हिमालय परिसरात बुद्धां प्रमाणेच पद्मसंभव ही देखिल अतिशय आदराची, पूजनीय व्यक्ती!
पद्मसंभव हे एक गुढच आहे. यांचा निश्चित काळ ज्ञात नाही. काहींच्या मते, ते आठव्या शतकात होऊन गेले. तर काहींच्या मते ते पहिल्या शतकातच होऊन गेले.
प्रसिद्ध प्राचीन नालंदा विद्यापीठात पद्मसंभव शिकले. त्यांनी प्रगाढ अभ्यास केला. त्यांची हुषारी, अभ्यास आणि व्यासंग पाहून नालंदामधेच त्यांची अध्यापक म्हणून नेमणूक झाली. अनेक वर्ष त्यांनी तिथे शिकवले.
दरम्यान आजच्या लडाख परिसरात बौद्ध मॉनेस्ट्री निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले. परंतु अनेकदा प्रयत्न करूनही तसे घडेना. काही ना काही विघ्न येत असे. शेवटी या विघ्नांचा नाश केवळ पद्मसंभवच करू शकतील अशा विचारांतून तेथील महंतांनी पद्मसंभव यांना विनंती केली. अन त्याला मान देऊन पद्मसंभव लडाखला गेले.
पद्मसंभव यांनी आपल्या ज्ञान, तंत्र यांमार्फत तेथील वाईट शक्तींना पराभूत केले. आणि तिथल्या महंतांना वाईट शक्तींशी लढताना स्वत: च्या आत असणारे सामर्थ्य जागवण्याचा मंत्र अन तंत्र शिकवले. त्यांची ही शिकवण बौद्ध धर्मामधे समाविष्ट केले गेली.
पद्मसंभव यांचा भर तंत्रविद्येवर जास्ती होता. हिंदु धर्मातील नाथ संप्रदायातील तंत्रविद्या आणि पद्मसंभव यांची तंत्रविद्या यात साम्य आढळते.
अशी नवीन पद्धत शिकवणारा हा दुसरा बुद्ध! एकीकडे जास्तीत जास्त जीवनाशी जोडणारी आणि दुसरीकडे जास्तीत जास्त अध्यात्मिक पातळीवर जागृती करणारी अशी ही पद्मसंभव यांची शिकवण!
लडाख सारख्या अतिशय टोकाच्या ( एक्स्ट्रिम) निसर्गामधे रहाण्यासाठी ही विचारसरणी अतिशय उपयुक्त ठरली. आणि म्हणूनच पद्मसंभव यांना बुद्धांच्या बरोबरच मानाचे स्थान बौद्ध धर्मामधे आहे.