो फरक आहे तो यात  अपेक्षित आहे. एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असते पण तरी ती आपल्याला जाणवत नाही वा आपले लक्ष जात नाही, हे पाहणे वा माहिती.  पण जेव्हा त्या गोष्टी बद्दल आपल्या नीट जाणीव होते , आपल्या मनात त्या  गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद होते तेव्हा ते दिसणे असते, ते ज्ञान असते.  चवदाव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत युरोपमध्ये हे असे  प्रत्येक गोष्टीबाबत जाणीवपूर्वक ज्ञान होणे घडू लागले. आणि म्हणून या काळाला युरोपचा प्रबोधन काळ असे म्हटले जाते. या प्रबोधन काळात काय काय बदल झाले ते आपण पुढे पाहू. 


No comments:

Post a Comment